भारत - अमेरिका मैत्रीचे नवे शिखर

स्रोत: विवेक मराठी    दिनांक28-Sep-2019   
वनानि दहतो वह्नेः सखा भवति मारुतः।

स एव दीपनाशाय कृशे कस्यास्ति सौहृदम्॥

- वारा हा वनामध्ये वणवा झालेल्या अग्नीचा मित्र असतो. पण तोच वारा एखाद्या दिव्याचा नाश करण्यासाठी कारण ठरतो. अर्थात दुर्बळाला कोणी मित्र नसतो.

भारत-अमेरिका संबंध हे प्रत्येक दशकात वेगवेगळया प्रकाराने वर-खाली होत राहिले आहेत. कम्युनिझम आणि पर्यायाने एकाधिकारशाही पसरण्याची भीती सर्व तत्कालीन प्रगत लोकशाही राष्ट्रांमध्ये होती. परिणामी स्वातंत्र्योत्तर नेहरूंच्या काळात, तत्कालीन सोव्हिएट रशियाशी असलेले मैत्रिपूर्ण संबंध आणि नेहरूंनी घेतलेली अलिप्ततावादाची भूमिका अमेरिकेला कधी रुचली नाही. शीतयुध्दाच्या काळात ते संबंध अधिकच अविश्वासावर आधारित होत गेले. जगातील दोन प्रमुख लोकशाही ह्या साम्यवादी राष्ट्रांच्या जवळ गेल्या - आपण रशियाच्या, तर अमेरिका चीनच्या. 1991 साली सोव्हिएट रशिया कोलमडून पडला आणि भारत-अमेरिका हळूहळू जवळ येऊ लागले.

 

24 सप्टेंबरला झालेल्या ह्यूस्टन, टेक्सासमधील 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमात अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आले आणि एका अर्थाने अमेरिका-भारत मैत्रीने मोठे शिखर गाठले! सप्टेंबरचा महिना हा अमेरिकेत सर्व देशांतील नेत्यांच्या येण्याचा असतो. या महिन्यातील शेवटच्या आठवडयात संयुक्त राष्ट्रांचे संमेलन असते, जिथे प्रत्येक राष्ट्रप्रमुख अथवा त्यांचा प्रतिनिधी बोलतो/बोलते. त्याला लागून अमेरिकन राज्यकर्त्यांबरोबर, उद्योगांबरोबर तसेच इतर राष्ट्रप्रमुखांबरोबर चर्चा करण्याची चांगली संधी असते. प्रत्येक राष्ट्रप्रमुख हा त्यांच्या राष्ट्रीय हिताला योग्य ठरतील अशा प्रकारच्या भेटीगाठी घेत असतो, त्यातून करारमदार करत असतो.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ह्या संमेलनासाठी म्हणून ज्या ज्या वेळेस अमेरिकेत आलेले आहेत, तेव्हा इथल्या भारतीयांनी त्यांना हक्काने आणि आग्राहपूर्वक भाषण करण्यासाठी बोलावले आहे. या वेळेस ह्यूस्टन-टेक्सासमध्ये असा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले. साधारण दोन-अडीच महिन्यांच्या अवधीत भव्य-दिव्य असा कार्यक्रम करण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प स्थानिक आयोजकांनी सोडला आणि तयारीला लागले. त्यासाठी ह्यूस्टनचे प्रसिध्द एन.आर.जी. स्टेडियम घेण्यात आले. पंतप्रधान मोदी ह्यांची लोकप्रियता प्रचंड असल्याने मोदींचा जाहीर कार्यक्रम आहे म्हटल्यावर प्रेक्षक मिळणे अवघड असण्याचा प्रश्नच नव्हता! रजिस्ट्रेशन चालू केल्यावर काही आठवडयांतच स्टेडियमची क्षमता होती तितक्या प्रेक्षकांनी - म्हणजे 50,000 प्रेक्षकांनी नोंदणी केली! यात जवळपास सर्वच, म्हणजे अमेरिकेतील 50 राज्यांमधून कोणी ना कोणी सहभागी झाले. आणखी एक वैशिष्टय म्हणजे अमेरिकेतील दोन्ही पक्षांमधील साधारण दोन डझन अमेरिकन सभागृहातील काँग्रोसमन, तसेच सिनेटर्सही येण्यासाठी तयार झाले आणि त्याप्रमाणे आले! मात्र पुढे जे काही झाले, ते ऐतिहासिक होते. संयोजकांच्या निमंत्रणाला आणि विनंतीला मान देऊन स्वत: राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी येण्याचे ठरवले. भारतीय पंतप्रधानांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने येणे आणि दोन देशांमधील दृढ होत असलेल्या मैत्री संबंधाचे जाहीर प्रदर्शन करणे हे फारच अद्वितीय होते.

