कादंबरीतील मूल्यविचार

स्रोत: विवेक मराठी    दिनांक03-Aug-2019

अण्णाभाऊ हे समष्टीशी एकरूप झालेले लेखक होते. समकालीन समाजाच्या व्यथा-वेदनांचे त्यांना भान होते. त्यामुळेच त्यांच्या कथा-कादंबर्यांमधून समकालीन समाज नेमकेपणाने स्पष्ट होताना दिसतो. कथा, कादंबर्या, लावणी, पोवाडे अशा विविध साहित्यप्रकारांत अण्णाभाऊंचा हातखंडा होता.


मराठी कथा-कादंबर्यांमध्ये वास्तववादी जीवनदर्शन घडविणार्या थोर प्रतिभावंतांपैकी अण्णा भाऊ साठे हे एक आहेत. सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे 1 ऑॅगस्ट 1920 रोजी जन्मलेले अण्णाभाऊ स्वत:च्या प्रतिभेच्या जोरावर जागतिक कीर्तीचे लेखक झाले. शाहीर म्हणून अवघ्या महाराष्ट्राला अण्णाभाऊंचा परिचय आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊ एक शाहीर म्हणून नावारूपाला आले. त्यांनी अनेक पोवाडे आणि लावण्या रचल्या. या रचना लोकप्रियही झाल्या. असे असले, तरी अण्णाभाऊंनी कथांच्या आणि कादंबरीच्या प्रांतातसुद्धा विपुल आणि दर्जेदार लेखन करून आपली छाप सोडली आहे. दुर्दैवाने अल्पायुषी ठरलेल्या अण्णाभाऊंनी 30-35 वर्षांमध्ये 35 कादंबर्या, 3 नाटके, एक प्रवासवर्णन, जवळपास 13 कथासंग्रह, 14 लोकनाट्ये, 10 प्रसिद्ध पोवाडे, अनेक लावण्या आणि गीते तसेच विविध लेख असे विपुल लेखन केले. त्यांच्या 7 कादंबर्यांवर चित्रपट निघाले आहेत. असे महान लेखक अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे त्या अनुषंगाने विविध कार्यक्रम वर्षभर घेतले जातील. त्या निमित्ताने अण्णाभाऊंच्या विचारांचे आणि साहित्याचे पुन्हा विश्लेषण केले जाईल. पण एकूणच इतिहासात डोकावून पाहिल्यास मराठी समीक्षेने अण्णाभाऊंच्या साहित्याची म्हणावी तितकी दाखल घेतली नाही, ही वस्तुस्थिती आहे.

अण्णाभाऊंचे लेखन ते ज्या उपेक्षित समाजात जन्माला आले होते, त्या उपेक्षित समाजाच्या जीवनाचे वास्तव प्रकर्षाने मांडणारे होते. विशेषत: अण्णाभाऊंच्या कादंबर्यांमधून हे उपेक्षित वर्गाचे वास्तव चित्रण अधिक प्रमाणात दिसते. तसेच समाजामध्ये जेवढे म्हणून उपेक्षित आहेत - मग ते कष्टकरी असतील, दलित असतील, स्त्रिया असतील - या सर्वांचे चित्रण अण्णाभाऊंच्या कादंबर्यांमधून येते. या गावकुसाबाहेरच्या, दुर्लक्षित समाजाचे चित्रण अण्णाभाऊंच्या आधी थोड्याफार फरकाने झाले होते. परंतु अण्णाभाऊंच्या लेखनाने या चित्रणाला एक वेगळी कलाटणी दिली. आधीच्या साहित्यातील पीडित हा समाजाची सहानुभूती मिळवीत होता. पण अण्णाभाऊंनी आपल्या कादंबरीतील या पीडित, अस्पृश्य जनतेला ताठ मानेने जगणे शिकवले. संघर्ष करायला शिकवले. आपला हक्क लाचारीने नव्हे, तर संघर्ष करून मिळवायचा संदेश त्यांनी जनतेला दिला. हा दलित साहित्याला अण्णाभाऊंनी दिलेला नवा दृष्टीकोन होता. ‘फकिरामधील सगळी पात्रे - मग तो राणोजी असेल, फकिरा असेल, सावळा असेल - या सर्वांमध्ये हीच संघर्षाची भावना जिद्द पाहावयास मिळते. ही मंडळी कुठेही लाचार अथवा दुबळी नाहीत. उलट ते परकीय आणि स्वकीय अशा दोन्ही व्यवस्थांमधील जुलमी प्रवृत्तींबरोबर संघर्ष करतात.

