मलाबी भाजपात येऊ द्या की रं!

विवेक मराठी    20-Sep-2019
Total Views |

सध्या आणि गेल्या पाच वर्षांत ज्या गतीने विरोधी पक्षांतील एकेक नेते भाजपाच्या वळचणीला येत आहेत, ते पाहता खरंच एक-दोन वर्षांनी राष्ट्रवादीसारख्या पक्षात शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार एवढेच लोक उरतील अशी चिन्हं आहेत. जो-तो कमळ घेऊन मलाही भाजपाच्या जत्रेत येऊ द्याअसंच म्हणतोय.



राधाकृष्ण विखे-पाटील, सुजय विखे-पाटील, हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, मधुकर पिचड, वैभव पिचड, गणेश नाईक, संदीप नाईक, कालिदास कोळंबकर, चित्रा वाघ, डॉ. भारती पवार, निरंजन डावखरे, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, राणा जगजितसिंह पाटील, धनंजय महाडीक, निर्मला गावीत, जयकुमार गोरे, प्रसाद लाड, प्रशांत ठाकूर, प्रवीण दरेकर... गेल्या पाच वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपामध्ये आलेल्या नेत्यांची, माजी मंत्री, आजी-माजी खासदार-आमदारांची, नगरसेवकांची यादी याहून बरीच मोठी आहे. संपूर्ण लिहायची झाली, तर साप्ताहिकाची दोन पानंही कमी पडतील. 2014पासून या पक्षांतरांची सुरुवात झाली. 2014 विधानसभा निवडणुकीनंतर 2019 लोकसभा निवडणुकीपर्यंत अशी असंख्य पक्षांतरं झाली आणि लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना याचा तिसरा टप्पा सुरू आहे. भाजपामध्ये होत असलेल्या या घाऊक पक्षप्रवेशांबद्दल आजवर बरंच लिहिलं गेलं आहे. समाजमाध्यमांत डोकावलं, तर या विषयाचं प्रतिबिंब तिथेही मोठ्या प्रमाणात उमटलेलं आढळून येईल. असंख्य विनोदांचा, मिम्सचा, सटायर्सचा रतीब फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप व अन्य माध्यमांतून पडताना आढळेल. झंप्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एका खोलीत चर्चा करताना दिसले. त्यांच्यासोबत हर्षवर्धन पाटील, उदयनराजे भोसले, रामराजे नाईक-निंबाळकर, राणा जगजितसिंह, भास्कर जाधव आदी मंडळी दिसली. झंप्याने खोलीबाहेर येऊन बोभाटा करण्यास सुरुवात केली की, फडणवीस आणि ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत!दुसरा एक असाच किस्सा म्हणजे, ‘राष्ट्रवादीच्या कार्यालयात म्हणे चक्क पाटीच लावल्ये, जो कोणी शेवटी शिल्लक राहील, त्याने पंखे, दिवे वगैरे बंद करून, कार्यालयाला टाळे लावून किल्ल्या साहेबांकडे नेऊन देणे!आणखी एक मजेशीर विनोद म्हणजे, ‘भाजपाचे काही दिवसांनी दोन गटांत विभाजन होणार आहे. एक म्हणजे भाजपा खुर्द (मूळ भाजपेा) आणि भाजपा बुद्रुक (आणि पक्षांतून आलेले). बुद्रुकमध्येही दोन भाग असतील, वरची आळी (राष्ट्रवादी) आणि खालची आळी (काँग्रेस)!!

