परंपरा ही पुढती नेण्याला....!!

स्रोत: विवेक मराठी    दिनांक03-Aug-2019

अण्णा भाऊ साठे यांची शहिरी माणसाला हलवून सोडणारी होती. रक्त तापवणारी होती. त्याचप्रमाणे इथल्या संस्कृतीचा, संस्काराचा वारसा पुढच्या पिढीकडे नेण्याचे काम करणारी आहे. त्यांचे महाराष्ट्र प्रेम अलौकिक होते.


महाराष्ट्राला लोककलेची मोठी परंपरा आहे. कीर्तन, शाहिरी, लावणीपासून अगदी लोकनाट्यापर्यंत ही परंपरा अत्यंत समृद्धपणे नटलेली दिसून येते. समृद्ध अशा या लोकसंस्कृतीने लोककलेच्या माध्यमातून सर्वसामान्य मर्हाठी माणसाच्या मन-मनगटाची आणि मनोवृत्तीची जडणघडण केली. त्यामुळे मर्हाठी मन अत्यंत भावनाप्रधान कर्तव्यनिष्ठ असेच घडले. महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेने आपल्या इतिहासातून स्फूर्ती घेऊन वर्तमानाची भविष्याची सांगड घालत आपल्या उज्ज्वल परंपरेचा समृद्ध वारसा पुढच्या पिढीला देत त्यांच्यातील वीरश्रीयुक्त लढवय्या वृत्ती जागी ठेवण्याचे कार्य केले. वीरश्रीयुक्त पोवाड्यांनी सुरू झालेली ही शाहिरी परंपरा चळवळीतील शाहिरांनी पुढे नेली आणि या परंपरेतील महत्त्वाचे नाव म्हणजे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे.

महाराष्ट्र मायभू आमची,

मराठी भाषिकांची, संत-महंतांची,

ज्ञानवंतांना जन्म देणार,

नररत्नांचे दिव्य भांडार,

समराधिर घेत जिथे अवतार!! जी जी जी

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी कथा, कादंबरी, शाहिरी असे विपुल लेखन केले. चळवळीतील त्यांच्या शाहिरीचे योगदान कोणालाच डावलता येणार नाही. संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या वेळी त्यांनी लिहिलेली छक्कडमाझी मैनाअजरामर झाली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र घडला, यातील अण्णा भाऊ साठे यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. याच अण्णाभाऊंनीमहाराष्ट्राची परंपराहा उत्तम पोवाडा लिहिला. महाराष्ट्राचे गुणात्मक वर्णन करताना लोकशाहिरांच्या लेखणीतून असे उत्तम शब्द प्रसवतात की बस्स. महाराष्ट्राच्या - मायभूच्या प्रेमापोटी आंतरिक ओलाव्यातून अनेक मान्यवर शाहिरांनी उत्तमोत्तम पोवाडे-शाहिरी गीते लिहिली. खरे तर एखादा शाहीर जेव्हा शाहिरी करू लागतो, तेव्हा तो पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहितो त्यानंतर त्याला पोवाडा लिहावासा वाटतो तो महाराष्ट्राचा. याच आंतरिक ओढीतून अनेक शाहिरांनी आपल्या ओघवत्या शब्दलालित्यातून महाराष्ट्रभूमीचे आपापल्या परीने गुणगान केले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंनीही महाराष्ट्राचा उत्तम पोवाडा लिहिला, ज्यात महाराष्ट्राच्या जडणघडणीपासून महाराष्ट्राच्या भूत-भविष्य- वर्तमानकाळानुसार शब्दचित्र आपल्यासमोर उभे केले आहे. गुणात्मक, रसात्मक प्रेरणात्मक या गुणांनी युक्त असूनही हा पोवाडा तसा उपेक्षित राहिला असे वाटते.


लोकशाहीर
अण्णा भाऊ साठे यांचे आणि माझे गुरू शाहीररत्न किसनराव हिंगे यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्या काळात दुसर्या शाहिराची रचना आवडली, तर गाण्याचा प्रघात होता. शाहीर हिंगे अण्णाभाऊंची छक्कड उत्तम प्रकारे सादर करीत. मी शाहीर हिंगे यांच्याकडूनचमाझी मैना गावावर राहिलीही छक्कड गायला शिकलो. अण्णाभाऊंचे सहकारी, त्यांच्या पथकातील शाहीर बाळ पाटसकर यांच्याकडून अण्णाभाऊंच्या शाहिरीतील बारकावे आम्हाला ऐकायला मिळाले. पाटसकरांनीच मला अण्णाभाऊंचामहाराष्ट्राची परंपराहा पोवाडा शिकवला. पोवाडा खूप मोठा असल्याने त्यातील निवडक भाग आम्ही शिकून घेतला आजही आमच्याशाहिरी चौरंगया कार्यक्रमात आम्ही हा पोवाडा गातोच गातो.

