कार्य संस्कृतीचे प्रतिनिधी

स्रोत: विवेक मराठी    दिनांक16-Sep-2019   

 


कोणत्याही संस्थेत कार्य संस्कृती व व्यक्तींमधले परस्परसंबंध हे काळाच्या ओघात विकसित होत असतात. एका ठिकाणी दीर्घकाळ काम करणं हेच आज इतिहासजमा होत असताना, हे विधान कदाचित हास्यास्पद वाटू शकेल. पण, ते खरं आहे. अनुभवावर आधारित आहे. कोणत्याही आस्थापना वा संस्थेची लिखित नियमावली असते ती कामाच्या वेळा आणि अनुषंगिक गोष्टी सांगते. 'संस्थेतलं वातावरण खेळीमेळीचं, सौहार्दाचं राहण्यासाठी, असा नियम करण्याने तशी वातावरण निर्मिती होत नाही. तर अशी इच्छाशक्ती आणि वर्तन काम करणा-या सर्वांचं असावं लागतं. आमच्या विवेक समूहातील कार्यालयं त्याचं उदाहरण म्हणता येतील. कामानुसार पदांची उतरंड असली तरीही सर्वांमध्ये असलेला परस्परांविषयीचा अकृत्रिम जिव्हाळा आणि संस्थेविषयीची आत्मीयता ही आमची 2 वैशिष्ट्यं आहेत. त्याची प्रचिती आमच्या कोणत्याही कार्यालयात येते. रोजचा 'लंच टाईम' हे त्याचं एक उदाहरण. जेवणाच्या टेबलवर सगळे एकमेकांचे स्नेही असतात. आपलं पद आपापल्या खुर्चीत ठेवून सर्वजण एकत्र आणि एकमेकांच्या डब्यामधलं शेअर करत जेवतात. एखाद्याला कामामुळे थोडा वेळ लागणार असेल तर आपल्या डब्यातला भाजीचा घास त्या स्नेह्यासाठी आवर्जून काढून ठेवला जातो. हे उदाहरण आमच्या कामाविषयी बोलत नसेल पण आमच्या भावनिक गुंतवणुकीविषयी सांगून जातं. ही गुंतवणूक इथल्या प्रत्येकाला आनंदाने आणि मनःपूर्वक काम करायला ऊर्जा पुरवते. याचा अर्थ असा अजिबात नाही की, इथले वरिष्ठ कधी कडक अवतार धारण करत नाहीत किंवा इथले सहकारी परस्परांशी वादच घालत नाहीत. असे प्रसंग क्वचित कधी घडत असले तरी प्रत्येकाच्या मनात 'आपण एक कुटुंब आहोत', ही जाणीव सदैव असते. विवेकमधून अन्यत्र गेलेली मंडळीही आहेत. पण ती जाण्याची कारणं ही नेहमीच better prospets वा नवीन संधी अशी होती. त्यामुळेच त्या सर्वांचेही आजही विवेकशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. हे वातावरण कोणी जाणीवपूर्वक निर्माण केलं नाही. ते तयार होत गेलं. बहुतेक जण हे संघ परिवाराशी संबंधित कोणत्या ना कोणत्या कामाशी जोडलेले होते म्हणूनही असेल. पण ज्यांचा विवेकमध्ये येण्यापूर्वी अशा कोणत्याही कामाशी संबंध नव्हता असेही आहेत जे इथे सहज मिसळून गेले. आजच्या कॉर्पोरेट कल्चरपासून विवेक समूह अद्याप खूप दूर आहे. तो पुढील काळातही तसाच राहील. इथले परस्परसंबंध हे इथे नोकरी करून मिळणा-या भौतिक लाभांच्या पल्याड आहेत. खरं तर तो मुद्दाच कोणासाठी इतका महत्त्वाचा नाही. इथे मिळणारं वेतन हे सर्वसाधारण श्रेणीत मोडणारं आहे. तरीही आनंदात काम करणारी माणसं इथे आहेत. हा विवेकचा मोठा ठेवा आहे.


