'एपिक्यरस'चा आनंदवाद

विवेक मराठी    21-Sep-2019   
Total Views |

सदर - जग दार्शनिकांचे

सॉक्रेटिस, प्लेटो, ऍरिस्टॉटल यांनी त्यांच्या शिकवणीत 'शुध्द व्यक्तिवादाला' कधीच महत्त्व दिले नव्हते. एपिक्युरसमुळे या नव्या पायंडयाला सुरुवात झाली. पुढे चालून जॉन लॉक, डेव्हिड ह्यूम, बेंथन, जॉन स्टुअर्ड मिल यांनी व्यक्तिस्वातंत्र्य, उपयुक्ततावाद मांडला. एपिक्युरसचे 'द गार्डन' त्याचा स्रोत मानला जातो.


अथेन्सच्या राजाने आपल्या सरदारांकडून, इतर सेवेकऱ्यांकडून 'एपिक्युरस गार्डन'विषयी खूप ऐकले होते. गार्डनला वेलींनी गोलाकार तट बांधला होता व आत एपिक्युरस आणि त्याचे शिष्य राहत होते. गार्डनच्या फाटकावर या आश्रमाचे बोधवाक्य लिहिलेले होते - 'खा, प्या, मौज करा.' राजाला सांगणाऱ्यांपैकी कुणीही आत जाऊन आलेले नव्हते.

आपल्याच राज्यात असलेल्या या गार्डनविषयी राजालाही कुतूहल होते. त्याला वाटले की, 'खा, प्या मौज करा' हे बोधवाक्य असलेल्या ठिकाणी राजापेक्षाही विलासी, सुखकर वातावरण असणार.

त्याने एका सरदाराला परवानगी घेऊन येण्यास सांगितले. गार्डनमधून आलेल्या सूचनेनुसार लवाजमा न घेता राजा एका सकाळी एकटाच तेथे गेला.

फाटकातून प्रवेश केल्यावर राजाला दिसले की, मध्यभागी खूप मोठा बगिचा आहे, ज्यात फळझाडे, भाजीपाला, फूलझाडांचे ताटवे असे सर्व आहे आणि बगिच्याभोवती गोलाकार पध्दतीने लहान लहान झोपडया बांधलेल्या आहेत. बाजूला विहीर आहे. सगळीकडे स्वच्छ, सुंदर निरामय वातावरण आहे.

तेथे बगिच्यात काही जण कामे करत होती. सगळयांचे चेहरे आनंदी होते. ते गुणगुणत मोठया आनंदाने बागेची मशागत करीत होते. स्वत: एपिक्युरस राजाला सामोरा गेला. अभिवादन करून त्याने राजाला आपल्या झोपडीच्या ओटयावर बसवले. स्वागतपेय दिले आणि 'काम संपवून येतोच' असे सांगून तोही कामात मग्न झाला.

 

एकाग्रातेने त्याने झाडांभोवती आळी केली, खत घातले, पाणी दिले.

 

राजा पाहत होता. भोजनाच्या वेळी राजाला एपिक्युरस अगत्याने एका मोठया भोजनगृहात घेऊन गेला. सगळे जमले होते. भात, भाजी, दूध, सूप, उकडलेले मांस असे साधे जेवण होते. पण सगळेच जण जणू 'अमृत' जेवत आहोत, अशा थाटात भोजन करीत होते. हास्यविनोद सुरू होते.

 

थोडी विश्रांती घेऊन जो तो निघून गेला. राजाला तिथली शांतता व वातावरण आवडले. तो संध्याकाळीही तेथेच थांबला. सूर्य कलला. त्या वातावरणात राजाही मौन होऊन गेला. ओटयावर एपिक्युरसचा हात हातात घेऊन बसून राहिला.

 

मग चांदण्या रात्री राजा एपिक्युरसला म्हणाला, ''माझा वेगळाच समज होता तुझ्या या गार्डनविषयी. तुझ्या आश्रमाला काय देऊ सांग?'' एपिक्युरस म्हणाला, ''तसे तर इथे सर्व आहेच. पण तुमचा मान म्हणून थोडेसे लोणी आणि मीठ पाठवा.''

