राम जेठमलानी - व्यक्ती आणि वल्ली

स्रोत: विवेक मराठी    दिनांक11-Sep-2019

***ऍड. सुशील अत्रे****

भारतात कोणताही अतिचर्चित, वलयांकित खटला उभा राहिला की त्यात वकील म्हणून 'राम जेठमलानी' हे असणारच. असे खटले चालविताना त्यांनी जनभावनेची अजिबातच तमा बाळगली नाही. अन्यथा स्व. इंदिरा गांधी किंवा राजीव गांधी यांच्या खटल्यातील आरोपींचे वकीलपत्र त्यांनी घेतलेच नसते. 'मला जे पटते ते मी करणार' हा त्यांचा सरधोपट खाक्या होता. 


कायद्याच्या क्षेत्रातील बहुधा सगळयात जास्त चर्चित असलेली व्यक्ती म्हणजे ऍड. राम जेठमलानी. मी जाणूनबुजून 'चर्चित' हा शब्द वापरला आहे, 'लोकप्रिय' नव्हे. असे म्हणतात की, अत्यंत बुध्दिमान किंवा अत्यंत प्रतिभावान व्यक्ती बहुधा हट्टी आणि चमत्कारिक स्वभावाच्या असतात. हा जगभराचा अनुभव आहे. असे म्हणता येईल की राम जेठमलानी या नियमाला अपवाद नव्हते. इतर लोक आपल्याला काय म्हणतील किंवा त्यांचे आपल्याविषयी मत काय होईल याची यत्किंचितही पर्वा न करता काही लोक आपले आयुष्य स्वतःच्या धुंदीत जगात असतात. त्यांच्या क्षेत्रात ते जणू मेरुदंड असतात. पण इतरांनी तसे म्हटले पाहिजे हाही त्यांचा आग्रह नसतो. राम यांच्या बाबतीत आश्चर्याची गोष्ट ही की असा स्वभाव घेऊन ते वकिलीतच नव्हे, तर राजकारणातही वावरले. नुसते वावरले नाहीत, तर या देशाचे कायदेमंत्रिपदही त्यांनी भूषविले. ते फारसे प्रभावी किंवा कार्यक्षम कायदेमंत्री ठरले नाहीत, हीदेखील वस्तुस्थिती आहे. परंतु त्याचे कारण पुन्हा तेच आहे. लोकशाहीत एखाद्या विषयाचे मंत्रिपद भूषविणारी व्यक्ती केवळ त्या क्षेत्रातील दिग्गज असणे पुरेसे नसते. आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन, सर्वसामान्य माणसाच्या पातळीला उतरून मग आवश्यक ते निर्णय घेणारी व्यक्ती ही त्या खात्याची मंत्री म्हणून अधिक शोभते. राम यांना ही बाजू नसावी. कायदा समजून घेताना प्रत्येक जण 'राम जेठमलानींप्रमाणे' समजू शकत नाही, हे त्यांनी ध्यानात घ्यायला हवे होते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे राजकारणात आलेली व्यक्ती कळत-नकळत तडजोडी करायला शिकते. तडजोड केल्याशिवाय माणूस राजकारणात टिकूच शकत नाही. आणि जेठमलानींसारखा प्रखर बुध्दिमान, स्वयंपूर्ण माणूस तडजोडींना तयार होईल ही शक्यता कमीच होती. एकतर राजकारण शेवटी मतांवर चालते. मते मागावी लागतात आणि मागणाऱ्याला नेहमीच पडती भूमिका घ्यावी लागते. ही साखळी अनिवार्य आहे. त्यामुळे राम यांच्यासारखा माणूस या साखळीत बसणे अवघडच होते. परिणामी अटलजींसारख्या सौम्य आणि अत्यंत समजूतदार पंतप्रधानानेही जेठमलानींचा राजीनामा मागितला. आपल्या मूळ स्वभावाला अनुसरून त्यांनी तो देऊनही टाकला... ना खंत ना खेद! उलटपक्षी, या घटनेनंतर 'बिग ईगोज, स्मॉल मेन'सारखे पुस्तक लिहून जिभेप्रमाणे आपल्या लेखणीचाही पट्टा फिरवून अनेकांना गारद केले.

आपल्या क्षेत्रात - म्हणजे वकिलीमध्ये त्यांचे स्थान इतके उंचावर आणि इतके अनिवार्य होते, की कायदेमंत्रिपदाचा राजीनामा त्यांच्या दृष्टीने फारशी चिंतेची गोष्ट नव्हतीच. त्यांचा आत्मविश्वास आयुष्यभर दणकट होता आणि तसच राहिला. त्यांना हे पुरेपूर माहीत होते की ते मंत्री असोत वा नसोत, देशातील सगळया मोठया प्रकरणांमध्ये वलयांकित माणसे शेवटी त्यांच्याकडे येणारच. आणि घडलेही तसेच. ते मंत्रिपदावरून बाजूला झाल्यानंतरसुध्दा त्यांचे 'राम जेठमलानीपण' अबाधित राहिले. शिवाय ते राजकारणापासून दूर कधीच राहिले नाहीत.अगदी मृत्यूपर्यंत ते राज्यसभा सदस्य होतेच.

