वयं अमृतस्य पुत्रा:।

स्रोत: विवेक मराठी    दिनांक21-Sep-2019

प्रियव्रत्त देवदत्त पाटील हा वयाच्या सोळाव्या वर्षी शास्त्र पोषक सभेची 'तेनाली महापरीक्षा' उत्तीर्ण होणारा इतिहासातील प्रथम विद्यार्थी म्हणून तो यशस्वी ठरला. संस्कृतभारतीचे संस्थापक चा.मु. कृष्णशास्त्री यांनी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रियव्रतच्या या यशाचे कौतुक केले आहे.

 

परीक्षेची सगळी तयारी झाली होती. त्याच्या चेहऱ्यावर तेच नेहमीच आत्मविश्वासाचं हास्य झळकत होतं. त्याने खाली वाकून आपल्या आईला प्रणिपात केला. अपर्णाताईंनी त्याला मस्तकावर हात ठेवत आशीर्वाद दिला. परीक्षेसाठी प्रियव्रत आतल्या कक्षात दाखल झाला आणि अपर्णाताईंच्या नजरेपुढे सारा भूतकाळ तरळू लागला.

 

प्रियव्रतचे वडील देवदत्त पाटील, मूळचे गोव्यातले, फोंडा तालुक्यातले बोरीशिरोडा गावचे राहणारे. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी माता-पित्याचं छत्र हरपलं. त्यांच्या पश्चात काकांनीच या पाच भाऊ आणि तीन बहिणी यांचा सांभाळ केला. देवदत्त गुरुजींचं शिक्षण दहावीपर्यंत इंग्लिश माध्यमातून झालं. दहावीला परीक्षेत पहिला क्रमांक न येता दुसरा क्रमांक आला म्हणून आता हे शिक्षण करायचच नाही असं ठरवलं. तेव्हा काकांनी त्यांना सुचवलं की तुझ्या आजोबांप्रमाणे तूही संस्कृतचा अभ्यास कर, आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा मान वाढव. त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून देवदत्त गुरुजी सन 1988 साली विद्येच्या माहेरघरी पुण्यात दाखल झाले. पुण्याच्या पटवर्धन पाठशाळेत राहून नवाथे गुरुजींकडे वेद अध्ययन सुरू केलं. त्याच काळात सती रूपकुंवर प्रकरणाच्या घटनेवर पत्रकार परिषद घेण्यासाठी काशीचे प्रकांड पंडित गणेश्वर शास्त्री उपस्थित होते. त्यांनी पत्रकार परिषदेत जमलेल्या सगळया पत्रकारांचे सगळे प्रश्न एकाच वेळी ऐकून त्यांनी नंतर सलग न चुकता त्यांची उत्तरे दिली. देवदत्त गुरुजींना या गोष्टीचं खूप अप्रूप वाटल. याचं रहस्य न्यायशास्त्राच्या अभ्यासात आहे असं गणेश्वर शास्त्रींनी सांगितलं. त्यांच्यासोबतच मग ते न्यायशास्त्राच्या अभ्यासासाठी त्यांच्या घरी काशीला जाऊन पोहोचले.

 

सुमारे चार-पाच वर्षं काशीत राहून न्यायशास्त्र, कौटिलीय अर्थशास्त्र, लीलावती गणित आणि कुंडार्क ग्रांथाचा अभ्यास केला. त्यानंतर दक्षिण भारतात कांची येथे राहून गुरूंकडे न्यायशास्त्राचं पुढचं शिक्षण पूर्ण केलं. त्या वेळी त्यांच्या गुरूंनी त्यांच्याकडून दोन वचनं घेतली की काहीही झालं तरी आपली मातृभूमी सोडून परदेशात स्थायिक व्हायचं नाही आणि आयुष्यभर शिष्यांकडून कुठल्याही प्रकारचं विद्याशुल्क न घेता गुरुकुल पध्दतीने वेदांचं आणि शास्त्रांचं अध्यापन करायचं. आपल्या प्रगल्भ बुध्दिमत्तेच्या जोरावर देवदत्तशास्त्रींनी सहा वर्षांचा अभ्यासक्रम अवघ्या दोन वर्षांत पूर्ण करून सत्तर वर्षांपूर्वी घोषित झालेली परंतु कुणीही उत्तीर्ण होऊ न शकलेली शास्त्र पोषक सभेची 'तेनाली महापरीक्षा' - जी आत्ता प्रियव्रतने दिली, ती वयाच्या पंचविसाव्या वर्षी उत्तीर्ण केली. परीक्षा उत्तीर्ण केल्यावर पुण्यात पुन्हा वेदशास्त्रसंपन्न फडकेगुरुजींसह नृसिंह सरस्वती पाठशाळेत शास्त्र विभागाचे अध्यापक म्हणून कार्यरत झाले.

