ऐ मेरे प्यारे वतन

विवेक मराठी    14-Aug-2019
Total Views |

 

 
माणसाने जमिनीवर रेषा ओढायला सुरुवात केली आणि स्थलांतर या शब्दाचा जन्म झाला. नैसर्गिक आपत्ती, वाढती लोकसंख्या, वाढती बेकारी, शहरी भागात असणाऱ्या रोजगाराच्या संधी, उद्योगधंदा, व्यापार, शहरी जीवनाचे आकर्षण अशी अनेक कारणे आहेत, ज्यामुळे माणसे वास्तवाचे ठिकाण सोडून परगावी, परप्रांती - अगदी परदेशातसुद्धा जाऊ लागली.

 

स्थलांतर म्हणजे नवीन जीवनाची सुरुवात. स्थलांतर म्हणजे आपल्या मातीला, आपल्या परंपरेला दुरावणे .
खूप काही मिळवल्यानंतर लक्षात येते की आपण बरेच काही गमावले आहे. पण अनेक वेळा जे हरवते ते परत मिळणेही अशक्य होऊन जाते. माणूस चांगल्या आयुष्याच्या शोधात आपले गाव सोडतो खरे, पण जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी तो आपले मूळ विसरत नाही. हृदयाचा एक कोपरा त्याला घट्ट
धरून ठेवतो.

ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछड़े चमन
तुझपे दिल क़ुरबान

रूढ अर्थाने हे राष्ट्रभक्तिपर गीत नाही. हा आठवणींचा कल्लोळ आहे. आपल्या मातृभूमीला घातलेली साद आहे. रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेली काबुलीवालाही कहाणी केवळ एक पठाण आणि एक छोटी मुलगी यांच्यात निर्माण झालेल्या मैत्रीची कहाणी नाही, ही आपल्या मातृभूमीला अंतरलेल्या एक विस्थापिताचीही कथा आहे.


चित्रपटाची सुरुवात होते काबुलमधील दृश्याने. रहमत पठाण (बलराज सहानी) हा विधुर आहे. त्याचा सारा जीव त्याच्या लहान मुलीत गुंतलेला आहे. मुलगी आजारी पडते. तिच्या आजारपणात बराच खर्च झाल्याने कर्जाचा बोजा वाढतो. हे कर्ज फेडण्यासाठी पैसे तर कमवायला हवे. यासाठी रहमत पठाण भारतात यायचे
ठरवतो. मुलीला सोडून जाताना जिवावर येते, पण इलाज नसतो. तिची आठवण म्हणून एका कागदावर तिच्या हाताचे ठसे घेऊन तो निघतो.

पठाण म्हणजे राकट, क्रूर माणूस असे समजतात. जनमानसात त्याची प्रतिमा अशीच आहे. रहमत वरून जरी उग्र वाटला, तरी त्याचे अंतःकरण मात्र कोमल आहे. कोलकातामध्ये जेव्हा त्याला मिनी भेटते, तेव्हा तिच्यात त्याला आपल्या मुलीचे प्रतिबिंब दिसते. त्या निष्पाप, गोड मुलीच्या गप्पांत तो रमून जातो. मिनीचे वडील लेखक. ते आणि मिनीची आई आपापल्या कामात व्यग्र असतात. बोलायला आसुसलेली मिनी आणि काबुलीवाला दोघांची गट्टी जमते. मिनीच्या आईच्या मनात मात्र या पठाणाबद्दल संशय आहे. धर्म, जात, वंश, वर्ण हे माणसांनीच निर्माण केलेले भेद आपापसातील अविश्वासाला जन्म देतात. काबुलीवाला मात्र मिनीसोबत लहानाहून लहान होतो. वयाची बंधने गळून जातात आणि मैत्रीचे निरागस आणि उत्कट नाते त्यांच्यात निर्माण होते. एके दिवशी काबुलीवाला येत नाही, म्हणून मिनी त्याच्या शोधात निघते. रस्ता चुकते आणि या महानगरात हरवते. काबुलीवाला तिला शोधतो, पण मुले चोरणारा असे समजून इतर माणसे त्याला चोप देतात. मिनी आजारी पडते आणि रात्रभर जागून अल्लाची प्रार्थना करणारा काबुलीवाला मिनीबरोबर आपल्याही हृदयात घर करतो. हा आघात जीवघेणाच. एकतर पोटच्या पोरीसारख्या असणाऱ्या मुलीला आजारी पडलेले पाहून होणारे दुःख आणि इतरांच्या नजरेत स्वतःबद्दल जाणवणारा अविश्वास. या परक्या भूमीत आपले म्हणणारे कुणीही नाही, हे दुःख किती असह्य असेल! घरापासून दूर, आपल्या मुलीपासून दूर असलेल्या या पठाणाला मातृभूमीची आठवण व्याकूळ करते.

ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछड़े चमन
तुझपे दिल क़ुरबान
तू ही मेरी आरज़ू, तू ही मेरी आबरू
तू ही मेरी जान

या गीतात मातृभूमीप्रती वाटणारा आदर आहे, प्रेम आहे आणि अभिमान आहे. हे गाणे आहे एका पठाणाचे. त्याच्या मातृभूमीसाठी, काबुलसाठी गायलेले असूनही ते आपल्या राष्ट्रभक्तिपर गीतात आपण सामील करून घेतलेले आहे. यावरून या गीतातील भावना ही देश, धर्म, संस्कृती, सीमा या सर्वांना ओलांडून गेली आहे, हे लक्षात येते. याचे पूर्ण श्रेय जाते गीतकार प्रेम धवन, संगीतकार सलील चौधरी आणि गायक मन्ना डे यांना. मुंबईत जिथे अफगाणी लोकांची वस्ती होती, तिथूनच सलील चौधरी यांना या गीताचे ध्रुवपद मिळाले. या गीतात वापरलेलेरबाबहे अफगाणी वाद्य या संगीताला आणखी उठाव देते. जन्मभूमीपासून लांब असलेल्या प्रत्येकाची वेदना मन्ना डेंनी आपल्या आवाजातून पोहोचवलेली आहे.

 
तेरे दामन से जो आए, उन हवाओं को सलाम
चूम लूँ मैं उस ज़ुबाँ को, जिसपे आए तेरा नाम
सबसे प्यारी सुबह तेरी, सबसे रंगीं तेरी शाम
तुझपे दिल क़ुरबान
 


आपल्या देशातल्या वाऱ्यालाही पारखे झाल्याने उन्मळून आलेले हे शब्द आणि ब्रायटनच्या समुद्रावर वीर सावरकरांनी रचलेले काव्य यात किती साम्य आहे पाहा! आपल्या खिडकीतून अस्ताला जाणारा सूर्यास्त पाहताना, पठाणाला आपल्या देशातला सूर्योदय आठवतो, क्षितिजाच्या पटलावर रंग उधळणारी सायंकाळ
अस्वस्थ करते, तर आपल्या मातृभूमीच्या आठवणीने गहिवरून आलेले स्वातंत्र्यवीर म्हणतात,
ती आम्रवृक्षवत्सलता रे
नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाबहि आता रे
फुलबाग मला हाय पारखा झाला
सागरा प्राण तळमळला

काही वर्षांपूर्वी एक महिना परदेशात राहण्याचा योग आला होता. तिथली स्वच्छता, मोठी घरे, प्रवासाच्या सुविधा, वक्तशीरपणा, सुबत्ता या सगळ्यांनी सुरुवातीला भारावून गेले होते. मग जसजसे दिवस जाऊ लागले, तसतसे भारतातली गर्दी, लोकांचे एकत्र हसणे, बोलणे अगदी वाद घालणे, रस्त्यावरचे धाबे, गाड्यांचे हॉर्न, फेरीवाल्यांची हाळी यांची आठवण अस्वस्थ करू लागली. तिथली शांतताही नकोशी झाली.

जितना याद आता है मुझको
उतना तड़पाता है तू
तुझपे दिल क़ुरबान

आठवणी येत असतातच आणि जर परदेशात राहणे ही मजबुरी असेल, तर त्या अतिशय त्रास देतात. इथे तर तो आपल्या कुटुंबीयांपासून लांब आहे.
 

 

 

माँ का दिल बन के कभी, सीने से लग जाता है तू
और कभी नन्हीं सी बेटी, बन के याद आता है तू..

मिनीमध्ये आपली मुलगी पाहणे हाही आभासच असतो. अर्थात जेव्हा सत्य कडू असते, तेव्हा माणूस या आभासाच्या सोबतीने जगतो. त्याच्यात सुख शोधतो. मिनीचे आजारपण, तिच्यापासून लांब जाणे त्याला विदारक सत्याची जाणीव करून देते. हे सूर त्याच्या एकटेपणाच्या व्यथेला बोलके करतात. व्यावहारिक,
 
आर्थिक अपयश नशिबी आल्यावर, ज्या मातीत जन्म घेतला त्याच मातीत मिसळणे ही त्याची इच्छा सर्वच निर्वासितांच्या आणि विस्थापितांच्या वेदनेला शब्द देते.

छोड़ कर तेरी ज़मीं को, दूर आ पहुँचे हैं हम
फिर भी है ये ही तमन्ना तेरे ज़र्रों की क़सम
हम जहाँ पैदा हुए उस जगह ही निकले दम
तुझपे दिल क़ुरबान|