आनंदी वृध्दत्व

स्रोत: विवेक मराठी    दिनांक23-Sep-2019   

खेडयापाडयात अजून तरी वृध्दत्व टाकून दिलं जात नाही. गाव सांभाळतं, सांभाळायला भाग पाडतं. रडतखडत का होईना, म्हाताऱ्या माणसांचं केलं जातं. ठीक आहे. प्रश्न आहे तो जिथे वृध्दत्व प्रश्नचिन्ह बनतं तिथला. त्या प्रश्नाचं जमेल तसं उत्तर तर शोधू या. माणसांच्या जगण्यातूनच हे उत्तर मिळतं. आशा निर्माण होते. असे अनुभव तुमचेही असतील. ते परस्परांत वाटू या. त्यातूनच शिकायचं असतं.

 

मला कल्पना आहे, हे सगळं तुमच्या-माझ्यासारख्या दोन वेळचं पोटभर जेवणारांसाठी ठीक आहे. बाकी वृध्दांची अवस्था अशासाठी विचित्र आहे की आरोग्यासाठी खर्च करणं अवघडच होतं. घरात पडून राहणं. तिथे निदान कर्तव्य म्हणून तरी केलं जातं. खेडयापाडयात अजून तरी वृध्दत्व टाकून दिलं जात नाही. गाव सांभाळतं, सांभाळायला भाग पाडतं. रडतखडत का होईना, म्हाताऱ्या माणसांचं केलं जातं. ठीक आहे. प्रश्न आहे तो जिथे वृध्दत्व प्रश्नचिन्ह बनतं तिथला. त्या प्रश्नाचं जमेल तसं उत्तर तर शोधू या. माणसांच्या जगण्यातूनच हे उत्तर मिळतं. आशा निर्माण होते. असे अनुभव तुमचेही असतील. ते परस्परांत वाटू या. त्यातूनच शिकायचं असतं. हे जगणं शिकवतं. वृध्दत्वातलं जगणं हाही समाजाचाच भाग आहे. जेव्हा आपण त्या जगण्याचा एक भाग होतो तेव्हा मनात येतं, ते शब्दातून मांडलंय इतकंच. हे काही कुणाला शहाणपण शिकवणं नाही. असो.

 

असाच हा तिचा त्यांच्याबद्दलचा अनुभव. तिला मी भेटले तेव्हा ती 66 वर्षांची असेल असं वाटलंच नाही. पहिल्यांदा तरी आपण वय दिसण्यावरूनच ठरवतो. त्या बाजूनेही ती तेवढं वय असलेली वाटत नव्हती. तिची दोन्ही मुलं मोठया वेगवेगळया शहरांत राहतात. कुणाकडे केव्हा जायचं हे एकत्रपणे ठरवतात. जातील तिथे तिथले होऊन राहतात. त्यामुळे दोन्ही घरातली नातवंड आजीआजोबांची अगदी वाट पाहात असतात. बरेच वेळा आजीआजोबा लाडावतात, नको ते लाड करतात अशी तक्रार ऐकायला येते. त्याही बाबतीत हे दोघे कडक आहेत. हो म्हणजे हो नि नाही म्हणजे नाही, अशी भूमिका घेतात. ते ज्या पध्दतीने नातवंडांना समजून घेतात व मगच त्यांना शिकवतात, त्यामुळे 'आता काळ बदललाय, शिकवायच्या पध्दती बदलल्या आहेत' असंही ऐकून घ्यावं लागत नाही. ती हे सगळं लिहिते. इतरांना वाचायला देते. तिच्यातली आईही वेगळी होती नि आता आजी व सासूही वेगळी आहे. तशीच वडीलही वेगळे होते नि आजोबाही. वेगवेगळया संस्थांचे ते सदस्य आहेत. केवळ नावाला नाही, तर सक्रिय आहेत. पैसा मिळवला, पण कुठे थांबायचं हे ओळखून व्यवसाय कमीही केला. तरुणांना त्या दोघांशी गप्पा माराव्याशा वाटतात नि तरुणांच्या गटात हे दोघे असले तरी जाणवत नाही. तिच्या सुनांशी दोघांचं जमतं छान! कारण सुनांना त्या दोघांत नि आपल्यात फरकच वाटत नाही. एकूण काय, असं देखणं वृध्दत्व मग तरुण होतं, असंच हेच खरं.

