चांद्रयान-2आत्मचिंतन ते आत्मविश्वास

विवेक मराठी    12-Sep-2019
Total Views |

***सारंग ओक***

चांद्रयान -2 मोहिमेचे विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्याच्या टप्प्यातील बिघाड अवघ्या देशाला चटका लावून गेला. एकीकडे विक्रम लँडरच्या संपर्काच्या आशा पल्लवित आहेत, तर दुसरीकडे या मोहिमेच्या यशापयशाची चर्चा सुरू आहे. या मोहिमेचा तटस्थपणे आढावा घेणारा लेख.


काळजाचा ठोका चुकवणाऱ्या क्षणांची सुरुवात झाली 7 सप्टेंबर 2019 रोजीच्या पहाटे 1.00 वाजल्यापासून आणि या क्षणापर्यंत आणून ठेवायला कारणीभूत होती इस्रोची अभूतपूर्व अशी चांद्रयान-2 मोहीम. सगळा भारतच नव्हे, तर जगातील अनेक देश या वेळी प्रसारित होणाऱ्या दृश्यांकडे नजर लावून बसले होते. याची सुरुवात झाली 22 जुलै, 2019 रोजी. भारताच्या अंतराळ संशोधन विश्वातील सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस. याच दिवशी 22 ऑक्टोबर 2008पासूनची 11 वर्षांची प्रतिक्षा संपुष्टात आली आणि बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा चांद्रयानाला घेऊन GSLV MkIII-M1 या अग्निबाणाने श्रीहरीकोटा येथील तळावरून दुपारी 2.43 वाजता अंतराळात यशस्वी उड्डाण केले. उड्डाणानंतर काही काळातच या अग्निबाणाच्या ताकदवान इंजिनांनी चांद्रयान-2ला पृथ्वीभोवतीच्या कक्षेत स्थिर केले. त्यानंतर चांद्रयान-2 पृथ्वीभोवतीच्या कक्षेत फिरत फिरत, ही कक्षा हळूहळू वाढवत ऑगस्ट महिन्यात त्याने चंद्राभोवतीच्या कक्षेत प्रवेश केला. यानंतर चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे 100 कि.मी. उंचीवरून हे यान चंद्राभोवती जवळजवळ एक वर्ष फिरत राहणार आहे.

या मोहिमेतला पुढील महत्त्वाचा टप्पा होता 7 सप्टेंबर 2019 रोजी. या दिवशी या यानातील लँडर विक्रम हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवभागाजवळील दोन विवरे Nanzinus आणि C Simpelius N यांच्यादरम्यानच्या उंच अशा पठारी भागावर उतरवायचे इस्रोचे उद्दिष्ट होते. 6 सप्टेंबर 2019ची रात्र ही भारतीयांसाठी आशेची, स्वप्नांची, अभिमानाची आणि सगळयात महत्त्वाचे म्हणजे एकात्मतेची रात्र होती. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी भारताचे पंतप्रधान इस्रोच्या नियंत्रण कक्षात स्वतः हजर होते. सगळा देश विक्रम लँडरच्या चांद्रपृष्ठभागावर उतरण्याकडे लक्ष ठेवून होता. भारतातील सर्व माध्यमेही इतर बातम्या सोडून या क्षणाचे लाइव्ह वृत्तांकन करत होती. वैज्ञानिक कारणासाठी माध्यमे इतका वेळ देताहेत, असे भारताच्या इतिहासात बहुधा पहिल्यांदीच होत असावे. इस्रोचे प्रमुख के. सीवन यांनी वर्णन केल्याप्रमाणे विक्रम लँडरच्या प्रवासाची शेवटची 15 मिनिटे ही खरेच 15 minutes of terror ठरली. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा असा हा प्रवास होता. विक्रमच्या प्रवासाचा आखीव मार्ग हिरव्या रंगाने नियंत्रण कक्षातील पडद्यावर दिसत होता आणि त्या मार्गानुरूप होणारा विक्रमचा प्रवासही सर्व तंत्रज्ञांसह कोटयवधी भारतीयांना आनंदाचे उधाण देणारा होता. 30 कि.मी. उंचीवरून सुमारे 6000 कि.मी./तास या वेगावरून 150 मीटर/सेकंद म्हणजेच 540 कि.मी./तास या वेगावर विक्रमने येणे अपेक्षित होते. त्यानंतर हा वेग हळूहळू आणखी कमी करून लँडर चांद्रपृष्ठभागावर उतरवायचे होते. याच वेळी लँडरची चार इंजिने बंद करून केवळ एक इंजीन चालू राहणेही अपेक्षित होते. चांद्रपृष्ठभागावरची धूळ इंजिनांमुळे उडून लँडरच्या पॅनल आणि विविध सेन्सरमध्ये जाऊन ते निकामी होऊ नयेत, यासाठी ही काळजी घेण्यात आली. यान उतरण्याच्या नियोजित वेळेआधी 10 मिनिटे ठरल्याप्रमाणे लँडरची पाचही इंजिने चालू करून वेग नियंत्रणात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर ठरल्यावेळी त्यातील चार इंजिने बंद झाली. ह्या सर्व गोष्टी या विक्रम लँडरवरील संगणक नियंत्रित करत होता. पृथ्वीवरील नियंत्रण कक्षाचे त्यावर कोणतेही नियंत्रण नव्हते. घडते आहे ते बघणे आणि निरीक्षण करणे यापलीकडे आपले तंत्रज्ञ काही करू शकत नव्हते. याचदरम्यान लँडरने त्याचा अपेक्षित मार्ग सोडलेले पडद्यावर दिसून आले आणि सगळयांचाच हृदयाचा ठोका चुकला. काहीतरी अनपेक्षित घडते आहे हे जाणवले. तंत्रज्ञांचे चिंताक्रांत चेहेरे सगळे काही सांगत होते.