 

दरम्यान मूळच्या सोलापूरच्या असलेल्या, संस्कृत विषयात पीएच.डी. आणि सुवर्णपदकप्राप्त अपर्णाजींशी त्यांचा विवाह झाला. त्याही विद्यापीठातली नोकरी सोडून गुरुजींसह त्यांच्या पाठशाळेत सहभागी झाल्या. सन 2003मध्ये कोजागिरीच्या दिवशी प्रियव्रतचा पुण्यात जन्म झाला. त्याला समजायला लागल्यापासून देवदत्त गुरुजी आणि अपर्णाजी दोघेही त्याच्याशी संस्कृतमध्येच बोलू लागले. त्यामुळे त्याची मातृभाषा संस्कृतच आहे. आसपासच्या इतर मुलांशी तो अन्य भाषा - मराठी, हिंदी, इंग्लिशही बोलायला शिकला. पुण्यातल्या एका शाळेत औपचारिक शिक्षणासाठी प्रवेश घेतला, परंतु शिक्षण मात्र घरच्या पाठशाळेतच झालं. वयाच्या सातव्या वर्षीच संपूर्ण गीतेची परीक्षा उत्तीर्ण होणारा तो पहिला विद्यार्थी ठरला. त्याचबरोबर घरी आई आणि वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा न्यायशास्त्राचा अभ्यास सुरू झाला. छोटया छोटया गोष्टीतून, खेळातून त्याला न्यायशास्त्राचे कठीण पाठ शिकवण्याचा एक अनोखा प्रयोग सुरू झाला. वयाच्या दहाव्या वर्षी त्याचे न्यायशास्त्राचे तीन ग्रांथ मुखोद्गत झाले होते. त्यानंतर दक्षिणेत राजमंद्री येथे व्याकरणशास्त्राचं शिक्षण घेतलेले मध्य प्रदेशातील मोहनजीशास्त्री यांच्याबरोबर राहून त्याने व्याकरणशास्त्राचा पुढचा अभ्यास सुरू केला. तरुण असलेल्या मोहनशास्त्रीजींनी प्रियव्रतला स्वतःच्या लहान भावासारखंच समजून शिकवायला सुरुवात केली. कधी त्याला मांडीवर बसवून, कधी त्याला गोष्टी सांगत, त्याच्याशी खेळत त्याला न्याय आणि व्याकरण अशा अतिशय किचकट आणि कठीण ग्रांथांच्या अभ्यासाची गोडी लावली.
 

वयाच्या अकराव्या वर्षी नगरच्या वेदांत विद्यापीठात असलेल्या परीक्षा केंद्रातून दोन वर्ष परीक्षा उत्तीर्ण झाला. त्यानंतर प्रियव्रतने तेनालीच्या संस्थेत प्रवेश मिळवला. तेनालीच्या पाठशाळेत सहा वर्षांत पूर्ण करण्याच्या ह्या चौदा स्तरीय परीक्षा त्याने केवळ दोन वर्षांत पूर्ण केल्या. दिवसभरात 17-18 तास अभ्यास करून त्याने अतिशय परिश्रमपूर्वक या परीक्षांचा अभ्यास केला. महापरीक्षा देण्याच्या आधी आहार, विहार, व्यवहार या सगळया गोष्टींवर प्रयत्नपूर्वक नियंत्रण ठेवत त्याने या परीक्षेची तयारी केली आणि वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ही परीक्षा उत्तीर्ण होणारा इतिहासातील प्रथम विद्यार्थी म्हणून तो यशस्वी झाला. आता आगामी काळात व्याकरणाचा महाभाष्य नावाचा एक मोठा ग्रांथ, त्यात असलेल्या 81 प्रकरणांची एक महापरीक्षा असते, जी अजूनपर्यंत कुणीही दिलेली नाही, तिचा अभ्यास प्रियव्रतने सुरू केला आहे. त्याने औपचारिक शिक्षणाची आठवीची परीक्षा दिली आहे, आगामी वर्षात तो दहावीची परीक्षा देईल.

