स्वयंसेवकांच्या गराडयांत फुलणारे व्यक्तिमत्त्व

विवेक मराठी    17-Aug-2019
Total Views |

***सुभाष भागवत****



'जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च'

श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी हे चिरंतन सत्य सांगितले आहे. जन्माला आलेल्या व्यक्तीचा मृत्यू निश्चित आहे. या न्यायाने भास्कर हरी मुंडले या व्यक्तीचे दि. 16 जुलै 2019 रोजी गुरुपौर्णिमेला निधन झाले. पण भास्करराव ही केवळ व्यक्ती नव्हती, तर ते एक व्यक्तिमत्त्व होतं. संघटनकुशल, मृदुभाषी, प्रसन्नचित्त, हसतमुख आणि सदैव पांढऱ्याशुभ्र वेशात वावरणारं एक व्यक्तिमत्त्व होतं. पांढराशुभ्र वेश हे त्यांच्या धवल चारित्र्याचं प्रतीक होतं. एका स्वयंसेवकाचं व्यक्तिमत्त्व होतं. एक असा स्वयंसेवक, ज्याच्या दैनंदिन व्यवहारांतून त्याचं स्वयंसेवकत्व प्रतीत होत होतं. असं एक लोकविलक्षण व्यक्तिमत्त्व गुरुपौर्णिमेच्या दिवशी काळाच्या पडद्याआड गेलं.

1971-72 सालातील प्रसंग आहे. सुरेंद्र थत्ते हे मुंबईतील एक कार्यकर्ते मुंबई जिल्ह्यात प्रचारक म्हणून कार्यरत होते. मी त्या वेळी गिरगावात एका मंडलाचा कार्यवाह म्हणून काम पाहत होतो. आमच्या भागात थत्ते यांचा प्रवास होता. माझ्या घरी ते भोजनासाठी आले होते. भास्करराव मुंडलेही त्यांच्याबरोबर आले होते. भास्कररावांशी माझा जुजबी परिचय होता. त्या दिवशी ते घरी आल्यावर मी त्यांचा घरातील सर्वांशी परिचय करून दिला. माझ्या मातोश्रींनी भास्कररावांना विचारले, ''मी लहानपणी पार्ल्याला लोकल बोर्डाच्या शाळेत होते, तेव्हा आम्हाला 'मुंडले' नावाचे गुरुजी होते.'' ''ते माझे वडील'' भास्करराव उत्तरले. लगेच थत्ते म्हणाले, ''अरे सुभाष, या नात्याने भास्करराव तुझे मामा झाले.'' मी होकारार्थी मान हलवली. भास्करराव त्यांच्या मिस्कील स्वरांत म्हणाले, ''तसे बरेच लोक माझा 'मामा' करतात, पण हे मामा होणं मला खूप आवडलं.'' अन् त्या दिवसापासून भास्करराव आमच्या घराशी, कुटुंबाशी जे जोडले गेले ते त्यांच्या शेवटच्या दिवसापर्यंत. पुढे काही कौटुंबिक कार्यक्रमांतूनही जेव्हा आमच्या भेटी झाल्या, तेव्हा त्यांचे आणि आमचे काही नातेवाईकही कॉमन आहेत, हे कळलं.