चांद्रपृष्ठभागापासून 400 मी. अंतरावर असताना लँडरबरोबर असलेला संपर्क पूर्णपणे तुटला. यामागे अनेक कारणे असू शकतात. पहिले म्हणजे वेग नियंत्रित करण्यासाठी जे इंजीन चालू ठेवले, त्याची क्षमता कमी पडली आणि ते यानाचा वेग अपेक्षीत गतीने कमी करू शकले नाही. त्यामुळे लँडर ठरलेली कक्षा सोडून भरकटले. या दरम्यान आणखी एक इंजीन चालू करून लँडरवरील संगणकाने मार्ग सुधारण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पुरेसा ठरला नाही. दुसरे म्हणजे या दरम्यान चंद्राच्या असमान गुरुत्वाकर्षणामुळे, लँडरच्या वेगावर अपेक्षित नियंत्रण मिळवता आले नाही. त्याचबरोबर वेग कमी करण्यासाठी वापरलेल्या इंजिनांपैकी एखाद्या इंजिनात काही त्रुटी (malfunction) निर्माण झाल्या, ज्यामुळे लँडरची दिशा भरकटली. मधला काही काळ लँडर ज्या स्थितीत असणे आवश्यक होते, त्यापेक्षा जास्त कललेले किंवा उलटे झाले असावे असेही चित्र दिसत होते. एकंदरच 11 वर्षांची मेहनत शेवटच्या काही मिनिटांवर अपयशी ठरली. निराश चेहरे, अश्रू आणि देहबोली हेच सांगत होती. पण केवळ संपर्क तुटला होता. लँडरचे नक्की काय झाले आहे याबाबत कोणतीही निश्चित माहिती आलेली नव्हती. 7 तारखेला सकाळी इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी अधिकृत घोषणा करून कळवले की लँडरबरोबर असलेला संपर्क तुटलेला आहे, मात्र लँडरचा शोध चालू आहे. अजूनही आशा संपलेली नाही.

8 तारखेला के. सिवन यांनी परत घोषणा केली की विक्रम लँडर उतरले त्या जागेची आणि लँडरची थर्मल इमेज घेण्यात ऑर्बिटरला यश आले आहे. अतिशय आशादायक आणि आनंदाची अशी ही बातमी होती. मात्र हे लँडर कललेल्या अवस्थेत आहे आणि त्याच्याशी कोणत्याही पध्दतीचा संपर्क होऊ शकत नाहीये. आत्ताच्या स्थितीत लँडर चंद्रावर ठरलेल्या ठिकाणापासून सुमारे 500 मीटर अंतरावर आहे. त्याची काही मोडतोड झाली आहे का? त्यातील रोव्हर प्रग्यान चांद्रपृष्ठभागावर उतरले का? याबाबत कोणतीही माहिती आपणास मिळू शकत नाहीये. प्रग्यान जरी ठरलेल्या प्रोग्रॉामप्रमाणे पृष्ठभागावर उतरून माहिती गोळा करत असेल, तरी आपल्याला कळणार नाही, कारण ही सर्व माहिती विक्रमच्या माध्यमातून आपल्याकडे पाठवण्यात येणार होती आणि विक्रमशी असलेला संपर्क तुटलेला आहे.

विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हरचा कालावधी हा एक चांद्रदिवस, म्हणजेच सुमारे 14 पृथ्वी दिवसांचा होता. यानंतर विक्रम उतरलेला भाग हा सूर्याच्या विरुध्द दिशेला गेल्याने विक्रम आणि प्रग्यानची बॅटरी काम करेनाशी होऊन ते बंद पडणार आहेत. त्यामुळे विक्रमशी संपर्क साधून त्याकडून जास्तीत जास्त माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी आपल्याकडे केवळ काही दिवसांचाच कालावधी आहे. ही आपल्या तंत्रज्ञानाची वेळेशी असलेली स्पर्धा आहे. मात्र विक्रम लँडर चांद्रपृष्ठभागावर नियोजित जागेजवळ उतरले आहे, हे मात्र निश्चित झाले आहे.


याच दरम्यान ऑर्बिटर मात्र त्याचे काम सुरळीतपणे आणि ठरलेल्या वेळापत्रकानुसार पार पाडते आहे. त्याचबरोबर विक्रमशी असलेला संपर्क तुटल्यानंतर अवघ्या काही तासांत ऑर्बिटरने त्याची उतरण्याची जागा आणि थर्मल इमेज मिळवली आहे, जी फार मोठी गोष्ट आहे. आपल्या क्रायोजेनिक इंजीनने जी कमाल केली, त्यामुळे ऑर्बिटरकडे अपेक्षेपेक्षा जास्त इंधन बाकी आहे. त्यामुळे या ऑर्बिटरचा चंद्राभोवती फिरण्याचा 1 वर्षाचा निर्धारित कालावधी वाढून सुमारे 7.5 वर्षे झाला आहे. भारतीय तंत्रज्ञानाला अभिमान वाटावी अशी ही सफलता आहे.

या ऑर्बिटरवरील 8 उपकरणे त्यांच्या पूर्ण क्षमतेने काम करताहेत. पुढील 7 वर्षे त्यांच्याकडून अत्यंत उपयुक्त अशी माहिती सतत आपल्यापर्यंत पोहोचत राहणार आहे. चांद्रपृष्ठभागाचे मॅपिंग, चांद्रपृष्ठभागाच्या खाली पाणी आहे का याचा शोध, खनिजांचे प्रमाण, चंद्राच्या वातावरणाचा आणि त्यातील घटकांचा अभ्यास यासारखी कामे ऑर्बिटरमधली उपकरणे करणार आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा अभ्यास आहे पाण्याचा शोध. चांद्रयान-1ने चांद्रपृष्ठभागाखाली पाणी असावे असे पुरावे दिले होते. चांद्रयान-2च्या ऑर्बिटरवरील उपकरणांद्वारे पृष्ठभागाखाली 10 मीटरपर्यंत पाणी असेल त्याचा शोध घेता येणार आहे आणि आता ऑर्बिटरचा कार्यकाल 7 वर्षांपर्यंत वाढल्याने हा शोध अधिक प्रभावीपणे घेता येईल. त्यामुळे भारतीय चांद्रमोहिमेच्या आशा आता पूर्णपणे ऑर्बिटरवर अवलंबून आहेत.

