परराष्ट्र खात्याची ‘सुपरमॉम’

स्रोत: विवेक मराठी    दिनांक09-Aug-2019

***डॉ. विजय चौथाईवाले***


 

सुषमाजी या प्रभावी वक्त्या आणि उत्तम संसदपटू होत्या, हे सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र विचारांची आणि उद्दिष्टांची सुस्पष्टता, प्रत्येक गोष्टीचा खोलात जाऊन विचार करण्याची प्रचंड क्षमता आणि सगळ्यात शेवटचे म्हणजे त्यांची तत्त्वनिष्ठा या त्यांच्या वैशिष्ट्यांबाबत फार कमी जणांना माहिती असेल.

त्यांच्या या वैशिष्ट्यांमुळेच मोठी कामे आणि प्रकल्प हाती घेऊन ते पूर्णत्वास नेऊ शकत असत. सरकारी यंत्रणेत ही नक्कीच सोपी बाब नाही. त्यांच्या कार्यकाळात 2015मध्ये येमेनमधून भारतीय नागरिकांची सुटका करण्याचे उदाहरणच घ्या. एका आठवड्यात प्रत्येक दिवशी दोन तासांसाठी सौदीकडून येमेनवर होणारे बाँबहल्ले थांबवण्यात येतील, अशी व्यवस्था पंतप्रधान मोदी यांनी सौदीच्या राजाद्वारे केली होती. वेगवेगळ्या एजन्सींच्या मदतीने आणि राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंह यांना जिबुती या देशात तैनात करून एका रेस्क्यू ऑपरेशनचे नियोजन करण्यात आले होते. त्यात 5000 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली. तसेच इतर 48 देशांच्या (अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी आणि इस्रायल यांच्यासह) सुमारे 2000 नागरिकांचीही सुटका करण्यात आली. गेल्या पाच वर्षांत परकीय भूमीत अडकलेल्या 2 लाखांहून अधिक लोकांची भारत सरकारद्वारे सुटका करून त्यांना मायदेशी परतण्याचा मार्ग सुकर करण्यात आला.

"Reaching the unreached' हे गेल्या पाच वर्षांतील भारतीय परराष्ट्र धोरणाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी येण्याआधी गेल्या अनेक दशकांत भारताच्या एकाही पंतप्रधानाने कित्येक महत्त्वाच्या देशांना भेट दिली नव्हती, हे आश्चर्यकारक आहे. श्रीलंका, कॅनडा, संयुक्त अरब अमिराती, नेपाळ हे त्यांपैकी काही देश होते. असे 39 देश आहेत ज्यांना कोणत्याही भारतीय मंत्र्याने भेट दिली नव्हती. मात्र मागच्या कार्यकाळात परराष्ट्र मंत्रालयानेबृहद संपर्क योजनाराबवली. या योजनेअंतर्गत लोकसभेचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत सर्व 192 देशांना किमान एका तरी भारतीय मंत्र्याने भेट द्यावी असे निश्चित करण्यात आले होते. मार्च 2019पर्यंत तीन देश वगळता 189 देशांना भारतीय मंत्र्यांनी भेट दिली होती. स्वत: सुषमाजी आणि त्यांच्या दोन राज्यमंत्र्यांनी 110 देशांना भेट दिली.

या अभूतपूर्व संपर्काचे आणखी एक उदाहरण म्हणजे भारत-आफ्रिका परिषद. यापूर्वी या परिषदेत आफ्रिकेतील केवळ 17 देशांच्या प्रतिनिधींची उपस्थिती असे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सूचना केली की तिसर्या भारत-आफ्रिका परिषदेसाठी आफ्रिका खंडातील सर्व 54 देशांना बोलवावे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे त्या सर्व देशांनी आनंदाने या निमंत्रणाचा स्वीकार केला. त्यांपैकी 41 देशांनी त्यांच्या महत्त्वाच्या नेत्यांना प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवले.