विनोदाचा भाग जरा बाजूला ठेवू. परंतु सध्या आणि गेल्या पाच वर्षांत ज्या गतीने विरोधी पक्षांतील एकेक नेते भाजपाच्या वळचणीला येत आहेत, ते पाहता खरंच एक-दोन वर्षांनी राष्ट्रवादीसारख्या पक्षात शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार एवढेच लोक उरतील, अशी चिन्हं आहेत. (त्यातही अजित पवार वेगळा गट स्थापन करणार असल्याची व्हॉट्स अ‍ॅपवर चर्चा आहे!). नेते-कार्यकर्त्यांची पक्षांतरं राजकरणात नवी नाहीत. भाजपा सरकार येण्यापूर्वीही गेली अनेक दशकं कोणत्याही निवडणुका जवळ आल्या की त्यात एका पक्षाचं तिकीट न मिळालेले इच्छुक वगैरे कार्यकर्ते नाराज होऊन दुसर्‍या पक्षांत उडी घेत असतातच. नेत्यांची फोडाफोडीहोत असते. त्यामुळे ही बाब काही नवी नाही. फरक इतकाच की, पूर्वी ही प्रक्रिया बर्‍यापैकी दुहेरी होती. म्हणजे, काँग्रेस-राष्ट्रवादीतदेखील नेते प्रवेश करत होते, तिकीट मिळवून जिंकून येत होते. किंबहुना राष्ट्रवादीसारखे पक्ष फोडफोडीतूनच तर निर्माण झालेले आहेत. आता ही प्रक्रिया पूर्णपणे एकेरी झाली आहे. म्हणजेच, नेते केवळ भाजपामध्ये जात आहेत, भाजपामध्ये जागा नसल्यास शिवसेनेत जात आहेत. रोजचं वर्तमानपत्र पाहिल्यास मुख्य पानावर कुणा ना कुणा मोठ्या नेत्याची भाजपाप्रवेशाची बातमी असते आणि आतील प्रादेशिक पानांवर तालुका, गाव पातळीवर तिथल्या स्थानिक नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भाजपाप्रवेशाच्या बातम्या असतात. थोडक्यात, पूर्वी आयाराम-गयारामअसत, आता फक्त आयारामदिसताहेत. या मेगाभरतीबाबत दोन्ही बाजूंनी मतमतांतरं व्यक्त होत आहेत. बाहेरून आलेल्या मंडळींमुळे पक्षाचं काय होणार, भाजपाची काँग्रेस होईल का, ज्यांच्या विरोधात आजवर भूमिका घेतली त्यांच्याच बाजूला कसं बसायचं, जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार... वगैरे अनेक प्रकारची चिंता सध्या मोठ्या प्रमाणावर व्यक्त केली जात आहे. संघपरिवारात या विषयावर मोठ्या प्रमाणात चिंता असल्याचं म्हटलं जातं. अनेकदा, संघ-भाजपाच्या कार्यकर्त्यांपेक्षा जे कट्टर संघ-भाजपा विरोधक आहेत, त्यांनाच भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांची चिंता अधिक लागलेली दिसते. त्यामुळे, ही चिंता आणि त्यातून येणारे आक्षेप हे भावनिक किती आणि वास्तविक किती, हे विविध कसोट्यांवर तपासून पाहायला हवं.

पूर्वीचा जनसंघ आणि आताचा भाजपा महाराष्ट्रात गेली सहा-सात दशकं सक्रिय आहे. परंतु या संघटनेला राजकीय पक्ष गांभीर्याने घेण्यास सुरुवात होऊन फारतर चार दशकं झाली असतील. राज्यातील दोन-तीन जिल्हे आणि त्यातील काही भाग वा मतदारसंघ वगळता उर्वरित बहुतांश ठिकाणी या भाजपावाल्यांची अनामत रक्कम तरी यंदा वाचेल का?’ अशाच स्वरूपाच्या चर्चा असत, असं जुनी मंडळी सांगतात. पुढे ऐंशीच्या दशकात ही परिस्थिती थोडीफार बदलू लागली आणि नव्वदच्या दशकात हा पक्ष राज्यात शिवसेनेबरोबरच्या युतीच्या माध्यमातून पहिल्यांदा सत्तेत आला. वसंतराव भागवत, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासह अनेकांचे अपार कष्ट यास करणीभूत होते. तथापि त्यानंतरही, युतीत लहान भाऊवगैरे म्हणवलं जाणं, त्यातून वाट्याला जागा कमी येणं आणि काँग्रेस, नंतर राष्ट्रवादी आदींची राज्याच्या राजकरणावरील पकड यामुळे 1999पासून अगदी 2014पर्यंत राज्यातील चार प्रमुख पक्षांतील चौथ्या क्रमांकाचा मोठा पक्ष अशीच भाजपाची प्रतिमा राहिली. निवडणुकांतील कामगिरी, मतदनाची टक्केवारी वगैरे गोष्टी बदलतं चित्र दाखवत होत्या, परंतु तरीही ही प्रतिमा कायम राहिली होती. 