अण्णाभाऊचा कथाप्रपंच

03 Aug 2019 12:52:49

 

अण्णाभाऊ साठे यांची साहित्यसंपदा अफाट होती. त्यांचे साहित्य कल्पनाविलास नसून समाजातील वास्तव रेखाटणारे होते. त्यांच्या कथांत जगणारी पात्रे जरी तळागाळातील संघर्षमय जीवन जगत असली तरी लाचार नाहीत, हे त्यांच्या कथांतील वैशिष्ट्य.
  

 

अण्णा भाऊ साठे म्हणजे मराठी साहित्यातले फार मोठे, पण अगदी अलीकडेपर्यंत तसे दुर्लक्षित नाव. अण्णाभाऊंनी साहित्याच्या जवळजवळ सर्व प्रकारांत स्वतःच्या प्रतिभेचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या नावावरफकिरासारख्या 35 कादंबर्या, 13 कथासंग्रह आणिमाझा रशियाचा प्रवाससारखे प्रवासवर्णन, 3 नाटके, 14 वगनाट्ये, 8 पोवाडे, 10-12 गाणी असे जवळजवळ 52 ग्रंथ आहेत. याखेरीज त्यांनीलोकयुद्ध’, ‘लोकयुग’, ‘युगांतर’, ‘युद्धनेतृत्ववगैरे नियतकालिकांतून लेखन केलेले आहे. त्यांच्या एकूण सात कादंबर्यांवर चित्रपट निघालेे आहेत. त्यांच्याफकिराला 1961 साली महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला होता. अण्णाभाऊंनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला ही कादंबरी अर्पण केली. अण्णाभाऊंच्या मनांत बाबासाहेबांबद्दल अतिशय आदर होता. ‘धनवंतांनी अखंड पिळले, धर्मांधांंनी असेच छळले, मगराने जणू माणिक गिळले, चोर झालेे साव. जग बदल, घाव घालुनी, सांगुनी गेले मला भीमरावअशा शब्दांत या शाहिराने बाबासाहेबांबद्दलच्या भावना व्यक्त तर केल्यातच, तसेच त्यांच्या अनुयायांना कृतिप्रवण होण्याचा संदेश दिला आहे. अशी बहुप्रसवा लेखणी असणार्या अण्णाभाऊंचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे.

 

सुरुवातीला अण्णाभाऊंच्या जन्मतारखेविषयी काहीसा गोंधळ होता. पण डॉ. बाबूराव गुरव यांच्याअण्णा भाऊ साठे समाजविचार आणि साहित्यविचारया पीएच.डी.च्या प्रबंधामुळे आता 1 ऑगस्ट 1920 ही जन्मतारीख सर्वमान्य झाली आहे. त्यांचा कार्यकाल 1941 ते 1969 हा. त्यांना 18 जुलै 1969 रोजी मृत्यूने गाठले. अण्णाभाऊंच्या एकूण जीवनाचे ढोबळमानाने चार टप्पे करता येतात. पहिला टप्पा म्हणजे जन्मगाव वाटेगाव, जिल्हा सातारा येथील जगणे. त्यांनी 1931 साली वाटेगाव ते मुंबई हा प्रवास पायी केला होता! यासाठी त्यांना सहा महिने लागले होते. दुसरा टप्पा म्हणजे मुंबईतील माटुंगा येथील लेबर कॅम्पातील वास्तव्य. तिसरा टप्पा म्हणजे मार्क्सवादी अण्णाभाऊ चौथा टप्पा म्हणजे कम्युनिस्ट चळवळीचा भर ओसरल्यानंतरचे अण्णाभाऊ. अण्णाभाऊंचे शिक्षण फारसे झालेले नव्हते. ते जेमतेम तिसरी-चौथीपर्यंत शिकले होते. त्यांचे खरे शिक्षण जीवनाच्या शाळेत झाले. म्हणूनच त्यांच्या एकूणच साहित्यात जगण्यासाठी गोरगरिबांना करावा लागणारा संघर्ष नेहमी येतो. मात्र त्यांची अनेक पात्रे गरीब असली, तरी नैतिकतेचा धागा घट्ट पकडून जगत असतात, संघर्ष करतात. कधी हरतात तर कधी जिंकतात, पण मोडत नाहीत. यामागे जसे त्यांच्यावर झालेले मार्क्सवादी संस्कार आहेत, तसेच त्यांनी प्रत्यक्ष भोगलेले, बघितलेले जीवन आहे. या लेखातकथाकार अण्णा भाऊ साठेयांचा विचार करावयाचा आहे.

