प्रेरक भेट

स्रोत: विवेक मराठी    दिनांक30-Aug-2019

***रवींद्र मुळे***

दीपा मलिक या दिव्यांग मुले-मुली यांच्यासाठी त्या विशेष कार्य करतात! त्यांनी तेथे एक ऍकॅडमी स्थापन केली आहे दिव्यांग खेळाडूंसाठी! पुरस्कार घेण्यापूर्वी आपल्या सासू-सासऱ्यांचे आशीर्वाद घ्यायला त्या आल्या होत्या. आम्ही त्यांना भेटायला गेलो आणि एक हृद्य कौटुंबिक सोहळाच जणू अनुभवायला मिळाला. 

 

राज चौधरी यांचा काही दिवसापूर्वी फोन आला - ''अरे, दीपा मलिक यांना भेटून या. त्यांना खेल रत्न पुरस्कार मिळाला आहे. त्या नगरला येत आहेत.'' माझ्यासमोर झटकन दहा-बारा वर्षांपूर्वीचा प्रसंग उभा राहिला. राहुरी येथे एका कार्यक्रमात दीपाजी प्रमुख पाहुण्या होत्या. ती बातमी ऐकून अरविंद कुलकर्णी (संघाचे जिल्हा कार्यकर्ते) माझ्याकडे ते कात्रण घेऊन आले होते. दीपाजींनी गोळाफेकीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पारितोषिके प्राप्त केली होती आणि त्यांचे अभिनंदन करणारे एक सुंदर पत्र अरविंदराव यांनी लिहिले होते. काळ किती गतीने पुढे जातो ना!

दीपाजी मलिक यांना आजारपणात काही कारणाने दिव्यांगत्व आले. संपूर्ण जीवन व्हील चेअरवर बसून काढण्याची वेळ आली. जणू काही त्यांच्या जीवनात निसर्गाने अंधकार उभा केला. पती सैन्यदलात! सासरेही सैन्यातून निवृत्त झालेले. परिस्थितीपुढे नमते घ्यायचे नाही हे प्रशिक्षण! त्यामुळे त्यांनी दीपाजींनाही ती सकारात्मक ऊर्जा दिली. त्यांनी मग नगर येथे जामखेड रस्त्यावर एक कॅन्टीन सुरू केले.

एक दिवस तेथे एक दिव्यांग महानुभाव ग्राहक म्हणून अवतरले. दीपाजी यांना माहीत नव्हते की ते ग्राहक म्हणून आलेले गृहस्थ परमेश्वराने त्यांची नियती बदलण्यासाठी पाठवलेले दूत आहेत! त्या ग्राहकांना जेव्हा गेल्यावर व्हील चेअर मिळाली, तेव्हा त्यांचे कुतूहल जागे झाले आणि मग त्यांना कळले की कॅन्टीनच्या मालकीणसुध्दा दिव्यांग आहेत! परिचय झाला. वास्तविक दीपाजी यांच्या घरातील सगळे सैन्यात अधिकारिपदावर आणि हे तृतीय श्रेणी कर्मचारी! पण न राहवून त्यांनी दोन दिवसांनी दीपाजींना फोन केला. ''तुमच्यामध्ये एक क्रीडापटू दडलेला आहे'' असे मत व्यक्त केले. दीपाजींनी त्याकडे थोडे दुर्लक्ष केले. पण ह्यांनी पिच्छा सोडला नाही. शेवटी दीपाजी गोळाफेकी साठी तयार झाल्या आणि बघता बघता प्रावीण्य मिळवत गेल्या. खऱ्या अर्थाने देवदूत ठरलेले हे द्रोणाचार्य म्हणजे दीपकजी देवणे! त्यांना आणखी गुरू भेटले ते पोहण्यासाठी, त्यांचे नाव रामदास ढमाले आणि श्री बाबर सर! त्यांनी त्यांना पोहण्याचा सराव करून घेतला. त्यामुळे त्या पूरक व्यायाम शिकल्या आणि बघता बघता दीपा मलिक पॅरा स्पोट्र्समधील एक आंतरराष्ट्रीय नाव झाले. उद्या क्रीडा दिनाच्या निमित्ताने त्यांना राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार मिळत आहे. दुर्दैवाने ढमाले यांचे नुकतेच निधन झाले. ते क्रीडा भारतीचे उपाध्यक्ष होते.

