'सुयश'ने घडविली कृषी - आर्थिक क्रांती

स्रोत: विवेक मराठी    दिनांक16-Sep-2019   

सुयश चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था गेली 35 वषर्े जनजाती शेतकऱ्यांना/ महिलांना आर्थिक सक्षमता व संपन्नता मिळवून देण्याचे कार्य करत आहे. महाराष्ट्र, राजस्थान, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश व आसाम या राज्यांतील 4500पेक्षा जास्त गावांमध्ये कृषिविकासातून गावे सक्षम व संपन्न करण्यासाठी सुयशचे काम पोहोचले आहे. यातून लाखो कुटुंबे पूर्णपणे सक्षम आणि संपन्न झाली आहेत.

 

जनजाती समूहांना समजून घेऊन, त्यांना विश्वास देऊन, मदतीचा आणि मार्गदर्शनाचा हात देत त्यांना समाजाच्या विकसित प्रवाहात आणण्याचे कार्य सुयश ही संस्था गेल्या अनेक दशकांपासून करीत आहे. सुयशच्या कामामुळे वनवासी पाडयापाडयात प्रगतीच्या नव्या पाऊलवाटा उमटत आहेत. शेतीचा नवा प्रयोग हाती घेऊन जनजाती समूहातील शेतकऱ्यांना नवा मार्ग गवसला आहे.

'सुयश'च्या बांधिलकीचा पाया

गेल्या साडेतीन दशकांपासून शेतकऱ्यांना उन्नतीच्या कामात एका कुशल गवंडयाप्रमाणे योगदान देणाऱ्या 'सुयश' संस्थेचा पाया मोहन व स्मिता घैसास ह्या पुण्यातील उद्योजक कुटुंबाने घातला.

संस्थेच्या स्थापनेची पार्श्वभूमी अशी होती - जनजाती भागात असलेल्या विविध समस्यांचा विचार करून नगर जिल्ह्यातील अकोले येथे वनवासी कल्याण आश्रमाची सुरुवात झाली होती. 1977-78 साली घैसास कुटुंबीयांनी अकोले आश्रमाच्या विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले. समाजप्रवाहापासून दूर असलेल्या या समूहाची दैना त्यांच्या लक्षात आली. या समाजाच्या समस्यांचे निराकरण करायचे असेल, तर त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडविणे आवश्यक होते. त्यासाठी स्वतःच पुढाकार घेऊन मार्गक्रमण करणे गरजेचे होते. या ध्यासातून घैसास यांनी 1980च्या दशकात सुयश चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेची स्थापना केली.

शास्त्रातून कृषिउन्नती

जनजाती समूहातील मुलांना शिक्षणाबरोबरच कृषीतूनच आर्थिक उत्पन्नाचेही शिक्षण दिले गेले, तरच हा समाज मूळ प्रवाहात येऊ शकतो याची संस्थेला खात्री पटली.

संस्थेने पहिल्या दहा वर्षांत कृषीसंबंधी स्वतः माहिती घेऊन काही कार्यपध्दती तयार केल्या. कल्याण आश्रमातील विद्यार्थ्यांना नवीन कृषिपध्दतीचे दोन महिन्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या गावी ते प्रयोग करण्यास प्रवृत्त केले. ह्या विद्यार्थ्यांनी आपापल्या पाडयात, शेतात प्रयोग यशस्वी केला. पुढे हेच विद्यार्थी सुयशचे कृषी कार्यकर्ते बनले. या कार्यकर्त्यांनी सुधारित कृषी आकृतिबंध तयार करून पाडयावरील शेतकऱ्यांचे लक्ष वेधले. खरीप पिकांमध्ये उत्पन्न वाढविणे, नवीन बियाणे, जैविक खते व औषधे यांचा संतुलित वापर करून पिकांचे उत्पन्न दुप्पट करणे असा कार्यक्रम आखून पीक लागवडीत व उत्पादनात बदल घडवून आणला.