2014मध्ये नरेंद्र मोदींच्या उदयानंतर हे चित्र साफ बदललं. मोदींच्या उदयाला लाटका म्हटलं जातं, ते यावरून कळतं. नुसतं बहुमत मिळालं नाही, तर जुनंपुराणं सगळं साफ वाहून गेलं, राजकारणाचे संदर्भ पार बदलले, नव्या व्याख्या-परिभाषा प्रस्थापित झाल्या. मुख्य म्हणजे भाजपा हा आणि केवळ हाच क्रमांक एकचा पक्ष बनला, स्थिरावला. या परिवर्तनाला जेमतेम पाचच वर्षं झाली आहेत. सहा-सात दशकं विरोधी पक्षांत बसल्यानंतर (केंद्रातील वाजपेयी सरकारचा आणि राज्यातील युती सरकारचा अपवाद वगळता) आता भाजपा अचानक प्रमुख सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेत आला आहे. ही भूमिका पुढची किमान दहा वर्षं तरी नक्कीच निभावावी लागेल, अशीच सध्या चिन्हं आहेत. पक्षाचे नेते-कार्यकर्ते आता मंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक वगैरे झाले असले, तरी याचा अर्थ सत्तेचा वाटा सर्वच कार्यकर्त्यांना मिळाला असं होत नाही. तो सर्वांना मिळणं शक्यही नसतं. पन्नास-शंभर कार्यकर्त्यांतील कुणीतरी एक नगरसेवक होतो, अनेक नगरसेवकांतून कुणी एक महापौर-नगराध्यक्ष होतो, पाचशे-हजार कार्यकर्त्यांतून कुणी एक आमदार होतो, अनेक आमदारांतून कुणी एक मंत्री, मुख्यमंत्री होतो. कार्यकर्त्यांच्या पायावर सत्तेचा आणि सत्ताधार्‍यांचा स्तंभ उभा राहतो. भाजपाच्या बाबतीत तर फुलटाइमआणि सीझन्डसत्ताधारी बनून जेमतेम पाच वर्षं झालेली आहेत, त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांचं काय होणार आणि उपर्‍यांना संधी मिळणार का? हा प्रश्न एखाद्या वर्तुळातून विचारला जातो, तेव्हा त्यामागे हे सारे संदर्भ असतात. भाजपामध्ये आणि पक्षांतून येत असलेल्या नेत्यांपैकी अनेक जण त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यांतील प्रभावी नेते आहेत. अनेकजण दोन-तीन दशकांपासून त्या जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व ठेवून आहेत. या नेत्यांच्या आणि ते ज्या पक्षात होते त्या पक्षाच्या विरोधात आजवर भाजपा लढत आला. त्यामुळे अचानक त्या नेत्याला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आपला पक्षातील सहकारी कसं काय म्हणायचं, असाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो.


भाजपा राज्यातील प्रमुख पक्ष झाला असला, तरी राज्यात अनेक भाग, मतदारसंघ असे होते, जिथे भाजपाला आपले उमेदवार निवडून आणता आले नव्हते. तेथील राजकारणात आपलं अस्तित्व निर्माण करता आलं नव्हतं. कधी भाजपाला तिथे सक्षम चेहरा मिळाला नाही किंवा कधी तिथे अन्य पक्ष आणि नेते इतके प्रबळ होते की इतरांना काही संधीच उपलब्ध नव्हती. अगदी 2014नंतरही अनेक ठिकाणी अशी परिस्थिती होती - उदा., नवी मुंबई. याचा अर्थ इथे भाजपाकडे कार्यकर्ते नव्हते