 

लोकप्रिय कायदेतज्ज्ञ

 मी स्वतः वकील असल्याने अगदी तालुका कोर्टांपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत कोणत्याही पातळीवर वकिलीचे उदाहरण द्यायचे झाले, तर ते अपरिहार्यपणे राम यांचेच दिले जायचे. म्हणजे एखाद्याचा वकील म्हणून उपहास करायचा असेल, तरीसुध्दा 'स्वतःला काय जेठमलानी समजतो का?' हाच प्रश्न लोकप्रिय होता. मला नाही वाटत दुसऱ्या कोणत्याही वकिलाला भारतात एवढे नाव मिळाले असेल आणि सध्याची एकूण परिस्थिती लक्षात घेतली, तर यापुढे दुसऱ्या कोणाला मिळेल असेही वाटत नाही. आश्चर्य म्हणजे आमच्या वकिली क्षेत्रातीलही अनेकांना राम जेठमलानी यांच्या वकिली कारकिर्दीविषयी फारशी माहिती नाही. नाव तेवढे माहींत आहे.

जुन्या काळी एका वर्षात दोन इयत्ता पार केल्यामुळे ते वयाच्या तेराव्या वर्षीच मॅटि्रक झाले. 17व्या वर्षी वकील झाले. 21 वर्षांचा होईपर्यंत वकिली सुरू करता येणार नाही, असा नियम असताना विशेष अपवाद म्हणून त्यांना अवघ्या 18व्या वर्षी वकिलीची सनद मिळाली. तेव्हापासून ते थेट वयाची नव्वदी पार केल्यानंतरसुध्दा त्यांच्या जिभेची धार कायम होती. ज्या वयात सामान्यतः लोकांना लहानसहान गोष्टींचेही विस्मरण होऊ लागते, त्या वयात राम यांना कधीकाळचे निकालसुध्दा व्यवस्थित आठवत होते. त्यांनी युक्तिवादाला सुरुवात केली, पण वयपरत्वे शब्द अडखळले, विस्मरण झाले, पुनरुक्ती झाली असे एकदाही घडले नाही. ही किती प्रचंड दुर्मीळ गोष्ट आहे, हे एखादा वकीलच समजू शकेल. आमच्या क्षेत्रात अनेकदा असे होते की, वयोवृध्द वकील अट्टाहासाने काम चालवतात खरे, पण त्यांच्या बोलण्यात, उलटतपासणी घेण्यात बरेचदा गोंधळ उडतो. त्यांच्या वयाचा मान म्हणून समोरील वकील किंवा न्यायाधीश ते मनावर घेत नाही, इतकेच. हे सगळयांच्या बाबतीत घडते असे अर्थातच नाही. पण राम हे अपवादांमधलेही अपवाद होते, असे म्हणावे लागेल.

भावानिकदृष्टया तटस्थ

ते कायम नेमके आणि सुसंबध्द (रेलेव्हंट) राहण्यामागे एक इंगित असे होते की ते वकील म्हणून नेहमीच भावानिकदृष्टया तटस्थ होते. मुळात त्यांच्या स्वभावात फार मोठी भावनाशीलता नव्हती. त्यामुळे कोणाही अशिलामध्ये भावनिकदृष्टया गुंतण्याचा प्रश्नच नव्हता. आणि या देशातल्या इतक्या मोठमोठया व्यक्तींचे वकीलपत्र त्यांनी घेतले होते की आपला अशील ही कोणी फार मोठी व्यक्ती आहे, या गोष्टीचे त्यांना कधीच अप्रूप नव्हते. 1959 साली भारतामध्ये के.एम. नानावटी यांचा खटला चालला ('रुस्तुम' हा चित्रपट ज्या खटल्यावर बेतलेला आहे, तो खटला. किंवा मराठीप्रेमी लोकांसाठी 'अपराध मीच केला' हे मधुसूदन कालेलकरांचे नाटक ज्यावर बेतले होते, तो खटला!). या खटल्याने भारताच्या कायदाक्षेत्रात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. एक म्हणजे 'ज्युरी' पध्दतीने चाललेला हा भारतातील शेवटचा खटला ठरला. आणि दुसरे म्हणजे कायदाक्षेत्रात राम जेठमलानी हे नाव ज्याच्या त्याच्या तोंडी झाले. ते या खटल्यात सरकारपक्षातर्फे होते. तेव्हापासून हा जणू अलिखित नियमाच झाला. भारतात कोणताही अतिचर्चित, वलयांकित खटला उभा राहिला की त्यात एक नाव 'राम जेठमलानी' हे असणारच. असे खटले चालविताना त्यांनी जनभावनेची अजिबातच तमा बाळगली नाही. अन्यथा स्व. इंदिरा गांधी किंवा राजीव गांधी यांच्या खटल्यातील आरोपींचे वकीलपत्र त्यांनी घेतलेच नसते. आजच्या प्रमाणे तेव्हा फेसबुक, टि्वटर वगैरे सोशल मीडिया भरात नव्हता. अन्यथा जेठमलानींचा कडक निषेध करणाऱ्या, आजच्या लाडक्या भाषेत त्यांना शिवीगाळ करणाऱ्या, आई-बहीण काढणाऱ्या लाखोंनी पोस्ट्स आल्या असत्या. पण हेही तितकेच खरे की त्यांनी यातल्या एकाही पोस्टला किंमत दिली नसती. 'मला जे पटते ते मी करणार' हा त्यांचा सरधोपट खाक्या होता.


