वाहतुकीचे नियम आणि पुणे

स्रोत: विवेक मराठी    दिनांक26-Aug-2019

  


नुकतेच पुणे महानगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सामाजिक उपक्रम अंतर्गत रक्षाबंधननिमित्ताने वाहतूक सुरक्षा अभियान घेण्यात आले. यामध्ये संघाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला व विविध ठिकाणी जाऊन वाहतूक समस्याचे जनजागरण केले. त्यानिमित्ताने मोनीश शाह यांनी काही निरीक्षण नोंदवले आहे.

पुणे हे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न शहर आहे.पुण्याला एक देदीप्यमान ऐतिहासिक वारसा आहे.पूर्वेकडील ऑक्स्फर्ड म्हणूनही पुणे ओळखले जाते.निवृत्तांचे माहेरघर, शांत, कमी लोकसंख्या आणि हिरवेगार असे होते आपले पुणे.मात्र अलीकडे पुण्याची ही ओळख पुसली जात आहे.

आपले शहर आता काँक्रीट जंगलापेक्षा अधिक काही नाही राहिले. पुण्याची लोकसंख्या प्रचंड वाढली आहे, ज्यापैकी काही लोक उतावीळ, असंस्कृत आणि कायद्याला न जुमानणारे आहेत. त्यामुळे अनेक मानव निर्मित समस्या निर्मात होत आहेत. त्यापैकी एक म्हणजे आपल्या शहरातील वाहतूक व्यवस्था ही सर्वात मोठी समस्या झाली आहे. आपल्या शहरातीलया वाहतूक समस्येमुळे प्रत्येक नागरिकाचे रोजचे जीवन जवळजवळ ठप्प होते.

आपण विविध दृष्टीकोनातून या समस्येचे थोडक्यात चिंतन आणि विश्लेषण करू.

आपल्या पुण्याचे अतिशय - घातांकी वेगाने शहरीकरण झाले. मात्र दुर्दैवाने ही वाढ अत्यंत विसकळीत झाली.ज्या पुण्याच्या रस्त्यांवर एकेकाळी माणसांची आणि सायकलींची वर्दळ होती, त्या रस्त्यांवर आता स्वयंचलित दोनचाकी आणि चारचाकी वाहनांची गर्दी दिसते. तथापि ही वाढ पूर्णपणे असमान आहे आणि शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासाशीदेखील सुसंगत नाही.

वास्तविक, ही खरी समस्या नसून आधुनिक युगातली आपली मन:स्थिती ही खरी समस्या आहे - प्रवास करताना आपण आपला वेग 'ताशी किलोमीटर'मध्ये मोजता 'गिगाबाइट प्रतिसेकंदा' मोजतो! आपले जीवन इतक्या धकाधकीचे झालेय की आपण इतर नागरिकांच्या जीवनाची किंमत विसरलोय. आपल्याला फक्त स्वत:चे सुख आणि स्वत:ची सोय हवी असते.

या वास्तविक जीवनातले उदाहरण आपण बघू या. रस्त्यांची विद्यमान व्यवस्था सुधारून आणि विस्तारित करून, उड्डाणपूल, भुयारी मार्ग इत्यादी बांधून स्थानिक सरकारने आपले आयुष्य सोपे करणे सुरू केले आहे. परंतु याने आपल्या समस्यांचे निराकरण होणार नाही, कारण या पायाभूत सुविधा ही समस्या नसून आपला स्वभाव अणि आपले विचार हीच खरी मूळ समस्या आहे.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी अनेक रस्ते रुंद केले गेले आहेत. परंतु रस्ता रुंदीकरण केल्यावर ही तेथील स्थानिक लोकांची विनामूल्य पार्किंगची जागा बनते आणि वाहतूक कोंडीची समस्या जशीच्या तशीच..

वाहतूक विशिष्ट दिशेने सुरळीत प्रवाहित व्हावी, यासाठी दुभाजक, वाहतूक बेटे तयार केली जातात. काही नागरिक मात्र काही सेकंदांचा वेळ वाचवण्यासाठी, काही मिलिलीटर इंधन वाचवण्यासाठी किंवा केवळ स्वत:च्या सोयीसाठी कायदा तोडून चुकीच्या विरुद्ध दिशेने वाहन चालवण्यात भूषण मानतात.

पादचाऱ्यांना चालण्यासाठी पादचारी मार्ग (फूटपाथ) बनवण्यात येतात. परंतु ते बांधल्यानंतर काही दिवसातच ते फेरीवाले, छोटे व्यावसायिक यांनी व्यापले जातात, आणि तेथे आधीपासून असलेल्या दुकान मालकांसाठी ही आरक्षित पार्किंगची व्यवसायाची जागा बनते. आपल्या शहरात रूढ होत असलेली नवी पद्धत म्हणजे या अनधिकृत फेरीवाले-छोट्या व्यावसायिकांपेक्षा पादचारी आणि त्यांचा जीव नगण्य आहे, मग पदपथ हा पादचाऱ्यांनी चालण्यासाठी नसून, त्यांनी वाहनांसाठी असलेल्या रस्त्यावरून चालण्यासाठी जागा शोधावी.