मराठमोळ्या शिवरायांच्या पावनभूमीवरी, गर्जली मर्हाठी शाहिरी ..... ध्रु.

संत-पंत आणि तंत काव्याने मर्हाठी बहरली,

शेतकरी अन कामगाराने मशागत केली.

शाहीर मावळे लीन होतसे मर्हाठीच्या मंदिरी॥

मी लिहिलेल्या एका शाहिरी मुजर्यातील या ओळी आहेत. महाराष्ट्राचे संत कवी, पंत कवी आणि तंत कवी यांनी मर्हाठीची भाषा समृद्ध केली, यात शंकाच नाही. या संत-पंत तंत कवींनी मराठीच्या शब्दवैभवात अनेक मौल्यवान शब्दरत्नांची भर घातली. सत्य सहज स्वाभाविकपणे भागवत संप्रदायाची मोठी जोपासना केली. विठ्ठलभक्ती अध्यात्म हा संतसाहित्याचा आत्मा असल्याने वारकर्यांकडून याची उत्तम जोपासना झाली. तसेच पंत साहित्यानेही मराठी भाषेचे वैभव विशेषत्वाने वाढवले आहे. नागर संस्कृतीमुळे पंत कवींचे विचारही समाजमान्य झाले. सर्वसामान्य माणसाच्या रंजनासाठी लोकांनी लोकांसाठी लोकांची असलेली लोकभाषा म्हणजे तंत कवींचे साहित्य लोककलेच्या माध्यमातून लोकसंस्कृतीचे देखणे रूप धारण करून तंत कवींची लोकभाषा सर्वांच्या मुखी सामावली. या तंत कवींच्या शब्दवैभवाला कधीही मरण नाही. या संत, पंत तंत कवींनी मराठीचे भरणपोषण केले असे म्हटले, तर वावगे होणार नाही.

समाजातील तळागाळातील माणसाचे प्रतिनिधित्व करीत अण्णाभाऊंनी आपल्या शाहिरीतून सहज सोप्या भाषेत त्याच्या मनाचे प्रतिबिंब मांडण्याचा प्रयत्न केला. अलंकारांची क्लिष्टता आणता सध्या सोप्या बोलीभाषेत अर्थात लोकभाषेत अण्णाभाऊंनी आपल्या व्यथा मांडल्या. खर्या अर्थानेशब्दप्रभूअसलेल्या अण्णाभाऊंनी कथा-कादंबरीतून आणि शाहिरीतून सामान्य माणसाच्या मनातील व्यथा-वेदनांचे शब्दरूप रेखाटले मराठी मनाला वाट मोकळी करून दिली. संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या माध्यमातून कम्युनिस्ट चळवळीतून घडलेला हा शाहीर पुढे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक परीसस्पर्शाने मोहरून गेला समाजातील बहिष्कृत, उपेक्षित वर्गाच्या व्यथा वेदना अगदी मोजक्या मार्मिक शब्दात मांडीत गेला.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या निमित्ताने या चळवळीतील शाहिरांनीमुंबईसह संयुक्त महाराष्ट्रहा बिनीचा विषय मनाशी पक्का करून मुंबई प्रांतात रान पेटवले. मराठी माणसाची नाडी त्यांच्या हातात पक्की सापडली. ‘संयुक्त महाराष्ट्रहा परवलीचा शब्द ठरला. मराठी माणसाच्या मनातील धगधगत्या अग्नीला शाहिरीतील शब्दांची आहुती देऊन हिंदुस्थानाला मराठी मनाच्या जिवंतपणाची अस्तित्वाची जाणीव करून दिली.

अण्णाभाऊंच्या शाहिरी काव्यलेखनातीलमहाराष्ट्राची परंपराया पोवाड्याविषयी चिंतन करू या. महाराष्ट्राच्या सर्व विषयांना स्पर्श करण्याचे काम या पोवाड्यातून झाले आहे. सुरुवातीलाच मराठी माणसाचे वर्णन करताना अण्णाभाऊ लिहितात -

 

शौर्याची अजरामर महती, आजही नांदती, सह्याचलावरती, मावळा दख्खनचा राहणार

स्वाभिमानार्थ जिणे जगणार मराठा मानी आणि दिलदार... जी जी जी

 

स्वाभिमानाने जगणारा मराठी माणूस मानी आहे, पण तेवढाच दिलदारही आहे.

