जिओ गिगा फायबर'डिजिटल भारत' घडण्याच्या दिशेने

विवेक मराठी    14-Sep-2019
Total Views |

व्यापार, मार्केटिंग, सेवा क्षेत्र, होम इंटरनेट यूजर्स अशा सर्वच स्तरांवर आज हाय स्पीड इंटरनेट सुविधा स्वस्त दरात उपलब्ध होणे गरजेचे होते. गिगा फायबरची ही नवीन योजना त्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार असून डिजिटल भारत घडण्याच्या दिशेने अधिक चालना मिळेल. 

 



 

 

1990च्या दशकात इंटरनेटने जगात पदार्पण करायला सुरुवात केली. व्यावहारिक वापरासाठी त्याचा उपयोग सुरू होण्याचा हा कालखंड. त्या वेळी ईमेल ही नवीन आणि क्रांतिकारक बाब होती. एखादा संदेश एका क्लिकवर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यापर्यंत पोहोचणे अत्यंत आश्चर्यकारक मानले जात असे. इंटरनेट जगाने पुढे अनेक नवनवे विक्रम रचले आणि ते आज संपूर्ण जगाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनून गेले आहे. साधारणत: 1990च्या दशकात ऑनलाइन खरेदी, इंटरनेट बँकिंग, पेमेंट गेटवे, मोबाइल कॉम्प्युटिंग इत्यादी आजचे दैनंदिन चलनातील उपक्रम दिवास्वप्न भासत होते. परंतु ते शक्य करता आले विकसित तंत्रज्ञानामुळे आणि सामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या इंटरनेट सुविधेमुळे. 

 

 

इंटरनेट सुविधा कितीही विकसित झाली, तरी जोपर्यंत ती सामान्यांच्या खिशाला परवडणारी होत नाही, तोवर तिची उपयुक्तता आणि वापर खूप मर्यादित ठरतो. 1990च्या दशकात असणारे मोबाइल कॉलिंगचे दर सामान्यांच्या खिशाला अजिबात परवडणारे नव्हते. त्यामुळे मोबाइलचा वापर एका विशिष्ट वर्गापुरता मर्यादित असे. मात्र त्यानंतरच्या काळातील टेलीकॉलिंगचे घटणारे दर हे मोबाइल तंत्रज्ञानाच्या विकासाची नांदी ठरले आणि आजवरच्या मोबाइल तंत्रज्ञान प्रवासाचे आपण साक्षीदार होऊ शकलो. 

 

 

जिओ गिगा फायबर हे काही नवीन तंत्रज्ञान नव्हे, तर इंटरनेट सुविधा पुरवणारी एक योजना आहे. कुणाच्याही मनात हा प्रश्न येऊ शकतो की, एखाद्या खाजगी योजनेची एवढी चर्चा कशाला व्हावी? त्याचे कारण आहे, सामान्य व्यक्तीच्या खिशाला परवडणारी ही हायस्पीड इंटरनेट सुविधा रिलायन्सने उपलब्ध करून दिली आहे. गरज ही शोधाची जननी आहे या म्हणीनुसार, एखादे तंत्रज्ञान तेव्हाच अधिक गतीने विकसित होते, जेव्हा त्याच्या वापरकर्त्यांची संख्या वाढत असते. फायबर ऑप्टिक तंत्रज्ञान तसे जुनेच! हॅथवे, तिकोना, यू ब्रॉडबँड, बीएसएनएल ब्रॉडबँड, एअरटेल व्ही फायबर इत्यादी विक्रेते ही सुविधा अनेक वर्षांपासून बाजारात विकत आहेत. मात्र जिओ गिगा फायबर ही सुविधा तिच्या किमतीमुळे वैशिष्टयपूर्ण ठरते. केवळ 699 रुपयांत 100 मेगाबाइट प्रतिसेकंद इंटरनेट स्पीडची योजना रिलायन्स जिओने भारतीय बाजारपेठेत आणली आहे. त्याला मोफत व्हॉइस कॉलिंग, टीव्ही, व्हिडिओ कॉलिंग, गेमिंग सुविधेची जोड, तसेच डीटीएच ऍप्सदेखील काही महिन्यांसाठी मोफत दिले गेले आहेत. म्हणूनच ही योजना विशेष लोकप्रिय ठरत आहे. 

