भास्करराव मुंडले - अनुकरणीय स्वयंसेवक

विवेक मराठी    16-Aug-2019
Total Views |

***राम नाईक***

संघकामाचा विस्तार हे एकच ध्येय डोळयासमोर ठेवून त्याचाच विचार चिंरतर करणारे भास्कराव मुंडले. संघकार्यासाठी अविरत प्रवास, अफाट संपर्क, हे भास्करावांचे वैशिष्टय. संघस्वयंसेवकांशी असलेले ऋणानुबंध शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी जपले .


त्रिखंडात दुमदुमनी जावो, जरी राष्ट्राची कीर्ति!

कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती!!

या संघगीताचे यथार्थ उदाहरण म्हणजे भास्करराव मुंडले. गेली 65 वर्षे मी त्यांना पाहात होतो. 1954मध्ये चर्चगेटजवळच्या बी रोडवर ईश्वरभुवनमध्ये एका छोटया खोलीच्या कार्यालयात संघाच्या बैठकीसाठी येणारे तरुण भास्करराव असोत की अगदी काही महिन्यांपूर्वी जुन्या-जुन्या स्वयंसेवकांना पुन्हा एकदा परस्परांना भेटता यावे यासाठी जवळजवळ 1,000 स्वयंसेवकांच्या 'मिलन' कार्यक्रमाची योजना आखणारे भास्करराव असोत, दोन्ही वेळी केवळ संघकार्याची त्यांची तळमळ दिसे.

परस्परांशी आम्ही संघाच्या नाळेनेच जोडले गेलो होतो. पदवी मिळताच कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी नोकरीच्या शोधात 1954मध्ये मी पुण्याहून मुंबई गाठली. सुरुवातीला स्वर्गवासी वडिलांच्या दिवंगत मित्राच्या घरी राहत होतो. नोकरी मिळाल्यावर त्यांचा गैरलाभ न घेता दुसरीकडे राहू, असे ठरविले होते. नोकरी मिळालीही. पण जागा मिळणे, परवडणे त्या वेळीही सोप्पे नव्हते. तेव्हा चर्चगेटच्या त्या संघ कार्यालयात मुक्कामाची सोय झाली होती. दिवसभर साप्ताहिक विवेकचे जाहिरात विभागाचे कार्यालय तेथे चाले. सायंकाळी संघाच्या बैठकी आणि रात्री मुक्कामाला मी व आणखी एक स्वयंसेवक. कार्यालयात दिवसभर संघस्वयंसेवकांचा राबताही असे. त्यांच्यातच समवयस्क भास्कररावांशी एक-दोन भेटींमध्येच स्नेह जुळला. कधी संघकार्यावर चर्चा करावी, कधी तात्कालिक सामाजिक विषयांवर, तर कधी चक्क शिळोप्याच्या गप्पा. कार्यालयातला माझा मुक्काम मी काही महिन्यांतच हलविला, पण भास्कररावांशी संपर्कात राहिलो. आजच्या व्हॉट्स ऍपच्या युगातल्यांना फोनही दुर्मीळ, महागडा अशा त्या काळात नव्याने झालेली मैत्री राखणे किती अवघडच असे याची कल्पना येणे थोडे कठीणच. पण संघाने जोडले गेलो होतो, म्हणून ते सहज जमले. अनेक बाबतीत आमच्या स्वभावात साम्य होते. संघकार्य करायला वेळ हवा, म्हणून भास्करराव उच्चशिक्षित असूनही मुंबई महानगरपालिकेत नोकरी करताना त्यांनी कधीही वरच्या जागेसाठी प्रयत्न केले नाहीत, तर मी संघकार्य सुकर व्हावे म्हणून सरकारी नोकरी सोडून 1958मध्ये खाजगी कंपनीत - खिरा स्टील फर्निचर कंपनीमध्ये नोकरी स्वीकारली. खिरांची फॅक्टरी सांताक्रूझला, म्हणजेच पश्चिम उपनगरांत, म्हणून मग दक्षिण मुंबई सोडून उपनगरात राहायला जायचा विचार मनात आला. उपनगरातील स्वयंसेवक स्नेही म्हणून भास्कररावांकडे विषय काढला. त्यांनी तत्काळ जोगेश्वरीत त्यांच्या घराजवळच एकांकडे पेइंग गेस्ट म्हणून माझी सोय करून दिली. साहजिकच मग आम्ही दोघे भास्कररावांच्या घरासमोरील शाखेत जाऊ लागल्याने मैत्री अधिकच दृढ झाली.

भास्कररावांची दिनचर्या मोठीच व्यग्र असे. सुरुवातीला बाल शाखांना भेट देऊन बाल स्वयंसेवकांच्या घरी जाण्याकडे त्यांचा अधिक भर असे. बाल स्वयंसेवकांतूनच समर्पित स्वयंसेवक निर्माण होतील यावर त्यांचा नितांत विश्वास होता. पुढे जबाबदारी वाढल्यावर सायंकाळी मुंबईच्या विविध भागांतील सायंशाखांना भेटी देऊन ते स्वयंसेवकांच्या बैठका घेत. पक्षाच्या कामातही आम्हाला भास्कररावांच्या या संपर्काचा मोठाच फायदा होत असे. मला आठवतेय, आणीबाणीत मी मुंबई जनसंघाचा संघटन मंत्री होती. मुंबईतून विधान परिषदेवर दोन पदवीधर आमदार निवडण्यासाठी निवडणूक जाहीर झाली. प्रा. ग.भा. कानिटकर व डॉ. वसंतकुमार पंडित हे जनसंघाचे दोन उमेदवार होते. त्यातले प्रा. कानिटकर आणि जवळजवळ सर्व प्रमुख नेते मंडळी, कार्यकर्ते तुरुंगात होते. संघस्वयंसेवकांचीही तीच परिस्थिती होती. भास्कररावही तुरुंगातच होते. पण तिथून त्यांनी जोगेश्वरीतील संपर्क व्यवस्था मोठया कौशल्याने हाताळली. माधव कार्ले, काशिनाथ गावकर, प्रभाकर बेहरे आदी कार्यकर्त्यांना त्यांनी कारागृहातून कामाची प्रेरणा दिली. या दोन्ही जागा आम्ही पहिल्या फेरीतच जिंकलो आणि विशेष म्हणजे भास्करराव राहत असलेल्या जोगेश्वरी मतदान केंद्रावर जनसंघाच्या दोन्ही उमेदवारांना मिळून 93 टक्के मते मिळाली.