सुषमाजींच्या नेतृत्वाखाली जगभरातील आपले सर्व दूतावास लोकांसाठी मैत्रिपूर्ण बनले आणिघरापासून दूर असलेले घरअसा अनुभव त्यांनी दिला. परदेशातल्या माझ्या प्रवासादरम्यान भेटलेले प्रवासी भारतीय भारताच्या दूतावासांविषयी आलेले चांगले अनुभव सांगत असत. या स्नेहपूर्ण व्यवहारामुळे जागतिक स्तरावर भारताविषयी मोठ्या प्रमाणात सदिच्छेची भावना निर्माण झाली. त्याचबरोबर अनेक प्रक्रिया सोप्या करण्यात आल्या, त्यातील अडथळे दूर करण्यात आले. त्यामुळे परराष्ट्र मंत्रालयाची कार्यक्षमता वाढली. उदाहरणार्थ, आता 161 देशांचे नागरिक -व्हिसाद्वारे भारताला भेट देऊ शकतात. हा व्हिसा ऑनलाइन मिळत असल्याने दूतावासात स्वत: जाऊन पासपोर्ट जमा करण्यात आणि तो खूप दिवसांनी परत मिळवण्यात जाणारा वेळ मोठ्या प्रमाणात वाचतो. पीआयओ (पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन) आणि ओसीआय (ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया) कार्डांचे विलीनीकरण झाल्यामुळे सर्व प्रकारच्या प्रवासी भारतीयांना त्यांच्या पासपोर्टचा रंग कोणताही असला तरी एकच ओळख देण्यात आली आहे. कित्येक प्रकरणात भारतात तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी येणार्यांना तत्काळ व्हिसा देण्याच्या सूचना सुषमाजींनी केल्या होत्या. त्यांपैकी काही उदाहरणे पाकिस्तानमधली आहेत. हा अनुभव घेणार्या देशांमध्ये भारताविषयी सद्भावना निर्माण झाल्या.

आपल्या देशात पासपोर्ट मिळवणे ही सोपी गोष्ट नव्हती. त्यातील महत्त्वाचे अडथळे काही पासपोर्ट कार्यालये आणि पासपोर्ट सेवा केंद्रे होती. सुषमाजींच्या नेतृत्वाखाली परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी जास्तीत जास्त केंद्रे सुरू करण्याची ठोस भूमिका घेतली. आतापर्यंत भारतभर 375 केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात पासपोर्ट कार्यालये असलीच पाहिजेत असे निश्चित करण्यात आले.


 

सुषमाजींच्या ट्विटर धोरणाने जागतिक वर्तुळात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांनी केवळ जास्तीत जास्त लोकांशी संवाद साधण्यासाठी या माध्यमाचा वापर केला नाही, तर त्यांच्या समस्या सोडवण्यासाठीही केला. अडचणीत सापडलेल्यांना मदतीसाठी कायम हात पुढे करणार्या अशी त्यांची जागतिक प्रतिमा तयार झाली होती. त्यामुळे वॉशिंग्टन पोस्टसारख्या वृत्तपत्रानेसुपरमॉम ऑफ स्टेटअशा शब्दात त्यांचे वर्णन केले असेल तर आश्चर्य नाही. आतापर्यंत कोणत्याही परराष्ट्र मंत्र्याने समाजमाध्यमांचा वापर करून इतक्या तत्परतेने समस्या सोडवल्या नव्हत्या, अडचणीत असलेल्या इतक्या लोकांना मदत केली नव्हती. आपत्कालीन परिस्थितीत व्हिसा मिळावा यासाठी त्यांनी एकदा दूतावासाचे दरवाजे शनिवार-रविवारीही उघडे ठेवले होते. तसेच एकदा एका नवविवाहित जोडप्याला मधुचंद्राला जाण्यास अडचण येऊ नये यासाठी एका रविवारी पासपोर्ट कार्यालय सुरू ठेवण्यात आले होते. त्याच वेळी त्यांनी अशा तक्रारींना उत्तर देर्यासाठी एक वेब पोर्टल (www.madad.gov.in) सुरू केले. हे वेबपोर्टल त्यांच्या कार्यालयाद्वारे दिवसरात्र चालवले जाते. (त्यांची लोकप्रियता इतकी होती की एका व्यक्तीने तिचा फ्रीज दुरुस्त करण्यासाठीही त्यांच्याकडे मदत मागितली आणि ती विनंती त्यांनी नम्रपणे नाकारली.)

