उद्देश 'Save Aarey' चा छद्मी प्रचार

विवेक मराठी    20-Sep-2019
Total Views |

***शैलेश राजपूत***

मेट्रो-3च्या कारशेडविरुद्ध उभे केलेले आंदोलन म्हणजे ख्रिस्ती मिशनरी, बाह्य निधीवर पोसल्या गेलेल्या स्वयंसेवी संस्था आणि विकासविरोधी समाजकंटक यांनी मीडियाला हाताशी घेऊन आणि सोशल मीडियाद्वारे भ्रम आणि छद्म पसरवून, लोकांची दिशाभूल करून उभे केलेले एक भीषण कारस्थान असल्याचे लक्षात येत आहे.



आरे दुग्धवसाहतीत होत असलेल्या मेट्रो-
3च्या कारशेडला विरोध करण्यासाठी 2014 साली ‘Save Aarey’ ही चळवळ सुरू झाली. वरकरणी पर्यावरणरक्षण असा या चळवळीचा उद्देश वाटत असला, तरी यांची एकूण कार्यप्रणाली संशय निर्माण करणारी आहे.

आरे वाचवाअसं म्हणत असताना या लोकांना 1,287 हेक्टरमध्ये पसरलेल्या आरे दुग्धवसाहतीचे कोणतेच प्रश्न दिसत नसून यांचा मुद्दा फक्त 30 हेक्टर जमिनीवर बांधल्या जाणार्‍या कारशेडच्या जागेपुरताच मर्यादित आहे.
एकूणच आरे दुग्धवसाहतीचा इतिहास पाहता 1949 साली सरकारने ही जमीन दुग्धप्रकल्पासाठी अधिग्रहित केली. 1951 साली स्वतः जवाहरलाल नेहरू यांनी येथे आशियातील पहिली दुग्धशाळा स्थापन केली. या भागात म्हशींचे व गायींचे 32 गोठे आहेत. यातील जनावरांसाठी 160 हेक्टर जमिनीवर कुरणांची लागवड होते. 1990च्या दशकापर्यंत मुंबई शहराला आरे दुग्धयोजनेद्वारे दूधपुरवठा होत होता.

देशाच्या दुधउत्पादन धोरणात 1991 ते 2002मध्ये झालेल्या बदलानुसार सुरुवातीला शासकीय आस्थापनांकडे असलेले दुग्धउत्पादन क्षेत्र हळूहळू सहकार आणि खाजगी क्षेत्राकडे वळवण्यात आले. त्यामुळे 1997नंतर वारणा आणि गोकुळ या कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी दूध संघांनी बृहन्मुंबई परिसरात दूधपुरवठा करण्यास सुरुवात केली. दुग्धव्यवसायातील एकूणच बदललेल्या धोरणामुळे आरे दुग्धवसाहतीतील शासकीय दुग्धव्यवसाय बंद झालेला आहे.
सरकारी जागेत असलेले येथील 32 गोठे आता आपल्या दुधाचा खाजगी व्यवसाय करत आहेत. म्हणूनच ऑगस्ट 2016मध्ये महाराष्ट्राचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी या गोठ्यातील 25 टक्के दूध सरकारकडे जमा करण्याची मागणी केल्याची बातमी होती.



एकूणच सरकारी जमीन असलेल्या या आरे दुग्धवसाहतीत आता सरकारी दुग्धव्यवसाय होत नसल्यामुळे गेल्या दोन दशकांत आरे वसाहतीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत व होत आहेत. यात प्रामुख्याने झोपड्या
, छोटी-मोठी देवळे, मांत्रिक-बाबा यांचे अड्डे अशा विविध गोष्टी वसत आहेत. गोरेगाव व आसपासच्या परिसरातील विविध मंडळी आरे कॉलनीत पावसाळ्यात वृक्षारोपणाचे कार्यक्रम करत असतात. यानंतर काही समाजकंटकांकडून ही रोपे नष्ट करण्याचेही प्रकार वारंवार घडत असतात.

1,287 हेक्टरमध्ये वसलेल्या हिरव्यागार आरे दुग्धवसाहतीत होणार्‍या अशा कोणत्याच दुष्कृत्याबद्दल या Save Aarey campaignला सोयरसुतक नाही. या आंदोलनाला जन्म कारशेडला विरोध करण्यासाठी झाला आहे आणि याची व्याप्तीही कारशेडच्या विरोधापुरतीच आहे.

संशयास्पद कार्यपद्धती

या आंदोलनाची एकूणच कार्यपद्धती संशयास्पद आहे. सोशल मीडियाद्वारे आंदोलन पेटवणे, खोट्या गोष्टींचा वारंवार प्रचार करणे - उदाहरणार्थ, आरे हे 1949पासून दुग्धप्रकल्प म्हणून संरक्षित असूनही आरे जंगलअसा त्याचा हेतुपुरस्सर वारंवार उच्चार करून लोकांना संभ्रमित करणे याबरोबरच कारशेडच्या निर्मितीत 2700 झाडे तोडली जात असल्यामुळे यावर पद्धतशीररीत्या लोकांच्या - विशेषतः तरुणांच्या भावना भडकण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मेट्रो प्राधिकरण पर्यावरणविषयक विविध प्रश्नांवर वारंवार उत्तरे देत असूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष हे यांचाच अजेंडा राबवत आहेत.

आंदोलनाच्या आयोजनात अग्रणी असलेल्या काही संस्था - उदा., ‘वनशक्तीनावाची NGO यांचा इतिहासच असा आहे की त्यांनी आरेप्रमाणेच इतरही ठिकाणीही विविध विकासकामांना विरोध केला आहे आणि ही कामे बंद पाडण्यासाठी प्रयत्न केले आहेत.



वांद्य्राच्या सेंट पीटर्स चर्चमध्ये मेट्रो कारशेडविरुद्ध लोकांच्या स्वाक्षर्‍यांची मोहीम राबवण्यात आली. वांद्य्रातील सेंट स्टॅनिस्लॉस या शाळेने मुलांना घरोघरी जाऊन लोकांना या मेट्रो कारशेडविरुद्ध स्वाक्षर्‍या करायला लावल्या. सेंट झेवियर्सच्या विद्यार्थ्यांचा व काही प्राध्यापकांचाही या आंदोलनात सक्रिय सहभाग आहे. या सगळ्या गोष्टींकडे डोळसपणे पाहिले असता या आंदोलनात असलेला ख्रिस्ती मिशनर्‍यांचा हात लक्षात येतो आहे. त्यामुळेच काही ठरावीक प्रसारमाध्यमे सुरुवातीपासून या आंदोलनाला आपल्या वृत्तपत्रांत गरजेपेक्षा जास्त स्थान देत आहेत. शे-दोनशे लोकांच्या गर्दीला वारंवार पानेच्या पाने भरून नियोजनबद्ध प्रसिद्धी देत आहेत.
एकूणच मेट्रो-3च्या कारशेडविरुद्ध उभे केलेले आंदोलन म्हणजे ख्रिस्ती मिशनरी, बाह्य निधीवर पोसल्या गेलेल्या स्वयंसेवी संस्था आणि विकासविरोधी समाजकंटक यांनी मीडियाला हाताशी घेऊन आणि सोशल मीडियाद्वारे भ्रम आणि छद्म पसरवून, लोकांची दिशाभूल करून उभे केलेले एक भीषण कारस्थान असल्याचे लक्षात येत आहे. सामान्य मुंबईकर या कारस्थानाला आणि छद्मी प्रचाराला बळी पडून स्वतःच्या जीवनवाहिनीच्या विरोधात उभा राहतो आहे.
 
9773301292