श्री शिवराय - Constructive Genius

स्रोत: विवेक मराठी    दिनांक20-Sep-2019

फार पूर्वी, म्हणजे 30-35 वर्षांपूर्वी मुंबई दूरदर्शनवर (जेव्हा A to Z वाहिन्यांचा सुळसुळाट नव्हता) ‘प्रतिभा आणि प्रतिमाहा मुलाखतीचा कार्यक्रम होत असे. महाराष्ट्रातील अनेक नामवंत व्यक्ती त्यात सहभागी होत असत. त्या सर्व व्यक्ती सर्वार्थाने सुप्रसिद्ध होत्या. त्यांना त्या कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी काही एकप्रतिमामिळालेली असे. त्यांच्या त्याप्रतिमाहोण्यासाठी त्यांच्याकडे कायप्रतिभाहोती, ह्याचा ह्या कार्यक्रमातून धांडोळा घेतला जात असे. शिवरायांवरील ह्या लेखमालेतूनस्वराज्यकर्तेह्या त्यांच्याप्रतिमेपेक्षा त्यांची प्रत्यक्षातील सुराज्यकर्ते हीप्रतिभाकिती मोठी होती, ह्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आहे.


Constructive Genius व्हायला एक असामान्य अशीप्रतिभाअसावी लागते. त्याशिवाय हे बिरूद मिळणे कठीण. तसेच Genius हीच मुळात कुठल्याही क्षेत्राची, समाजाची कायमची गरज असते. ह्या मुद्द्याच्या स्पष्टीकरणासाठी आपण भारतातील सर्वाधिक लोकप्रिय अशाक्रिकेटचे उदाहरण घेऊ. सुमारे 35 वर्षांपूर्वी क्रिकेटमध्ये सुनील गावस्करला आपण Cricketing Genius मानत होतो. त्याच्या निवृत्तीनंतर आपण तसाच Genius सचिनमध्ये शोधला त्यानंतर आता विराटमध्ये, विराटनंतरही हा शोध चालूच राहणार आहे. कारण मानवी समाजाचा हा संपणारा शोध आहे. तो अर्थातच विधायक आहे. आत्ताचा किंवा पुढचा Genius शोधताना आधीचे Genius अर्थातच दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरतात. शिवराय हे असेच मार्गदर्शकदीपस्तंभआहेत.

स्वराज्यकर्तेही शिवरायांचीप्रतिमाअसली, तरसुराज्यकर्ते, ही त्यांचीप्रतिभाहोती. ती कशी ते आता पाहू. स्वराज्य + सुशासन = सुराज्य असे साधे समीकरण आहे. तसेच सुराज्याची अंतिम परिणती ही लोककल्याणकारक राज्य अशी असते. ‘स्वराज्यासाठी महाराजांनी केलेल्या लढाया संघर्ष सर्वश्रुत आहेत. पण सुशासन, स्वराज्य, कल्याणकारक राज्य यांबाबत महाराजांनी काय केले, ते आपल्याला बघायचे आहे. सुशासन सुराज्य यासाठी आवश्यक असते उच्च दर्जाचे प्रशासकीय कौशल्य! त्यासाठी उचित धोरणे आणि त्यांची यशस्वी अंमलबजावणी आवश्यक असते, त्याबाबत सुरेंद्रनाथ सेन यांचे मत आपण पूर्वी बघितलेच आहे. आपल्याला शिवचरित्रातून त्याचा प्रत्यंतर पुरावा मिळतो. महाराजांची राजकीय कारकिर्द वय वर्ष 15 ते 51 अशी सुमारे 35 वर्षांची आहे. त्यापैकी सुमारे सात ते सव्वासात वर्षे त्यांनी लढायांचे पूर्वनियोजन, प्रत्यक्ष लढाया, लढायांचे परिणाम निवारणे ह्यात घालवली, पण उरलेली 28 वर्षे त्यांनी प्रशासकीय व्यवस्थापकीय व्यवस्था बसवण्यात त्या कायम करण्यात वा सुधारणा करण्यात व्यतीत केली आहेत. हे प्रमाण साधारणपणे 1:4 असे पडते. या दोन्हीतला फरक बरेच काही सांगून जातो.

