बंधुभाव हाच धर्म

स्रोत: विवेक मराठी    दिनांक13-Aug-2019   


राखीपौर्णिमा हा भारतात सर्वत्र साजरा केला जाणारा सण आहे. या पारंपरिक सणाला डॉ. हेडगेवारांनी राष्ट्रीय भ्रातृभावाचा आयाम जोडला. आज संघजीवनात या भ्रातृभावाच्या आधारावर खूप मोठया प्रमाणात काम चालू आहे. आजच्या काळातील धर्म म्हणजे बंधुभाव आहे, हे बंधुत्वाच्या एका स्नेहसूत्रात बांधलेल्या संघाने आपल्या कृतीतून साकार केले आहे.राखीबंधन, राखीपौर्णिमा - संपूर्ण देशभर साजरा केला जाणारा हिंदुचा सण. या सणाबाबत अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक कथा प्रचलित आहेत. बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ तिला रक्षण करण्याचे वचन देत असतो. हा सण बहीण-भावाचे नाते अधिक घट्ट करणारा आहे. देशभर जरी हा सण साजरा केला जात असला, तरी तो एका अर्थाने वैयक्तिक आणि कौटुंबिक स्वरूपाचा आहे. परस्परावरील विश्वास अधिक घट्ट करत नातेसंबंध जपण्याची प्रेरणा देणारा हा सण आहे.

रा.स्व. संघाच्या सहा उत्सवांत राखीबंधन या हिंदूच्या सणाचा समावेश आहे, मात्र त्याचे संदर्भ बदलले गेले आहे. पारंपरिक राखीबंधन सणात बहीण भावाला राखी बांधते, तर संघाच्या उत्सवात एक स्वयंसेवक दुसऱ्या स्वयंसेवकाला राखी बंधतो. राखीबंधन या पारंपरिक सणातून जो नातेसंबंध आणि जी आत्मीयता जपली जाते, त्याला संघाने सामााजिक बंधुतेचे आणि राष्ट्रीय एकात्मतेचे आयाम जोडले आणि कौटुंबिक सण राष्ट्रीय उत्सव झाला. 

संघाच्या उत्सवात एक स्वयंसेवक दुसऱ्या स्वयंसेवकाला राखी बांधतो, एवढया सहज साध्या विषयात गहन अर्थ दडलेला आहे. संघाची प्रारंभापासूनची भूमिका आहे की हे हिंदू राष्ट्र आहे. राष्ट्र ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी एक भाषा, एक वंश, एक संस्कृती इत्यादी गोष्टीचा आधार घेता येऊ शकतो. मात्र आपल्या देशात हे शक्य नाही, कारण अनेक पंथ, उपपंथ, वंश, भाषा इत्यादीची विविधता असल्यामुळे राष्ट्र आणि राष्ट्रीय भावना कशी उभी करायची? प्रत्येकाच्या वेगवेगळया जीवनशैलीतून निर्माण झालेल्या संस्कृतीमुळे विविधतेने व्यापलेल्या आपल्या देशात परस्परपूरकता आणि एकात्मभाव जागृत करण्यासाठी कोणते सूत्र वापरले तर ते उपयुकत ठरेल? या प्रश्नाचे उत्तर बंधुभाव हे आहे.


संघ हाच बंधुभाव जागृत करण्याचा आणि तसा व्यवहार करण्यासाठी प्रयत्न करत असतो. बंधुत्व ही भावनिक संकल्पना आहे. त्यामुळे ती माणसाच्या मनात उत्पन्न व्हावी लागते, त्यासाठी त्याला अनुभूतीची आवश्यकता असते. संघकार्यकर्ते राखीबंधनाचा एक उत्सव करतात, पण वर्षभर तो उत्सव जगत असतात. आपल्या सहज व्यवहारातून, संवादातून बंधुतेची अनुभूती एकमेकांना देत असतात. आपला व्यवहार हाच इतरासाठी आदर्श आहे, आपल्याकडे पाहून, आपल्या जगण्या-वागण्याकडे पाहून दुसरी व्यक्ती त्याचे अनुकरण करणार आहे आणि त्यातूनच समाजात बंधुभाव वाढणार आहे याच भूमिकेतून संघाच्या सहा उत्सवांत राखीबंधन उत्सवाचा समावेश झाला आहे. संघस्थापनेनंतर चार-पाच वर्षांच्या कालावधीत संघसंस्थापकांनी संघकार्यपध्दतीमध्ये विविध उत्सवांचा समावेश केला आणि त्या माध्यमातून स्वयंसेवकांना दिशा देण्याचा प्रयत्न केला. स्वयंसेवकाच्या भ्रातृभावजागृतीतून समाजात एकात्मता आणि त्यातून राष्ट्रभक्तीची प्रेरणा उत्पन्न करण्याचा हा प्रयत्न आहे.