71च्या सुमारास मुंबई जिल्ह्याचे कार्यवाह म्हणून मनोहरपंत मुजुमदार कार्यरत होते. त्यांना सहकारी म्हणून मधुकरराव मोघे - मुंबई शहर, अनंतराव देशपांडे - पूर्व उपनगर आणि भास्करराव मुंडले - पश्चिम उपनगर अशा नियुक्त्या होत्या. भास्करराव नोकरीनिमित्ताने महापालिकेत येत असत. त्याचप्रमाणे, त्या वेळच्या व्यवस्थांमध्ये अधिकारी आणि प्रवासी कार्यकर्त्यांचा निवास जिल्हा कार्यालय (नाझ सिनेमासमोर) आणि नवयुग निवास येथे असे. त्या दोन्ही वास्तू गिरगावात असल्याने भास्कररावांचे गिरगाव विभागात जाणे-येणे असे. पू. श्रीगुरुजींचा निवास जर मुंबईमध्ये असेल तर भास्करराव बरेच प्रसंगी ऑफिसच्या वेळेव्यतिरिक्त या वास्तूंमध्ये असत. अशाच एका मुक्कामात पू. श्रीगुरुजींनी पृच्छा केली होती की, ''मुंबईत स्वयंसेवक किती असतील?'' संबंधित अधिकाऱ्यांनी आपले अंदाज वर्तवल्यावर पू. श्रीगुरुजी म्हणाले होते, ''माझ्या अंदाजानुसार मुंबईत लाखभर स्वयंसेवक असावेत. शोध घेतल्यावर निश्चित आकडा कळेल.'' आणि शोध सुरू झाला. मुंबईचे संघकार्य गिरगावातून प्रारंभ झाले होते. स्वाभाविकच, गिरगावात अधिकाऱ्यांच्या फेऱ्या होऊ लागल्या. भास्करराव ऑफिसमधून बाहेर पडल्यावर जुन्या स्वयंसेवकांचा शोध घेण्यासाठी गिरगावात आणि अन्यत्र फिरत असत. नंतर कुठल्यातरी शाखेवर प्रार्थना करून रात्री 10-11 वाजता जोगेश्वरीत परतत असत. अशा शोध घेतलेल्या स्वयंसेवकांची एक विशाल यादी करून पू. श्रीगुरुजींचा एक कार्यक्रम दडकर मैदानावर झाला होता. संपूर्ण गणेवशात झालेल्या या कार्यक्रमात 15 हजारपर्यंत स्वयंसेवक सहभागी झाले होते. त्या वेळी अनेक स्वयंसेवकांची नावं यादीत नव्याने समाविष्ट झाल्याचे भास्कररावांकडून कळले होते.


भास्कररावांचे विलोभनीय दर्शन

भास्कररावांचे मृदू भाषण आणि साधी रहाणी समोरच्याला प्रभावित करत असे. त्यांच्या ऑफिसमध्ये ते अतिशय आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जायचे. आपल्या सहकाऱ्यांमध्ये ते संघाविषयी बोलत असत. मला आठवतं की श्री. रविकुमार अय्यर जेव्हा प्रचारक म्हणून निघाले, तेव्हा ते भास्कररावांना भेटायला त्यांच्या ऑफिसमध्ये गेले होते. श्री. रविकुमारजी Instrumentation Engineer होते आणि लार्सन ऍंड टूब्रोसारख्या प्रतिष्ठित कंपनीतील महत्त्वाच्या पदावरील नोकरी सोडून प्रचारक निघाले होते. त्यांच्या या सर्व वैशिष्टयांसहित भास्कररावांनी आपल्या ऑफिसमध्ये रविजींचा परिचय करून दिला. सहकाऱ्यांना प्रचारकाचे हे दर्शन अविश्वसनीय वाटले होते. पण भास्कररावांच्या शब्दांमुळे त्यांना विश्वास वाटला. रविजी निघून गेल्यावर एका सहकाऱ्याने भास्कररावांना प्रश्न विचारला होता की, ''एवढे शिक्षण घेतलेला एक तरुण अशा प्रकारे आपलं आयुष्य फुकट घालवतो आहे, असे तुम्हाला वाटत नाही का?'' त्यावर भास्करराव उत्तरले होते की, ''अशा तरुणांची पिढीच्या पिढी उभी राहील, तेव्हाच हा देश उभा राहील. सक्षम देश उभा करण्याचे साधन (Instrument) म्हणजे तरुण पिढी आहे. या Instrumentation Engineerचा आदर्श ठेवून ही पिढी उभी राहील, असा संघाचा विश्वास आहे.'' एकंदरीतच रविकुमारजींच्या दर्शनाने आणि भास्कररावांच्या या स्पष्टीकरणामुळे सारेच जण प्रभावित झाले होते. स्वत: भास्कररावांनी हा किस्सा मला सांगितला होता. निवृत्तीनंतरही त्यांचे कार्यालयीन सहकाऱ्यांशी संबंध शेवटपर्यंत टिकून होते. सहकाऱ्यांच्या घरातील विवाहप्रसंगी तर भास्कररावांना घरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीसारखा मान मिळत असे.

