''अंत्योदय .... हेच ध्येय !'' - खा. रक्षाताई खडसे

स्रोत: विवेक मराठी    दिनांक07-Aug-2019

रावेर मतदारसंघातून पुनश्च निवडून आलेल्या खासदार रक्षाताई खडसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील सर्व योजनांना व ध्येयांना दृश्य आकार देण्यास आपण बांधील असल्याचे मानतात. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि आगामी उद्दिष्टांचा परिचय करून देणारा लेख.2019च्या लोकसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघातून खासदार रक्षाताई निखिल खडसे या तीन लाखांहूनही जास्त मताधिक्याने निवडून आल्या. देशाचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी यांचे कणखर नेतृत्व, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भक्कम साथ, कार्यकर्त्यांनी विणलेले जाळे, संघटनशक्ती, बुथप्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख यांनी गावागावांत पोहोचवलेल्या शासनाच्या योजना, जिल्ह्यातील नेत्यांचे मार्गदर्शन यामुळे रक्षाताई पुनश्च: खासदार होऊ शकल्या. गत पाच वर्षात रक्षाताईंनी सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेत सातत्याने जनसंपर्क ठेवला. मतदारसंघातील 1400 गावांपैकी 1300 गावांमधे प्रत्यक्ष भेट देणाऱ्या महिला खासदार म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल. माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, मंत्री ना.गिरीष महाजन, मतदारसंघातील सर्व आमदार, यांच्या मार्गदर्शनाने रक्षाताईंनी मतदारसंघात भरगच्च काम केले. खा. रक्षाताई खडसे यांनी गत पाच वर्षात गतिमान विकासकामांमुळे जनतेचा विश्वास संपादन केला. जनतेच्या विश्वासावर आणि प्रेमावर चाललेली त्यांची ध्येयपूर्तीची ही वाटचाल प्रशंसनीय आहे. आपल्या खंबीर मनोबलाने त्यांनी अनेक कठीण प्रसंगावर मात केली व जनतेच्या मनात कायमच स्वत:ची वेगळी छाप उमटवली आहे यात शंकाच नाही.

खा. रक्षाताई खडसे यांची काम करण्याची शैली ही कौतुकास्पद आहे. त्यांनी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या योजना तळागाळातील सामान्य जनतेसाठी राबवल्या आणि त्या अत्यंत प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवल्या. रावेर मतदारसंघ भौगोलिकदृष्टया खूप मोठा असूनही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यात त्या यशस्वी झाल्या. रोजगार, शिक्षण व मूलभूत सुविधांसाठी त्या सातत्याने प्रयत्नशील राहिल्या. देश व जनसेवेसाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या दूरदृष्टीच्या लोकप्रतिनिधी म्हणून रक्षाताईंचा उल्लेख करता येईल.

गत पाच वर्षांत रेल्वे संदर्भात विविध विकासकामे केली. रेल्वे उड्डाणपूल मंजूर केले. मतदारसंघातील सर्व रेल्वेची स्थानके अत्याधुनिक केली. भुसावळ रेल्वेस्थानकाचे सुशोभिकरण केले. अपंग आणि वृध्दांसाठी सरकते जिने व लिफ्टची सुविधा प्राप्त करून दिली. नवीन रेल्वे प्लॅटफॉर्म, नवीन रेल्वे आणि मतदारसंघातील स्थानकांवर थांबे मिळावे यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिल्या.

प्रधानमंत्री सुकन्या समृध्दी योजना, प्रधानमंत्री जन-धन योजना, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री फसल बिमा योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, उज्ज्वला गॅस योजना, अटल पेंशन योजना, स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना, यांसारख्या प्रमुख योजना मतदारसंघातील जनतेपर्यंत पोहोचवल्या. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमधे पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी दोन्ही बाजूने मोफत रेल्वेगाडी उपलब्ध करून दिली. मतदारसंघातील नागरिकांसाठी भुसावळ येथे नवीन पासपोर्ट ऑफिसची निर्मिती केली.