माणसं वेळ मिळाल्यावर किती वेगवेगळी कामं करतात या वयात! माझा एक मित्र. वय वर्ष 65. तसा तो तालुक्याच्या ठिकाणी राहतो. वेगवेगळया क्षेत्रांत गाजलेल्या माणसांना बोलवावं, लोकांनी त्यांना ऐकावं यासाठी त्याची धडपड सुरू असते. इथे माणसांना बोलावताना त्यांचं वय तो लक्षात घेत नाही. प्रेरणादायक, निरनिराळया क्षेत्रांत विशेष कामगिरी करणाऱ्यांना तो बोलावतो. त्यांचे विचार समजून घेतो. जमतील तेवढयापर्यंत पोहोचवतो. वाचतो. पुस्तक भेट देतो. एक नुकतेच निवृत्त झालेली सखी. अगदी छान प्लॅनिंग केलं तिने वेळेचं. छान वेळ जातो. परीक्षा देते. मग अभ्यास झालाच.

वयाच्या 84व्या वर्षी कॉम्प्युटर शिकणाऱ्या आजीबाई, लंडनला जाऊन राहणाऱ्या लंडनच्या आजीबाई (डॉ. सरोजिनी वैद्य - लंडनच्या आजीबाई), वाडीतल्या मुलांना जमवून गोष्टी सांगणारे, कविता म्हणवून घेणारे, रामरक्षा शिकवणारे आजोबा, दुपारच्या वेळी सरकारी दवाखान्यात जाऊन पेशंटबरोबर गप्पा मारणारे आजोबा, बाळंतविडा शिवून देणाऱ्या ताई, जाता जाता कुठल्या नोकरी करणाऱ्या बाईच्या घरात शिरून 'सांग काय मदत करू पटकन' असं म्हणून मदत करणाऱ्या आक्का! अशा वेगळया वाटा (वेळ जाण्यासाठी) निवडलेली माणसं समजून घेऊ या. त्यांचं वय होणं हे त्यांचं क्लॉलिफिकेशन होऊन जातं. वयाच्या उत्तरार्धात असं काही ठरवलं असलं म्हणजे मन भरून गेलेलं असतं. हे करताना कधी चार पैसे मिळाले तर ठीकच. एक आजोबा काहीशी भिक्षुकी शिकले. त्यातून मिळणारे पैसे ते त्यांना द्यावेसे वाटतील अशा संस्थेत जाऊन भेट देतात. पेन्शन घरात देतात.

उत्तरार्धाकडे झुकणाऱ्या एका जोडप्याने वेगळा विचार केला. गावाकडे त्यांनी थोडी जमीन घेतली. घर बांधलं. घरात 2-3 वेगळया खोल्या काढल्या. मित्रांना घेऊन ते गावाकडे जात. हरवलेला, आठवणीतला आनंद ते त्यांना देत. म्हणजे काय? वय झाल्यावरही वाटतंच कच्चे आंबे खावे, झाडावरून करवंद तोडून खावीत, झोपाळयावर बसून झुलावं, सूर्योदय-सूर्याला पाहावा, मातीत काम करावं. गावाकडच्या घरामुळे वृध्दांना हे करता येतं. ते याला गमतीनं म्हणतात ‘Oldageturism’ शिवाय येणाऱ्या वृध्दांना सांगतात - तुमच्यात जे आहे ते गावात वाटा. मग कुणी शाळेत जाऊन गणित शिकवतं, कुणी महिलांना वेगवेगळया कला शिकवतं, कुणी आरोग्य शिबिरं भरवतं, कुणी पंचायतीत जाऊन भाषण देतो. यातून घरात राहून कुणासाठी तरी केल्याचा आनंद मिळतो. हे क्षण आठवणी होतात नि वर्तमानातलं वार्धक्य सुखावलं होतं. यालाच आनंदी वृध्दत्व म्हणू.

अनेक गोष्टी 'चालायचंच' म्हणून स्वीकारायला हव्यात. कारण निसर्गनियम आहे हा! जे निरुपयोगी ते गळून पडतं. अडगळीत पडतं. माणसं काय नि वस्तू काय! एक दिवस जुन्या सामानात अडगळीत पडलेला 'स्टो' नातवाने पाहिला. 'हे काय आहे आजी?'' ''याला स्टो म्हणतात. पूर्वी यावरच मी स्वयंपाक करायचे.'' ''मग तो असा टाकून का दिलास?'' ''आता गॅस आला. त्याचा उपयोग नाही.'' ''मग टाकून दे ना. उगाचच अडगळ.'' अनेक वेळा असंच होतं फेकवत नाही नि ठेवलं तर अडगळ होते. तरीही हे घडतं. वस्तू दुरुस्त करून वापरता येतात नि माणसंही. तरी दुरुस्तीनंतर जशी त्या वस्तूची काम देण्याची मर्यादा असते. तसेच जगण्याचेही.

चला तर मग, हेही स्वीकारू या ना! एक दिवस जायचं आहे. जाताना आठवणी द्यायच्यात नि मग ठरायचंय.

रेणू दांडेकर

8828786875, 9403693275


[email protected]