माझ्या सुदैवाने पक्षातील जबाबदारीमुळे त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. ही जबाबदारी जेव्हा मी स्वीकारली, तेव्हा मी पहिल्यांदा सुषमाजींना भेटलो होतो. श्याम परांडे यांनी त्यांच्याशी माझी ओळख करून दिली. त्यांनी माझे नाव ऐकल्यावर माझे स्वागत केले आणि जसे काही मला अनेक वर्षांपासून ओळखत असल्याप्रमाणे बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर सातत्याने मी त्यांच्या या प्रेमळ संवादाचा आणि मार्गदर्शनाचा अनुभव घेतला. मला त्या नेहमीच अतिशय प्रेमळ पण त्याच वेळी विचारांच्या बाबतीत सुस्पष्ट आणि एकाग्र असल्याचे जाणवले. परदेश दौर्यात असताना तेथील आपल्या विचार परिवाराच्या लोकांशी संवाद साधण्यास त्या सदैव उत्सुक असायच्या. त्यांच्या कोणत्याही महत्त्वाच्या दौर्याआधी काही दिवस त्यांच्या कार्यालयातून सतीश गुप्ताजी आम्हाला फोन करून माहिती द्यायचे की परराष्ट्र मंत्र्यांनी कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी अमुक वेळ ठेवली आहे. त्यांना भेटणे हा आम्हा प्रत्येक कार्यकर्त्यासाठी संस्मरणीय अनुभव असे.

नुकत्याच झालेल्या निवडणूक प्रचारासाठी प्रचार साहित्य तयार करण्यासाठी पक्षाने स्थापन केलेल्या समितीचे नेतृत्व त्या करत होत्या. मीही त्या समितीचा सदस्य होतो. प्रचार साहित्य (जाहिरनाम्याव्यतिरिक्त) तयार करण्याचे काम आमच्यावर सोपवले होते. या कमिटीच्या मीटिंगच्या वेळी त्यांचे हिंदी आणि इंग्लिश दोन्ही भाषांवरील प्रभुत्व पाहून, शब्दांची निवड आणि परिपूर्णतेचा आग्रह पाहून मी आश्चर्यचकित झालो. त्या एखादे वाक्य मोठ्याने वाचायच्या, त्याची पुनर्बांधणी करायच्या, प्रत्येकाचे मत विचारायच्या, त्यानुसार वाक्यात बदल करायच्या आणि त्याला अंतिम रूप देण्यापूर्वी पुन्हा दुसर्यांदा मोठ्याने वाचायच्या. त्याच वेळी रंगसंगती, कागदाची गुणवत्ता आणि अक्षरांचा आकार याकडेही त्यांचे तितकेच लक्ष असायचे.

त्यांनी निवडणूक प्रचारात फारच कमी जाहीर सभा घेतल्या होत्या, तरी मी त्यांना फेसबुक लाइव्हद्वारे जगभरातल्या प्रवासी भारतीयांशी संवाद साधण्याची विनंती केली असता त्यांनी ती लगेच मान्य केली. ही व्हर्च्युअल भेट इतकी लोकप्रिय झाली की या व्हिडिओला विविध समाजमाध्यमांतून 2.5 लाखांहून अधिक views मिळाले होते
.

जूनच्या पहिल्या आठवड्यात मी त्यांना शेवटचे भेटलो होतो. त्या नेहमीइतक्याच आनंदी होत्या. त्यांनी त्या वेळी गेल्या पाच वर्षांतील यशाचा थोडक्यात मागोवा घेतला होता. तसेच राजकारणात येण्यापूर्वीच्या माझ्या आयुष्याविषयी त्यांनी मला अनेक प्रश्न विचारले. योगायोगाने तो माझा जन्मदिवस होता. मी निघण्यापूर्वी त्यांना त्याविषयी सांगितले आणि त्यांच्यासह सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त केली. त्या त्यासाठी तयार तर झाल्याच, त्याचबरोबर स्वत:च्या हाताने मला मिठाई भरवली. मी त्यांच्यासमोर आशीर्वादासाठी नतमस्तक झालो. पण त्या वेळी माहीत नव्हते की त्यांच्याशी ही माझी शेवटची भेट ठरेल.

भारताच्या परराष्ट्र धोरणावरील त्यांच्या शेवटच्या भाषणात (13 मार्च 2019 रोजी) परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाच्या दोन मजबूत खांबांचा उल्लेख केला. एक म्हणजेराष्ट्रहित सर्वोपरिआणि दुसरावसुधैव कुटुंबकम्’. विशेष म्हणजे परराष्ट्र मंत्रिपदावर असताना सुषमाजींनी स्वत:देखील या दोन तत्त्वमार्गांवरूनच वाटचाल केली.

सुषमाजी, तुम्ही आमच्या स्मरणात निरंतर असाल.

डॉ. विजय चौथाईवाले

प्रभारी, परराष्ट्र व्यवहार विभाग, भाजपा

 (अनुवाद : सपना कदम-आचरेकर)