वारसा पुरुषार्थाचा

विवेक मराठी    26-Aug-2019   
Total Views |

 यशाच्या प्रवासाचे एक-एक सेनापती आता काळाच्या पडद्याआड जात चालले आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांचा मृत्यू वयोमानाप्रमाणे अपरिहार्य मानला, तरी प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंडे, मनोहर पर्रिकर, कर्नाटकाचे अनंत कुमार, सुषमा स्वराज आणि आता अरुण जेटली या सर्वांचे मृत्यू अकालीच समजले पाहिजेत. फूल उमलते, त्याचा सुंगध दरवळू लागतो आणि दुष्ट काळ त्यावर अचानक झडप घालून ते फूल कुस्करून टाकतो. मागे राहतात त्या फक्त स्मृतीच्या सुगंधी आठवणी.


भारतीय जनता पार्टीचा सत्तेचा प्रवास काटयाकुटयांचा मार्ग तुडविण्याचा होता. जनसंघाच्या प्रारंभीच्या काळात निवडणुकीला उभा असलेला उमेदवार
'मी विजयी होणार' असे म्हणत असला, तरी मनातून आपले डिपॉझिट वाचविण्याची चिंता करीत असे. उपेक्षा, अवहेलना, जहरी टीका, सर्व काही सहन करीत जनसंघ ते भाजपा हा यशाचा प्रवास झाला आहे. या यशाच्या प्रवासाचे एक-एक सेनापती आता काळाच्या पडद्याआड जात चालले आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांचा मृत्यू वयोमानाप्रमाणे अपरिहार्य मानला, तरी प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंडे, मनोहर पर्रिकर, कर्नाटकाचे अनंत कुमार, सुषमा स्वराज आणि आता अरुण जेटली या सर्वांचे मृत्यू अकालीच समजले पाहिजेत. फूल उमलते, त्याचा सुंगध दरवळू लागतो आणि दुष्ट काळ त्यावर अचानक झडप घालून ते फूल कुस्करून टाकतो. मागे राहतात त्या फक्त स्मृतीच्या सुगंधी आठवणी.

यातील प्रत्येकाचे कर्तृत्व एकासारखा दुसरा असे नाही. राजकारणात दुसऱ्याची प्रतिकृती बनून नेतृत्व होत नाही. राजकारण हे अनेक अंगी असते. सत्ता म्हणजे काय? ती कशासाठी मिळवायची? ती राबवायची कशी? लोकशाहीची सत्ता लोककल्याणकारक करण्यासाठी नेमके काय केले पाहिजे? सर्वांचा सहभाग कसा मिळवायचा? जाती, धर्म, भाषा याच्या वर उठून सर्व समावेशक राजकारण कसे करायचे? असे राजकारणाचे असंख्य पदर असतात. 

त्यासाठी राजकारणाचे खोलवरचे ज्ञान असावे लागते. राजकीय तत्त्वज्ञान वाचून राजकारणाचे थोडेसे ज्ञान होते, परंतु मुख्य ज्ञान लोकांत मिसळून होत असते. जो लोकांना कंटाळत नाही आणि ज्यांना लोक कंटाळत नाही, तो यशस्वी राजकारणी असतो. प्रमोद महाजनांपासून ते अरुण जेटलींपर्यंत सर्व जण राजकारण ज्ञानी होते, तसेच ते जनज्ञानीदेखील होते. लोकांच्या मनात काय आहे, लोकांच्या अपेक्षा काय आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे हे ज्यांना उमगत होते, अशी ही थोर मंडळी होती. 

प्रत्येक जण आपआपल्या परीने कुशल वक्ता होता. वक्त्याचा एक गुण सांगितला जातो, तो म्हणजे 'वक्ता तो वक्ताची नव्हे, श्रोतेविण।' लाखोंच्या सभेला खिळून कसे ठेवायचे हे प्रमोदजी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, गोपीनाथराव यांच्याकडून शिकण्यासारखे होते. लोकानुरंजन करणारे, नकला करणारे, लोकांना हसवणारे वक्ते भरपूर असतात. लोकशिक्षण करणारे नेते मात्र दुर्मीळ असतात. भाजपाच्या या सर्व नेत्यांनी लोकानुरंजन करणारी भाषणे केली नाहीत. आपण कोण आहोत? आपला इतिहास काय? आपली संस्कृती कोणती? आपल्याला काय प्राप्त करायचे आहे? या गोष्टी त्यांनी त्या-त्या वेळच्या राजकीय भाषेत सांगितल्या. कोणी विकासाचा विषय घेतला, तर कुणी सामाजिक न्यायाचा विषय घेतला, तर कुणी रामजन्मभूमीचा विषय घेतला.

लोकशिक्षण करीत करीत एक बांधील मतदार निर्माण करण्यामध्ये या सर्वांचे योगदान न पुसता येणारे आहे. तशी ही सर्व संघाच्या मुशीतून आलेली माणसे आहेत. आणि संघाचा मंत्र आहे लोकसंग्रह करण्याचा. ज्याला लोकसंग्रह करायचा आहे, त्याला कोणतीही संकुचित भूमिका घेता येत नाही. सर्वच आपले आहेत. काही विरोधी दलात आहेत. त्यांचे विचार आणि कार्यक्रम वेगळे आहेत. परंतु ते सगळे आपलेच आहेत. त्यांच्या विचारांच्या आणि कार्यक्रमांच्या मर्यादा जेव्हा त्यांच्या लक्षात येतील, तेव्हा ते आपल्याकडेच येतील, या विश्वासाने या सर्वांनी वाटचाल केली. हा विश्वास आता प्रत्यक्षात दिसू लागलेला आहे. 

प्रमोदजी ते अरुण जेटली अशी एक कर्तृत्ववान पिढी आपल्यात नाही. त्यांच्या अकाली जाण्याची जखम घाव ठेवून जाणारी असली, तरी आपल्याला जखम चिघळत ठेवत बसून चालणार नाही. पुढे जायचे आहे. आज ज्या शिखरावर आहोत, ते शिखरदेखील लहान वाटेल अशा भव्य शिखरावर पोहोचायचे आहे. वाट कठीणच आहे आणि म्हणूनच ती आव्हानात्मक आहे. पुरुषार्थ म्हणजे काय? हे या सर्व मंडळींनी दाखविले. त्या पुरुषार्थाचा वारसा आपल्याला प्राप्त झालेला आहे, तोच आपल्याला पुढे न्यायचा आहे.

vivekedit@gmail.com