'द लॅन्सेट'ने आपल्या 17 ऑगस्ट 2019च्या अंकात 'फिअर ऍंड अन्सर्टन्टी अराउंड काश्मीर्स फ्यूचर' या शीर्षकाखाली हे संपादकीय लिहिले आहे. म्हणजे शीर्षकापासूनच काश्मीरच्या भविष्याविषयीची पोकळ भीती आणि अनिश्चितता व्यक्त केली आहे. या संपादकीयात काश्मीरचे सार्वभौमत्व धोक्यात आल्याचे सांगतानाच पाकिस्तानवर कसा अन्याय झाला आहे हेही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच काश्मीरमध्ये अतिरिक्त सैन्य वाढवल्याने काश्मिरी जनतेचे आरोग्य, सुरक्षा आणि स्वातंत्र्य यांविषयी चिंता त्यात व्यक्त केली आहे. हे वादग्रस्त संपादकीय अन्य प्रसारमाध्यमांसाठी बातमीचा विषय झाले. मात्र राष्ट्रीय विचारांनी प्रेरित असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनने या संपादकीयाचा चांगलाच समाचार घेत या नियतकालिकाच्या ब्रिटिश मनोवृत्तीवर टीका केली आहे.
'द लॅन्सेट' हे जवळजवळ दोन शतके (1823मधील स्थापना) जुने ब्रिटिश नियतकालिक आहे. ते मेडिकल जर्नल असल्याने वैद्यकीय विश्वाला उपयोगी पडेल अशी माहिती त्यात प्रसिध्द होणे अपेक्षित असते. मात्र अधूनमधून अशा राजकीय विषयांवर भाष्य केल्याने यापूर्वीही या नियतकालिकावर टीका झाली आहे. या वेळी तर इंडियन मेडिकल असोसिएशनने 'द लॅन्सेट'चे मुख्य संपादक रिचर्ड हॉर्टन यांना खरमरीत पत्र लिहून या संपादकीयाविरोधात तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
'द लॅन्सेट'सारख्या प्रतिष्ठित मेडिकल जर्नलने या राजकीय विषयावर भाष्य करून औचित्याचा भंग केला असल्याची खंत या पत्रात व्यक्त केली आहे.
या पत्रात पुढे म्हटले आहे की, भारतीय संघराज्याच्या अंतर्गत बाबींमध्ये हा हस्तक्षेप आहे. 'द लॅन्सेट'ला काश्मीर मुद्दयावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. काश्मीर मुद्दा हा ब्रिटिश साम्राज्यानेच वारशात मागे ठेवला आहे. काश्मिरींच्या आरोग्याविषयी काळजी दाखवण्याच्या नावाखाली या नियतकालिकाने भारत सरकारच्या प्रशासकीय निर्णयावर भाष्य केले आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशन ही भारताची स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेली राष्ट्रीय वैद्यकीय संस्था आहे. ब्रिटिश साम्राज्याने भारतीय जनतेवर केलेला अत्याचार, स्वातंत्र्यलढयातील आहुती, फाळणी आणि त्याचे परिणाम या सर्व अनुभवांचे साक्षीदार असलेल्या संस्थांपैकी ती एक आहे. भारतभरातील सुमारे सव्वातीन लाख डॉक्टर्स तिचे सदस्य आहेत. त्यामुळेच भारताच्या अंतर्गत राजकीय निर्णयात हस्तक्षेप करण्याच्या 'द लॅन्सेट'च्या भूमिकेला विरोध करणे ही या संस्थेला आपली जबाबदारी वाटली.
इंडियन मेडिकल असोसिएशनने या नियतकालिकाच्या विश्वासार्हतेवर आणि त्यातील अनुचित संपादकीयामागे असलेल्या दूषित हेतूवर शंका उपस्थित केली आहे. तसेच भारतातील अनेक पिढयांच्या - विशेषत: भारतीय डॉक्टरांच्या आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मनात 'द लॅन्सेट'च्या या कृतीमुळे कटू आठवणी राहतील, असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
काश्मीर विषयावर अन्य देश ज्या ज्या वेळी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतात, त्या त्या वेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचे सांगून त्यांना त्यापासून परावृत्त करतात. 'द लॅन्सेट'च्या संपादकीयाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतविरोधी प्रतिक्रियांना भारतीय नागरिक किंवा संस्था म्हणून कशा प्रकारे उत्तर द्यावे, याचा आदर्शच इंडियन मेडिकल असोसिएशनने घालून दिला आहे.