‘सुवर्ण’ सिंधू

स्रोत: विवेक मराठी    दिनांक27-Aug-2019
भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या जागतिक बॅडमिंटन चॅम्पियन स्पर्धेतील अंतिम सामना जिंकत इतिहास रचला. सिंधू ही अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली. तिची जपानच्या नोझोमी ओकुहाराशी लढत झाली. तिने 40 मिनिटात 21-7 आणि 21-7 असा एकहाती हा सामना जिंकला. ही स्पर्धा म्हणजे भारतीय बॅडमिंटन इतिहासातील एक सुवर्णपानच आहे.


 
“Champions keep playing until they get it right !”
  
हे वाक्य आहे टेनिसमधली एक सुपरस्टार आणि हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवणारी महिला टेनिसपटू बिली जीन किंग हिचं. जोपर्यंत मनासारखं घडत नाही, तोपर्यंत प्रयत्न करतो तो चॅम्पियन! पी.व्ही. सिंधू चॅम्पियन होतीच, आता दिग्गजांच्या पंक्तीत जाऊन बसली आहे.

भारताची पहिली बॅडमिंटन विश्वविजेती खेळाडू. आणि ज्या पद्धतीने अंतिम सामन्यात तिने प्रतिस्पर्धी नोझोमी ओकुहाराची धुलाई केली, ते दृश्य आताही डोळ्यासमोरून जात नाही. तिने 40 मिनिटांत 21-7 आणि 21-7 असा एकहाती हा सामना जिंकला. एक भारतीय खेळाडू विश्वविजेतेपदासारख्या ऑलिम्पिकखालोखाल महत्त्वाच्या स्पर्धेत अंतिम सामन्यात निर्विवाद वर्चस्व गाजवते, प्रतिस्पर्ध्याला विजयाची संधीच देत नाही, असं चित्र यापूर्वी भारतीय क्रीडारसिकांनी कधी अनुभवलं नव्हतं. सिंधूचा वेग, चपळता, अचूकता, तंदुरुस्ती सारं कसं बघत राहण्यासारखं होतं.
 
2017 मध्ये याच ओकुहाराविरुद्ध याच विश्वविजेतेपद स्पर्धेत सिंधूने एक तास पन्नास मिनिटं लढा दिला होत. अक्षरश: इंच-इंच भूमी लढवली होती. पण अखेर पदरी पडला तो पराभवच. त्यामुळे आज ओकुहाराला एका तासाच्या आत चारी मुंड्या चित केल्यावर सिंधूच्या चेहर्यावरचा आनंद काही औरच होता.
 
मागची दोन वर्षं आणि खरं तर रिओमध्ये रौप्य जिंकल्यानंतर सिंधूला अनेक विजेतेपदांनी हुलकावणी दिली. डिसेंबरमध्ये मिळवलेलं वर्ल्ड फायनल्सचं विजेतेपद आणि अलीकडे जिंकलेली इंडोनेशियन ओपन या व्यतिरिक्त इतर ठिकाणी फायनल-सेमीफायनलमध्ये पोहोचून तिचा पराभव होत होता. काहींनी तर असंही म्हटलं - तिच्याकडे जिंकण्याची ईर्ष्या नाही.

 
सिंधूसाठीही तो काळ कठीण होता. कारण, सेमीफायनलमध्ये ज्या खेळाडूला ती हरवू शकत होती, त्यांच्याकडून फायनलमध्ये हरत होती, असंही अनेकदा घडलं. बॅडमिंटनमधली अभेद्य चिनी भिंत सातत्याने भेदणं जमत नव्हतं. मग सिंधूने तेच केलं, जे वर बिली जीन किंग हिने म्हटलं आहे. सगळे पाढे नव्याने गिरवायला सुरुवात केली. स्वत:पुरती छोटी-छोटी लक्ष्य निर्धारित केली. आणि त्यानुसार मेहनत करत गेली. सरावाचं वेळापत्रक आणि पद्धत ठरवायला प्रशिक्षक गोपीचंद होतेच.
 
दोघांनी मिळून मग एक मार्ग आखला. चिनी, कोरियन आणि जपानी खेळाडूंशी मुकाबला करायचा, तर हवी सर्वोत्तम तंदुरुस्ती, जोडीला खांद्यात आणि मनगटात अजोड ताकद, एक तास सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्यासाठी स्टॅमिना. या गोष्टींवर काम सुरू झालं. गोपीसरांनी मधल्या काळात काळाची गरज ओळखून इंडोनेशियन कोच अॅकॅडमीत आणायला सुरुवात केली होती. त्यांनी मागच्याच वर्षी किम जि ह्यून या कोरियन आणि स्वत: एशियन गेम्स विजेत्या बॅडमिंटनपटूला कोच म्हणून हैदराबादला आणलं. सिंधूची जबाबदारी त्यांनी किम यांच्यावर सोपवली.
 