किंवा जे होते त्यांनी काही कष्ट केले नाहीत असं मुळीच नाही. फक्त, माणसं निवडून येऊ शकत नव्हती. त्यामुळे पक्षाचा जमेल त्या मार्गाने विस्तार करण्यासाठी भाजपा नेतृत्वाने अन्य पक्षांतील प्रभावी नेत्यांना आपल्या गोटात घेण्याचा मार्ग अवलंबला. स्थानिक पातळीवर वर्षानुवर्षं सत्तेत राहिलेली माणसं उगाचच तिथे राहत नाहीत. वर्षांनुवर्षांचा जनसंपर्क आणि जनसंग्रह, कार्यकर्त्यांना सत्तेचा काही ना काही वाटा देणं, लोकांच्या लहानसहान गोष्टींमध्ये त्यांना मदत करणं, त्यांच्या आनंदाच्या-सुखदुःखाच्या प्रसंगी त्यांच्यामध्ये सहभागी होणं, लोकांच्या ज्या गोष्टी प्रशासनातून सहज होत नाहीत, त्या करवून घेणं, त्यासाठी वशिला इ. लावणं, हे सारं ही नेतेमंडळी करत असतात. स्थानिक राजकारण चालवण्यासाठी पदरी बक्कळ पैसा असावा लागतो. या ना त्या मार्गांनी या मंडळींनी तो पैसा मिळवलेला असतो आणि ते तो मुक्तहस्ते खर्चही करत असतात. यातील अनेकांवर भ्रष्टाचाराचे, गुन्हेगारीचे आरोपही असतात. परंतु त्यांच्या प्रभावक्षेत्रातील कार्यकर्ते व मतदारांना हे आरोप फारसे महत्त्वाचे वाटत नाहीत, त्यांना त्यांची स्थानिक वा वैयक्तिक कामं होणं अधिक प्राधान्याचं वाटतं. संघटनेच्या शिस्तीत वाढलेल्या, त्या संघटनात्मक कार्याच्या भावविश्वात गुंतलेल्या कार्यकर्त्यांना अनेकदा ही स्थानिक राजकारणाची इकोसिस्टिमसमजून घेणं अवघड वा जड जातं. राज्यपातळीवर नारायण राणे, अजित पवार, छगन भुजबळ वगैरे मंडळी उदाहरणादाखल घेता येतील. यांच्यावर आरोप, खटले वगैरे कितीही असले, तरी यांची कार्यक्षमता, सत्तेत असतानाची प्रशासनावरील पकड, विषयांचा आवाका या बाबतीत मात्र शंका उपस्थित करता येणार नाही. अशी अनेक माणसं जिल्हा, तालुका, गाव स्तरावर कार्यरत असतात. काँग्रेस हा आतापर्यंत या इकोसिस्टिममधील नैसर्गिक पक्ष होता. आता तो भाजपा बनला असल्याने या सर्व स्तरांतील नेत्यांचा लोंढा सध्या भाजपाकडे आहे. तो इतका प्रचंड आहे की, या गतीने काँग्रेस-राष्ट्रवादी पूर्ण रिकामी होऊन जाईल, असंच चित्र आहे. या वेळी कोणत्याही स्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नेस्तनाबूत करायचंच, असा चंग बांधलेल्या भाजपा नेतृत्वाने त्यामुळे अशा सर्व भाजपा प्रवेशोत्सुक नेत्यांना काही ठरावीक फिल्टर्स लावून पक्षात घेण्याचं धोरण आखलं आहे आणि जिथे जिथे भाजपा कमकुवत आहे किंवा पक्षाचा हवा तसा विस्तार झालेला नाही, तिथे या नेत्यांचा भाजपाला मोठा फायदा होणार आहे. परंतु यामध्ये एक धोका उद्भवू शकतो, ज्याची काळजी घेणंही आवश्यक आहे. ज्या ठिकाणी भाजपाचं संघटन आधीपासून आहे, तिथे ही नवी माणसं सहज मिसळून जातात आणि त्यांनाही पक्षाने सांगितलेला अजेंडाच पुढे न्यावा लागतो. परंतु जिथे भाजपाचं संघटन नाही किंवा कमकुवत आहे, तिथे ही नवी मंडळी आपलाच अजेंडा पुढे नेण्याची शक्यता राहते. भाजपा म्हणून लोकांच्या मनात इतकी वर्षं जी काही प्रतिमा रुजली आहे, तिला या नव्या लोकांच्या नव्या कार्यपद्धतीमुळे आणि अजेंड्यामुळे, तसंच वेगळ्या राजकीय संस्कृतीमुळे धक्का पोहोचू शकतो. भाजपाने विस्तार करत असताना या गोष्टींचं मात्र आवर्जून भान बाळगला हवं.