आमचे सेवक....मदतनीस बंधू हे त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण. सदैव हसतमुख
, मदतीला तयार आणि कामाप्रती यातल्या प्रत्येकाच्या मनात असलेला जिव्हाळा ही या सगळ्यांची वैशिष्ट्यं आहेत. याचीदेखील विवेकमध्ये परंपराच आहे. दुपारी चहाच्या वेळात येणा-या पाहुण्याला 'चहा घेतल्याशिवाय जाऊ नका बरं', असं अगत्यपूर्वक सांगणारे, विवेकच्या आर्थिकदृष्ट्या पडत्या काळातही इथेच थांबून वरिष्ठांची साथसोबत करणारे बाळा हे या सर्वांचे मूळ पुरुष. बहुदा ते आपल्या चांगुलपणाचा आणि आत्मीयतेचा वसा या पुढच्या टीमला देऊन गेले. काही वर्षांपूर्वी मी विवेकसाठी एका ज्येष्ठ अभिनेत्याची मुलाखत घेतली होती. तो अंक त्यांना भेट देण्यासाठी आमचे सेवक नगरकर त्यांच्या घरी गेले. तिथे जाताना कोणीही न सांगता त्यांनी वर्गणीचं पावती पुस्तक ते सोबत घेऊन गेले होते. त्या अभिनेत्याच्या घरी चहापान करून निघताना, अगदी सहजपणे तुम्ही विवेकचे वर्गणीदार असलं पाहिजे, असं नगरकरांनी म्हटलं. त्यांनी होकार दिल्यावर ताबडतोब झोळीतून पावतीपुस्तक काढत त्रैवार्षिक वर्गणीची पावती फाडलीही. अॉफीसमध्ये परतल्यावर त्यांनी अतिशय आनंदाने झाला प्रकार सांगितला. कोणी न सांगताही आपण विवेकसाठी एक वर्गणीदार मिळवला याचा आनंद त्यांना झाला कारण त्यांचं कामावर असलेलं प्रेम. त्यांच्या या कृतीचं त्या अभिनेत्यालाही विशेष कौतुक वाटल्याने त्यांनी आवर्जून फोन करून ही गोष्ट मला सांगितली. दर आठवड्याला विवेकचा अंक प्रकाशित झाल्यानंतर तो पोस्टात पडेपर्यंत आणि सर्व ठिकाणी पोचेपर्यंत या टीमला भरपूर काम असतं. दर आठवड्याला एक रात्र त्यासाठी कार्यालयात थांबावं लागतं. बाहेरगावी पाठवायच्या अंकांची पार्सलं टेंपोत चढवणं, काही गठ्ठे पोस्टात नेऊन टाकणं तर जवळच्या उपनगरातले गठ्ठे लाेकलच्या गर्दीतून त्या त्या जागी वेळेत पोचवणं. तो त्यांच्या कामाचा भाग असला तरी तो उरकायच्या भावनेने केला जात नाही हे विशेष. त्यांचं आपापसात या कामाचं नियोजन आणि न्याय्य वाटप झालेलं असतं. त्यामुळेच ठरलेल्या वेळेत शातंपणे काम पूर्ण झालेलं असतं. दीपक पाडावे, नारायण चव्हाण, यशवंत धुरी, संजय शिगवण आणि अंकीत मिसाळ ही सध्याची सा. विवेकमधली सेवक बंधूंची टीम. वेगवेगळ्या घरातून आलेले, वेगवेगळ्या वयाचे हे सर्व एकाच मुशीत घडल्यासारखे एकदिलाने काम करतात. नियमित कामाबरोबर दिवाळी अंकाच्या वितरणाच्या वेळी आठवडाभर होणारी प्रचंड धावपळ, जागरणं, एखाद्या जाहीर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी करावी लागणारी धावपळ, नंतरची आवराआवर किंवा एखाद्या दिवसभराच्या वा निवासी बैठकीच्या आयोजनातला त्यांचा जाणवण्याइतका महत्त्वााच सहभाग. यातल्या कुठल्याही प्रसंगात यातल्या एकाचाही जुलमाचा रामराम नसतो. त्यांनाही कुटुंब आहे. कुटुंबाशी निगडीत विवंचना आहेत. आर्थिक ओढाताणही होत असेलच. पण यातलं काहीही चेह-यावर दिसू न देता, हसतमुखाने काम करत असतात. विवेक समूहाच्या वार्षिक स्नेहमिलनातही उत्साहाने सहभागी होतात. यशवंत धुरी यांनी अलिकडेच असं ठरवलं की अॉफीसमध्ये असताना जो मोकळा वेळ मिळतो तो सत्कारणी लावायचा. ज्या वर्गणीदारांची वर्गणी संपली आहे अशांशी फोनवरून संपर्क करून त्यांना या गोष्टीचं स्मरण करून द्यायचं. कार्यालयात जाता-येता अशा वर्गणीदारांच्या घरी जाऊन वर्गणी घेऊन यायची. इतकंच नव्हे तर सा. विवेकची वर्गणी घेतानाच त्यांना ज्येष्ठपर्व आणि वैद्यराज या विवेक समूहातल्या नियतकालिकांचीही माहिती द्यायची. त्यासाठीही वर्गणी द्यायला त्यांना प्रवृत्त करायचं. हे त्यांना कोणीही सांगितलेलं काम नाही. हे त्यांनी आपणहून हाती घेतलेलं आहे. बरं याची जाहिरात, वाच्यताही केलेली नाही. माझ्या एका सहका-यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी सांगितलं. गेल्या 2/3 महिन्यात यशवंत धुरींनी विवेकसाठी शंभरहून अधिक वर्गणीदार केले आहेत. हे सर्व करण्याची उर्मी कुठून येते? ही आत्मीय भावाने काम करण्याची प्रेरणा कशातून मिळते? मला वाटतं, ती इथल्या वातावरणातून मिळते. गेल्या 71 वर्षांच्या वाटचालीत विवेकची ही सर्वात मोठी कमाई. प्रखर राष्ट्रीय विचारांची रूजवण समाजात करतानाच, विवेक हा एक परिवार झाला. ही कुटुंब भावना अाजही विवेकची शक्ती आहे. कॉर्पोरेट कल्चरमध्ये वावरतानाही आम्हांला तिची गरज वाटते. किंबहुना आज अधिकच गरज वाटते. काल आमच्या प्रतिनिधी बैठकीत आमच्या या सेवक सहका-यांचं छोटंसं कौतुक केलं. विवेकचे लातूर येथील ज्येष्ठ प्रतिनिधी, निवृत्त मुख्याध्यापक आराध्ये सर यांच्या हस्ते त्यांना विवेकची bag भेट दिली. त्यांच्या विवेकमधल्या योगदानाविषयी गावोगावच्या प्रतिनिधींना थोडक्यात माहिती दिली. या अनौपचारिक कौतुकाने खूश झाले सगळे. स्पष्ट बोलले नाहीत तरी त्यांचा उजळलेला चेहरा, डोळ्यातला आनंद सगळं सांगून गेला. विवेकच्या कार्यसंस्कृतीचे हे प्रतिनिधी.

- अश्विनी मयेकर