एखाद्या जागी सहजतेने प्रवेश करण्यासाठी आणि आपल्या सोयीसाठी आपण इतके आग्रही असतो, की आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे तेथून आपले वाहन अगदी जवळ उभे असावे यासाठी प्रसंगी 'नो पार्किंग'च्या फलकाजवळही रस्ता हीच तात्पुरती पार्किंग जागा समजून वाहन रस्त्यावरच उभे करतो. आमच्या सोयीसाठी आमची वाहने रस्त्यावरच बेफिकीरपणे अशी लावतो की इतर नागरिक रस्त्यावरून कशा प्रकारे मार्ग काढतील याचीही आम्ही पर्वा करत नाही.

अपण पथकर भरतो, म्हणून हे रस्ते आपलीच मालमत्ता आहेत असे समजून आपण आपली वाहने जागा मिळेल तिथे, बेशिस्तपणे उभी करतो. यामुळे दुसर्यांना होणार्या गैरसोईची आपण जराही पर्वा करत नाही.

 

आपण असे वेड्यासारखे घाईत असतो की जणू आपल्याला एखादी शर्यत जिंकायची असल्याप्रमाणे, सिग्नलजवळील झेब्रा क्रॉसिंग रेषा ही शर्यतीची प्रारंभरेषा समजून सिग्नल हिरवा होण्याची वाटही पाहता वाहन पळवतो. दुसऱ्या वाहनाच्या पुढे जाणे (ओव्हरटेकिंग) हा जणू आपला जन्मसिद्ध हक्कच आहे आणि रस्त्यावरील मार्गदर्शक खुणांकडे दुर्लक्ष करून आम्ही पुढे जाणारच.

रस्ता आपल्याच मालकीचा आहे, आपण रस्त्यावरचे कोणी विशेष व्यक्ती आहोत असे आपल्या सर्वांना वाटते आणि म्हणूनच चौकातून प्रथम कोण जाईल या चढाओढीत सर्व वाहने शेवटी एकाच ठिकाणी येऊन थांबतात आणि कोंडी होते, परिणामी आपण आपल्या वेळेची इंधनाची नासाडी करतो.

सर्वांनी आपल्याकडे लक्ष द्यावे, आपलेच ऐकावे, आपणच सर्वांच्या आकर्षणाच्या केंद्रस्थानी असावे अशा समजुतीने आपण सतत विनाकारण हॉर्न वाजवत असतो. आपल्या पुढे असलेल्या वाहनाला पुढे जाण्यासाठी जागा नाही हे दिसत असूनही तरीही कर्कश हाँर्न वाजवत राहतो.

यंत्रासारखी एकाच वेळी अनेक कामे करावी असे आम्हाला इतक्या प्रकर्षाने वाटते की वाहन चालवीत असतानाही आम्ही आमच्या स्मार्ट फोन्सवर बोलत असतो, संदेश टंकत असतो आणि त्यामुळे आमच्या मागे वाहनांची लांबलचक रांग लागून वाहतूक कोंडी होते.

प्रत्येक मूल त्याच्या पालकांचा जीव की प्राण असते. पण पुण्यामधील पालकांसाठी त्यांची मुले तर इतकी अतिअतिप्रिय आहेत की शाळेत प्रवेश करण्यासाठी आपल्या मुलाला चार पावले चालायचेही कष्ट होऊ नयेत यासाठी पालक मुलांना शाळेत सोडण्या-घेण्यासाठी जातात तेव्हा थेट शाळेच्या द्वारांसामोर आपली वाहने उभी करतात - त्यामुळे वाहतूक थांबली तरीही चालेल.

आपला जीव वाचवणाऱ्या हेलमेटवर आम्ही काहीशे रुपये खर्च करू इच्छित नाही, तर तुलनेने कमी महत्त्वाच्या गोष्टीसाठी - चैनीसाठी, महागडा फोन घेण्यासाठी हे पैसे वाचवतो.