राम न्यायमूर्तींशीही असेच वागायचे, हे विशेष आहे. त्यांनी अनेकदा अनेक न्यायमूर्तींनाही आपल्या तिखट जिभेचा प्रसाद दिलेला आहे. परंतु तोपर्यंत त्यांच्या नावाचा दबदबाच एवढा झाला होता की कोणाही न्यायमूर्तीने त्यांच्याशी प्रतिवाद केला नाही. आमच्या क्षेत्रात अनेकांना माहीत असलेले, पण अर्थातच पुरावा नसलेले राम यांचे प्रसिध्द उद्गार म्हणजे, ""I am ready to argue before a lamppost, if I am paid for that!'' - 'मला जर माझी फी मिळाली, तर मी एखाद्या विजेच्या खांबासमोरही युक्तिवाद करायला तयार आहे!' आजच्या काळात हे उद्गार जाहीरपणे काढण्याची कोणाचीतरी हिंमत आहे का? दॅट वॉज जेठमलानी!

कायदेविषयक ग्रंाथ

 

आश्चर्य म्हणजे कायदा क्षेत्रातील या दिग्गजाने कायद्यावर मार्गदर्शक अशी स्वतंत्र पुस्तके फारशी लिहिली नाहीत. ते सहलेखक होते. मात्र त्यांनी वेळोवेळी केलेली भाषणे आणि लिहिलेले प्रासंगिक लेख यांचे संकलन करून त्यांनी दोन पुस्तके प्रकाशित केली. आपल्या स्वभावाला अनुसरून या पुस्तकांना त्यांनी नावेही तशीच दिली आहेत. पहिल्या पुस्तकाचे नाव "Conscience of a Maverick'. मॅव्हरिक म्हणजे अवलिया, विक्षिप्त माणूस. म्हणजे पुस्तकाच्या शीर्षकाचे रूपांतर 'विक्षिप्ताची विवेकबुध्दी' असे होईल. सुमारे सात वर्षांनी याचा दुसरा भाग प्रकाशित झाला. नाव होते - 'Maverick Unchanged'. म्हणजे, आपण अजूनही बदललेलो नाही, हे राम यांनी ठासून सांगितले. काही दिवसांपूर्वी एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींनी हैराण होऊन राम यांना ''तुम्ही अखेर निवृत्त होणार कधी?'' असा प्रश्न विचारला होता. त्यावर राम यांनी आपल्या प्रसिध्द फटकळ भाषेत, ''मी केव्हा मरणार आहे, याची न्यायमूर्ती का चिंता करीत आहेत?'' असा प्रतिप्रश्न केला. 'मी मरेपर्यंत वकिली करणार आहे' हे सरळही सांगता आले असते - परंतु ते 'राम जेठमलानींचे' सांगणे राहिले नसते. गंमत म्हणजे हा किस्सा झाल्यावर अवघ्या काही दिवसांत त्यांनी अचानक वकिलीतून निवृत्ती जाहीरही करून टाकली आणि यापुढे आपण भ्रष्टाचाराविरुध्द लढणार आहोत असेही जाहीर केले. (आणि या वेळी ते लालूंच्या 'राजद'मध्ये होते!!)

खरोखरच, अशा एखाद्या 'अफाट' माणसाचे निधन झाले की नक्की काय लिहावे हा प्रश्न पडतो. श्रध्दांजलीपर लेखात अपेक्षित असते तशी भाषा वापरली, तर खरे राम जेठमलानी समोर येणारच नाहीत. मग लिहिणार तरी काय? गोंधळ उडतो. स्वतः राम यांना विचारले असते, तर त्यांनी आपल्या शैलीत ''देन डोन्ट राइट...'' एवढे म्हणून एका फटक्यात विषय संपवला असता!