आदर्श वस्तुपाठ

स्रोत: विवेक मराठी    दिनांक17-Aug-2019

***राधा भिडे***

संघकार्याला सदैव समर्पित असलेले बाबा एक चैतन्यदायी व्यक्तिमत्त्व होते. संघकार्य करत असताना वयोपरत्वे येणाऱ्या शारिरीक तक्ररींचाही त्यांनी कधी बाऊ केला नाही. अविरीत संघकार्य करत असतानाच कुटुंबाकडेही त्यांचे लक्ष असत. त्यांचे जीवन म्हणजे आदर्श वस्तुपाठच होता. 

दि. 16 जुलै, 2019... गुरुपौर्णिमा... नेहमीसारखा दिवस उजाडला. आपल्या आयुष्यातलं काहीतरी महत्त्वाचं आपल्याला गमवायला लागणार आहे, याची पुसटशीही कल्पना येऊ न देता. शुचिर्भूत होऊन देवाचं नामस्मरण करता करता बसल्या जागी बाबांनी कधी डोळे मिटले, ते कळलंही नाही. मृत्यू एवढया शांतपणे येऊ शकतो? इतरांना चाहूलही लागू न देता? मधुमेह, हृदयविकार, कंपवात अशा रथी-महारथींना बाबांनी जवळच्या मित्रांसारखा दीर्घकाळ आश्रय दिला होता. मृत्यूलाही त्यांनी मित्रासारखी हाक मारली असावी का? कुठेही कधीही काही दुखलं-खुपल्याची तक्रार नाही, माझ्याच वाटयाला असे आजार वा दु:खद प्रसंग का यावेत याविषयी कधीही उसासे नाहीत. शेवटपर्यंत आई-वडिलांविषयी आणि देवाविषयी कृतज्ञता आणि आयुष्यभर संघकार्य करायला मिळाल्याची कृतार्थ भावना! देव आपली काळजी घेतो, मग आपण त्याच्या कामात लुडबुड का करावी? आपण आपले काम करत राहावे एवढा साधा सरळ हिशोब! दवाखान्यातल्या खाटेवरही ते 'फर्स्टक्लास' असत.
  
बाबांची सहनशक्ती प्रचंड होती. शारीरिक आघातांबरोबरच त्यांनी मानसिक धक्केही सहजतेने आणि तटस्थतेने पचवले. एरवी भावनाप्रधान असणारे बाबा आपल्या जवळच्या माणसांच्या मृत्यूच्या बातमीने खचलेले कधी दिसले नाहीत. वैयक्तिक आयुष्यातील आघातांचा कोणताही परिणाम त्यांनी त्यांच्या संघ व कार्यालयीन कामावर कधी होऊ दिला नाही. त्यांची साधू-संतांसारखी मनाची स्थिरता आम्ही बरेचदा अनुभवली.

  बाबांचे चहा आणि कांदाभज्यांविषयीचे प्रेम सर्वांना माहीत होते. चटकदार आणि विविध खाद्यपदार्थांची आवड असणारे बाबा बिन-मिठाचा पदार्थही तेवढयाच आनंदाने खाऊ शकत असत. कोणताही शाकाहारी खाद्यपदार्थ त्यांना वर्ज्य नव्हता. औषध म्हणून घ्यावे लागणारे मेथीचे पाणीही ते चहाप्रमाणे चवीने पीत असत.

  
बाबांचे जीवन संघाने व्यापले होते. पू. डॉक्टर आणि श्रीगुरुजी ही त्यांची दैवते होती. त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून आमरण संघकार्य करत राहणे हेच त्यांच्या आयुष्याचे सार होते. 'कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती'. जाण्यापूर्वी काही दिवस आधी, आपल्या उर्वरित वेळेचा आणि आयुष्याचा संघासाठी कसा काय उपयोग होऊ शकेल याविषयीचे विचार त्यांच्या डोक्यात घोळत होते. शारीरिक अस्वस्थता आणि वयपरत्वे येणारी अशक्तता यामुळे येणाऱ्या बंधनांचा विचार करता, स्वतंत्रपणे फारसे काम होणे शक्य नसल्याचे त्यांना कदाचित जाणवले असावे. त्यामुळे कदाचित आता जगण्यात काही अर्थ नाही असा विचार त्यांनी केला असावा का?

