जळगावला कृषी - व्यापारी केंद्र बनवण्यासाठी प्रयत्नशील - खा. उन्मेश पाटील

स्रोत: विवेक मराठी    दिनांक06-Aug-2019

अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतून जळगाव मतदारसंघातून निवडून गेलेले खा. उन्मेश पाटील यांच्या रूपाने विकासाच्या अनेक व नव्या संकल्पना उराशी बाळगणारे नेतृत्व निवडून आले आहे. जळगांव जिल्ह्याच्या विकासासंदर्भात त्यांच्याशी केलेली बातचीत.


जळगाव जिल्ह्याच्या विकासासंदर्भात तुमची पहिली प्राथमिकता कशास राहील?

शेतीसाठी पाण्याची उपलब्धता कशी वाढेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. जिल्ह्यात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले पाडळसे, भागपूर, पद्मालय हे प्रकल्प तात्काळ मार्गी लागावेत हा माझा प्रयत्न राहील. या तीनही प्रकल्पांना सुमारे 3400 कोटी रुपयांचा निधी मिळविण्यासाठी मी निवडून आल्या आल्या प्रयत्न सुरू केले आहेत. या अनेक वर्षे रखडलेल्या प्रकल्पांना नाबार्ड टप्पा 2च्या माध्यमातून निधी मिळावा म्हणून मी पाठपुरावा करीत आहे. आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रासारख्या मोठमोठया नद्या नाहीत व तसे मोठे प्रकल्पही नाहीत. त्यामुळे जेमतेम 25 टक्क्यांच्या आसपास आमची शेती सिंचनाखाली आहे. सिंचनाची सोय वाढविण्यासाठी मी अधिकाधिक काम करणार आहे. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजन ह्यांचे सहकार्य घेईन. नदीजोड प्रकल्प अधिक कार्यक्षमरित्या राबवून मतदारसंघात सिंचन सुविधा निर्माण करण्यावर माझा भर राहील.


शेती आणि शेतकऱ्यांसाठी तुमच्याकडे काय कार्यक्रम आहे?

शेतीला हमखास पाणी मिळाले तर शेतकऱ्यांचे निम्मे प्रश्न सुटतात. त्यानंतर उप्तादित मालाला योग्य दर मिळाल्यास त्याच्या कष्टाचे चीज होते. शेतकऱ्याला योग्य दर मिळावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आता शेतीचे लहान लहान तुकडे झाले आहेत. अशा शेतकऱ्यांनी गटाने एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन कराव्या, त्यांनी स्थापन केलेल्या कंपन्यांना नाबार्डच्या माध्यमातून अर्थसाहाय्य मिळवून देण्यासाठी मी पुढाकार घेतो आहे.


रासायनिक शेती अधिकाधिक खर्चिक होत चालली आहे. शिवाय शेतजमिनीचा पोत बिघडत चालला आहे. त्यासाठी शासनाची
'गोवर्धन' योजना काही ठिकाणी राबवून शेणखत कंपोस्ट करण्याची योजना हाती घेणार आहे.


तुम्ही आमदार असताना शिक्षण आणि रोजगार याबाबत ठोस भूमिका घेत होता. आता क्षेत्र विस्तारले आहे. आता काय भूमिका आहे?

आज आमच्या जिल्ह्यातील तरुण रोजगारासाठी पुणे, औरंगाबाद, मुंबईची वाट धरतो. कारण त्याला आपल्याच जिल्ह्यात रोजगार मिळत नाही. जळगाव एमआयडीसीची अवस्था बिकट आहे. यापूर्वीच अनेक उद्योगांनी येथून पलायन केले आहे व आताही आहेत ते उद्योग रोजगार देण्यास अक्षम ठरत आहेत. पाईप, चटई आणि डाळ उद्योगासाठी जळगाव एमआयडीसीची ख्याती आहे. तेथे अनेक लघुउद्योगही आहेत. एमआयडीसीला पूर्वीचे वैभव आणून देण्यासाठी व उद्योजकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करीन. मी आमदार असतांना चाळीसगावात सुमारे 3 हजार कोटी रुपयांचे उद्योग आणले. आता जळगावसाठी प्रयत्न करणार आहे. आमच्या तरुण मित्रांना जळगावात कसे काम मिळेल याला प्राधान्य राहील. तसेच प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना अधिक कार्यक्षमतेने राबवून त्या अंतर्गत तरुणांना प्रशिक्षित करणे यावर माझा भर राहील.


 


जळगावातील दळणवळणाच्या समस्या काय आहेत? त्या कशा मार्गी लागतील?


रस्ते व रेल्वेची चांगली सुविधा सामान्य जनतेला मिळावी ह्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. रेल्वेबाबत म्हणायचे तर नियमित अपडाऊन करणाऱ्यांसाठी भुसावळ-मुंबई स्वतंत्र गाडी सुरू करण्यास माझे प्राधान्य राहणार आहे. धुळे-चाळीसगाव रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे आता धुळे-मुंबई व धुळे-पुणे गाडया सरू व्हाव्यात यासाठी मी प्रयत्न करणार आहे.

 

अजिंठा लेणी पाहायला जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वेची सेवा उपलब्ध झाली पाहिजे म्हणून पाचोरा-जामनेर मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करून तिला अजिंठयापर्यंत नेण्यासाठीचे नियोजन करण्यात येईल. त्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करणार आहे.

 

जिल्ह्यातील लहानमोठे रस्ते व जिल्ह्यातून जाणारे महामार्ग हे विकासवाहिन्या असतात. या वाहिन्या चांगल्या राहाव्यात यासाठी प्रयत्न करणार आहेत. जळगाव जिल्हा नाशिक, औरंगाबाद या औद्योगिक महानगरांशी जोडलेला आहे. ह्या शहरांना जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था सध्या बिकट वाटते कारण त्यांची कामे सुरु आहेत. सुरत-नागपूर महामार्गाचेही काम प्रगतीपथावर आहे. ते अधिक गतीने व्हावे यासाठी माझे प्रयत्न राहतील. गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामे मुख्यमंत्री ग्रााम सडक योजनेतून अधिक तत्परतेने कशी होतील याकडे मी लक्ष देणार आहे.

 

रस्ते व रेल्वेमार्ग हे फक्त प्रवासाची साधने नाहीत तर ते विकासाचे मार्ग असल्याचे माझे मत आहे. त्यामुळे मी फक्त थांबे मिळविण्यावर थांबणार नाही तर ह्या थांब्यांना प्रवाशी कसे मिळतील व ह्या प्रवाशांना रोजगार कसा मिळेल हे पाहणार आहे.

 

जळगावातील समांतर रस्त्याचा प्रश्न सुटावा यासाठी काय भूमिका आहे?

जळगावच्या बाहेरून जाणारा महामार्ग चौपदरीकरणाचे काम जसे महत्त्वाचे आहे, तसे जळगावातील समांतर रस्त्यांचे महत्त्वही आहेच. त्यामुळे जळगावातील अपघात कमी होतील. समांतर रस्त्यांसाठी निधी मिळाला असून आता लवकरच प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होऊ शकेल.

येत्या काळात जळगांव कृषी व व्यापाराचे केंद्र व्हावे यासाठी काम करण्यावर माझा भर राहील.

 

-प्रतिनिधी