 

 

लढणारी माणसे

 

 

अण्णाभाऊंनी पहिली कथा 1949 साली लिहिली. तिचे शीर्षक होतेमाझी दिवाळी’. ही कथामशालया साप्ताहिकात प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर अण्णाभाऊंनी भरपूर कथालेखन केले. त्यांच्या नावावर सुमारे 300 कथा आहेत, ज्या 13 कथासंग्रहांत उपलब्ध आहेत. त्यांच्या काही कथासंग्रहांची नावेभानामती’, ‘फरारी’, ‘कृष्णाकाठच्या कथा’, ‘निखारा’, ‘नवतीवगैरे. अण्णाभाऊंचा पहिला कथासंग्रह 1957 साली मुंबईच्या अभिनव प्रकाशनाने काढला. त्याचे नाव होतेखुळंवाडी’. या कथासंग्रहाला आचार्य अत्र्यांची प्रस्तावना आहे. यात अत्रे म्हणतात, ‘अण्णा भाऊ साठेंच्या कथांचे एका वाक्यात वर्णन करायचे झाल्यास असे सांगता येईल कीही जगण्यासाठी लढणार्या माणसाची कथा आहे. ही कच खाणारी, हार मानणारी माणसं नाहीत. या सर्वांना मानाने जगायचे आहे आणि आक्रमक वृत्तीने, निकराने लढून त्या सामन्यात त्यांना जिंकायचेही आहे.’ आचार्य अत्र्यांसारखा ज्येष्ठ लेखक ही निरिक्षणे नोंदवतोय, हे लक्षात घेतले पाहिजे. असे असूनही अण्णाभाऊंकडे मराठी सारस्वतांनी अक्षम्य दुर्लक्ष केले, हे विसरता येत नाही. कुसुमावती देशपांडेंसारख्या साक्षेपी समीक्षकांनीसुद्धा अण्णाभाऊंकडे पाठ फिरवली होती.

 

 

नैतिक भूमिका

 

 

अण्णाभाऊंचा दुसरा कथासंग्रह 1960 साली आला. याला खुद्द अण्णाभाऊंचीच प्रस्तावना आहे. अण्णाभाऊंचे एकूण साहित्य समजून घेण्यासाठी ही प्रस्तावना अतिशय उपयुक्त आहे. या प्रस्तावनेत अण्णाभाऊ म्हणतात, ‘मी जे जीवन जगतो, बघतो, अनुभवतो, तेच लिहितो. मला कल्पनेचे पंख लावून भरारी मारता येत नाही. त्या बाबतीत मी स्वतःला बेडूक समजतो.’ यातून अण्णाभाऊंतील लेखक कसा सदैव मातीशी नाते घट्ट पकडून होता, हे दिसून येते. अण्णाभाऊंची पात्रे गरिबीतही नैतिकतेची कास सोडत नाहीत आणि प्रसंगी आधुनिक, पुरोगामी मूल्यांच्या आधारे महत्त्वाचे निर्णय घेतात. त्यांच्याहिराकथेत बलात्कार झालेल्या स्त्रीचा पती तिला स्वीकारतो, असेे दाखवले आहे. ही कथा काळाच्या किती पुढे आहे याचा अंदाज यायला हरकत नाही. त्यांच्याफरारीकथेत, आज ज्याला स्त्रीवादी दृष्टीकोन म्हणतात तो व्यक्त झालेला दिसून येतो. यात स्त्रीच्या योनिशुचितेचा बडिवार माजवू नये, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहेे. रशियन लेखक मॅक्सिम गॉर्की म्हणतो की लेखक त्याच्या लेखनातून जी नैतिक भूमिका घेतो, त्यात त्याच्या लेखनाचा दर्जा दिसून येतो. अण्णाभाऊंच्या कथांच्या संदर्भात हेे निरीक्षण यथार्थ आहे.