अण्णाभाऊ हे समष्टीशी एकरूप झालेले लेखक होते. समकालीन समाजाच्या व्यथा-वेदनांचे त्यांना भान होते. त्यामुळेच त्यांच्या कथा-कादंबर्यांमधून समकालीन समाज नेमकेपणाने येतो. अण्णाभाऊंच्या कादंबर्या या शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही पार्श्वभूमींवर साकार होतात. विशेषत: ग्रामीण जीवनातील रगेलपणा रंगेलपणा याचे त्यांच्या कादंबर्यांतून दर्शन अधिक प्रमाणात घडते. याचे कारण म्हणजे आपण ज्या समाजात जगलो, त्या समाजाशी लेखकाची असलेली एकरूपता. अण्णाभाऊंनी हा समाज लहानपणापासून समजून घेतला आणि तोही सकारात्मक वृत्तीने. या समाजातील सर्व लोक, त्यांचे स्वभाव, या समाजाचे रितीरिवाज या सगळ्यांचा त्यांनी सकारात्मकतेने स्वीकार केला होता. म्हणूनच त्यांच्या कादंबरीविश्वातील सगळी पात्रे ही त्यांच्या त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांसह आपल्यासमोर उभी राहू शकली. समाजातील आवतीभोवती असणारी माणसेच नव्हे, तर संपूर्ण वारणा आणि परिसर याविषयी अण्णाभाऊंना विलक्षण आत्मीयता वाटत असे. त्यामुळे त्यांच्या लेखनातून हा वारणा परिसरही जिवंत होऊन आपल्या भावभावनांसह वाचकांसमोर उभा राहतो. अण्णाभाऊंच्या साहित्यातून येणारे सारे जीवन त्यांनी स्वत: अनुभवलेले होते. कल्पनेच्या विश्वात रमणारा त्यांचा पिंड नव्हता. जे वास्तव त्यांनी पाहिले आणि अनुभवले, तेच त्यांच्या साहित्यातून व्यक्त झाले आहे.

असे असले, तरी अण्णाभाऊंनी दलित आणि पीडित जनतेचे केवळ दारिद्य्र, दु: दैन्य याचे चित्रण केले नाही. त्यांच्या साहित्याला जसे वेदनेचे मूल्य आहे, तसेच नकाराचे विद्रोहाचेही मूल्य आहे. अण्णाभाऊंच्या कादंबर्यांमधून अन्यायाविरुद्ध पिळवणुकीविरुद्ध उठवलेला आवाज आहे. तसेच त्यांच्या कादंबर्यांमधील पात्रे ही नैतिक मूल्यांची जपणूक करणारी आहेत - किंबहुना एका नव्या समताधिष्ठित व्यवस्थेसाठी संघर्ष करणारी पात्रे त्यांच्या कादंबर्यांत सापडतात. ही नवी समताधिष्ठित व्यवस्था स्थापित करणे हाच त्यांच्या संघर्षाचा मूलमंत्र आहे. नव्या मूल्याधिष्ठित युगाच्या निर्मितीसाठी प्राणपणाने झटणारी त्यांची पात्रे आहेत.

अण्णाभाऊंच्या कादंबरीतील पात्रे भुकेली आहेत, कंगाल आहेत. पण ही पात्रे भाकरीसाठी संघर्ष करत नाहीत, तर अण्णाभाऊंच्या कादंबरीतील पात्रे संघर्ष करतात तो समाजामध्ये माणुसकीच्या मूल्याची प्रतिष्ठापना करण्यासाठी. सर्व माणसांना माणसाप्रमाणे जीवन जगण्याचा अधिकार आहे या भावनेतून ते अन्याय अत्याचाराचा सामना करतात. या लेखनामागे कोणतीही वर्ण-अथवा वर्गसंघर्षाची भूमिका नाही. असे असते, तर फकिरामधील विष्णुपंतांनी वेगळी वर्ण- आणि वर्गश्रेष्ठतेची भूमिका घेतली असती. पण तेही पीडित आणि पददलित जनतेच्या पाठीमागे ठामपणे उभे राहतात ते केवळ माणुसकीच्या मूल्याच्या प्रस्थापनेसाठी. त्यांची पात्रे तळागाळातील, पददलित असली तरी ती सात्त्विक आहेत. नीतिमत्ता जपणारी पात्रे त्यांनी निर्माण केली आहेत. अस्पृश्यतामुक्त समाज, अत्याचारमुक्त समाज, गुलामगिरीमुक्त समाज तसेच सर्वांना समता, बंधुता न्याय प्रदान करणारा समाज अण्णाभाऊंना अपेक्षित होता आणि याच माणुसकीच्या मूल्यांतून अण्णाभाऊंनी आपले कादंबरीलेखन केले आहे. ‘वैजयंतामधून स्त्रियांवरच्या अत्याचाराचे चित्रण करून त्यांनी कलावंत स्त्रियांच्या जीवनातील समस्या मांडल्या आहेत. ‘माकडीचा माळमधून भटक्या विमुक्तांच्या जीवनाचे चित्रण केले आहे. या सर्व साहित्यात माणुसकीच्या मूल्याच्या प्रस्थापनेसाठीचा त्यांचा संघर्ष पाहावयास मिळतो.

लौकिक अर्थाने अल्पशिक्षित असलेले अण्णा भाऊ साठे आपल्या कसदार लेखनाच्या जोरावर उत्तमोत्तम कलाकृतींची निर्मिती करून जागतिक कीर्तीचे लेखक झाले. साहित्याच्या विविध प्रांतांत त्यांनी त्यांच्या प्रतिभेच्या साह्याने मुक्त विहार केला. समताधिष्ठित समाजाचे स्वप्न पाहिले आणि त्याच्या पूर्ततेसाठी आपली वाणी आणि लेखणीही झिजवली. अशा या महान लेखकाकडे, तसेच त्यांच्या दर्जेदार आणि युगप्रवर्तनाचे सामर्थ्य असणार्या साहित्याकडे मराठी समीक्षेने अक्षम्य डोळेझाक केली असली, तरी आजच्या काळातही या साहित्याचे श्रेष्ठत्व अबाधित आहे.

-  डॉ. विवेकानंद ससाणे