मंत्रपुष्पांजली - सार्वभौम राज्याची कामना

स्रोत: विवेक मराठी    दिनांक30-Aug-2019   

प्रजाहिततत्पर, प्रजेचा प्रतिपाळ करणारा राजा हा देवांच्या राजासारखा म्हणजे इंद्रासारखा असावा. अशा साम्राज्यात पुष्कळ कार्यक्षम अधिकारी असावेत. असा राजा दीर्घायू व्हावा आणि सृष्टीच्या शेवटापर्यंत परार्धकालापर्यंत हे सुख नांदावे आणि त्याच्या निमित्ताने राज्याची प्रगती व्हावी आणि पृथ्वीपासून समुद्रापर्यंत स्थैर्य लाभावे, अशी प्रार्थना वैदिकांनी केली, जी आपण मंत्रपुष्प अर्पण करताना म्हणतो.गणेशोत्सव हा उत्सव भारतीय मनाला आनंद देणारा आहे. कुटुंबाला, समाजाला संघटित करणारा आहे. गणेशाची स्थापना झाल्यापासून त्याच्या विसर्जनापर्यंत केली जाणारी आरती हासुध्दा भारतीय मनाला आस्था असणारा विषय आहे. आर्त भावाने ईश्वराला मारलेली हाक म्हणजे आरती. आरती म्हणून झाल्यावर हातात फुले आणि अक्षता घेऊन मंत्रपुष्प वाहिले जाते. पुजेतील सोळा उपचारातील हा शेवटचा उपचार मानला जातो.

पूजेत काही कमी-अधिक झाले असेल तर ते तू पूर्ण मानून घे, अशी प्रार्थना या निमित्ताने केली जाते. या वेळी म्हटले जाणारे जे मंत्र, त्यांना मंत्रपुष्पांजली म्हटले जाते. वर्षानुवर्षे भक्तिभावाने म्हटल्या जात असलेल्या या संस्कृत मंत्रांचा आशय आणि अर्थ समजून घेण्याचा हा एक छोटा प्रयत्न.

मंत्रपुष्पांजली हे एक सलग सूक्त नाही. वेगवेगळया ग्रांथांतील मंत्रांचे ते संकलन आहे, असे म्हटले तरी चालेल. ऋग्वेद (10.90.16), तैत्तिरीय आरण्यक (1.31.6) आणि ऐतरेय ब्राह्मण (8.4.15 आणि 8.4.21) यातील मंत्र मिळून संकलित मंत्र उच्चारत मंत्रपुष्पांजली आपण म्हणतो.

पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी नोंदविल्याप्रमाणे देवे मंत्रातील हा भाग आहे. देवे म्हणजे देवाला केलेल्या वैदिक प्रार्थना. देवे म्हणून अनेक मंत्र म्हटले जातात. या मंत्रांचे अर्थ समजून त्यांचे पठण करण्याचे आवाहनही सातवळेकर यांनी आपल्या पुस्तकात केले आहे.

देवे संग्राहात समाविष्ट असलेल्या मंत्रपुष्पांजलीतील मंत्रांचे अर्थ पुढीलप्रमाणे -

यज्ञेन यज्ञं अयजन्त देवा: तानि धर्माणि प्रथमानि आसन् ते ह नाकं महिमान: सचन्त यत्र पूर्वे साध्या: सन्ति देवा: (ऋग्वेद 10. 90. 16)

अर्थ - देवांनी यज्ञाने यज्ञाची पूजा केली. तोच त्या वेळी प्रमुख धर्म मानला जात असे. ते देव श्रेष्ठत्व प्राप्त करून जेथे श्रेष्ठ देवगण वास्तव्य करीत असत, अशा स्वर्गाला जाऊन पोहोचले.

ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे स् मे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय नम: महाराजाय नम: ॐ स्वस्ति (तैतिरीय आरण्यक, 1.31.6)

अर्थ - आम्ही सामर्थ्यवान, राजाधिराज, विश्रवस पुत्र कुबेराला नमस्कार करतो. सर्व इच्छांचा स्वामी असा तो विश्रवस पुत्र कुबेर अनेक इच्छा असणाऱ्या माझ्या इच्छा पूर्ण करो. विश्रवस पुत्र कुबेराला माझा नमस्कार असो. सर्वांचे कल्याण असो.

साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठयं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं समन्त पर्यायि स्यात् सार्वभौम: सार्वायुष आन्तादापराधार्त् पृथिव्यै: समुद्र पर्यन्ताया: एकराट् (ऐतरेय ब्राह्मण, 8.4.15)

अर्थ - हा सार्वभौम, दीर्घायुषी राजा आणि त्याचे साम्राज्य उपभोगाच्या वस्तूंनी संपन्न, प्रजातंत्राने चालणारे, सर्वथा स्वतंत्र, परमेश्वराशी निष्ठावंत, विस्तृत, अनेक अधिकारी असलेले आणि सर्वसमावेशक असे असो. जगाच्या अंतापर्यंत परार्धकालापर्यंत तो राजा समुद्रवलयांकित पृथ्वीचा एकछत्री सम्राट होवो.

 

इति तदपि एषः श्लोक: अभिगीत: मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्य अवसन् गृहे आविक्षितस्य कामप्रे: विश्वेदेवा: सभासद इति (ऐतरेय ब्राह्मण, 8.4.21)

अर्थ - नंतर हादेखील श्लोक म्हटलेला आहे. सर्व देव व सभोवार बसलेले इतर मरुत हे विक्षितकुलोत्पन्न मृताच्या घरी पाहुणे म्हणून राहिले होते.

यज्ञेन यज्ञं अयजन्त देवाः (ऋग्वेद, 10.90.16) या मंत्राचा आशय आहे की पूर्ण ज्ञानी लोक परमेश्वराचे पूजन करतात. परोपकार करण्यासाठी ते आत्मसमर्पण भावनेने कार्य करतात. आत्मसर्वस्वाचे समर्पण हाच खरा यज्ञ आहे. याचे अनुष्ठान जे करतात ते अखंड आत्मानंदाचा उपभोग घेतात. त्यानंतर राजाधिराज विश्रवसपुत्र कुबेर यांची स्तुती करण्यात आली आहे. सर्व इच्छा आणि आकांक्षा यांची पूर्ती होण्यासाठी संपत्तीच्या मिषाने त्यांची प्रार्थना करावी. (राजाधिराजाय प्रसह्यसाहिने... महाराजाय नमः।)

ऐतरेय ब्राह्मण हा ऋग्वेदाचा ब्राह्मणग्रांथ आहे. त्यामध्ये प्रजापतीने इंद्राला केलेला महाभिषेक आणि त्याचा विधी याचे सविस्तर वर्णन आलेले आहे, ते असे -

इंद्राचा सर्वतोपरी उत्कर्ष होण्यासाठी सर्व देवांनी त्याच्या नावाचे, पराक्रमाचे व गुणांचे कौतुक केले, उच्च स्वरात त्याचा जयघोष केला, यशाचे गान केले ते असे - इंद्र हा साम्राज्याचे प्रवर्तन व संरक्षण करण्यास योग्य सम्राट आहे (साम्राज्यं) सर्व प्रकारच्या उपभोगांचा भोक्ता व पालक आहे (भौज्यं), स्वराज्याचा अधिकार चालविणारा विराट असा तो आहे (स्वाराज्यं, वैराज्यं), असा तो इंद्र राजांचा पालक (माहाराज्यमाधीपत्यम)आहे. इंद्र हा पारमेष्ठयपदाचा पूर्ण अधिकारी आहे (पारमेष्ठ्यं). इंद्र हा अखिल प्राणिजातीचा अधिपती, प्रजांचा भोक्ता, शत्रूंचा विदारक, असुरांचा घातक, वेदांचे रक्षण करणारा आणि वेदोक्त धर्माचे पालन करणारा समुद्रवलयांकित पृथ्वीचा एकछत्री सम्राट आहे. देवांनी केलेल्या या स्तुतीने इंद्राला सर्व देवांचे श्रेष्ठत्व प्राप्त झाले.

एखाद्या क्षत्रिय राजाला जर असे पद प्राप्त करायचे असेल, तर त्याच्या आचार्याने त्याच्यासाठी असा अभिषेक करावा. त्यापूर्वी राजाने शपथ घेऊन मला इंद्रासारखे पद प्राप्त व्हावे म्हणून प्रार्थना करावी, असाही भाग ऐतरेय ब्राह्मणात सांगितलेला आहे.

त्यानंतरच्या शेवटच्या मंत्रात उल्लेख आलेला मरुत हा अविक्षित याचा पुत्र असून एक राजर्षी होता. त्याच्या घरी देव पाहुणे म्हणून राहिले होते, अशा आशयाने या मंत्र समूहाची सांगता होते.