तापी नदीच्या पुलात दरवर्षी पाणी वाया जाते या वाया जाणाऱ्या पाण्याचे दोन्ही काठांवर विविध ठिकाणी पुनर्भरण करण्यासाठी महाकाय पुनर्भरण योजना (मेगा रिचार्ज) राबवण्यात येणार आहे. देशातील हा पहिला मेगा प्रकल्प आहे. यामुळे भविष्यात महाराष्ट्रात चार लाख हेक्टर जमिनीचे फेरभरण होऊन 20 लाख बेरोजगारांना काम मिळणार आहे. तसेच या भागामध्ये पाण्याची स्रोत क्षमता वाढण्यासह पाच मीटरपर्यंत वाढू शकेल. हा प्रकल्प ग्रीन प्रोजेक्ट म्हणूनही गणला जातोय. या योजनेचा सखोल अभ्यास मा.आ. एकनाथराव खडसे आणि मा.आ. हरिभाऊ जावळे यांनी केला आणि त्यासाठी पाठपुरावा केला. त्याचे फलित म्हणजे 10 जानेवारी 2016 रोजी तत्कालीन केंद्रीय जलसंधान मंत्री उमा भारती, मुखमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी या योजनेची हवाई पाहणी करून प्रकल्पाला मान्यता देऊन अहवाल तयार करण्याचे आदेश दिले. त्यामुळे परिसराला नवसंजीवनी ठरणारा 'मेगा रिचार्ज' माझ्या आयुष्यातील फलश्रुती आहे, असे रक्षाताई म्हणतात.

स्त्रियांचे समाजातील स्थान बळकट करणे ही माझी प्राथमिकता आहे असे त्या म्हणतात. केंद्र व राज्य सरकारच्या वेगवेगळया योजनांची माहिती महिला बचत गटांना उपलब्ध करून द्यावी यासाठी त्यांनी सातत्याने पाच वर्ष बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन केले. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या आजुबाजुच्या राज्यातील बचत गटांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

तापी नदीवरील शेडगाव प्रकल्प पूर्ण करणे हे माझे उद्दिष्ट आहे. बोदवड, कुऱ्हा, वरणगाव उपसासिंचन योजनांची कामे त्यांनी मार्गी लावली. हतनुर प्रकल्पात 60 टक्के गाळ असून गेल्या पाच वर्षात या समस्येतून मार्ग काढण्याचा प्रयत्न रक्षाताई करत आहेत. महामार्ग चौपदरी करण्याचे काम जोरात सुरू आहे. ते लवकरात लवकर पूर्ण व्हावे असे नियोजन करीत आहेत. अंकलेश्वर, बऱ्हाणपूर रस्त्याचा प्रश्न येत्या 2 वर्षात सुटावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. येत्या पाच वर्षात रोजगार निर्मितीच्या दृष्टीने कौशल्य योजनेत सुधारणा करणे संबंधित सूचना मांडणार आहे. स्थानिक गरजा ओळखून त्या दृष्टीने उद्योग व व्यवसाय सुरू होण्यासंबंधी कौशल्य विकसित करण्यावर भर देईल.

बचत गटांना व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने 100 कोटी मंजूर केले आहेत. त्यातून रक्षाताईंनी मुक्ताईनगर तालुक्यातील पाच गावांचे क्लस्टर केले. बचत गटांना विद्यार्थ्यांचे गणवेश शिलाईचे काम दिले. किमान दोन-तीनशे महिलांना रोजगार मिळेल अशी व्यवस्था केली.


'मेगा रिचार्ज'चे काम पूर्ण करणे, भुसावळमध्ये येऊ घातलेले रेल्वेचे विविध प्रकल्प पूर्ण करणे, महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे यासाठी विविध उद्योग उभे करणे ही रक्षाताईंसमोरील महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. त्याशिवाय प्रमुख रस्ते राष्ट्रीय महामार्गामध्ये वर्ग करणे, विमानसेवा सुरळीत करणे यासाठीही त्या प्रयत्नशील आहेत.

अंत्योदय हे भारतीय जनता पक्षाचे ध्येय आहे. त्यासाठी मी बांधिल आहे, असे रक्षाताई म्हणतात. विकासाच्या झऱ्यांचा पाझर समाजाच्या तळातल्या घटकांपर्यंत नेणे हे अंत्योदयाचे मूळ तत्त्व आहे आणि आपण आपल्या अंतापर्यंत या मूळ तत्त्वाशी नाळ तोडायची नाही हीच खासदार म्हणून, पक्ष सदस्य म्हणून आणि एक व्यक्ती म्हणूनही माझी बांधिलकी आहे असेही रक्षाताई सांगतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील सर्व योजनांना व ध्येयांना दृश्य आकार देण्यासाठी खासदार म्हणून मी माझे योगदान देतच राहीन, अशा शब्दात त्या आपली भावना व्यक्त करतात.

 

-प्रतिनिधी