बंधुभाव ही मानसिक, भावनिक संकल्पना असल्यामुळे ती कायद्याने प्रस्थापित करता येत नाही किंवा भौतिक स्वरूपात दाखवता येत नाही. भ्रातृभाव एक तर असतो किंवा नसतो. त्यामुळे भ्रातृभावाची निर्मिती आणि त्याचे संवर्धन हे केवळ मानवी मनावर अवलंबून असते. त्यामुळे ही भावना किंवा मानसिकता निर्माण करणे आणि तिला व्यवहारातून प्रकट करणे आवश्यक असते. संघस्वयंसेवक तसा प्रयत्न करतात. गेल्या 94 वर्षांच्या कालखंडात या व्यवहारातूनच राष्ट्रीय आणि सामाजिक पातळीवरच्या अनेक समस्यांची सोडवणूक करण्यात संघाला यश आले हे याच भ्रातृभावामुळे.

आपल्या देशाच्या राज्यघटनेत स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तिन्ही शब्दांचा उल्लेख आहे. या तीन शब्दांना साकार करण्यासाठीच राज्यघटना तयार झाली आहे. असे असले, तरीही राज्यघटनेत स्वातंत्र्य आणि समता याविषयी विविध प्रकारचे कायदे आहेत. मात्र बंधुतेबाबत कोणताही कायदा नसला, तरी स्वातंत्र्य आणि समता यांच्या प्रस्थापनेसाठी बंधुता अत्यावश्यक आहे. बंधुभाव नसेल, तर स्वातंत्र्याचा आणि समतेचा अनुभव आपण घेऊ शकणार नाही हे डॉ. आंबेडकरांना माहीत होते आणि म्हणूनच त्याच्या तत्त्वज्ञानात बंधुतेला खूप महत्त्व होते. कायद्याने बंधुभाव प्रस्थापित करता येत नाही, त्यासाठी व्यवहारावर भर दिला पाहिजे असा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आग्राह होता. ते म्हणत, ''बंधुभाव हाच आजच्या काळातील धर्म आहे.'' हा बंधुभावाचा धर्म प्रस्थापित करण्यासाठीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रदीर्घकाळ चळवळ चालवली होती.

मानवी जीवनात बंधुभाव उत्पन्न करण्यासाठी आपल्या देशात काही धार्मिक आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न होत असतात. आपण सारी एकाच ईश्वराची लेकरे आहोत, म्हणून आपण परस्परांचे बंधू आहोत असे तत्त्वज्ञान आपल्या संत-महंतांनी सांगितले आहे आणि या तत्त्वाच्या आधाराने आचरण करणारे समाजबांधवही आपल्या आसपास आपण पाहत असतो. वारकरी पालखी सोहळयात आपण या बंधुतेचा अनुभव घेत असतो. मात्र ही बंधुता आध्यात्मिक किंवा धार्मिक पातळीवरची असते.

या साऱ्या पार्श्वभूमीवर युगपुरुष डॉ. हेडगेवार यांनी संघ व्यवहारात आणि जीवनात बंधुतेच्या स्नेहसूत्राला महत्त्वाचे स्थान दिले आणि बंधुतेला राष्ट्राशी जोडले. बंधुभाव कशासाठी, तर राष्ट्रासाठी हा भाव जागवणारा आणि जगणारा समाज उभा राहावा हे डॉ. हेडगेवारांचे स्वप्न होते आणि ते त्यांच्या हयातीत प्रत्यक्षात आले होते. बंधुभावाचे सहजपणे आचरण करत संघस्वयंसेवक जगतो. त्याच्या या जगण्याला जात, धर्म, भाषा, प्रदेश, उपासना पध्दती या सर्वांना पार करून केवळ भारतमातेशी, म्हणजेच या राष्ट्राशी एकरूप होण्याचा मार्ग बंधुभावाच्या माध्यमातून संघाने विकसित केला आहे आणि या बंधुभावाच्या स्नेहसूत्रात आज काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते कामरूप असा उभा-आडवा देश बांधला आहे. केवळ आपण भारतमातेचे पुत्र आहोत, म्हणून परस्परांचे बंधू आहोत ही भ्रातृभावना संघ कशी विकसित करतो? आणि त्या भावनेला व्यवहारात कसे आणतो? हे प्रत्यक्ष अनुभवण्याचा विषय आहे.

एका बाजूला संघ विस्तारतो आहे, समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांना स्पर्श करत राष्ट्रीय विचाराने जगणारा समाज निर्माण करण्यासाठी अथक परिश्रम करत आहे. संघ कसा वाढतो, स्वयंसेवकाचे जीवन कसे असते यांचा अभ्यास न करता संघावर टीकाटिपण्णी केली जाते, तेव्हा टीका करणाऱ्या मंडळींना भ्रातृभाव समजलेला नसतो.

राखीपौर्णिमेसारख्या पारंपरिक सणाला जेव्हा संघासारखी शिस्तबध्द संघटना राष्ट्रीयतेशी जोडते आणि त्याला एक व्यापक आशय प्राप्त करून देते आणि समाज जेव्हा त्यातून होणाऱ्या अभिव्यक्तीचा
, व्यवहाराचा अनुभव घेतो, तेव्हा बंधुभाव हाच धर्म आहे याची त्याला खात्री पटते. .

रवींद्र गोळे

9594961860