ही दमाची लढाई आहे

स्रोत: विवेक मराठी    दिनांक13-Sep-2019   

जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होऊ नये असे वाटते, असे सारे तथाकथित विचारवंत आणि माध्यमकर्मी आरडाओरड करत आहेत. या गदारोळात सर्वसामान्य भारतीयांनी लक्षात ठेवायला हवे की ही दमाची लढाई आहे आणि लढाई यशस्वी होण्यासाठी मोदी-शाह यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले पाहिजेमानवी स्वातंत्र्याची पायमल्ली करणारी आणि राजकीय विरोधकांना तुरुंगात डांबणारी आणीबाणी इंदिरा गांधी यांनी जाहीर केली, तेव्हा हा वरवंटा किती दिवस सहन करावा लागेल याचा अंदाज कोणालाही येत नव्हता. अशा वेळी आणीबाणीविरुद्ध आवाज बुलंद करणार्या रा.स्व. संघाच्या नेतृत्वाने, म्हणजे बाळासाहेब देवरस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हटले होते, “ही दमाची लढाई आहे. जेे दम टिकवतील, धीराने, नेटाने प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढताना अन्य कोणत्याही टीकाटिप्पणीकडे लक्ष न देता आपल्या ध्येयमार्गावर चालत राहतील, तेच आणि तेच हे आणीबाणीचे आव्हान परतवून लावतील.” आज जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीसाठी ते पुरेपूर लागू आहे असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. गेल्या महिन्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरबाबत धाडसी निर्णय घेतला आणि 370 व 35ए ही कलमे रद्द करताना जम्मू-काश्मीरचे विभाजन करून लडाख हा स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश केला. या सार्या घडामोडीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या प्रदेशात काही निर्बंंध लागू केले गेले. सुरुवातीला काही दिवस संचारबंदी जाहीर करण्यात आली आणि सर्व प्रकारच्या संपर्क माध्यमांवर बंदी घालण्यात आली. 370 कलम हटवल्यानंतर पाकधार्जिण्या मंडळींना आणि फुटीरतावाद्यांना हालचाल करण्यास वाव मिळू नये, हा त्यामागचा उद्देश होता. जोपर्यंत काश्मीर खोर्यातील परिस्थिती सर्वसामान्य होत नाही, तोपर्यंत तेथे निर्बंध लागू राहतीलच. जम्मू-काश्मीरमधील निर्बंध हे तेथील सर्वसामान्य नागरिकांवर लादलेले नसून फुटीरतावादी गटांवर आहेत, हे आधी समजून घेतले पाहिजेत. कारण या फुटीरतावादी गटाचे माध्यमातील समर्थकच आज आरडाओरडा करताना दिसत आहेत. निर्बंधामुळे त्यांच्या नाड्या आवळल्या गेल्या आहेत, हेच या आरडाओरड्यामागचे कारण आहे. मात्र मोदी व शाह हे दोघेही दमदार राजकारणी आहेत, त्यामुळे ते अशा वावदूकांकडे लक्ष देत नाहीत.

370
कलमाबाबत काही निवडक मंडळींची अशी धारणा होती की ते रद्द होणारच नाही. ते रद्द होण्याशीच त्यांच्या अस्तित्वाची जीवनरेषा बांधलेली होती. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात लागू झालेले आणि सत्तर वर्षे अस्तित्वात राहिलेले हे कलम रद्द होताच स्थानिक जनतेनेे त्याचे स्वागत केले, तर काही मंडळींना मात्र याचा धक्का सहन झाला नाही. या अनपेक्षित धक्क्यातून सावरता सावरता त्यांनी मानवी स्वातंत्र्याच्या आणि अधिकाराच्या गावगप्पा मारण्यास सुरुवात केली. काश्मिरात कशी हुकूमशाही सुरू आहे, तेथील स्थानिक जनता कशी नाडली जात आहे याची रसभरीत वर्णने विविध माध्यमांतून प्रकाशित करण्याची शर्यत लागली. यामध्ये विविध चित्रवाहिन्यांचे आणि वृत्तपत्रांचे संपादक जसे सामील होते, तसेच काही तथाकथित पुरोगामी विचारवंतही सहभागी झाले होते. 370 कलम रद्द करून काय उपयोग झाला? काश्मीरमधील सर्वसामान्य जनतेला किती दिवस वेठीस धरणार? संपर्क आणि संवाद माध्यमावरील निर्बंध कधी उठवणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची कोल्हेकुई या मंडळींनी सुरू केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही काश्मीरमध्ये भारत सरकार मानवी अधिकाराचे हनन करत असल्याची आवई उठवण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला. हे सारे करत असताना आपल्या कृतीतून आपण पाकिस्तानची आणि फुटीरतावाद्यांची बाजू घेत आहोत, याचेही भान त्यांना राहिले नाही. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये असणारे निर्बंध तातडीने उठवावेत अशी त्यांची मागणी आहे.


गेली सत्तर वर्षे तात्पुरत्या स्वरूपातील कलम 370 स्वीकारले गेले - नव्हे नव्हे, ते अबाधित राहावे यासाठी पाठराखण करण्याची स्पर्धा लागली आणि आता ते कलम रद्द झाल्यावर तत्काळ सामान्य स्थिती निर्माण झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कोणत्याही गोष्टीच्या विकासाचा नैसर्गिक कालखंड असतो आणि तो द्यावाच लागतो. काश्मीरची स्थिती पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही वेळ द्यावा लागेल आणि त्या वेळेचा दमाने सामना करायला हवा. कोणत्याही दबाव-दहशतीशिवाय काश्मिरी समाजबांधव जीवन जगू शकतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. केंद्र शासन तसे प्रयत्न करत आहे. आपली जबाबदारी पार पाडताना केंद्र शासन कोणत्याही प्रकारची कुचराई करत नाही. मात्र ज्यांना जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होऊ नये असे वाटते, असे सारे तथाकथित विचारवंत आणि माध्यमकर्मी आरडाओरड करत आहेत. या गदारोळात सर्वसामान्य भारतीयांनी लक्षात ठेवायला हवे की ही दमाची लढाई आहे आणि लढाई यशस्वी होण्यासाठी मोदी-शाह यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले पाहिजे.