यामध्ये उल्लेख झालेले शासनसंस्थांचे प्रकार काही अभ्यासक नोंदवितात. ते पुढीलप्रमाणे -

1. वैराज्ये म्हणजे विरक्त लोकांनी चालविलेली राज्ये. ही भारतीय पर्वतीय प्रदेशात होती.

2. भौज्य म्हणजे सुबत्तेने परिपूर्ण राज्ये, म्हणजे ही भारताच्या दक्षिण भागात होती.

3. राजा, अमात्य, योग्य शासन व्यवहार यांच्या समन्वयाने चालणारी साम्राज्ये भारताच्या पूर्व दिशेला होती.

4. स्वाराज्य म्हणजे लोकशाही तंत्राने चालणारी राज्ये भारताच्या पश्चिमेला होती.

याखेरीज सर्वांची सर्वांगीण उन्नती साधणारे परमेश्वरी राज्य यावे आणि सार्वभौम राजा आणि त्याची प्रजा यांचे कल्याण व्हावे, अशीही प्रार्थना ऐतरेय ब्राह्मणग्रांथात केलेली दिसते.

संहितांमध्ये म्हणजे वेदांमध्ये एकछत्री सम्राट आणि त्याची सुखी प्रजा यासाठी केलेली प्रार्थना आढळते. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडळातील 173 आणि 174 ही दोन सूक्ते ही राजस्तुती सूक्ते आहेत. लोकनियुक्त राजा, राज्य आणि त्यांची स्थिरता हा प्रजेच्या सुखाचा मार्ग आहे असे या सूक्तांमध्ये म्हटले आहे. युध्दाला सज्ज झालेल्या राजाला हे मंत्र ऐकवण्यात येत असत, असे आश्वलायन गृह्यसूत्र या ग्रांथात सांगितलेले आहे.

 

ऋग्वेदाच्या पाचव्या मंडलात (5.66) मित्रावरुण देवतांना प्रार्थना केलेली आहे की राजाने प्रजेच्या मतांचा आदर करीत शांततामय राज्यव्यवस्था प्रजेला द्यावी, यासाठी तुमचे आशीर्वाद असोत.

सारांश, प्रजाहिततत्पर, प्रजेचा प्रतिपाळ करणारा राजा हा देवांच्या राजासारखा म्हणजे इंद्रासारखा असावा. अशा साम्राज्यात पुष्कळ कार्यक्षम अधिकारी असावेत. असा राजा दीर्घायू व्हावा आणि सृष्टीच्या शेवटापर्यंत परार्धकालापर्यंत हे सुख नांदावे आणि त्याच्या निमित्ताने राज्याची प्रगती व्हावी आणि पृथ्वीपासून समुद्रापर्यंत स्थैर्य लाभावे, अशी प्रार्थना वैदिकांनी केली, जी आपण मंत्रपुष्प अर्पण करताना म्हणतो.

ओंजळीत फुले आणि अक्षता घेऊन कृतज्ञ भावनेने अशी प्रजेच्या आणि राजाच्या कल्याणाची विनंती केवळ परमेश्वराला करावी असे नाही, तर या स्वप्नाचे साक्षीदार होण्यासाठी अशा एकछत्री सम्राटाला आपणही साहाय्य करण्याचा संकल्प प्रत्येक भारतीयाने केला पाहिजे.

संदर्भ पुस्तके -

1. Bloomfield Maurice,1906, š Vedic Concordance,Motilal Banarasidas Publication, Pune

2. सातवळेकर श्रीपाद दामोदर, 1933, देवे मंत्रांचा अर्थ, पुरुषार्थ ग्रांथमाला15, स्वाध्याय मंडळ, पारडी

3. डॉ. पाठक प्र.वि. 2009, वैदिक मंत्रपुष्पांजली, हरि ओम प्रकाशन, नाशिक

4. बापट धुंडीराज गणेश दीक्षित (श्रौताचार्य), शके 1983, ऋग्वेदाचे ऐतरेय ब्राह्मण.

5. चित्राव सिध्देश्वरशास्त्री, 1969, ऋग्वेदाचे मराठी भाषांतर, प्रकाशक - विनायक सिध्देश्वरशास्त्री चित्राव

6. चित्राव सिध्देश्वरशास्त्री, 1972, अथर्ववेदाचे मराठी भाषांतर,श्री अमृतेश्वर प्रकाशन, पुणे.