 

हे संख्याशास्त्रीय प्रमाण एकूण आयुष्यासाठी आहे, हे स्थूलदर्शन (Macro) आहे. पण सूक्ष्मदर्शन (Micro) काय सांगते? केवळ स्वराज्यविस्तार नव्हे, तर त्या विस्तारित प्रदेशात आपल्या प्रशासकीय व्यवस्था कायम करणे ह्याला महाराजांचे पहिले प्राधान्य असे. कारण प्रशासकीय व्यवस्था हेच सुशासनाचे पहिले पाऊल असते. लोकसुखासाठी लष्करी व्यवस्था किंवा ताकद यापेक्षा चांगले मुलकी प्रशासन कुठेही आणि केव्हाही जास्त उपयुक्त असते. लष्करी कारवाया कायमच प्रासंगिक असतात, पण मुलकी प्रशासन हे रोज चालणारे असते - किंबहुना ते तसेच असावे लागते. याबाबत महाराज काय करीत असत, ते बघण्यासारखे आहे.

 

स्वराज्यम्हणजे केवळ सत्तापालट अशी त्यांची कल्पना नव्हती, तर ह्या सत्तापालटातून संपूर्ण समाजाचा फायदा झाला पाहिजे हीच त्यांची धारणा होती. त्यामुळे जो मुलूखस्वराज्यातआला, त्याचे लवकरसुराज्यातकसे रूपांतर होईल ह्याची ते खटपट करीत. ‘सुराज्यहे चांगल्या मुलकी प्रशासनावर अवलंबून असल्यामुळे स्वराज्याच्या वाटचालीत जे किल्ले, मुलूख जिंकले, त्यांची मुलकी व्यवस्था सुरळीत ठेवणे नंतर ती स्वतःच्या पद्धतीने सुधारणे हाच क्रम त्यांनी ठेवला. नुसती मुलूखगिरी करीत सुटणे असे त्यांनी कधीच केले नाही. हाती आलेल्या मुलखाची नीट व्यवस्था लावण्याशिवाय त्यांनी पुढचे मुलूख काबीज करण्याचा अट्टाहास केला नाही. आपल्याला जेवढ्या मुलखाची नीट व्यवस्था लावता येईल, तेवढाच मुलूख ते सहसा काबीज करत. त्याप्रमाणेच हाती आलेला मुलूख आपल्याच ताब्यात राहावा असेच त्यांचे नियोजन असायचे. उदा., जावळीचा मुलूख जिंकल्यानंतर त्यांनी प्रथम तेथील मुलकी व्यवस्थेची चौकशी केली. कृष्णाजी बाबाजी यास तेथील सुभेदार नेमले, तर विरो राम यास मुजुमदार. या दोघांनीही गणशेट शेट्ये ह्या तिथल्या प्रतिष्ठित गृहस्थास बोलवून आणले आणि त्याला सर्व जुन्या हक्कदारांची माहिती विचारली. कोण कोण हक्कदार आहेत, त्यांना कुठले हक्क आहेत ह्याची माहिती घेऊन ते पूर्ववत चालू ठेवले.

 

ह्या संदर्भात महाराजांचे स्वतःचे उद्गार तर प्रसिद्धच आहेत. ते आपल्या अधिकार्यांना नेहमी सांगत की, “रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. नाहीतर रयतेचा तळतळाट होईल आणि ती म्हणेल की हे कसले स्वराज्य? यापेक्षा मोगल बरे!”

 

परकीयांच्या आणि आपल्या राज्यातील फरक लोकांना/रयतेला तलवारीच्या धारेने नव्हे, तर कार्यक्षम, प्रामाणिक मुलकी कारभारानेच कळेल, ही त्यांची पहिल्यापासूनच धारणा होती आणि त्या अनुरोधानेच ते वागत राहिले.

- डॉ . अजित आपटे