माझ्या आठवणीतील माझी बँक

स्रोत: विवेक मराठी    दिनांक30-Aug-2019

***मनीषा यशवंत मोहिदेकर (माजी व्यवस्थापिका)***

श्रीमती मनीषा मोहिदेकर यांनी बँकेच्या स्थापना दिवसापासून 28 वर्षे बँकेस सेवा दिली. आज त्या 79 वर्षांच्या आहेत. चिकाटी, जिद्द, कष्टपूर्वक काम करून अन्य सहकाऱ्यांसमोर त्यांनी एक आदर्श घालून दिला. केवळ मॅट्रिकपर्यंत शिक्षण असूनही त्यांनी लिपिक पदापासून व्यवस्थापक पदापर्यंत पदोन्नती मिळविली.


06 सप्टेंबर 2019 रोजी माझी बँक सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना माझ्या डोळयासमोर एकामागून एक आठवणींनी फेर धरला आहे.

अनेक सहकारी बँकांचे प्रणेते मा. माधवराव गोडबोले व अर्थतज्ज्ञ डॉ. द.म. मुन्शी यांच्या हस्ते, दि. 06 सप्टेंबर 1970 रोजी डॉ. राव यांच्या हॉस्पिटलच्या पुढील जागेत बँकेचा शुभारंभ झाला. त्या दिवशी बँकेत झालेली गर्दी, तो उत्साह काही औरच होता. पहिल्याच दिवशी 262 बचत खाती आणि 10-12 आवर्त खाती उघडली गेली. मी, कॅशियर भावे, व्यवस्थापक आठल्ये व दोन शिपाई एवढा स्टाफ होता.

त्या दिवशी दुपारी आम्ही सर्व जण भागवत साहेबांच्या घरी जेवून पुन्हा 2 वाजता बँकेत आलो. डॉ. राव यांनी दोन वर्षांसाठी जागा दिली होती. परंतु बँकेची घोडदौड इतकी वेगात होती की त्याआधीच, म्हणजे 06 फेब्रुवारी 1972 रोजी बँकेने बाजीप्रभू चौकातील सुभाष भवनमध्ये स्थलांतर केले.

त्या वेळी मला बँकही नवीन होती आणि मुंबईही. सर्व संचालकांनी दिलेल्या चांगल्या स्नेहपूर्वक वागणुकीमुळे मला कधी परके वाटलेच नाही.

इथे येण्याआधी मी एका को-ऑप. बँकेत 9 वर्षे नोकरी केली होती. पण तिथे मी कोणाही संचालकास बँकेत आलेले पाहिले नव्हते. फक्त मॅनेजिंग डायरेक्टर मात्र रोज संध्याकाळी कॅश तपासायला येत असत. त्यामुळे इथला माहोल, आपुलकीची वागणूक पाहून परिवार म्हणजे काय ते मला कळले.

डोंबिवली पश्चिमेलाही बँक काढावी अशी तिकडच्या लोकांची मागणी होऊ लागली आणि तिचा मान राखत संचालक मंडळाने 01 ऑगस्ट 1971ला पश्चिमेला स्टेशनजवळ गोडसे बिल्डिंगमध्ये एक्स्टेंशन काउंटर सुरू केले. मला तिथे काम करायची संधी मिळाली. लोकांची साथ, संचालकांचे नि:स्पृह प्रयत्न आणि आमची आपुलकीची सेवा यामुळे बँकेची घोडदौड चालूच होती.

रिझर्व्ह बँकेची पहिली तपासणी सुरू झाली. त्या वेळी त्यांनी तपासणी करताना बँक सुरू करण्याचा खर्च फक्त 162.70 रुपये पाहून तोंडात बोटेच घातली. हे कसे शक्य आहे? असे विचारले.

सप्टेंबर 1970मध्ये सुरू झाल्यानंतर सर्व संचालकांनी व इतर कार्यकर्त्यांनी 5- 6 वर्षे फिरून, अथक परिश्रम करून भाग-भांडवल जमा केले. एका शेअरची किंमत 50 रुपये असली, तरी लोकांकडून 10-20 रुपये असे जमा करीत असत. दर आठ दिवसांनी (खरे तर रोजच) सर्व संचालकांची मीटिंग होत असे. परंतु मीटिंगसाठी नाश्ता-चहापाण्याचा खर्च संचालक स्वतःच करीत. अशी होती नि:स्पृहता.