 

 

अण्णाभाऊंना दुर्मीळ अशी विनोदबुद्धी होती. त्यांच्याकाडीमोडकथेतील औताड्याची सखूबाई आपल्या लेकाचे हरणाबरोबर लग्न लावून देते. पण अंधश्रद्धेपायी त्या नवदांपत्याला संग करू देत नाही. शेेवटी काडीमोडापर्यंत पाळी जाते. याचप्रमाणे अण्णाभाऊ ग्रामीण जीवनातील गावकीतील ताणतणाव वस्तुनिष्ठपणे रंगवतात. त्यांच्याउपकाराची फेडकथेत मधू महार मेलेले ढोर उचलायचे नाकारून शंकया चांभाराला चांगला धडा शिकवतो.

 

 

या छोटेखानी लेखात मी अण्णाभाऊंच्या एका अतिशय महत्त्वाच्या कथेचे तपशिलात जाऊन विवेचन करणार आहे

 

 

आयुष्याचा विस्तव

 

 

स्मशानातलं सोनंही ती कथा आहे. ‘स्मशानातलं सोनंमध्ये मुुंबईसारख्या महानगरातील जीवन रेखाटले आहे. माझ्या मते एक कथाकार म्हणून अण्णाभाऊंचीस्मशानातलं सोनंही कथा फार महत्त्वाची आहेत. ‘स्मशानातलं सोनंमध्ये ग्रामीण भागातून मुंबईला स्थलांतरित झालेल्या एका कुटुंबाची कथा आहे. अशी स्थलांतरे आजही होत आहेत. कथेचा नायक भिमाला मुंबईतील दूरवरच्या एका उपनगरातल्या खाणीत अंगमेहनतीचे काम मिळते. तेथे जवळपासच तो एक झोपडी उभारून जगायला सुरुवात करतो. अशात एक दिवशी बातमी येते की खाणीतले काम बंद झाले. भिमा त्याचे कुटुंब उघड्यावर पडते. एके रात्री असाच हताश अवस्थेत घरी परतत असताना भिमाला स्मशानात प्रेत जळून खाक झालेले दिसते. मनाच्या उद्विग्न अवस्थेत तो त्या प्रेतावरील राखेत हात घालतो. थोड्या वेळाने त्याला प्रेताच्या बोटातील एक तोळ्याची आंगठी सापडते. त्याचा त्या दिवशीचा जगण्याचा प्रश्न एका झटक्यात सुटतो. एवढेच नव्हे, तर जाता जाता त्याला उत्पन्नाचा एका नवीन जगावेगळा मार्ग दाखवून जातो, तो मार्ग म्हणजे दररोज रात्री अशाच प्रकारे स्मशानात जायचे, जळून खाक झालेली प्रेते शोधायची. त्या राखेत कधी बांगडी, तर कधी अंगठी तर कधी नाकातले डूल, तर कधी तोंडातला सोन्याचा दात सापडायचा. ते विकून आला दिवसभर साजरा करायचा.

 

 

इथपर्यंत ठीक चाललेले असते. या दरम्यान लेखक म्हणून अण्णाभाऊ स्मशानाचे, तेव्हाच्या मुंबईतले गरीब लोकांचे जगणे जे उभे करतात, त्याला तोड नाही. एका प्रसंगी स्मशानातले वर्णन करताना अण्णाभाऊ लिहितात - ‘ती पन्नास झोपडी भेदरली होती’. अशा वाक्यातून अण्णाभाऊ पात्रांच्या मनातील भावना शब्दबद्ध करतात. हा जगण्याचा मार्ग योग्य नाही अशी भिमाला त्याची पत्नी वारंवार जाणीव करून देते. ती गरीब असली, तरी काय योग्य आहे आणि काय नाही, हे तिला मूल्यभान असतेे. पण भिमासारखे असंख्य गरीब लोेक लाचार झालेले असतात. या अर्थानेस्मशानातलं सोनंही कथा फक्त भिमाची राहता हजारो गरिबांची कथा होते. गरिबीमुळे आलेली लाचारी वाचकांना अस्वस्थ करते.