जर आपल्याला आपले हे शहर आदर्श सर्वोत्तम शहर बनवायचे असेल, तर त्यासाठी वरील सर्व अशा इतर अनेक गोष्टी बंद करणे अत्यावश्यक आहे.'जाऊ दे, चालतंय' असा दृष्टीकोन सोडून द्यायला हवा. आपले वागणे हे आपल्या सुशिक्षितपणाचे प्रतिबिंब असते, पुढची पिढी आपल्या वागण्याचे अनुकरण करत असते हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

आदर्श नैतिक मूल्ये जोपासणारा समाज, आज्ञाधारकपणा, शिस्त, राष्ट्राभिमान, नियमांचे कायद्याचे पालन करणे ही आपल्या स्वतंत्र भारतामध्ये देशभक्तीची नवीन परिभाषा आहे. आजचे हे अराजक, बेशिस्त, स्वार्थ आणि आपल्या जबाबदारीबाबत बेफिकिरी यासाठी आपल्या पूर्वजांनी आणि स्वातंत्र्यसैनिकांनी आपले जीवन समर्पित केलेले नाही.त्यांच्या स्वप्नातला भारत उभा करण्यासाठी आपण त्यांच्या अपेक्षा पूर्ण करून भविष्यातील पिढ्यांना आपला अभिमान वाटेल असे वर्तन करू.त्यासाठी आपण कायद्याचे आणि नियमांचे पालन करणे एवढेच पुरेसे आहे.

ही परिस्थिती सुधारण्यासाठी आपण सर्वांनी संयमाने वागू या, आपल्या देशबांधवांबद्दल सहवेदना बाळगूं या वाहतूक नियमांचे अधिक चांगल्या प्रकारे पालन करू या.

 

आपण आपल्या देशाला पुन्हा श्रेष्ठ समृद्ध बनवण्याची प्रतिज्ञा करू या. आपण आपला रोजचा प्रवास करताना, वाहन चालवताना काही सोपी पावले उचलून आपण हे सहज साध्य करू शकतो.

 

आपण आपल्या देशबांधव नागरिकांच्या रस्त्यावरून मार्गक्रमण करण्याच्या हक्काचा सन्मान करू या.

२. आपण वाहतुकीच्या सर्व सांकेतिक चिन्हांचे, सिग्नल्सचे आणि सर्व कायद्यांचे पालन करू या.


. आपण स्वतःला शिस्त लावू आणि आपली रस्ते पोलीसमुक्त बनवू या.

. रस्ता वापरणाऱ्या इतर सर्व नागरिकांशी सहानुभूतीने वागू या.

. आपण सर्वांनी संयमाने वागू आणि वेळेचे योग्य नियोजन करून, वाहने हळू चालवून रस्त्याला शर्यतीचा मार्ग करणे टाळू.

. आवश्यकता नसताना हॉर्न वाजवणे, नियमबाह्य पद्धतीने पुढे जाणे, आपल्या इतर नागरिक बंधुभगिनींशी सहानुभूतीने प्रेमाने वागणे अशा सोप्या कृतींद्वारे रस्ता वाहतूक कमी तणावपूर्ण आणि शांततापूर्ण करू या.

. आपली वाहने फक्त नियुक्त पार्किंग स्थानांवरच, लष्करी शिस्तीने अतिशय व्यवस्थितपणे उभी करू.

. शाळेतून निघताना आपल्या मुलांनी थोडेसे चालणे आवश्यक आहे, यामुळे शाळेच्या परिसरातील रस्त्यांवरील रहदारीसुरळीत राहील, वाहतुकीची कोंडी कमी होईल आणि चालल्यामुळे मुलांचे आरोग्य चांगले राहील.

. आपण फक्त दूर असलेल्या ठिकाणी जाण्यासाठीच वाहनांचा वापर करू.

१०. आपण आपल्या पूर्वजांसारखे, उदार अंतःकरणाने इतरांना सन्मानाने पुढे जाऊ देऊ या.

११. आपण वाहन चालवीत अस्तांना भ्रमणध्वनी वापरणार नाही, अशी शपथ घेऊ या.

१२. रुग्णवाहिकेला प्राथमिकता देऊन पुढे जाण्यास मार्ग देऊ या.


 

चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वत:पासूनच होते, असे म्हणतात. आपल्या साध्या कृतींनी आणि वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याने आपण देशभक्त नागरिक होण्याच्या दिशेने एक सकारात्मक पॉल पुढे टाकू या.

भारत देश पुन्हा महान बनवण्याची शपथ घेऊ या. आज टाकलेले प्रत्येक छोटे पाऊल आपल्या पुढील पिढ्यांच्या आणि जागतिक स्तरावर आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करेल.

आपण वाहतुकीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळण्याचा संकल्प करू या.जलद, कार्यक्षम आणि प्रदूषणमुक्त वाहतूक हे भारत विकसित, सुरक्षित आणि समृद्ध होण्याच्या दिशेने एक छोटेसे पाऊल ठरेल.

 

मोनीश शाह

( लेखक वाहतूक समस्याचे अभ्यासक आहेत.)