 

दरम्यान सुमारे 2015पर्यंत पुण्यात राहून अध्यापन करीत असताना देवदत्तगुरुजींनी पुन्हा आपल्या पितृगृही स्थायिक होऊन गुरुकुलम पध्दतीने पाठशाळा सुरू करायचा निर्णय घेतला. गोव्यातल्या थोडया दुर्गम अशा रिवण या छोटयाशा गावात हेमंत प्रभुदेसाई यांनी आपलं एक मोठं दोन मजली घर पाठशाळेसाठी दान म्हणून दिलं आणि तिथे ही पाठशाळा सुरू झाली.

श्रीसुब्रमण्य वाङ्मय ट्रस्टच्या अंतर्गत या श्री विद्या पाठशाळेत सध्या 39 विद्यार्थी-विद्यार्थिनी निवासी पध्दतीने शिकतात. हे सर्व विद्यार्थी भारतातल्या सात-आठ विविध प्रांतांतून आलेले आहेत. देवदत्तगुरुजींनी आपल्या गुरूंना दिलेल्या वचनाप्रमाणे कुठल्याही विद्यार्थ्याकडून कुठलेही शुल्क घेतले जात नाही. कुठल्याही जातीपातीचे बंधन नाही. संपूर्ण पाठशाळेत 30 विद्यार्थी आणि 9 विद्यार्थिनी आहेत. एका शास्त्राचा संपूर्ण पाठयक्रम साधारण सहा वर्षांचा असतो. वयाच्या साधारण बारा ते तेराव्या वर्षी प्रवेश दिला जातो. विद्यार्थिनींची निवास आणि भोजन व्यवस्था सोडली तर बाकी सर्व कार्यक्रम सगळयांबरोबर आणि सगळयांना समान असेच असतात. विद्यार्थी आपलं रोजचं भोजन स्वतः बनवतात. परिसरातली सर्व कामं स्वतः करतात आणि दिवसभरातला अधिकाधिक वेळ ज्ञानार्जनात घालवतात. रिवण ह्या अतिशय निसर्गरम्य परंतु आडवाटेला असलेल्या गावात एका डोंगरावर ही पाठशाळा आहे.

काही दानशूर संस्थांच्या आणि व्यक्तींच्या साहाय्यावर पाठशाळेचा सर्व योगक्षेम चालतो. मात्र कुठल्याही अटी अथवा शर्तीविनाच हे दान स्वीकारले जाते. पाठशाळेत प्रमुख भाषा संस्कृतच आहे. सगळे दैनंदिन व्यवहार, पाठ, शिक्षण हे सगळं संस्कृतमध्येच चालतात. महिन्यातून दोनदा येणाऱ्या प्रतिपदांना पाठशाळेला सुटी असते. एरवी रोज पहाटे पाच वाजता उठून आपली दिनचर्या पार पडणाऱ्या विद्यार्थ्यांना या दिवशी कुठलंही बंधन नसतं. उशिरापर्यंत उठून नदीवर पोहायला जातात, मैदानात मनसोक्त क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी असे खेळ खेळतात. पाठशाळेच्या गुरुपत्नी अपर्णाताई प्रियव्रतप्रमाणेच या सगळया मुलांची काळजी घेतात. या पाठशाळेत देवदत्तगुरुजींबरोबर अध्यापन करणारे मोहनशास्त्री आणि अन्य शिक्षक स्वतः काही विषयांचे विद्यार्थी म्हणून शिक्षणही घेतात आणि काही विषयांचं अध्यापनही करतात. येथे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याकडून गुरुजींची एकच अपेक्षा असते, ती म्हणजे येथून बाहेर पडल्यानंतर त्यांनीदेखील अशाच प्रकारे निःस्वार्थीपणे विद्यादानाचं कार्य सुरू ठेवावं. आजपर्यंत या गुरुकुलातून बाहेर पडलेल्या सर्व 19 विद्यार्थ्यांनी हे व्रत अखंडितपणे सुरू ठेवलं आहे.

परवा मोदींनी चांद्रयानाच्या अवतरणाच्या वेळी उल्लेखलेल्या, ''आम्ही सारे अमृताचे पुत्र आहोत आणि आम्ही ज्ञान-विज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रात असेच देदीप्यमान यश संपादित करू'' हा विश्वास प्रियव्रतसारख्या तरुणांमुळे सार्थ होताना दिसतोय. संस्कृतभारतीचे संस्थापक चा.मु. कृष्णशास्त्री यांनी आणि भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदींनी प्रियव्रतच्या या यशाच्या केलेल्या कौतुकामुळे संस्कृतीच्या संवाहक असलेल्या या पाठशाळा भविष्यात अधिक प्रकाशात येतील आणि जनाधारामुळे हे कार्य अविरत सुरू राहील, हे निश्चित..

अभिजीत खेडकर

9420602780