 

 

जीवनात काहीही स्थिर नसतेही मार्क्सवादी जीवनविषयक जाणीव अण्णाभाऊंच्या या कथेतून कलात्कम पातळीवर व्यक्त होतेे. या प्रकारे प्रेते उकरून जगणे हा काही कायमस्वरूपी उपाय होऊ शकत नाही. गावात या कृत्याची कुजबुज सुरू होते की कोेणी तरी रात्रीच्या अंधारात प्रेते उकरते. एके दिवशी भिमाला बातमी लागते की गावातील एक श्रीमंत माणसाचा मृत्यू झाला असून दुपारीच त्याला जाळले. या बातमीचा भिमासाठी उपयोग म्हणजे रात्री प्रेतावरील राख बाजूला केली, तर काही तरी घबाड मिळेल. येथेसुद्धा अण्णाभाऊतील साक्षेपी लेखक जागा असतो म्हणूनच तो एक निरीक्षण नोंदवतो की प्रेतावरून समजू शकते की मेलेली व्यक्ती श्रीमंत होती की गरीब. जर अंगावर दागिने असतील श्रीमंत, नाहीतर गरीब हा साधा पण रोकडा निकष असतो. रात्री भिमा तयारीने स्मशानात येतोे. मनात भरपूर अपेक्षा असतात की आज काहीतरी मोठे सापडेल. तो मोठ्या उत्साहाने पे्रतावरील राखेत शोधाशोध सुरू करतो. त्याच्या दुर्दैवाने त्याला त्या रात्री एका वेगळ्याच पूर्णपणे अनपेक्षित संकटाचा सामना करावा लागतो. त्या रात्री स्मशानात कोल्ह्यांची टोळी आलेली असते ती टोळी प्रेते उकरून खाण्याच्या तयारीत असते. परिणामी कोल्ह्यांची टोळी जगण्यासाठी हे काम नाइलाजाने करावे लागत असलेला भिमा, यांच्यात तुंबळ युद्ध होेते. कोल्ह्यांची टोळी भिमाचेे लचके तोडून त्याला बेजार करते, तर भिमा हातोडीने त्याच्यावर हल्ला करणार्या कोल्ह्यांंना चोपत असतोे. हा प्रसंग या कथेतील उत्कर्षबिंदू आहेे. येथे लेखकानेनिसर्ग विरुद्ध माणूसहा आदिम संघर्ष चितारला आहे, जो मुळातूनच वाचला पाहिजे.

 

 

स्मशानात सुुरू असलेल्या, कोल्ह्यांची टोळी विरुद्ध भिमा यांच्यातील संघर्षाचे आवाज गावातल्या लोकांपर्यंत जातात. स्मशानात कोल्ह्यांची टोळी शिरली म्हणत गावकरी स्मशानाकडे निघतात. या टप्प्यावर भिमाने प्रेताच्या तोंडातील सोन्याचा दात काढण्यासाठी तोंड उचकटून दात बाहेर काढण्याचे निकराचे प्रयत्न चालवलेले असतात. एका बाजूने जवळ येत चाललेले गावकरी, दुसरीकडून कोल्ह्यांचे हल्ले यामुळे घाबरलेला भिमा घाईघाईत एक घोडचूक करतो आणि प्रेताचे तोंड मिटते आता भिमाची दोन बोटे अडकतात. ती काढणे अशक्य असल्यामुळे भिमा स्वतः दोन बोटे कापतो तेथून पळ काढतो. यथावकाश भिमाची जखम भरून येते तेव्हाच बातमी येते की खाण पुन्हा सुरू होणार आहेे. भिमा ढसाढसा रडतो, कारण दोन बोटे तुटली असल्यामुळे आता भिमाला खाणीत काम मिळणार नसते. लेखकाच्या शब्दांतपहाडासारखा भिमा लहान मुलांसारखा ढसाढसा रडतो.’ येथे विचक्षण वाचकांना हेन्री (1862-1910) या सुप्रसिद्ध अमेरिकन कथाकाराच्यागिफ्ट ऑफ मॅगीया गाजलेल्या कथेची आठवण होते. या कथेचा शेवट असाच नाट्यपूर्ण कमालीचा दु:खद होतो. ना.सी. फडक्यांनी त्यांच्याप्रतिभासाधनया पुस्तकात एकआदर्श कथाम्हणूनगिफ्ट ऑफ मॅगीचा उल्लेख केला आहे

 

स्मशानातलं सोनंही कथा एका कथाकार म्हणून अण्णाभाऊंतील लेखकाची सर्व वैशिष्ट्ये व्यक्त करते. सूक्ष्म निरीक्षणशक्ती, भाषेवर हुकमत, वातावरणनिर्मिती, चटकदार संवाद वगैरे सर्वच अंगे यात व्यवस्थित हाताळली आहेत.

 -अविनाश कोल्हे

Powered By Sangraha 9.0