संतपरंपरेचे वर्णन करताना जणू काही त्यांची लेखणी भक्तिरसात भिजून वीरश्रीचे रूप घेऊन मराठी मनाची प्रबोधनाची भूक भागवताना दिसते. ज्ञानाची मक्तेदारी असलेल्यांनी संस्कृतचा प्रभाव महाराष्ट्रात निर्माण केला. सर्वसामान्यांना आपल्या सांस्कृतिक ठेव्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला. यावर मात केली संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी. ज्ञानदेवादी सर्व संतांनी महाराष्ट्राचे प्रबोधन करून मराठी मनाची मशागत केली, हे सांगताना अण्णाभाऊ लिहितात -

घनघोर महाराष्ट्राची। ज्ञानेश्वरांची। गर्जना झाली॥

संस्कृत भाषेची भिंत। करुनी आघात। त्यांनी फोडिली॥

ती माय मराठी बोली। बाहेर काढिली। स्वैर सोडिली॥

अज्ञाना, दीनदलिता। भगवद्गीता। त्यांनी वदविली॥

मराठी माणसाला पुन्हा एकदा मायबोली मराठीतून शिकवून, मायबोलीत लिहिण्या-बोलण्यासाठी ज्ञानदेवांनी भाग पडले, असा कृतज्ञतापूर्वक उल्लेख अण्णाभाऊ करतात.

एकनाथ, जनी, संत तुकोबा अभंग जे बोले।

मराठा तितुका मेळवावारामदास वदले॥

अण्णाभाऊ श्री संत ज्ञानोबा-तुकोबांपासून रामदास स्वामींपर्यंतच्या संतांच्या कार्याचा यथोचित गौरव करतात.

पुढच्या टप्प्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मर्द मावळ्यांनी केलेल्या कार्याविषयी अण्णाभाऊ अत्यंत तडफेने लिहितात-

 

राखाया या महाराष्ट्रा। उठे मरहट्टा। रण करण्याला॥ हा जी जी

रणधुमाळीमध्ये हेटकरी रक्ताने नाहला।

महाराष्ट्राची परंपरा ती पुढती नेण्याला॥

आंग्र्यांचे आरमार त्यांनी इंग्रजांशी दिलेले लढे, पुढे 1857चा लढा, हिंदुस्तानच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये दख्खनने दिलेले योगदान हे सर्व लढे अण्णाभाऊ तडफेने मांडतात आणि तात्या टोपे, उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक यांच्या लढ्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतात.

मुंबई बंदरात खलाशांनी उभारलेल्या बंडावर अत्यंत मार्मिक भाष्य करतात -

त्या वेळी इंग्रज होते, जेते रणकर्ते, मग कोण पुसते,

हिंदी खलाशांचा काय बडिवार,

सुवरम्हणुनिया होत सत्कार,

आणि कमरेत लाथेचा मार॥

अण्णाभाऊंच्या लेखणीत लढवय्या वृत्ती ठासून भरलेली दिसते. महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांना एकत्र येण्याचे ते आवाहन करतात. आसाम, आंध्र, ओरिसा, बिहार, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू अशा सर्व घटकांनी एकत्र येऊन या हिंद देशाच्या गळ्यात माळ घालू या, अशी विनंती करतात.

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या माध्यमातून पुण्यात आम्ही अण्णाभाऊंच्या या शाहिरी वारशाचे जतन करून त्याचा प्रचार, प्रसार करण्याचे प्रशिक्षण देण्याचे कार्य करीत आहोत. किमान 100 शाहीर एकत्र येऊनमहाराष्ट्राची परंपराहा पोवाडा 18 ऑगस्ट 2019 रोजी (राष्ट्रीय शाहिरी दिनाच्या निमिताने) सादर करणार आहोत. अण्णाभाऊंच्या शाहिरीचा वारसा पुढच्या पिढीला देणार आहोत. कालसापेक्ष बदल झाले आहेत. जागतिकीकरणामुळे जग जवळ आले आहे. असे असले, तरी अण्णाभाऊंच्या विचारांचे मंथन होणे ही काळाची गरज आहे. एक क्रियाशील शाहिरी कार्यकर्ता या नात्याने एवढेच म्हणतो,

 

आम्ही चालवू हा पुढे वारसा॥

महाराष्ट्राची परंपरा ही पुढती नेण्याला.....

 
- शाहीर हेमंतराजे पु. मावळे  

(अध्यक्ष - शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे.)