बहुमत असलेल्या डेमोक्रॅटिक पार्टीचे अमेरिकन सभागृहातील प्रमुख नेते (हाउस मेजॉरिटी लीडर) स्टेनी होयर यांनी मोदींचे स्वागत करताना दोन देशांतील लोकशाहीमधले साम्य दाखवले.


आपल्या भाषणात भारत-अमेरिका संबंधांबद्दल बोलत असताना ट्रंप यांनी गेल्या पाच वर्षांत मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सामाजिक विकासाची स्तुती केली
, त्याचबरोबर वाढत असलेल्या अमेरिका-भारत यांच्या व्यापारी संबंधांबद्दल बोलण्यावरही भर दिला. मोदींच्या या अमेरिका भेटीत ट्रंप आणि मोदी यांच्यामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये व्यापारी करार होण्याची शक्यता आहे, असे सतत बोलले जात आहे.पंतप्रधान मोदी यांच्या भाषणात त्यांनी अनेक मुद्दयांना स्पर्श केला. आपल्या भाषणात
'हाऊडी मोदी' म्हणजे 'हाऊ आर यू मोदी' याचे भारताच्या वतीने, त्यांनी भारतातील विविध भाषांमध्ये 'सगळे उत्तम आहे' असे उत्तर दिले आणि भारतात असलेली विविधतेतील एकता अधोरेखित केली. तसेच भारताची अमेरिकेबरोबर औद्योगिक देवाणघेवाण यावरही वक्तव्य केले. हा कार्यक्रम केवळ ऐतिहासिकच नाही, तर दृढ संबंध (great chemistry) तयार करणारा आहे म्हणून संगितले. सगळयात महत्त्वाचे वैशिष्टय म्हणजे, 'राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तद्नंतरे' या उक्तीप्रमाणे त्यांनी जाणीवपूर्वक यजमान देशातील आणि यजमान राज्यातील आयोजक, प्रशासक आदींची तोंड भरून केलेली स्तुती. ट्रंप यांच्या 'आर्ट ऑफ द डील' या पुस्तकाबद्दल आणि त्यांच्या 'डील मेकिंग'च्या गुणाबद्दल बोलायलादेखील ते विसरले नाहीत.


कार्यक्रम अतिशय व्यवस्थित आणि कुठल्याही पध्दतीची उणीव न भासता पार पडला. उपस्थितांसाठी हा कार्यक्रम अविस्मरणीय झाला.


दोन राष्ट्रांचे संबंध किती समान पातळीवर आहेत हे बघायचे असेल
, तर कदाचित दोन्ही राष्ट्रप्रमुख एकमेकांच्या राष्ट्रामध्ये भेटीला आले होते का, ते पाहून ठरवता येऊ शकेल. सत्तरीच्या शेवटच्या काळात जनता पार्टीच्या राज्यात तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांनी भारताला भेट दिली होती. मधल्या काळात आपल्याकडील इंदिरा गांधी, राजीवा गांधी, नरसिंह राव यांनी भेटी दिल्या, पण अमेरिकन राष्ट्राध्यक्ष कधी आले नाहीत. त्यानंतर एकदम 1990च्या दशकाच्या शेवटी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आले होते. नंतर अध्यक्षपद संपल्यावरही ते येऊन गेले, जॉर्ज बुश राष्ट्राध्यक्ष असताना येऊन गेले आणि ओबामादेखील येऊन गेले.


भारतासाठी एक काळ असा होता
, जेव्हा अमेरिकेत केवळ भारताचे दारिद्रय आणि रस्त्यावर फिरणारे हत्ती, उंट आणि गारुडी असलेला देश इतकेच माहीत होते. योगविद्या म्हणजे चेटूक धरले गेले आणि भारतीय अन्नपदार्थांची थट्टा करण्यात आली. असे सहज वाटू शकते की स्वातंत्र्यानंतर जर आपण रशियाऐवजी अमेरिकेशी मैत्री केली असती, तर असे झाले असते का? जर-तरच्या प्रश्नांची उत्तरेही जर-तरचीच असतात. तरीदेखील असे वाटते की आपण रशियाशी केलेल्या मैत्रीपेक्षा साम्यवादाने प्रभावित असलेला समाजवाद राबवून चूक केली, त्याऐवजी आपण विकसित मार्गावर लागण्याआधीच अमेरिकेशी मैत्री करायचा प्रयत्न केला असता, तर देणारा आणि घेणारा असेच नाते झाले असते. आपण ते नकळत टाळले. गेल्या एक दोन दशकांत भारतीयांची कष्टाळू वृत्ती, भारतीय जेवण, आयुर्वेद, योगविद्या, इतकेच काय, बॉलीवूड या सर्वांनीच अमेरिकेला एक प्रकारचे गारुड घातले आहे. अमेरिकेने स्वतःच्या संस्कृतीची सॉफ्ट पॉवर जगाला दाखवली आहे. पण अशी सर्वक्षेत्रीय सॉफ्ट पॉवर अमेरिकेला दाखवू शकलेला केवळ भारतच असेल. आज आपली 'आंतादापरार्धात्पृथिव्यै समुद्रपर्यंता या एकराळिति तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्यावसन्गृहे' अशी वाटचाल चालू आहे. अशी सक्रिय महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या राष्ट्राशी मैत्री करायला कुणाला आवडणार नाही?