 

स्वावलंबनातून संपन्नतेकडे

नगर जिल्ह्यातील अकोल्याच्या डोंगररांगेत ढगेवाडी हा पाडा वसलेला आहे. मोहन घैसास व स्मिता घैसास यांनी या गावांविषयी विकासाच्या दृष्टीने काही योजना आखल्या. सुयशचे ढगेवाडीतील कार्यकर्ते भास्कर पारधी व गावकऱ्यांशी संवाद साधून जलसंधारणाचे महत्त्व पटवून दिले. गावकऱ्यांनी त्यांच्या उत्साहाला प्रतिसाद दिला. लोकसहभागातून पाणी साखळी तयार करण्यात आली. जलसंधारणाचे काम करण्यात आल्यानंतर आजूबाजूच्या विहिरींत पाणीपातळी वाढली. शेतकऱ्यांनी नव्या पीकपध्दतीचा आणि सेंद्रिय शेतीचा अवलंब केला.

शेतकऱ्यांनी टोमॅटोचे अमाप उत्पादन घेतले. टोमॅटोचे भरघोस उत्पादन बघून मोहन घैसास यांनी गावकऱ्यांना टोमॅटोपासून केचप कारखाना काढण्यास प्रोत्साहित केले. हा कारखाना देशातील जनजाती शेतकऱ्यांचा पहिला उद्योग ठरला. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही या उद्योगाची प्रशंसा केली. ढगेवाडीच्या प्रयोगाची वार्ता देशभर पसरली. संस्थेने या कामावर समाधान न मानता नाशिक, रायगड, ठाणे या जिल्ह्यांतील काही पाडयांचा ग्रामविकास घडवून आणला.

पालघरपासून बस्तर, आसामपर्यंत कार्यविस्तार

सुयशने अनेक प्रयोग हाती घेऊन ग्राामविकासाचा गाडा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण या संस्थेचा ओडिशापासून ते राजस्थानपर्यंत, तसेच बस्तरपासून गडचिरोली, चंद्रपूर, पालघर, मुंबई, पुणे, रायगड अशा विविध राज्यांत संस्थेचा विस्तार झाला आहे. सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या सूचनेनुसार विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांच्यासह गत वर्षापासून आसाम प्रांतातील 38 गावांत कामास सुरुवात झाली आहे. सुयशच्या एकूण कार्यक्षेत्रामध्ये 700पर्यंत शाखा सुरू झाल्या आहेत. कल्याण आश्रमाशी बांधिलकी ठेवून हा कार्यविस्तार करण्यात आला.

निःशब्द कृषिक्रांती

2008 साली संस्थेने दोन क्रांतिकारक निर्णय घेतले. पहिला - कृषिविकासासाठी सेंद्रिय पध्दती अवलंबून दोन वर्षांमध्ये जनजाती कुटुंबांच्या स्थितीत परिवर्तन करणे. दुसरा - स्वावलंबन व स्वाभिमान जागवून कोणच्याही मदतीशिवाय ही निःशब्द कृषिक्रांती यशस्वी करणे. ही क्रांती यशस्वी करण्यासाठी दशसूत्री कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.

 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुयशचे 25 पूर्णकालीन कार्यकर्ते व कोणत्याही आर्थिक मानधानाशिवाय प्रत्येक गावात एक असे 4500 प्रशिक्षित कार्यकर्ते काम करीत आहेत.


 

कार्यपध्दती

कोणाच्याही मदतीशिवाय दोन वर्षांत दोन एकर जमिनीवर प्रत्येक परिवाराचे उत्पन्न 15 हजार रुपयांवरून 1 लाखापर्यंत पोहोचविण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. त्यासाठी दर वर्षी नवीन गावांची निवड करून तेथील कार्यकर्त्यांना संस्थेच्या वतीने प्रशिक्षण दिले जाते. सर्व कार्यक्रमाच्या मूल्यमापनासाठी कार्यकर्ते व दहा गावांतून त्यांचा गटनायक अशी जोडणी करण्यात आली आहे.