मुंबईत रामजन्मभूमीसाठी झालेल्या संकल्प दिनाच्या कार्यक्रमात डावीकडून सर्वश्री राम नाईक, प्राचार्य दा.सी. देसाई, भास्करराव मुंडले, हशू अडवाणी, श्रीमती जयवंतीबेन मेहता, सुधीर फडके आदी.

आम्ही दोघेही मुळात संघस्वयंसेवक. मला 1960च्या सुमारास जनसंघाचे काम करावे असे सुचविण्यात आले. त्या मानाने भास्कररावांकडे विश्व हिंदू परिषदेची जबाबदारी थोडी उशिरा देण्यात आली. अर्थात ती अतिरिक्त जबाबदारी होती. नव्वदच्या दशकात भास्कररावांकडे विश्व हिंदू परिषदेच्या मुंबईच्या संघटन मंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. समाजातील मान्यवरांना विश्व हिंदू परिषदेशी, पर्यायाने संघपरिवाराशी जोडण्याचे काम भास्कररावांनी केले. तोवर सामाजिक कार्यात फार नसलेली पण अनेक प्रतिष्ठित मान्यवर मंडळी त्यांच्यामुळे विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून समाजकार्य करू लागली. रामजन्मभूमी आंदोलनात मुंबईतून फार मोठया संख्येने स्वयंसेवक, कार्यकर्ते, कारसेवक अयोध्येत गेले. यामध्ये भास्कररावांचा वाटा सिंहाचा होता. त्या वेळी घडलेल्या घटनांना अत्यंत संयमाने हाताळताना मी भास्कररावांना पाहिले. मी त्या वेळी भाजपा मुंबईचा अध्यक्ष आणि उत्तर मुंबईचा खासदार होतो. रामजन्मभूमीसाठी आम्ही एकत्रितपणे मुंबईत केलेल्या आंदोलनात अनेक मान्यवरांना सामील करून घेण्याचे श्रेयही भास्कररावांचे!

विश्व हिंदू परिषदेच्या सेवा कार्यामध्येही भास्कररावांचे विशेष योगदान आहे. देशभरात विश्व हिंदू परिषदेचे सेवा कार्य करणारे अनेक ट्रस्ट आहेत. या सर्व ट्रस्टचे कारभार शिस्तबध्द पध्दतीने चालावेत यासाठी सातत्याने देशभर प्रवास करून भास्कररावांनी विशेष परिश्रम घेतले. तथापि प्रचंड परिश्रम करूनही मुंबईत शीव येथे विश्व हिंदू परिषदेची शिवसृष्टी उभारता आली नाही, याची खंत भास्कररावांना होती. मुंबईत नव्हे, तर अगदी देशभर काम करणाऱ्या भास्कररावांना त्यांची जोगेश्वरी खूपच प्रिय होती. होता होईल तो ते तिथेच राहिले. स्वयंसेवकही त्यांची घरातल्या वडीलधाऱ्याची घ्यावी तशी काळजी घेत. अगदी शेवटी होईनासे झाल्यावर मात्र ते मुलीकडे ठाण्याला गेले, तरीही त्यांचे मन बहुधा जोगेश्वरीतच होते.

त्यांच्या शोकसभेसाठी 4 ऑॅगस्टला जोगेश्वरीत गेलो, तेव्हा भारी चुकल्याचुकल्यासारखे वाटले. पूर्वी मुंबईत दर महिन्याला ग्रँट रोडच्या नवयुग निवासात समन्वयासाठी होणारी परिवाराची बैठक आटोपली की मला पक्षाने दिलेल्या गाडीतून मी, बाळासाहेब कानिटकर, काका दामले, रमेश पतंगे व भास्करराव उपनगरात परतत असू. समन्वयाच्या बैठकीच्या बरोबरीने या एकत्र प्रवासामुळेही आमचा समन्वय सुरेख साधला जाई. कार्यकक्षा रुंदावल्या, बदलल्या तरीही परस्परांशी अधूनमधून विचारविनिमय केल्याखेरीज आम्हाला चैन पडत नसे. अगदी गेली पाच वर्षे उत्तर प्रदेशचा राज्यपाल असल्यामुळे मी लखनौत होतो, भास्कररावांची तब्येतही नरम-गरम असे, तरीही यात खंड नव्हता. भास्कररावांचा सल्ला मला नेहमीच मोलाचा वाटे. भास्करराव अनेकदा चाकोरीबाहेर जाऊन वागत, पण तेही अनुकरणीय असे. अगदी जातानाही त्यांनी तेच केले. देहदान करून स्वयंसेवकांपुढे त्यांनी आणखी एक अनुकरणीय नवा आदर्श ठेवला.

माजी राज्यपाल, उत्तर प्रदेश

me@ramnaik.com