अनेकदा टीकाकार म्हणतात मोदी हे ट्रंप यांच्या - म्हणजे रिपब्लिकन पक्षाच्या जवळ गेले आहेत. पण ते विसरतात की ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना
, 'माय फ्रेंड बराक' असेही मोदी बोलले आहेत. तीच गोष्ट आपण बुश आणि ओबामा यांच्याबद्दल बोलू शकतो. बुश आले, तेव्हा जितके तत्कालीन पंतप्रधान अटलजी यांच्याबरोबर संबंध तयार झाले, तितकेच नंतर मनमोहन सिंग यांच्याबरोबरदेखील झाले. ते ओबामाच्या काळात अधिक वृध्दिंगत झाले. नंतर मोदींनी ते आणखी पुढे नेले. थोडक्यात, लोकशाही राष्ट्रात राजकीय बदल झाले तरी धोरणात्मक बदल, तेदेखील आंतरराष्ट्रीय संबंधात होत नसतात. ते पुढेच चालू राहतात. कारण ते राजनैतिक असतात, स्वराष्ट्राचे हितसंबध सांभाळणारे असतात. पक्षांचे अथवा पुढाऱ्यांपुरते मर्यादित नसतात.


1971 साली बांगला देश युध्दाच्या वेळेस राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी भारतविरोधात अमेरिकेचे सातवे आरमार पाठवले होते, ही त्या इतिहासातील प्रसिध्द गोष्ट आहे. त्या वेळेस निक्सन यांचे परराष्ट्र मंत्री हेन्री किसिंजर यांनी भारत, इंदिराजी आणि भारतीय यांच्याबद्दल चिडून असंसदीय अपशब्द वापरले होते. अर्थात नंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. भारताची प्रगती डोळयात भरण्याइतकी झाली. तसेच ज्या पाकिस्तानला सढळ हस्ताने पैसा दिला, त्यांच्याकडूनच 9/11च्या हल्ल्यातील दहशतवादी निघाले. ओसामा बिन लादेन मिळाला आणि अफगाणिस्तानात काहीच मदत झाली नाही. त्याच किसिंजरना मग 2005मध्ये पश्चातबुध्दी झाली. पुढे त्यांना नवीन शतकातील/सहस्रकातील आंतरराष्ट्रीय संबंधाबद्दल बोलताना खालीलप्रमाणे सांगावेसे वाटले -


The world faces four major problems - terrorism, the proliferation of weapons of mass destruction, the movement of the centre of gravity from the Atlantic region to Asia and the impact of a globalised economy on the world order. The US and India have compatible, indeed overlapping, vital national interests in all four areas.


अमेरिकेचे भारतातील माजी राजदूत ब्लॅकविल यांनी हेन्री किसिंजर यांचा संदर्भ देत
Rand या प्रसिध्द thinktankने 2009मध्ये प्रसिध्द केलेल्या लेखात वरील महत्त्वाचे वाक्य म्हटले आहे.

 

दहशतवाद, अण्वस्त्र तंत्रज्ञान चुकीच्या हातात पडण्याची शक्यता, जागतिक अर्थव्यवस्थेची अवस्था याची काळजी स्वत:साठी अमेरिकेला दहा वर्षांपूर्वीदेखील होती आणि आजदेखील तितकीच आहे. त्यात भर पडलीच असेल तर ट्रंप यांच्या साधारण अडीच-पावणेतीन वर्षांच्या कारकिर्दीत अमेरिकेने चालू केलेल्या चीनच्या विरोधातील व्यापारी युध्दाची. त्या व्यतिरिक्त ट्रम्प यांना असलेले राजकीय आव्हान आणि पुढच्या वर्षात येणाऱ्या निवडणुका, या सर्व पूर्वपीठिकेवर ट्रंप यांनी मोदींच्या 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमात जाण्याचा घेतलेला निर्णय लक्षात घेतला पाहिजे आणि भारताने आणि पंतप्रधान मोदी यांनी साऱ्या जगाला दाखवलेल्या 'सॉफ्ट पॉवर'चे स्वागत करत स्वराष्ट्राचे हितसंबध्द कसे सांभाळले जात आहेत ह्यावर लक्ष ठेवले पाहिजे. त्या स्वबळावरच जगातील दोन लोकशाही देश एकमेकांचे मित्र म्हणून राहू शकतील.