अॅमेझोनचा विध्वंसक वणवा

स्रोत: विवेक मराठी    दिनांक31-Aug-2019
 
 ***हर्षद बर्वे****
 
अॅमेझॉनचे जंगल म्हणजे पृथ्वीचे फुफ्फुस आहे. पृथ्वीवरचा वीस टक्के प्राणवायू अॅमेझॉनच्या जंगलात तयार होतो. अॅमेझॉनचे जंगल नॉर्थवेस्टर्न ब्राझीलचा बहुतांश भाग कव्हर करत पेरू, कोलंबिया, व्हेनेझुएला, इक्वेडॉर, बॉलिव्हिया, गयाना, सुरीनाम आणि फ्रेंच गयानात पसरले आहे. अॅमेझॉनचे जंगल हे जगातले सर्वात मोठे रेन-फॉरेस्ट आहे. जगातल्या सर्वात सुंदर बायो-डायव्हर्सिटीत अॅमेझॉन येते आणि हे जंगल म्हणजे हजारो नद्यांचे एक जाळेच आहे. आणि ह्या नद्यांत वाहणारी सर्वात मोठी नदी म्हणजे अॅमेझॉन नदी. शेकडो जीव, जन्तु, वनस्पती, पक्षी फुलपाखरे आणि इतर अनेक प्रजातींचे माहेर म्हणजे अॅमेझॉन. निसर्गाची एक सर्वोत्तम निर्मिती म्हणजे अॅमेझॉन.

हेच अॅमेझॉन सध्या वणव्याच्या तावडीत सापडले आहे. रेन-फॉरेस्टला लागलेली आग प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान करते. रेन-फॉरेस्ट म्हणजे हिरवीगार कॅनॉपी. अशी विध्वंसक आग ह्या कॅनॉपीत एक मोठे भोक पाडून जाते. दमट हवामान आणि कमी सूर्यप्रकाशात जगणाऱ्या अनंत प्रजाती इथे राहतात. त्यांच्या डायरेक्ट पडणाऱ्या सूर्यप्रकाशाची सवय नसते. अश्या आगीने कॅनॉपीला पडलेल्या ह्या भोकामुळे तिथल्या अनेक प्रजातींचे जगणे अक्षरशः अशक्य होतं असते. तिथे परत त्यांनी हवे असणारे वातावरण निर्माण व्हायला अक्षरशः अनेक दशके लागू शकतात.
ह्या आगीत सर्वात जास्त नुकसान अॅमफीबियन्सचे होते. त्यांना तर पळून जायला मार्गच मिळत नाही आणि आगीला हरवून पळून जाता येईल इतका वेगही त्यांच्याकडे नसतो. अॅमफीबियन्सचे वातावरण ह्या आगीत मोठ्या प्रमाणात नष्ट होणार आहे. अॅमेझॉनमध्ये अॅमफीबियन्सच्या प्रजाती खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. आग संपूर्णपणे आटोक्यात आल्यावरच यांचे किती नुकसान झाले आहे हे लक्षात येईल.
अॅमेझॉनचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेल्या पक्षांच्या प्रजाती. अनेक रंगीबेरंगी पक्षी ह्या जंगलात आढळून येतात. अनेक पक्षांचा हा विणीचा मोसम आहे. अश्या वेळी लागलेली ही आग ह्या पक्षांची येणारी अख्खी पिढी जाळते आहे. इंडिव्हिजिउल पक्षी पलायन करेल पण त्यांना सोडून जाव लागणाऱ्या घरट्यात त्यांची अंडी, पिल्ले अक्षरशः भाजून निघाली असतील. हे अत्यंत वेदनादायक आहे.
अॅमेझॉनमध्ये मोठे प्राण्यांच्या पण अनेक प्रजाती आहेत. त्यात जगवार सारखे प्राणी पण आहेत. ते आगीपासून पळून तर जाऊ शकतील पण त्यांना नवीन एरिया सहजासहजी मिळणे कठीण असणार आहे. एकतर अॅमेझॉनमध्ये प्राण्यांची संख्या सर्वत्र भरपूर आहे. अश्या वेळी नवे येणारे प्राणी इको-सिस्टीमला कितपत पेलू शकतील ह्यावर अनेकांच्या मनात शंका आहे. बर हे झाले वेगाने पळू शकणाऱ्या प्राण्यांचे पण वेगाने न पळू शकणारे अनेक प्राणी ह्या जंगलात आहेत, उदाहरणार्थ स्लॉथ. हे प्राणी जिवंत रोस्ट होतात आहेत. कासव, साप ह्यांचे हाल तर विचारायलाच नको.
प्राण्यांच्या सोबत अजून भयंकर नुकसान फ्लोरा-फ़ौनाचे पण होते आहे. अनेक वनस्पती एखाद्या पर्टीक्युलर भागाच्या इंडिमिक प्रजाती असतात. ह्या आगीत अक्षरशः लाखो झाडे जळून खाक झाली. झाडे पटकन मोठी होत नाहीत. अनेक दशके त्या वनात टिकून राहिली की त्यांचे वृक्ष होतात. असे अनेक वृक्ष ह्या आगीत भस्मासात झाले आहेत. छोट्याश्या वनस्पती, ऑरचिड, रानफुले, गवत, कॅकटस, फंगस आणि अनेक गोष्टी ह्या आगीने खाऊन टाकले. संपूर्ण आग आटोक्यात आल्यावरच फ्लोरा आणि फ़ौनाचे कितपत नुकसान झाले हे लक्षात येणार आहे.
जवळपास तीन मिलियन प्रजातींचे घर असलेले हे जंगल अक्षरशः धुमसते आहे, आगीच्या तडाख्यात सापडले आहे. ही आग लवकरात लवकर आटोक्यात आणून पूर्णपणे विझवणे गरजेचे आहे. अॅमेझॉनचे जंगल हा एक जागतिक वारसा आहे. ब्राझीलच्या सरकारने ह्यावर जास्तीत जास्त वेगवान कारवाई करावी हीच माझी ह्या वर्षी गणरायाच्या श्रीचरणी प्रार्थना असणार आहे !!