डोंबिवली बँकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा आरंभ!

विवेक मराठी    16-Sep-2019
Total Views |

भारतातील अग्रगण्य सहकारी बँकांमध्ये गणना होत असलेल्या डोंबिवली नागरी सहकारी बँकेने नुकताच, दि.6 सप्टेंबर रोजी आपला 49वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा करत, सुवर्णमहोत्सवी वर्षात प्रवेश केला. या वर्धापन दिनानिमित्त राज्यभरातील 15 जिल्ह्यांतील सर्व 69 शाखांमध्ये सुशोभित व प्रसन्न वातावरणात निरनिराळया कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या दिवशी बँकेच्या शाखांनी प्रत्येकी किमान 50 नवीन कुटुंबांशी संपर्क करून, त्यांची खाती उघडण्याचा संकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केला व एकाच दिवशी सुमारे पाच हजार नवीन खाती मिळवण्याचा उच्चांक प्रस्थापित केला.

 

वर्धापन दिनी सर्वदूर, प्रत्येक शाखेला बँकेतील संचालकांनी अथवा पालक अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या व उपस्थित मान्यवरांशी संवाद साधला. कोल्हापूर येथील शाखेत अध्यक्षांच्या हस्ते बँकेच्या नवीन स्वरूपातील आकर्षक वेबसाइटचे उद्धाटन करण्यात आले.

 

बँकेतील सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देऊ केले आहे. वर्धापन दिनाचे औचित्य साधून, इचलकरंजी शाखेत भारतीय मजदूर संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य जयंतराव देशपांडे यांच्या हस्ते 5 लाख रुपयांचा धनादेश रा.स्व. संघ जनकल्याण समितीचे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी राजू मोहिते यांच्याकडे सुपुर्द केला. तसेच इचलकरंजी शाखेतील कर्मचाऱ्यांनी, त्यांना मिळालेल्या पारितोषिकातील 21 हजार रुपयांचा धनादेश रुग्णसेवेचे कार्य करणाऱ्या सेवा भारती या संस्थेकडे सुपुर्द केला. या प्रसंगी रा.स्व. संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भगतरामजी छाबडा, सेवा भारतीचे प्रमुख प्रमोद मिराशी, तसेच बँकेचे अध्यक्ष उदय कर्वे व अनेक मान्यवर ग्राहक व हितचिंतक उपस्थित होते.

वर्धापन दिनानिमित्त निरनिराळया शाखांना तेथील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व उद्योग-व्यवसाय जगतातील अनेक ज्येष्ठ व्यक्तींनी आवर्जून भेटी दिल्या. आमदार संजय केळकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार किसनजी कथोरे आदी मान्यवरांचा यात समावेश होता.

बँकेने सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण वर्षभर व्यावसायिक व सामाजिक आशय असलेल्या अनेक उपक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये बँकिंगपासून अजूनही दूर राहिलेल्या वर्गांना बँकिंगशी जोडत आर्थिक साक्षरता वाढवणे, विद्यार्थ्यांशी संबंधित नवनवीन कार्यक्रमांचे आयोजन करणे, बँकिंग सेवांची फारशी चांगली उपलब्धता नसलेल्या गावांपर्यंत संपर्कविस्तार करणे, छोटया व मध्यम आकाराच्या उद्योगांतील उद्योजकांसाठी मार्गदर्शनपर मेळावे घेणे अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे.

बँकेच्या सर्व शाखांना अनिवासी भारतीयांची खाती उघडण्यासंबंधातील परवानगी प्राप्त झाली आहे.

बँकेकडे महाराष्ट्र राज्यातील व राज्याबाहेरील काही बँकांच्या विलीनीकरणाचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.
डोंबिवली बँकेचे सुमारे एक लाख सभासद असून त्यांना बँकेकडून स्थापनेपासूनच्या सर्व वर्षांत चांगल्या दराने लाभांश दिला जात आहे. 'समाजातील सर्व स्तरांतील लोकांसाठीची त्यांच्या हक्काची बँक' अशी डोंबिवली बँकेची महाराष्ट्रभर ओळख आहे.