दीपाजी आता नगर सोडून हरियाणात जास्त असतात. खेळासाठी आणि विशेषत: दिव्यांग मुले-मुली यांच्यासाठी त्या विशेष कार्य करतात! त्यांनी तेथे एक ऍकॅडमी स्थापन केली आहे दिव्यांग खेळाडूंसाठी! पुरस्कार घेण्यापूर्वी आपल्या सासू-सासऱ्यांचे आशीर्वाद घ्यायला त्या आल्या होत्या. आम्ही त्यांना भेटायला गेलो आणि एक हृद्य कौटुंबिक सोहळाच जणू अनुभवायला मिळाला. यशाने अधिकच विनम्र झालेल्या दीपाजी, त्यांना प्रोत्साहित करणारे त्यांचे पतिदेव आणि आपल्या सुनेचे होणारे कौतुक डोळयात सामावून घेणारे ब्रिगेडियर श्री. व सौ. मलिक. हो, आणि त्यांची कन्या आपल्या आईची स्वीय साहाय्यक बनलेली. आईचे क्रीडा जग हेच तिचेही विश्व! आपल्या मुलाच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगतीसाठी झटणारे आई-वडील आपण बघितले आहेत. पण येथे मुलगी आईची क्रीडा क्षेत्रातील प्रगतीची काळजी घेते आहे!


कार्यक्रम आटोपल्यावर बाहेर पडणार, तो घरात काम करणाऱ्या एक महिला कर्मचारी धावत आमच्याजवळ आल्या. त्यांच्या डोळयात पाणी होते. कारण दीपा मॅडमना पुरस्कार मिळाल्याचा आनंद होताच, त्याचबरोबर ''तुम्ही सर्व परिवाराला या निमित्ताने सामावून घेतले, त्याचे आम्हाला खूप कौतुक वाटते'' असे त्या सेविका उध्दगरल्या!

देशात काही वर्षात पुरस्कार मिळवणारे पुरस्काराचा सन्मान वाढवत आहेत. अशा व्यक्तींना शोधणे आणि त्यांना पुरस्कृत करणे हा खरोखर अशा पुरस्काराचा हेतू आहे. सचिन तेंडुलकर आणि अशा ग्लॅमरस खेळ आणि खेळाडू यांना पुरस्कार मिळणे स्वभाविक आहे. पण दीपा मलिक याना पुरस्कार म्हणजे 'मेरा देश बदल रहा है' याचे द्योतक आहे! २९ ऑगस्टला ध्यानचंद यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जो क्रीडा दीन साजरा होतो, त्यानिमिताने  पुरस्कार मिळाला आहे. हॉकीचे जादूगार ध्यानचंद! आपल्या कौशल्यावर देशासाठी सुवर्णपदक मिळवून देणारे! आज या पूर्वसंध्येला क्रीडा क्षेत्रात खूप आशादायक घटना घडत आहेत. पी.व्ही. सिंधू सुवर्णपदक मिळवत असताना मानसी जोशी दिव्यांग पॅरा बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक मिळवत आहे. टेनिसमध्ये अमेरिकन ग्रँड स्लॅममध्ये एक तारा फेडररपुढे चमकत आहे आणि हिमा दास चा पराक्रम सर्वश्रुत आहे. देशासाठी खेळण्याची एक नवी प्रेरणा निर्माण होत आहे आणि भारतीय क्रीडा क्षेत्र प्रथमच मोकळा श्वास घेताना (एकाच खेळात गुंतून न राहता) दिसत आहे. ह्या सर्व पार्श्वभूमीवर दीपा मलिक यांचे त्रिवार अभिनंदन! आणि हो, त्यांना पुरस्कार देण्यासाठी शिफारस करणाऱ्या समितीचेसुध्दा!

9422221570

प्रांत संपर्क प्रमुख