शेतकरी व महिला बचत गट तयार करून गटामार्फत बीज खरेदी व शेती केली जाते. प्रत्येक महिन्यात कार्यकर्ता व गटनायक यांची बैठक होते. 90 टक्के संपन्न झालेल्या गावांना '' दर्जा देण्यात येतो. 70 ते 90 टक्के संपन्न गावांना '' दर्जा तर 70 टक्के कमी संपन्न झालेल्या गावांना '' दर्जा दिला जातो.

 

सुयशचा दशसूत्री कार्यक्रम

1. बीज ः गटामार्फत बीजखरेदी, सुधरित बियाणे, जुन्या बियाणावर बीजप्रक्रिया

2. सेंद्रिय खत : कंपोस्ट, गांडूळखत व जीवामृत यांचा वापर करून सेंद्रिय कार्बन वाढविणे

3.कीटनियंत्रक ः कीड रोग येण्याच्या अगोदरच सेंद्रिय कीटनियंत्रकाचा वापर करणे. यात दशपर्णीं, गोमूत्र, निंबोळी अर्काचा वापर करणे.

4. जल ः जलसंधारण व जलव्यवस्थापन करून रब्बी उत्पादन वाढविणे, बांबूक्रिट>, e{VVi{, odohar, dZamB©

शेततळे, विहिरी, वनराई बांध निर्मिती करणे.

5. वृक्ष ः पडीक जमिनीवर फळझाडांची व वनवृक्षांची लागवड करणे.

6. गवत ः वनजमिनीत गोखाद्य नेपिअर गवताची लागवड करणे.

7. कृषीशाला : आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शेतीविषयक आवड निर्माण होण्यासाठी कृषी तांत्रिक माहिती देणे.

8. सेंद्रिय प्रमाणीकरण : शेतमालाला चांगला दर मिळावा यासाठी गटांचे प्रमाणीकरण करणे.

9. विक्रीव्यवस्था : गटांच्या माध्यमातून एकत्र येऊन कृषिमाल विक्री गट तयार करून शहराच्या व बाजाराच्या ठिकाणी विक्री करणे.

10. प्रक्रिया उद्योग : शेतीमालाच्या निघणाऱ्या कच्चा मालाचे मूल्यवर्धन करण्यासाठी प्रक्रिया उद्योग निर्माण करणे व यातून गावातच रोजगार निर्मिती करणे.

 
 कृषिक्रांतीच्या पाऊलखुणा

संस्थेच्या कामावर शेतकऱ्यांचा जसा विश्वास वाढत गेला, तशी निःशब्द कृषिक्रांती यशस्वी होत गेली. महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांतील शेतकरी नवीन पीकपध्दतीचा अवलंब करून परिवर्तन करत आहेत. ओडिशा राज्यातील बाटगुडा परिसरातील मुंडापडा गावात 30 शेतकरी कुटुंबे 2011पासून मोठया प्रमाणात हळद लागवड करत आहेत. या परिसरात उत्पादित केलेली हळद एकत्र करून परदेशात निर्यात करण्यात येत आहे. सुयशचे भरत मलिक हे गटनायक म्हणून या परिसरातील गावातही परिवर्तनाची दिशा देत आहेत.

बस्तर जिल्ह्याच्या भानापूर तालुक्यातील नारायणपाल हे छोटेसे गाव आहे. कार्यकर्त्यांनी या गावात बैठक घेऊन शेतकऱ्यांना शेतीचे नवे धडे दिले. अनेक पाडयांत शेतकऱ्यांचे गट तयार करण्यात आले आहेत. या गावामध्ये रब्बीचे पीक घेतले जात नव्हते. 2015मध्ये या गावातील 17 शेतकऱ्यांनी 13 एकर जमिनीत रब्बी पीक घेण्यास सुरुवात केली. जैविक शेतीच्या माध्यमातून टोमॅटो, भेंडी, गवार या भाजीपाल्यासह फूलशेती घेऊन इथला शेतकरी आर्थिकदृष्टया सक्षम झाला आहे. नारायणपाल हे गाव आदर्श गाव बनविण्याचा सुयशचा मानस आहे.