  

बाबा अजातशत्रू होते. त्यांचा संपर्क अफाट होता. संघ-विहिंपमधीलच नव्हे, तर परिवारातील इतर संघटनांमधील, तसेच समितिसारख्या महिला संघटनांतील कार्यकर्त्यांशी, अधिकाऱ्यांशी तसेच परिवाराबाहेरही अनेकांशी त्यांचा उत्तम संपर्क होता. त्यांची दूरध्वनी क्रमांक लिहिलेली वही त्यांच्यासाठी 'गीता' होती. तिच्या सततच्या वापरामुळे आम्हाला ती अधूनमधून नव्याने लिहावी लागत असे. त्या वेळी बाबांचा किती थोर लोकांशी संपर्क होता ते आमच्या लक्षात येत असे. कोणत्याही स्तरातील तसेच कोणत्याही वयाच्या कार्यकर्त्याशी त्यांचे तितकेच आत्मीयतेचे संबंध होते. 'आपली माणसे' भेटल्याचा आनंद त्यांना ऊर्जा देऊन जात असे. कार्यकर्त्यांशी भरभरून गप्पा मारणारे बाबा पाहून 'बाबा एवढे बोलतात?' याचे आम्हा घरच्यांना खूप आश्चर्य वाटत असे. दुसऱ्याचे तोंड भरून कौतुक करणे हाही त्यांच्या अतिशय आवडीचा विषय होता.
  
संघकामासाठी ते जेथे जेथे प्रवास करत, त्या त्या ठिकाणच्या नातेवाइकांच्या घरी जाण्याचा त्यांचा शिरस्ता कधी चुकला नाही. मुंबई महानगरपालिकेतून निवृत्त झाल्यानंतर 29-30 वर्षांनंतरही त्यांचे त्यांच्या सहकाऱ्यांशी तेवढेच जिव्हाळयाचे संबंध राहिले. त्यांच्या शब्दाखातर अनेक जण दुरूनही त्यांना भेटायला येत असत आणि त्यांच्या भेटीचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर ओसंडून वाहत असे. 'माणसे जोडण्याची कला' त्यांना चांगलीच अवगत होती. त्यांनी हक्काने हाक मारून काही काम सांगावे आणि ते इतरांनी चटकन करून टाकावे एवढे प्रेम आणि आदर आम्ही अनेकदा जवळून अनुभवला.
  
संघकार्य ही त्यांची नेहमीच प्राथमिकता राहिली असली, तरी कौटुंबिक जबाबदाऱ्याही त्यांनी तेवढयाच ताकदीने पेलल्या. स्वतःचे आजार त्यांनी जेवढे काढले, तेवढीच घरातील अनेकांची जबाबदारी घेऊन त्यांची सेवा-शुश्रुषाही त्यांनी न थकता आनंदाने केली. या सगळयात 'मीच का?' हा प्रश्न त्यांना कधीही पडला नाही. एकाच वेळी विविध जबाबदाऱ्या त्यांनी कशा काय पेलल्या आणि त्यातूनही ते आनंदी आणि समाधानी कसे राहिले, याचे आम्हाला नेहमी आश्चर्य वाटत आले आहे. देव आणि संघ यांच्यावरील नितांत श्रध्दा त्यांना या सर्वांतून तावून सुलाखून सुखरूप बाहेर आणत असावी, असे वाटते. अनेक बऱ्या-वाईट प्रसंगांना ते सामोरे गेले. अनेक प्रकारच्या आणि अनेक स्वभावाच्या माणसांमध्ये ते वावरले. पण त्यांनी कायम चांगले क्षण पकडून ठेवले.

  आम्हा मुलींना त्यांनी एखादी गोष्ट करा किंवा करू नका असे कधी समोर बसवून सांगितलेले आठवत नाही. त्यांच्या आणि इतरांच्या जीवनातून आमचे आम्हीच प्रेरणा घेऊन शिकावे अशी कदाचित त्यांची भावना असावी. माझ्या शैक्षणिक प्रगतीपेक्षाही मी समितिचे काम करत असल्याचा त्यांना जास्त आनंद वाटत असावा, असे त्यांच्या बोलण्यातून बरेचदा जाणवे.

  
त्यांना अभिनयाचे तसेच गाण्याचेही अंग होते. ते उत्तम वक्ते होते. पू. श्रीगुरुजींचे, तसेच संघातील अनेक ज्येष्ठ अधिकाऱ्यांचे अनेक अनुभव ते व्यवस्थित तपशीलवार सांगत असत. त्यांच्या बोलण्यातून त्यामागील सच्चेपणा आणि कळकळ जाणवत असे. दुर्दैवाने त्यांची भाषणे ऐकण्याचा मला फारसा योग आला नाही.

 एक निष्कलंक, प्रामाणिक, तत्त्वनिष्ठ आयुष्य ते जगले. एक माणूस म्हणून, एक कार्यकर्ता/अधिकारी म्हणून कसे वागावे याचा त्यांनी आपल्या प्रत्यक्ष वागण्यातून आदर्श घालून दिला आहे, त्यावर आता आम्हाला पुढची वाटचाल करायची आहे. त्याचे संपर्काचे काम असेच पुढे चालू ठेवायचे आहे. वाट सोपी नसली तरी कठीणही नाही. शेवटी 'भास्करराव मुंडल्यांची मुलगी' ही सर्वात मोठी कमाई पाठीशी आहे. त्यांचा आशीर्वादही आहे. आपण फक्त कामावर निष्ठा ठेवून पुढे चालत राहायचे. यश 'तो' देतोच.