तिथून सिंधूचा खेळच बदलला. सिंधू पहिल्यापेक्षा जास्त तंदुरुस्त, जास्त एकाग्र, चपळ आणि वेगवान झाली. खेळात अचूकता आली. सिंधू आता कोर्टवर धावत नाही, उडते. तिच्या या नव्याने कमावलेल्या शैलीचा अनुभव विश्वविजेतेपद स्पर्धेत नोझोमी आकेहारा, यू फे चेन, यामागुची अशा, सिंधूपेक्षा क्रमवारीत अव्वल असलेल्या सगळ्याच खेळाडूंनी घेतला. कालच्या अंतिम सामन्यात सिंधूच्या एका स्मॅश फटक्याचा वेग ताशी 359 किलोमीटर इतका होता! आता बोला.
 
शारीरिक तंदुरुस्ती आणि वेग वाढवण्यासाठी सिंधूने बॅडमिंटन सरावापेक्षा वेगळा अतिरिक्त वेळ दिला. शिवाय कोर्टवर नेटजवळचे फटके आणि नेटपासून लांब मारायचे जोरदार स्मॅश आणि ड्रॉपचे फटके असाही सराव सुरू झाला.
गोपीसरांनी तिला आधीपासून एक शिकवण दिली होती. मोठ्या स्पर्धेसाठी मोठी आणि वेगळी तयारी लागते. म्हणूनच रिओ ऑलिम्पिकपूर्वी काढून घेतला होता, तसाच या वेळीही तीन महिन्यांपूर्वी सिंधूचा मोबाइल फोन काढून घेण्यात आला. व्हॉट्स अॅपमुळे तिचं लक्ष विचलित झालेलं त्यांना नको होतं. सिंधूही काही सेकंदांत तयार झाली. शॉपिंग, मैत्रिणींबरोबर गप्पा बंद झाल्या आणि सगळं लक्ष फक्त आणि फक्त बॅडमिंटनवर केंद्रित झालं. एकदा तुम्ही प्रसिद्धीच्या झोतात आलात की तुमचा खेळ आणि शैलीही समोरच्या खेळाडूला माहीत होते. तिचा अभ्यास करून पुढच्या वेळी तुम्हाला हरवणं सोपं जातं. रिओ ऑलिम्पिकनंतर सिंधूनेही याचा अनुभव घेतला होता.
 
आता नवीन कोच किम यांनी सिंधूला याचीच जाणीव करून दिली. त्यांच्या मते सिंधूच्या खेळात कौशल्याचा अभाव होता. तिचे फटके खूपच सरळसोट मारलेले होते, त्यात प्रतिस्पर्ध्याला बुचकाळ्यात टाकेल किंवा विचार करायला लावेल असं काही नव्हतं. म्हणून मग थोडं स्मार्ट बॅडमिंटन खेळण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला.
 

आक्रमता हा सिंधूचा स्थायिभाव आहे. त्याला किम यांनी नेटजवळच्या नजाकतभर्या खेळाची जोड दिली. मेहनतीत सिंधू कमी कधीच नव्हती. ती बॅडमिंटन खेळायला लागली, तेव्हा गोपीसर भारताची आणखी एक स्टार खेळाडू सायना नेहवालबरोबर मेहनत घेत होते. सायनाचा सराव पहाटे पाचला सुरू व्हायचा. सिंधूबरोबर सराव करायचा तर गोपीसरांनी तिला पर्याय दिला सकाळी चार वाजता कोर्टवर येण्याचा. सिंधूने विचार न करता तो पर्याय स्वीकारला. आणि तेव्हापासून कधीही सरावाची वेळ चुकवली नाही. आठ वर्षांची असताना तिने बॅडमिंटन सुरू केलं, तेव्हा सिकंदराबादहून दोन तासांचा प्रवास करून ती सरावासाठी सकाळी वेळेवर हजर व्हायची.
 
या वेळी कोर्टवरच्या सरावाबरोबरच शारीरिक तंदुरुस्ती आणि चपळता वाढवण्यासाठी वेगळे व्यायाम करण्याची गरज होती. त्यासाठी सिंधूने अतिरिक्त तास दिले आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून एक वेगळी, नवी सिंधू आपण समोर बघतो आहोतल्ल जिला आता वेध लागले आहेत टोकयो ऑलिम्पिकचे. जाता जाता एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. गोपीचंद सध्या थेट सिंधूबरोबर सराव करत नसले, तरी तिच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे.
 
2001मध्ये त्यांनी ऑल इंग्लंड ओपन ही मानाची स्पर्धा जिंकली, तेव्हा ते 28 वर्षांचे होते. भारतीय बॅडमिंटनपटूला पहिली मोठी स्पर्धा जिंकण्यासाठी इतका वेळ लागू नये, असं त्यांना मनापासून वाटत होतं. म्हणून त्यांनी लगेचच दोन वर्षांनी गोपीचंद अॅकॅडमी सुरू केली.
 
तेव्हा सहा वर्षांच्या असलेल्या सिंधूने गोपीचंद यांचा कौतुक सोहळा आणि विजेतेपदानंतर घरापर्यंत निघालेली मिरवणूक पाहिली आणि स्वत: जिंकण्याचा ध्यास घेतला. पुढे गोपीचंद यांच्याकडेच प्रशिक्षण घेऊन ऑलिम्पिक रौप्य आणि विश्वविजेतेपदापर्यंत तिने मजल मारली आहे. भारतीय क्रीडारसिकांना या गुरुशिष्याच्या जोडीचा कायम अभिमान वाटेल.
(लेखिका बीबीसी मराठीच्या पत्रकार आहेत.)