 

''कृषीतून आर्थिक परिवर्तन शक्य'' - मोहन घैसास

केवळ शिक्षण आणि आर्थिक मदत देऊन जनजाती बांधवांचे प्रश्न सुटले नाहीत, ही वस्तुस्थिती लक्षात घ्यावी लागेल. त्यासाठी सर्वांना रोजगार देणेही अशक्य आहे. त्यामुळेच त्यांच्या आर्थिक परिवर्तनासाठी त्यांना कृषीतून आर्थिक परिवर्तन हा एकमेव मार्ग आहे.

जनजाती विकास मंत्रालयाने कृषी शाळेत व वसतिगृहात कृषी प्रयोगांसाठीच्या उपकरणांची सोय करून द्यावी. दहावी/बारावी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना कृषितंत्राचा अभ्यासक्रम शिकविण्याची पूर्तता करावी. इथे शिकलेला तरुण अन्य रोजगारांकडे न वळता स्वतःच्या गावात असे रोजगार उभा करेल. त्याचबरोबर बीपीएल (दारिद्रयरेषेखालील) कार्ड ऐवजी सरकारने 'परिवर्तन कार्ड' काढावे. त्यात संपन्नतेच्या काळामधील कोणत्याही संकटासाठी विमा यासारखी तरतूद असावी. ही तरतूद किमान पाच वर्षांसाठी असावी. त्यानंतर हा समाज अन्य समाजाप्रमाणे ओळखला जावा.

 चिखलदरा तालुक्यातील तेलखार या पाडयात सुयशने 2009-10 साली कामास सुरुवात केली. दशसूत्रीनुसार या गावात खरीपासह रब्बीचे क्षेत्र वाढले आहे. अनेक शेतकऱ्यांनी, महिलांनी शेतीपूरक व्यवसायाची कास धरली आहे.

सुयशच्या कार्यविस्तारातील गावांची संख्या 30 पटींनी वाढली आहे. त्याची आर्थिक उलाढाल 8 कोटीवरून 300 कोटीवर गेली आहे. हे साध्य होण्यासाठी संस्थेला तीन वर्षांचा काळ पुरेसा आहे. त्यात गावातील प्रत्येक परिवाराचे आर्थिक उत्पन्न 1 लाखापर्यंत पोहोचते. दर वर्षी साधारण 8 हजार ते 10 हजार कुटुंबे संपन्न होतात व त्यासाठी संस्थेला 60 लाखापर्यंत खर्च येतो. हा सर्व खर्च घैसास परिवाराच्या व्यवसायातून केला जातो. सामाजिक भावनेतून कित्येक वर्षे हा खर्च चालू आहे. या कामासाठी सुयश ही संस्था कोणत्याही देणग्या स्वीकारत नाही. पण ज्या हिंतचिंतकांना सुयशबरोबर काम करायचे आहे, अशांना एखाद्या विभागाचे पालक किंवा मार्गदर्शक म्हणून काम करण्याची संधी आहे. एकूणच सुयशच्या कार्यामुळे जनजाती भागात विकासाची गंगा अवतरली आहे.

अध्यक्ष, सुयश चॅरिटेबल ट्रस्ट

संपर्क

मोहन घैसास, अध्यक्ष, सुयश चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे

(संध्याकाळी 7 ते 10 वेळेत संपर्क साधावा)

मो.नंः 9822064564

1.बाळासाहेब घोगरे - 09604986333

2. शेखर म्होकर - 9075236012