 

बँकेचा पसारा दिवसेंदिवस वाढतच होता. 1972 सालची रिझर्व्ह बँकेची तपासणी होती. रिझर्व्ह बँकेचे अधिकारी विष्णूनगर शाखेत आले. त्यांनी कॅश चेक केली. मी ठेवलेली सर्व रजिस्टर्स तपासली. आणि, ''उत्तम, खूप व्यवस्थित रेकॉर्ड मेंन्टेन केले आहे'' असे म्हणाले. मला खूप आनंद झाला. 2-3 दिवसांनी मला पटवारीसाहेब व मॅनेजिंग डायरेक्टर यांनी मुख्य शाखेत भेटायला बोलावले. मी जरा घाबरलेच होते. मी गेल्यावर त्यांनी, ''कसं झालं ऑडिट?'' असं विचारलं. मी म्हटलं, ''छान झालं.'' त्यावर त्यांनी, ''उद्यापासून तुम्ही हेड ऑफिसमध्ये अकाउंटंट म्हणून काम करायचं'' असे सांगितले. ''पण साहेब...'' मी म्हणाले. त्यावर, ''पण बीण काही नाही, उद्यापासून सांगितलं ते काम करायचं..'' ते म्हणाले.

आप्पासाहेब दातार, केशवराव खंडकर, बाळासाहेब हळबे, डॉ. मुळे, डॉ. वळामे, भाई गोरेगावकर, मुकुंदराव आंबर्डेकर, मधुकरराव भागवत, मधुकरराव चक्रदेव, बापूसाहेब मोकाशी यांच्या व अन्यही संचालकांच्या आपुलकीच्या वागण्याच्या, बँकेसाठी नियमित वेळ देण्याच्या, आवश्यक तेथे शिस्तीचा आग्रह धरण्याच्या अशा असंख्य आठवणी आज मनात दाटून येत आहेत.

सन 1980मध्ये भिवंडीला दंगल झाली, त्या वेळी कित्येकांचे हातमाग जळून खाक झाले. त्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले. तेव्हा सर्वप्रथम आपली बँक पुढे आली. नुसती पुढे आली नाही, तर प्रत्येकाकडून किमान आवश्यक तेवढीच कागदपत्रे घेऊन एक माग असेल तर 5,000 रुपये, दोन असतील तर 10,000 रुपये दिले, त्यांचे संसार उभे केले. नंतर महिनाभराने सर्व गोष्टींची पूर्तता करून घेतली.

 

शेवटी काम कुठलेही असो, प्रामाणिकपणे, मनापासून केले की त्याचे फळ मिळतेच. मथितार्थ, आपण जर प्रामाणिकपणे सचोटीने, आपुलकीने काम केले, तर यश हे मिळणारच. मी फक्त एस.एस.सी.पास आहे. पुढे शिकणे आवश्यक होते, इच्छाही होती. पण जमले नाही. परंतु माझे कामातील कौशल्य, सातत्य, सचोटी यामुळे बँकेच्या 25व्या वर्षात मला मॅनेजरपदी पदोन्नती मिळाली. आणखी काय पाहिजे? मी कृतार्थ आहे. कृतज्ञ आहे.

सर्व संचालक, कर्मचारी असा सुंदर परिवार परिवार होता. या परिवारामध्ये छोटे-मोठे कार्यक्रम सुरू होते.आणि आजही सुरू आहेत. त्यामुळे स्टाफलाही काम करायला उत्साह येतो. बँकेने पहिल्यापासूनच सामाजिक बांधिलकी जपली. डोंबिवलीत कोणताही सामाजिक कार्यक्रम असो, बँक त्यात सहभागी असणारच. अशी ही माझी बँक.. तिच्या आठवणीच आठवणी आहेत माझ्यापाशी. किती सांगणार!

ज्ञानेश्वरांच्या शब्दात सांगायचे म्हणजे, 'इवलेसे रोप लावियले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावेरी!' अशी आज माझ्यासारख्या बँकेच्या परिवारातील अनेकांची भावना आहे.