1977पासून मी विश्व विभागात कार्यरत झालो. परदेशात संघ विस्तारक म्हणून माझा प्रवास सुरू झाला. माझ्या ऑफिसमधून (एअर इंडिया) मिळणारा विदेश प्रवासाचा पास मी संघकार्यास्तव उपयोगात आणतो, याचे भास्कररावांना अप्रूप वाटे. अनेक ठिकाणी ते हा उल्लेख करीत असत. माझ्या प्रवासानंतर माझ्या घरी येऊन प्रवासवृत्त जाणून घेण्यात त्यांचा उत्साह असे. असेच 1980च्या माझ्या इंग्लंड-युरोप प्रवासानंतर ते एका रविवारी माझ्या घरी आले होते. रविवारच्या सांघिकनंतर काही गाठीभेटी घेऊन मी घरी पोहोचत होतो. तेव्हा 11 वाजले होते. मी पाहिले तर भास्करराव माझ्या मोठया मुलाला कडेवर घेऊन गॅलरीत खेळवत होते. मी थोडासा संकोचलो आणि काही बोलणार, तोच ते म्हणाले, ''अरे, तुझे दोन्ही मुलगे घरात आईला त्रास देत होते, तिला घरकामही करू देत नव्हते. म्हणून मीच एकाला घेऊन बाहेर आलो.'' संघ चुलीपर्यंत पोहोचला पाहिजे, या वाक्याचा लाक्षणिक अर्थ माझ्या ध्यानी आला आणि डोळयांत पाणी उभे राहिले. कार्यकर्त्यांच्या कौटुंबिक जीवनाशी तादात्म्य पावलेल्या भास्कररावांचे हे दर्शन विलोभनीय होते.

भास्कररावांकडे विश्व हिंदू परिषदेचे काम आले. स्वाभाविकच त्यांचे कार्यक्षेत्र बदलले आणि विस्तारले. त्यामुळे आमच्या भेटी कमी झाल्या. मध्यंतरी दोन वर्षे मीदेखील वि.हिं. परिषदेत द. मुंबई जिल्हा मंत्री म्हणून काम पाहत होतो. त्या काळात 'मंदिर वहीं बनाएंगे' याच उद्देशाने काम सुरू होते. शिलापूजनाच्या निमित्ताने काही सज्जन भेटीसाठी मी आणि भास्करराव गिरगावात बाबामहाराज सातारकरांना भेटायला गेलो होतो. गिरगावातील शुभारंभाचे शिलापूजन केशवजी नाईक चाळीत आयोजित केले होते. त्याला बाबामहाराजांचा आशीर्वाद लाभावा म्हणून ही भेट घेतली होती. शिलापूजन, रामरथयात्रा हे दोन्ही कार्यक्रम त्या काळांत केले. त्यात भास्कररावांचे मार्गदर्शन होते, पण त्यांचा सहवास फारसा मिळत नसे. 1997मध्ये विश्व हिंदू परिषदेचे काम सोडून मी विज्ञान भारतीत कार्यरत झालो. पण पुढे सेवानिवृत्तीनंतर गिरगावातील आमच्या इमारतीच्या दुरुस्तीपायी मी गिरगाव सोडून ठाणे मुक्कामी स्थायिक झालो. भास्कररावांच्या सौभाग्यवती त्याच सुमारास निवर्तल्यामुळे तेही ठाण्याला त्यांच्या लेकीकडे रहाण्यास आले होते. एक-दोन वर्षे ठाणे-जोगेश्वरी अशा त्यांच्या फेऱ्या सुरू होत्या. पण दोन वर्षांनी ते ठाण्यातच स्थायिक झाले आणि पुन्हा आमच्या भेटीगाठींना सुरुवात झाली. त्यांनीही वि.हिं. परिषदेतून निवृत्ती स्वीकारली होती. त्यामुळे पुन्हा 'संघ' या विषयावर आमचे सूर जुळले.