 

तेथून निघताना राजा मनात म्हणाला, ''आज मला कळले, आनंद आणखी कशानेच मिळत नाही. केवळ आनंदात राहिल्यानेच आनंद मिळतो.''

 

एपिक्युरसच्या तत्त्वज्ञानाचे नावच मुळी 'आनंदवाद' असे आहे. इसवीसनपूर्व 341मध्ये एपिक्युरसचा जन्म झाला. तो काळ युनानमधील कठोर धार्मिक आचरणाचा काळ होता. व्यक्तीला सामाजिक दृष्टीने नीतिमान घडवणे, ज्ञानाची कास धरणे हेच मानवी जीवनाचे उद्दिष्ट असे या काळात प्रस्थापित झाले होते.

 

एपिक्युरस जन्माला आला, तेव्हा प्लेटोचे नुकतेच देहावसान झाले होते. वयाच्या बेचाळिसाव्या वर्षापासून एेंशीव्या वर्षापर्यंत प्लेटोने आपल्या विद्यापीठातून 'नवविचारांचे' युग निर्माण केले होते. व्यक्तीच्या स्वतंत्र इच्छापेक्षा त्याचे समाजहिताच्या दृष्टीनेच प्रशिक्षण व्हावे व वाटेल ते न करता त्याने 'आदर्श राज्याला' आवश्यक ते करावे, अशी मते त्या काळात प्रसृत झाली होती.

 

प्लेटोचा शिष्य ऍरिस्टॉटल याने कायद्याच्या राज्याच्या पुरस्कार चालवला होता, त्या काळात एपिक्युरस शिक्षण घेत होता. तो काळ तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने ‘Crossroads’चा काळ मानला जातो. ज्ञानशास्त्राचे शिक्षण देणारी अनेक 'स्कूल्स' तेव्हा ग्रीसमध्ये निर्माण झालेली होती. अथेन्समध्ये तर 'ज्ञानसत्रे' भरत. एपिक्युरसच्या चरित्रात तो ऍरिस्टॉटलला भेटला असल्याचाही उल्लेख आहे.

 

शिक्षण घेताना एपिक्युरसला प्रश्न पडत की, योग्य काय अयोग्य काय हे कसे ठरवायचे? संपन्नता, विपुलता, भौतिकवाद याचे मानवी जीवनात किती स्थान असावे? ज्याच्या भयामुळे माणसे नीट वागत असतील, तर असा भीतिदायक ईश्वर मानस-अवकाशात गरजेचा आहे का? माणूस सामाजिक प्राणी असला तरी त्याचे असे अतिक्रमण नसलेले खासगी आयुष्य असायला हवे की नाही? प्रचलित विचार बहुसंख्य लोकांना पटत असेल, तरी त्याविरुध्द विचार मांडण्याचे स्वातंत्र्य असायला काय हरकत आहे? कदाचित हा नवा विचार नंतर बहुसंख्यांना पटू लागेल. इतरांना इजा न पोहोचवता प्रचलित रूढी, आचार-विचार पटत नसतील, तर ते तोडण्याचे स्वातंत्र्य व्यक्तीला असावे की नाही?

 

त्याला प्रचलित 'स्कूल्स'मधून काही समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. मग त्याने स्वत:चा 'आश्रम' सुरू करण्याचे ठरवले. त्याला नाव दिले 'द गार्डन'!

 

हे 'द गार्डन' सर्वच अर्थांनी वेगळे वैशिष्टयपूर्ण प्रशिक्षण केंद्र होते. या गार्डनचे बोधवाक्य होते -'खा, प्या, मौज करा, आनंदी राहा'.

 

एपिक्युरसच्या गार्डनमध्ये तो काय शिकवीत असे याचे स्वतंत्र पुस्तक दुर्दैवाने उपलब्ध नाही. मात्र त्याच्या शिष्यांनी घेतलेली टिपणे आणि त्याने शिष्यांना लिहिलेली पत्रे यावरून आजचा 'एपिक्युरिझम' आकारास आलेला आहे.