याचा अर्थ, सत्तेचा वाटा या मंडळींना अधिक आणि जुन्या, निष्ठावंत वगैरेंना कमी असा मुळीच होत नाही. म्हणजे, आजवर तरी भाजपामध्ये असं झालेलं दिसलेलं नाही. राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपामध्ये येण्यापूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. त्यामुळे त्यांना मिळालेलं गृहनिर्माण मंत्रिपद वगळता बाहेरून आलेल्या कुणालाच भाजपाने अजूनपर्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं नाही. भाजपाची वरिष्ठ फळी, कोअर टीममध्ये कोणीही पक्षाबाहेरून आलेला नाही. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, आशिष शेलार.. हे सर्व भाजपा संघटनेचेच आहेत, संघपरिवारातच वाढलेले, रुजलेले आहेत. भविष्यातही ही परिस्थिती बदलेल असं वाटत नाही. त्यामुळे बाहेरून आलेल्यांचं प्रस्थ वाढेल, ही शंका भाजपा नेतृत्वाची पक्षावरील पकड पाहता रास्त वाटत नाही. किंबहुना, भाजपामध्ये आलेली कित्येक मंडळी ही कधीकाळी अन्य पक्षांत होती, यावर विश्वासही बसणार नाही, अशी परिस्थिती आहे. प्रसाद लाड, प्रशांत ठाकूर, निरंजन डावखरे आदी नेतेमंडळींकडे पाहिल्यास हे दिसून येतं. अलीकडे या सर्वांची देहबोली, कार्यशैली वगैरे सगळंच भाजपाच्या परंपरागत कार्यकर्त्याला शोभेशी वाटते. शिवाय, कोकणात भाजपाचं तुलनेने कमी असणारं पक्षसंघटन गावागावांत फिरून, लोकांशी संवाद साधून, सातत्याने संपर्क ठेवून मजबूत करण्यात रवींद्र चव्हाण यांच्यासह या तिघा आमदारांनी मोठा वाटा उचलला आहे आणि आगामी काळात पक्षाला याचे फायदेही मिळतील. वाजपेयी-अडवाणींचा भाजपा आणि मोदी-शाहांचा भाजपा वेगळा आहे. दोघांची कार्यशैली भिन्न आहे. अटलजींच्या केंद्रीय मंत्रीमंडळात किंवा मुख्य निर्णय-धोरण प्रक्रियेत संघपरिवाराबाहेरच्या व्यक्तींची संख्या मोठी होती. ब्रिजेश मिश्रा, यशवंत सिन्हा, जसवंत सिंग वगैरे बरीच नावं देता येतील. परंतु मोदी-शाहांच्या काळात भाजपामध्ये अन्य पक्षांतून प्रचंड भरती झाली असली, तरी सरकारच्या वा पक्षाच्या मुख्य निर्णय प्रक्रियेत भाजपाबाहेरील माणसं जवळपास नाहीत. विद्यमान केंद्रीय मंत्रीमंडळातील एस. जयशंकर हे एखादंच अपवादात्मक उदाहरण. भाजपामध्ये गेल्या गेल्या आपल्याला लगेच मानाचं स्थान, सत्तेतील वाटा मिळणार नाही, हे भाजपाप्रवेश करणार्‍यांनाही माहीत आहेच. तरीही त्यांना भाजपामध्ये यायचं आहे. तरुण नेतेमंडळी तर आहेतच, तसंच काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये राहून, इतकी वर्षं सत्ता आणि मोठमोठी पदं मिळवून, आता सत्तरी-पंचाहत्तरी उलटून गेल्यावर, भाजपामध्ये आता आपल्याला काहीही मिळणार नाही, हे माहीत असतानाही भाजपात येणारी अनेक ज्येष्ठ मंडळी आहेत. हे सर्व नेते, कार्यकर्ते असं का करत आहेत? एखाददुसरा अपवाद वगळता भाजपाने तर कधी यांच्या दारी जाऊन आमच्या पक्षात या, अशी गळ घातलेलं दिसलं नाही. भाजपाला आता तसं काही करायची गरजदेखील उरली नाही. मग तरीही असं का होत असावं?
