इवलेसे रोप...

विवेक मराठी    07-Aug-2019
Total Views |

विवेक रूलर डेव्हलपमेंट सेंटर संचलित 'पर्यावरण विवेक समिती'तर्फे गेल्या तीन वर्षांपासून वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला जात आहे. या वृक्षरोपणाच्या माध्यमातून वृक्षप्रेमींना रोप दत्तक घेऊन त्यांचे पालकत्व देण्यात येते. वृक्षवनात पाकपुरस्कृत दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतीसाठी 'सैनिकवन' निर्माण करण्यात आले.इवलेसे रोप लावियले द्वारी।

तयाचा वेलू गेला गगनावरी॥

या अभंगातील एका ओवीचे सुंदर विवेचन एकदा वाचनात आले, ते असे - 'इवलेसे रोप' म्हणजे गुरुभेट आणि गुरुकृपेने शिष्याला गुरुमंत्राची दीक्षा मिळाली होती. दीक्षा मिळाल्यानंतर एक वेळ अशी येते की, (तयाचा वेलू गेला गगनावरी) त्याच्या साधनेला फळ मिळते. त्या इवल्याशा मंत्राने जागृत होऊन त्याचा प्रवास गगनाच्या अर्थात सहस्रार चक्राच्या दिशेने सुरू झाला.

गेल्या तीन वर्षांपासून विवेक रूलर डेव्हलपमेंट सेंटर संचलित 'पर्यावरण विवेक समिती'चा असाच प्रवास सुरू आहे. 2016मध्ये महाराष्ट्र शासनाने 50 कोटी वृक्षलागवडीचा संकल्प केला होता. त्या वेळी शासनाने सर्वप्रथम दोन कोटी वृक्षलागवडीचा विश्वविक्रम केला. शासनाच्या या वृक्षलागवडीच्या आवाहानाला प्रतिसाद म्हणून पर्यावरण विवेक समितीची स्थापना करण्यात आली. गेल्या तीन वर्षांपासून अडीच हजार वृक्ष लावण्यात आले आहेत. त्यातील 1230 झाडे राष्ट्रीय महामार्ग 48च्या शेजारी वनविभागाच्या जमिनीवर, उर्वरित राष्ट्र सेवेच्या शाळेतील विद्यार्थ्यांकडे आणि काही झाडे बांबू महिला कारागीर यांच्या घरी (मानवेल जातीचे बांबू वृक्ष) देण्यात आली.

पर्यावरण विवेक समिती ही अधिकृत समिती असून समितीमार्फत ज्या ठिकाणी वृक्षलागवड केली जाते, ती जागा वनविभागाची असून त्यासाठी शासनाकडून रीतसर परवानगी घेतली जाते. त्या जागांवर केवळ भारतीय प्रजातींचीच झाडे लावली जातात. वड, पिंपळ, चिंच, करंज, बहावा, कडुलिंब, बांबू इत्यादी. वृक्षलागवड झाल्यानंतर त्या झाडांच्या संरक्षण-संवर्धनासाठी लागणारा निधी समिती स्वबळावर व वृक्षप्रेमींच्या सहकार्याने उभा करत असते. यासाठी कोणत्याही प्रकारचा निधी शासनाकडून उपलब्ध होत नाही.

वृक्षारोपण करून आपल्या आजूबाजूला भराभर वाढणारी विदेशी झाडे आपण पाहतो. परंतु पर्यावरण विवेक समिती केवळ भारतीय प्रजातीचीच झाडे लावण्यात आग्रही आहे, असे पर्यावरण विवेक समितीचे कार्यवाह उमेश गुप्ता यांनी सांगितले. देशी झाडे पर्यावरणाचा समतोल राखण्यात सिंहाचा वाटा उचलत असतात. देशी झाडे ही पक्षी, प्राणी आणि कीटक यांचे अन्न आणि निवारा यासाठी हक्काचे स्थान असते. यांच्या विष्ठेतून जंगलात सर्वदूर पेरल्या जाणाऱ्या बियांपासून नवीन अंकुर फुटतात. म्हणजे हे एक निसर्गचक्र आहे. वृक्षलागवडीमुळे जमिनीची धूप थांबते. ऋतुचक्र नियमित होण्यास मदत होते. ही भारतीय प्रजातींची वैशिष्टये आहेत आणि हीच वैशिष्टये ओळखून त्यांचे महत्त्व आपण समजून घ्यायला पाहिजे.


पर्यावरणाचे हेच भान जागृत ठेवून पर्यावरण विवेक समिती गेली तीन वर्षे सातत्याने वृक्षरोपणाचा कार्यक्रम करीत असते. या वर्षी 13 जुलै रोजी हा कार्यक्रम घेण्यात आला होता. वृक्षदिंडी काढून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वर्षी एका दिवसात 500 झाडे लावण्यात आली. वनाच्या अतिरिक्त जागेत वृक्षवनात पाकपुरस्कृत दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतीसाठी 'सैनिकवन' निर्माण करण्यात आले. वृक्षारोपण करून त्या रोपांवर शहीद जवानांच्या नावांचे बटालियन नंबरसहित फलक लावण्यात आले. भाजपाचे मीरा-भाईंदरचे आ. नरेंद्र मेहता यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मेहता यांनी,''राष्ट्रसेवा समितीचे आणि त्या अंतर्गत असलेल्या पर्यावरण विवेक समितीचे काम प्रशंसनीय व अनुकरणीय आहे. या कार्यासाठी माझ्या परिने जे काही सहकार्य लागेल ते मी करायला तयार आहे.'' असे आश्वासन दिले. याप्रसंगी विवेक समूहाचे प्रबंधक संपादक व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळेकर, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे तसेच तपोवन आश्रम मेढाचे संचालक सचिन वाला (दादाजी), समितीचे संचालक प्रदीप गुप्ता, व्यवस्थापक लुकेश बंड यांची प्रमुख उपस्थिती होती. रमेश पतंगे यांनी ावेळी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास वृक्षप्रेमी, शालेय विद्यार्थी, एन.सी.सी. ग्रूप, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