 

भयमुक्त, स्वावलंबी जगण्यावर एपिक्युरसचा भर होता. शरीर हे मृत्यूबरोबरच संपते, त्याखेरीज त्यात आणखी काही नसते असे तो सांगत असे. मृत्यूच्या, परलोकाच्या भयाने ग्रासून जाऊन इहलोकातील जीवन चिंताग्रास्त आणि स्वार्थी बनवणे अत्यंत गैर आहे, असे त्याचे मत होते. व्यक्ती जेव्हा प्रचलित रूढी, परंपरा या अनिच्छेने, समाजाच्या दबावाने स्वीकारते तेव्हा दांभिकता वाढत जाते व त्या व्यक्तीला आत्मसुरक्षात्मक दुहेरी जीवन जगावे लागते.

 

मुळात मनुष्यजन्म हा आनंदाने राहण्यासाठी आहे. ज्यांना समाजात राहत असताना राजकीय विचार बाळगण्याची इच्छा नाही, त्यांना ते स्वातंत्र्य असले पाहिजे, असे एपिक्युरस म्हणतो.

 

ईश्वराविषयीची त्याची मते फार टोकाची होती. त्याने ईश्वरभक्ती करणारे अनेक दांभिक लोक अनुभवले होते. 'अमक्याचे वाईट होऊ दे' म्हणून प्रार्थना करणारे लोकही त्याचे परिचित होते. एकदा उपहासाने तो म्हणाला, ''या प्रार्थना करणाऱ्या सगळयांचे खरोखरच जर देवाने ऐकले, तर सगळेच जण एकाच वेळी नष्ट होतील. कारण ते एकमेकांविरुध्दच काहीतरी देवाकडे मागत आहेत.''

 

देव ही सर्वोच्च सार्वभौम सत्ता नाही, तर ब्रह्मांड हे अनंत आहे व स्थिर आहे. देव बक्षीस देत नाही, शिक्षाही देत नाही. आनंदमय असणे हीच 'सर्वोच्च सत्ता' आहे. एपिक्युरसची ही शिकवण रूढार्थाने निरीश्वरवादी (Atheistic) मानली जाते.


सॉक्रेटिस
, प्लेटो, ऍरिस्टॉटल यांनी त्यांच्या शिकवणीत 'शुध्द व्यक्तिवादाला' कधीच महत्त्व दिले नव्हते. एपिक्युरसमुळे या नव्या पायंडयाला सुरुवात झाली. पुढे चालून जॉन लॉक, डेव्हिड ह्यूम, बेंथन, जॉन स्टुअर्ड मिल यांनी व्यक्तिस्वातंत्र्य, उपयुक्ततावाद मांडला. एपिक्युरसचे 'द गार्डन' त्याचा स्रोत मानला जातो.


एपिक्युरसने आपल्या
'आनंदवादा'मध्ये नैतिक वागण्याला नेहमीच वरचे स्थान दिले. मात्र व्यक्तिजीवनावरील सामाजिक व कौटुंबिक दबावाला नाकारले. त्याच्यानंतर त्याच्या या तत्त्वज्ञानाचे स्वरूप उथळ होत गेले. 'आनंदवाद' म्हणजे स्वैर वागणे असे लोक मानू लागले.

 

आपल्याकडे असेलल्या 'चार्वाक' परंपरेसारखीच वाटावी अशी ही एपिक्युरिझमची परंपरा आहे. त्याचे अभिनव कम्यून हेदेखील आपल्याकडील 'आश्रमांच्या' स्वरूपासारखे वाटते. मात्र कोणताही नवा चांगला विचार, योग्य अनुयायी लाभले नाहीत, तर हळूहळू भ्रष्ट होत जातो, हेच खरे!


अथेन्समध्ये असणाऱ्या आत्यंतिक आदर्शवादी अशा तत्त्वज्ञानाला
'मानवकेंद्री आणि सहृदय' करण्याचे श्रेय अर्थातच एपिक्युरसला जाते.

 

ज्यांना शांत, समाधानी, कलासक्त, श्रमप्रधान आणि आनंदी जीवन जगायचे आहे. त्यांनी आपल्यापुरते आपल्या अंगण-परसात, 'एपिक्युरस' गार्डन नक्की फुलवावे!

- रमा गर्गे

9922902552