 
कारण, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारख्या पक्षांना आता काहीही भविष्य नाही आणि अशा पक्षांत आपलं काहीही होऊ शकत नाही, अशी भावना या पक्षाच्या नेते-कार्यकर्त्यांमध्ये बळावली आहे. कितीतरी नेते जे अजूनही या पक्षांत आहेत, त्यांच्या मनात पक्षाविषयी असलेली ही धाकधूक क्षणोक्षणी जाणवते. या पक्षातील संघटनेची पदं घेण्यास कुणी तयार नाही, काही नवीन कार्यक्रम देण्यास वा राबवण्यास कुणी तयार नाही, ना पक्षासाठी पैसा देण्यास. या पक्षांना लोकांनी साफ नाकारलंय, हे या लोकांमधूनच वर आलेल्या, लोकभावनेचा अचूक अंदाज असणार्‍यांनी कधीचंच ओळखलं असल्याने, बुडत्या जहाजाप्रमाणे अवस्था झालेल्या या पक्षांतून जहाज जलसमाधी घेण्यापूर्वी बाहेर उडी मारण्याची स्पर्धा या नेत्यांमध्ये लागलेली आहे. भाजपाने आणि शिवसेनेने अत्यंत नियोजनपूर्वक रणनीती आखत या पक्षांना नामोहरम करणं सुरू ठेवलं आहे आणि यामुळे ज्यांना भाजपामध्ये स्थान मिळू शकणार नाही, अशांना शिवसेनेत धाडलं जात आहे. शिवसेनेत आलेले नेते हा आणखी स्वतंत्र विषय आहे, विस्ताराच्या मर्यादेमुळे त्यावर इथे आणखी भाष्य करता येणार नाही. आता काँग्रेसचं किंवा राष्ट्रवादीचं नेतृत्व - विशेषतः शरद पवार भाजपाच्या या खेळीविरोधात वाट्टेल तशी आगपाखड करत असले, तरी त्यात कितपत दम आहे, हे सार्‍या महाराष्ट्राला ठाऊक आहे. आज शरद पवार उडाले ते कावळे, राहिले ते मावळेवगैरे गोष्टी बोलत असले, तरी राष्ट्रवादीचा इतिहास जगजाहीर आहे. भाजपा रजर विरोधी पक्ष फोडत असेल, तर मग धनंजय मुंडे, गणेश नाईक, छगन भुजबळ, नारायण राणे इ. मंडळी काय सेवादलातून काँग्रेस-राष्ट्रवादीत गेली होती काय? भाजपा जर मुलं पळवणारी टोळी’, तर राष्ट्रवादीला पुतणेपळवणारी टोळी म्हणायचं काय? राष्ट्रवादीत असेपर्यंत उदनयनराजे भोसले हे छत्रपती, महाराष्ट्राची शान वगैरे असताना आता भाजपात जाऊन लगेच व्यसनी, अल्लड, पोरकट, छत्रपतींच्या वारशाचा अपमान करणारे झाले काय? असे असंख्य प्रश्न उपस्थित होत आहेत. परंतु पवार, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याकडे यांची उत्तरं नाहीत. जे जे होईल ते ते पाहावे, इतकंच या मंडळींच्या हाती आता उरलंय. भाजपामध्ये होत असलेल्या घाऊक प्रवेशांबाबत चर्चा करत असताना, याही मुद्द्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण, काँग्रेस-राष्ट्रवादीत आता फारसं कुणी उरेल, असं वाटत नाही. जो-तो मला कमळ घेऊन मलाही भाजपाच्या जत्रेत येऊ द्या, असंच म्हणतोय. राज्यात आणखी एक लाट येऊ घातली आहे, हवामान तज्ज्ञांनाही एव्हाना तिचा अंदाज आला आहे. या लाटेपुढे काँग्रेस-राष्ट्रवादीसारखे एकेकाळचे मोठमोठाले पण आता खिळखिळीत झालेले बुरूज-बालेकिल्ले आता पार जमीनदोस्त होतील, अशी स्पष्ट चिन्हं असल्यामुळे या लाटेत बाकीचे लहानसहान मुद्दे अगदीच गौण ठरतात. फक्त, गतिमान लाटेवर स्वार होऊन वेगवान वाटचाल करत असताना, थोडीशी सावधगिरी बाळगणंदेखील आवश्यक ठरतं.