पर्यावरण विवेक समितीचे कार्यवाह उमेश गुप्ता यांनी लागवड केलेल्या रोपांच्या तीन वर्षे संवर्धनाचे वचन दिले. तसेच उपस्थितांना वृक्षसंवर्धन योजनेअंतर्गत रोपांना दत्तक घेण्याचे आवाहन केले. यासाठी केवळ एका रोपाला, एका दिवसाला, केवळ एक रुपया या स्वरूपाचे वृक्षदान करायचे आहे. प्रत्येकाच्या क्षमतेनुसार रोप (पटीने) दत्तक घेऊ शकतो. रोप दत्तक घेऊन ज्याने त्या रोपाचे पालकत्व स्वीकारले आहे, त्याच्या नावाचा फलक त्या वृक्षावर लावला जातो. शिवाय आपण जे रोप दत्तक घेतले आहे, त्याची पुढची (त्याची वाढ) प्रक्रिया, त्यासाठी राबविली जाणारी यंत्रणा याची संपूर्ण माहिती संबंधितांना दिली जाते. शिवाय सोशल मीडिया व समितीची वेबसाइट www.vivektreeplantation.comद्वारे वृक्षवाढीसंदर्भात माहिती दिली जाते. उमेश गुप्ता यांच्या आवाहानाला प्रतिसाद म्हणून शीतल करुलकर यांनी या कार्यासाठी एक लाख रुपयांची देणगी दिली.

आतापर्यंत खा. राजेंद्र गावित, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे, तहसलीदार सुरवसे, महाराष्ट्र भाजपाचे सचिव राजीव भुसारी, पोलीस निरीक्षक युनिस शेख, अभिनेते अरुण नलावडे यांच्या, तसेच अनेक सामाजिक संस्थांच्या नावाने वृक्षारोपण करण्यात आले आहे. समितीचे कार्यवाह उमेश गुप्ता यांनी वृक्षारोपण कार्यक्रमात समितीचा आढावा देताना वृक्षारोपण हा कार्यक्रम काही तासांत आटोपणारा कार्यक्रम दिसत असला, तरी त्याची प्रक्रिया ही दीर्घ असते, त्या प्रक्रियेची सविस्तर माहिती त्यांनी कार्यक्रमप्रसंगी वृक्षप्रेमींना दिली. हा कार्यक्रम जरी जुलै महिन्यात होत असला, तरी आधीपासूनच - म्हणजे मे महिन्यापासूनच या कार्यक्रमाची तयारी सुरू करण्यात येते. वृक्षारोपणासाठी खड्डे खणणे, त्यानंतर ती जागा अधिक सुपीक होण्यासाठी तिची मशागत करणे, शिवाय वृक्षलागवडीनंतर संरक्षणाकरिता बांध घालणे, वृक्षवाढीत बाधा आणणाऱ्या तणांची, वेलींची छाटणी करणे. वृक्षारोपण करून न थांबता त्याची योग्य रितीने जोपासना करणे अधिक महत्त्वाचे. पर्यावरण विवेक समितीचा पूर्ण चमू हे कार्य पर्यावरणाशी आपली बांधिलकी समजून आनंदाने करते.

सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सा. विवेकशी राष्ट्र सेवा समितीची नाळ जोडली असल्याने पर्यावरण विवेक समितीच्या माध्यमातून अनेक वृक्षप्रेमींना जोडून वृक्षारोपणाचा कार्यक्रम दर वर्षी घेण्यात येतो. पर्यावरण आणि मानवी जीवन हे परस्परपूरक आहेत. आपली भारतीय प्रजातीची झाडे पर्यावरणाचा समतोल राखणारी आहेत, ही जागृती प्रत्येक माणसापर्यंत पोहोचविण्याचा छोटासा प्रयत्न या माध्यमातून समिती करीत आहे. त्यांच्या या कार्याला भरभरून प्रतिसाद मिळून भारतीय झाडे लावून भारत हा खऱ्या अर्थाने समृध्द होवो!

शालेय विद्यार्थी आणि बांबू महिला कारागीर यांनी उत्तम प्रकारे झाडांची जोपासना केल्याबद्दल त्यांचे सत्कार करण्यात आले.

विद्यार्थी

1. शेवंती बाबुराव वरठा

2. ममता मधू कडव

3. सारिका विश्वनाथ ठाकरे

4. युवराज रंजीत धोदडे

5. अंकिता संतोष कडव

बांबू महिला कारागीर

1. दीपाली जाधव

2. संजिवनी धनवा

3. अश्विनी लहानगे

4. सुरेखा जाधव

5. प्रतिक्षा गोवारी

 
-

- पूनम पवार