जरी ही मोहीम अयशस्वी ठरली असली, तरी याने आपल्याला अनेक गोष्टी दिल्या आहेत. पहिल्याच प्रयत्नात लँडर चांद्रपृष्ठभागापासून 2.1 कि.मी. अंतरावर अचूक पोहोचवणारे तंत्रज्ञान आपण विकसित केले आहे. आपण संपूर्ण भारतीय बनावटीचे क्रायोजेनिक इंजीन बनवून त्याचा यशस्वी वापर केला आहे. त्याद्वारे ऑर्बिटरचा कार्यकाल वाढला आहे. जरी विक्रमशी संपर्क होत नसला, तरी विक्रम चांद्रपृष्ठभागावर उतरले आहे हे नक्की. त्यामुळे त्याच्याशी अत्यल्प कालावधीसाठी जर संपर्क झाला, तर चंद्रावर यान उतरवणारा भारत हा चौथा देश ठरेल आणि दक्षिण ध्रुवीय प्रदेशात यान उतरवणारा पहिला देश. ही बाब प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावणारी आहे. या मोहिमेतून आपल्याकडे आलेला डाटा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याद्वारे काय आणि कोठे चुकले, याचे अचून ज्ञान आपल्याला मिळेल. त्यातून बोध घेऊन पुढील मोहिमा - उदा., मंगळयान-2 आणि गगनयान यांच्या वेळी त्याचा उपयोग होणार आहे.

 

समाजमाध्यमांद्वारे 'भारतीय मोहीम पहिल्याच प्रयत्नात 95% यशस्वी. अमेरिका आणि रशियासारख्या महासत्तांच्या पहिल्या अनेक मोहिमा अयशस्वी झाल्यानंतर त्याना यश मिळाले, त्यापेक्षा भारतीय मोहीम आणि तंत्रज्ञान उच्च ठरले' अशा तऱ्हेच्या बातम्या, मिम्स फिरताना दिसत आहेत. इस्रोच्या बातमीपत्रात अथवा निवेदनातदेखील याच दिशेचे वार्तांकन दिसते आहे. मनोधैर्य उंचावण्यासाठी ठीक आहे, मात्र विज्ञानात असे इतके टक्के यशस्वी आणि इतके टक्के अयशस्वी असे नसते. सध्यातरी आपले ऑर्बिटर योग्य काम करते आहे आणि लँडर मोहीम पूर्णतः अयशस्वी आहे, हे आपण मान्य करायला पाहिजे. अमेरिका, रशिया यांनी याने पाठवली ती साठ आणि सत्तरच्या दशकात. त्या काळात आत्ता इतके प्रगत तंत्रज्ञान, संपर्क यंत्रणा, संगणक नव्हते. त्या काळच्या उपलब्ध स्रोत आणि तंत्रज्ञानानुसार त्या मोहिमाही आपल्या मोहिमेइतक्याच यशस्वी होत्या किंवा अयशस्वी होत्या. मात्र मोहीम अयशस्वी झाली आहे हे सत्य अंगीकारून हे देश पुढे गेले आणि त्यांनी इतिहास घडवला आहे. भावनेच्या भरात स्वतःचे कौतुक करण्यासाठी मोहीम अयशस्वी झाली आहे असे ठामपणे म्हणण्याचा उदात्तपणा दाखवला गेला नाही, हेदेखील मान्य करायलाच पाहिजे. कदाचित विक्रमशी संपर्क होऊ शकेल अशी आशा आणखी काही दिवस बाळगता येत असल्यानेही असेल. पण आपल्या तंत्रज्ञांकडून आणि समाजाकडूनही अशा धिटाईची अपेक्षा आहे. विज्ञानात अपयश अपेक्षितच असते. त्यातून कोणत्याही देशाला आजवर पहिल्याच प्रयत्नात चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करता आलेले नाही. त्या मानाने भारताची कामगिरी नक्कीच उजवी आहे.

आता वेळ आहे हा आनंदोत्सव बाजूला ठेवून येणाऱ्या माहितीच्या आधारे विश्लेषणाची. त्यातून काही नवीन शिकण्याची आणि पुढील मोहिमेसाठी तयारी करण्याची. आता वेळ आहे ऑर्बिटरकडून येणाऱ्या माहितीची वाट पाहाण्याची. चंद्र आपल्यासाठी काय सरप्राइजेस देतो आहे ते लवकरच कळेलच. त्याचबरोबर आशा बाळगू या की ऑर्बिटरचा पुढील काही दिवसातच विक्रमशी संपर्क होईल आणि आपण अभिमानाने म्हणू शकू की भारतीय मोहीम 100% यशस्वी झाली.

 

7219259149

 

sarang.2908gmail.com

(खगोल अभ्यासक)

- डायरेक्टर, असीमित अंतराळ आणि पर्यावरण संस्था, पुणे

- प्र.का.अ., मिती एज्युकेशनल फाउंडेशन, पुणे

- डायरेक्टर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका सायन्स सेंटर, पिंपरी चिंचवड