जुन्या स्वयंसेवकांच्या भेटीची तळमळ

पण ठाण्यात आलेल्या भास्कररावांचे घडलेले दर्शन हे थोडे व्यथित करणारे होते. सुरुवातीला मला वाटले की त्यांचे नेहमीचे कार्यक्षेत्र म्हणजे जोगेश्वरी सोडावे लागले असल्यामुळे ते अस्वस्थ असावेत. पण तसे काही नव्हते. स्वयंसेवकांशी होणाऱ्या भेटीगाठी कमी झाल्याने ही अस्वस्थता होती. फारसे कोणी भेटत नाही, फोनवरही बोलणे होत नाही असे ते बोलून दाखवीत. प्रकृतिअस्वास्थ्यामुळे त्यांना काहीसे परावलंबित्व आले होते. स्वत:होऊन कुठे जाणे शारीरिकदृष्टया अशक्य होते, त्यामुळे दैनंदिन शाखा होत नाही याचे त्यांना मनोमन खूप वाईट वाटे. जोपर्यंत कुणाचा आधार घेऊन चालणे शक्य होते, तोपर्यंत मी त्यांना काही परिचितांकडे घेऊन जात होतो. पण पुढे त्यांच्या हाती वॉकर आला आणि सर्व हालचाल थंडावल्यासारखी झाली. तरीही आपल्या निवासस्थानापासून जवळ राहत असलेल्या एका कार्यकर्त्याच्या गाडीतून ते रविवारी शाखेत जात होते. वाचन खूप करीत असत. त्यांतही वैशिष्टय असे की, एखादा चांगला लेख वाचनात आल्यावर त्या लेखाच्या लेखकाचे नाव, फोन नंबर शोधून त्याला फोन करून लेखनाबद्दल शाबासकी देत, चर्चा करीत असत जेणेकरून त्या लेखकाचा उत्साह वाढीस लागावा. जुन्या स्वयंसेवकांच्या भेटीची जी तळमळ त्यांना लागली होती, त्यातूनच त्यांना एकत्रीकरणाची कल्पना स्फुरली. संबंधित अधिकाऱ्यांपुढे त्यांनी ही संकल्पना मांडली. मा. प्रांतकार्यवाह सुनीलजी सप्रे आणि प्रमोदजी बापट यांना ही संकल्पना आवडली आणि कार्यक्रमाची योजना सुरू झाली. कार्यकर्त्यांची काही नावे त्यांच्यासोबत बसून काढली आणि भास्कररावांच्याच घरी बैठकी सुरू झाल्या. मी जवळजवळ सर्वच बैठकींना उपस्थित होतो. एकत्रीकरणात कार्यक्रम काय असावा, असा प्रश्न आल्यावर भास्कररावांनी दिलेले उत्तर त्यांच्या मनःस्थितीचे निदर्शक होते. ते म्हणाले होते की, ''सर्व स्वयंसेवकांना समाधान होईपर्यंत डोळे भरून पाहायचे आहे.'' 19 नोव्हेंबर 2017 या दिवशी हे ज्येष्ठ स्वयंसेवकांचे संमेलन चेंबूर येथे करण्याचे निश्चित झाले. कार्यकर्ते बैठकींना येत असत. मला आश्चर्य वाटे की, बोरिवली-कांदिवली आणि दक्षिण मुंबईतीलही ज्येष्ठ स्वयंसेवक या बैठकीसाठी लांबचा प्रवास करून येत आणि रात्री 9नंतर परत मुक्कामी जात असत. प्रत्येक बैठकीत संख्येचा अंदाज घेतला जात होता. प्रत्येक बैठकीत काही नवीन नावे समोर येत. एका कार्यकर्त्याने बैठकीत सांगितले की, ''माझे वडील 92 वर्षांचे आहेत आणि त्यांनी कार्यक्रमाला जाण्याचा हट्ट धरला आहे.'' या अशा चर्चेनंतर भास्कररावांचा उत्साह अधिकच वाढत असे. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत बारकाईने केले होते. जेवढे स्वयंसेवक अपेक्षित होते, त्याच्या एक तृतीयांश गाडयांची व्यवस्था केली होती. कारण, बहुसंख्य ज्येष्ठ 70 च्या वयोगटातील होते. चेंबूरच्या शाळेत सायं. 5.30 वाजेपर्यंत एकत्र यायचे. 6.30 ते 8 कार्यक्रम आणि भोजनोत्तर सर्वांना घरी पोहोचवणे, अशी व्यवस्था केली होती. केंद्रीय कार्यकर्ते मा. मधूभाई कुळकर्णी उपस्थित राहिले होते. सायं. 5 वाजल्यापासून स्वयंसेवक येऊ लागले होते. परस्परांची गळाभेट, आनंदाचे उद्गार असे स्वरूप होते. अनेक ज्येष्ठ स्वयंसेवक बऱ्याच वर्षांनंतर एकमेकांना भेटत होते, चौकशी करत होते. जवळजवळ 600पर्यंत स्वयंसेवक त्या स्थानी आले होते. एक वैयक्तिक गीत आणि मा. मधूभाईंचे वक्तव्य एवढयाच कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सर्व स्वयंसेवक भास्कररावांना आवर्जून भेटून जात होते. त्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर दाटलेला आनंद पाहण्यासारखा होता. त्या कार्यक्रमानंतर ज्या ज्या वेळी मी त्यांना भेटलो, तेव्हाही त्यांची चौकशी चालत असे की, ''हा अमुक अमुक त्या दिवशी होता का रे?'' पण त्या एकत्रीकरणाने भास्कररावांना परमसंतोष झाला होता.