 

 वैशिष्टये

 

सुरुवातीच्या टप्प्यात रिलायन्स ही योजना एकूण 1600 शहरांत राबविणार आहे. परवडणाऱ्या दरात वेगवान इंटरनेट सुविधा हेच योजनेचे ब्रीद. यानुसार ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्लान देण्यात आले आहेत. किंमत, इंटरनेट गती आणि विविध ऑफर्स यानुसार या प्लानची वर्गवार केली गेली आहे. ब्राँझ, सिल्व्हर, गोल्ड, डायमंड, प्लॅटिनम, टायटॅनियम अशी या वर्गवारीला नावे देण्यात आली आहेत. प्रतिमाह 699 ते 8,499 अशी विविध वर्गवारीची किंमत आहे. तसेच 100 मेगाबाइट प्रतिसेकंद ते 1 गिगाबाईट प्रतिसेकंद अशी वर्गवारीप्रमाणे इंटरनेट गतीची सुविधा ग्राहकांना दिली जाणार आहे. केवळ इंटरनेट सुविधा नव्हे, तर टेलिव्हिजन सुविधा, कॉलिंग सुविधा, गेमिंग, व्हर्चुअल शॉपिंग, व्हॉइस कमांड रिमोट कंट्रोल, 4k सेट टॉप बॉक्स सुविधा - ज्यात विविध व्हिडिओ, ऍप्सचा आणि टेलिव्हिजन चॅनल्सचा संग्रह असेल, त्याचबरोबर गृह संरक्षणाची सुविधादेखील यात देण्यात आली आहे, ज्यात विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्याशी ऍप्स संलग्नित असतील. 

 

 

योजनेचे मूलगामी फायदे आणि परिणाम

 

 

5 सप्टेंबर 2016 रोजी रिलायन्स जिओने मोबाइल रिचार्ज प्लान बाजारपेठेत आणून टेलिकॉम क्षेत्र दणाणून सोडले. अनेक महिने मोफत कॉलिंग आणि प्रतिदिन 1 जीबी इंटरनेट अशी ऑफर देऊन ग्राहकांना मोठया प्रमाणात आकर्षित केले. त्यानंतर इतर कंपन्यांनादेखील 1 जीबी इंटरनेट प्रतिदिन नाइलाजाने का होईना, सुरू करावे लागले. त्यापूर्वी 1 जीबी प्रतिमाह असे प्लान अनेक कंपन्यांनी विकले होते. 2009 साली टाटा-डोकोमोने मोबाइल कॉलिंगसाठी भारतीय बाजारपेठेत प्रथमच 1 पैसा प्रतिसेकंद दर आकारत टेलीकॉलिंग क्षेत्रात क्रांतिकारक निर्णय घेतला होता, तेव्हापासून मोबाइल वापरणाऱ्यांची संख्या मोठया प्रमाणात वाढायला लागली. 


 

 

त्याच मालिकेतील जिओ गिगा फायबरदेखील महत्त्वाची आणि मैलाचा दगड ठरणारी योजना म्हणून बघितली जात आहे. होम इंटरनेट यूजर्सवर व लहान व्यापाऱ्यांवर या योजनेचे मूलगामी परिणाम होतील. कॉर्पोरेट जगतात 'वर्क फ्रॉम होम' (घरून काम करणे) संस्कृती बऱ्यापैकी रुजते आणि वाढते आहे. घरून ऑफिसचे काम करताना लागणारे हायस्पीड इंटरनेट कमी दरात उपलब्ध झाल्यास अनेक गृहिणींना, नव माता-पित्यांना त्याचा उपयोग होईल. गृहोद्योगांनादेखील आज इंटरनेटची निकड भासू लागली आहे, त्यात जिओ गिगा फायबर कमालीची मदत करू शकते. ई-कॉमर्स क्षेत्र आता रिटेल बाजारपेठेकडे वळत आहे. रिटेल बाजारपेठ म्हणजेच छोटे-छोटे व्यापारीदेखील ई-कॉमर्सच्या माध्यमातून आपला माल जगभरात सहज विकू शकतील, त्यासाठी लागणारी इंटरनेट सुविधा जर कमी दरात उपलब्ध होऊ शकेल, तर त्यासदेखील चालना मिळेल.

 

निश्चलीकरणानंतर डिजिटल चलन स्वीकारण्याची पध्दत मोठया प्रमाणात भारतात रुजू झालेली आहे, त्याच्या वाढीसाठीदेखील हायस्पीड इंटरनेट मदत करेल. स्टार्ट-अप्सना रुजायला सुरुवातीच्या काळात कमी पैशात चांगली इंटरनेट सुविधा मोठया प्रमाणात फायद्याची ठरेल. आज अनेक स्टार्ट-अप्स इंटरनेटवर मोठया प्रमाणात अवलंबून असतात. अनेकांचे मार्केटिंग केवळ इंटरनेटवर अवलंबून असते, तेव्हा ही योजना त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

या सगळयाचा विचार केल्यास एका कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कमी दरात चांगली इंटरनेट सुविधा दिल्यामुळे इतर कंपन्यांनादेखील आपले दर घटवावे लागतील आणि त्याचा ग्राहकांना नक्कीच फायदा होईल, परिणामी वापरकर्ते वाढतील. डिजिटल भारत घडण्याच्या या दिशेने गतीला अधिक चालना मिळायला नक्कीच मदत होईल, त्यामुळे जिओ गिगा फायबर योजनेचे महत्त्व अधोरेखित करणे महत्त्वाचे ठरते.

 

kansarahk@gmail.com