यात्रेची यशस्वी सांगता

विवेक मराठी    20-Sep-2019
Total Views |

महाजनादेश यात्रेने अशा गावांत प्रवास केला, जिथे मुख्यमंत्रीच काय, जिल्ह्याचा पालक मंत्रीसुध्दा यापूर्वी अभावानेच फिरकला असेल. यापैकी अशीही अनेक ठिकाणं होती, जी कधीच भाजपाचे बालेकिल्ले वगैरे नव्हते. तिथे भाजपाचे खासदार-आमदार नव्हते. आता कुठे भाजपा त्या भागांत उभा राहतो आहे, संघटन रुजतं आहे. तरीही, एखाद्या नेत्याची आणि पक्षाची 'क्रेझ' काय असते, लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद काय असतो, हे या यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राने पाहिलं.


गेले काही दिवस महाराष्ट्रभर गाजलेल्या आणि गुरुवारी नाशकात समारोप झालेल्या महाजनादेश यात्रेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यव्यापी नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये झालेली समारोप सभा ही या यात्रेचा परमोच्च बिंदू. या परमोच्च बिंदूवर पंतप्रधानांनी ''देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाला पुन्हा एकदा जनादेश द्या'' असं आवाहन करणं अनेकार्थांनी महत्त्वाचं आहे. पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाची केलेली प्रशंसा आणि पुन्हा एकदा दाखवलेला विश्वास हा फडणवीस यांच्या यशस्वी नेतृत्वाची पोचपावती म्हणावी लागेल. ही प्रशंसा आणि विश्वास अशी सहजासहजी मिळालेली नाही, फडणवीस यांनी आपल्या पाच वर्षांच्या कामातून मिळवली आहे.

महाराष्ट्राने आजवर अनेक यात्रा, दौरे, मोहिमा पाहिल्या. परंतु आजच्या फेसबुक-टि्वटरच्या काळात महाराष्ट्रासारख्या भल्यामोठया राज्याच्या मुख्यमंत्र्याने सलगपणे, अविश्रांत प्रवास करत राज्याचा कानाकोपरा पालथा घालावा, ही बाब ऐतिहासिक ठरते. अमरावतीतून ही 'महाजनादेश यात्रा' सुरू झाली. पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांनी विदर्भ पालथा घातला. ठिकठिकाणी लहान-मोठया गावांत स्वागत सभा, रोड शो आणि जिल्ह्यातील प्रमुख शहरांत सभा आणि पत्रकार परिषदा अशा भरगच्च कार्यक्रमातून फडणवीस यांनी राज्याच्या जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या टप्प्यात मराठवाडा आणि तिसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र व कोकण असा प्रवास या यात्रेने केला. या सर्व प्रवासात मुख्यमंत्र्यांनी भाजपाच्या उत्साही कार्यकर्त्यांच्या भावविश्वाला साद घालण्याचाही प्रयत्न केला. छोटया-छोटया गावांत मुख्यमंत्री येणार म्हणून कार्यकर्त्यांनी चौकाचौकात स्टेज उभं कर, स्वागताचे फलक लाव, मुख्यमंत्र्यांना भेट देण्यासाठी त्या-त्या भागाचं वैशिष्टयं सांगणारी काही प्रतीकात्मक वस्तू आण, अमुक वजनाचा फुलांचा हार तयार कर अशा असंख्य गोष्टी प्रेमाने केल्या. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांनी यापैकी कोणाचाच हिरमोड न करता सर्वांचं स्वागत केलं, सर्वांना शक्य तितका वेळ दिला. आपल्या पक्षाचा राज्यातला पहिला मुख्यमंत्री आपल्या गावात येतो, आपल्या हातून हार-तुरे स्वीकारतो, कार्यकर्त्यांशी हस्तांदोलन करतो, या गोष्टींचं महत्त्व कार्यकर्त्यांच्या भावविश्वात अनन्यसाधारण असतं. इतक्या प्रचंड व्यग्र कार्यक्रमातही मुख्यमंत्र्यांनी या भावनांची जाणीव ठेवत त्यांना वाट मोकळी करून दिली आणि हीच बाब देवेंद्र फडणवीस यांचं राज्यव्यापी नेतृत्व अधिक ठसठशीतपणे अधोरेखित करणारी ठरते.

 

या महाजनादेश यात्रेने अशा गावांत प्रवास केला, जिथे मुख्यमंत्रीच काय, जिल्ह्याचा पालक मंत्रीसुध्दा यापूर्वी अभावानेच फिरकला असेल. यापैकी अशीही अनेक ठिकाणं होती, जी कधीच भाजपाचे बालेकिल्ले वगैरे नव्हते. तिथे भाजपाचे खासदार-आमदार नव्हते. आता कुठे भाजपा त्या भागांत उभा राहतो आहे, संघटन रुजतं आहे. तरीही, एखाद्या नेत्याची आणि पक्षाची 'क्रेझ' काय असते, लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद काय असतो, हे या यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राने पाहिलं.

 

बारामतीसारख्या ठिकाणी झालेली प्रचंड सभा पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण आता कोणत्या दिशेने जाईल, हेच दाखवून देणारी. तिसऱ्या टप्प्यातील अखेरच्या प्रवासात - म्हणजे कोल्हापूर-राधानगरी-फोंडा घाटमार्गे कणकवली, तिथून राजापूर-आडिवरे-पावसमार्गे रत्नागिरी असा प्रवास मुख्यमंत्र्यांनी केला. सकाळी मुख्यमंत्री 'मराठवाडा मुक्तिदिन कार्यक्रमा'साठी औरंगाबादला गेल्याने यात्रेची सुरुवातच तासभर उशिराने झाली. पुढे कोल्हापुरातून बाहेर पडून ठिकठिकाणी लहान-मोठया गावांत लोकांचं स्वागत स्वीकारत राधानगरीत पोहोचेपर्यंत हा उशीर आणखी वाढला. पुढे अवघड अशा फोंडा घाटातून यात्रेचा ताफा कोकणात उतरेपर्यंत आणखी उशीर झाला. कणकवलीत मुख्यमंत्री पोहोचले, तेव्हा दोनेक तास उशीर होऊनही, कोकणातल्या त्या मुसळधार पावसाळी वातावरणातही सभेचं ठिकाण खचाखच भरलेलं होतं. हीच गोष्ट रत्नागिरीतही घडली. आणि हीच गोष्ट आख्ख्या महाराष्ट्रातही घडली. तीन-तीन तास उशीर, पाऊस वगैरे कशाचीही पर्वा न करता केवळ मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सर्वसामान्य लोक ताटकळत तरीही उत्साहात उभे राहतात, ही बाब महाराष्ट्रात एक नवी लाट जन्म घेत असल्याचंच प्रतीक म्हणावं लागेल.

 महाराष्ट्राला या लाटेवर स्वार व्हायचं आहे आणि या लाटेत लहान-मोठे, जुने-नवे वगैरे सर्व विरोधक साफ वाहून जाणार आहेत, यावर शिक्कामोर्तब केलं ते पंतप्रधानांच्या नाशिकमधील भाषणाने. म्हणूनच, राज्याच्या राजकीय इतिहासात ठळकपणे नोंद होईल अशा या महाजनादेश यात्रेची ही यशस्वी सांगता राज्याची आगामी वाटचाल पुरेशी स्पष्ट करणारी आहे, असं म्हणायला हरकत नाही.