त्या कार्यक्रमापूर्वी अशाच एका कार्यक्रमाला मी, भास्करराव आणि डॉ. किनरे गेलो होतो. कांदिवलीतील आबा मयेकर यांना श्रध्दांजलीचा कार्यक्रम होता. आबा मयेकर भास्कररावांचे सहकारी. भास्कररावांबरोबर कार्यरत असलेल्या 5 'एम' पैकी एक (मुजुमदार, मराठे, मोघे, मुंडले आणि मयेकर). आबांच्या अंतिम दिवसांत त्यांच्या वैद्यकीय चिकित्सेसाठी 'मयेकर मित्र मंडळ' स्थापन झाले होते. त्यांच्या वतीने हा कार्यक्रम होता. तेथेही असाच अनुभव होता की, स्वयंसेवकांना भेटल्यावर त्यांना होणारा आनंद वर्णनातीत होता.

असे, स्वयंसेवकांच्या गराडयांत फुलणारे व्यक्तिमत्त्व आता पुन्हा दिसणार नाही. संपूर्ण आयुष्यभर देशसेवेला समर्पित झालेले हे जीवन पुढच्या पिढीसाठी आदर्श ठेवून गेले आहे. भास्कररावांचे वैशिष्टय असे आहे की, जो देह त्यांनी जिवंतपणी देशासाठी झिजवला, तो देह त्यांनी मृत्यूनंतरही देशासाठी अर्पण केला. देहदान करून मर्त्य देहाचासुध्दा समाजासाठी काही उपयोग होईल, असे पाहिले. एक प्रकारे आधुनिक काळातील दधिचीचे समाजाला दर्शन घडवले आहे.

अशा व्यक्तिमत्त्वाला श्रध्दासुमने अर्पित करणे हा आपला गौरव आहे. पण केवळ तेवढयावर थांबून चालणार नाही. संघसाधनेसाठी आयुष्यभर सक्रिय असणाऱ्या भास्कररावांना ते आवडणार नाही. म्हणून आपणही आपला सहभाग या पवित्र कार्यात कसा आणि किती असेल याचा संकल्प सोडू या. आज भास्कररावांच्या पावन स्मृतींची उजळणी करताना माझ्या मनात खालील काव्यपंक्ती पुन्हा पुन्हा घोळत आहेत -

तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हां घडो

त्वदीय गुणकीर्तन ध्वनी सुरम्य कर्णी पडो

स्वदेश हित चिंतना विण दुजी कथा नावडो

तुझ्यासमहि आमुची तनुहि देशकार्यी पडो


98690 37531