संमेलनाध्यक्ष निवडीवरून प्रश्नांचे मोहोळ

स्रोत: विवेक मराठी    दिनांक28-Sep-2019

***डॉ. राजेंद्र नाईकवाडे***

महाराष्ट्रातील प्रमुख साहित्य संस्थांनी मिळून एकमताने निर्णय घेऊन फादर दिब्रिटोंची निवड केल्याने त्याचा निषेध करणे वा उस्मानाबादच्या संमेलनावर बहिष्काराची भाषा करणे योग्य ठरत नसले, तरी या घटनांमुळे आपल्या एकूण वाङ्मयव्यवहारातील विरोधाभास, विसंगती आणि दांभिकपणा ह्यांचे जे दर्शन होत आहे, त्याचा या सर्व पार्श्वभूमीवर ऊहापोह करणे वाङ्मयीन निरामयतेकरिता आवश्यक ठरते.
 

उस्मानाबाद येथील नियोजित 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वसईचे प्रसिद्ध पाद्री, सामाजिक कार्यकर्ते मराठी लेखक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाल्याचे 21 सप्टेंबरला औरंगाबाद येथे झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत घोषित करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातील साहित्यविश्वातून विविध परस्परविरोधी प्रतिक्रियांचे तीव्र स्वर उमटताना दिसत आहेत. एक मोठी बुलंद आणि श्रेष्ठ परंपरा लाभलेल्या .भा. संमेलनाच्या इतिहासात या विचित्र निवडीमुळे एक नवाच पेच निर्माण झालेला दिसतो. 1878मधील अध्यक्ष महादेव गोविंद रानड्यांपासून ते अगदी मागील वर्षीच्या यवतमाळ संमेलनातील अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांच्यापर्यंत, वाङ्मयसेवकांची एक मोठी प्रदीर्घ परंपरा संमेलनाला लाभलेली दिसते. ही संमेलने म्हणजे आठशे-हजार वर्षांच्या मराठी वाङ्मयीन परंपरेचा अभिमानास्पद वारसा जपणारी एक प्रकारची ज्ञाननिष्ठांची, संस्कृतिनिष्ठांची आणि वाङ्मयनिष्ठांची थोर मांदियाळीच असल्याने मराठी मने त्याच्याशी जवळिकीने जोडलेली असून त्याविषयी खूप संवेदनशीलही आहेत. अशा संवेदनशील मराठी रसिक मनांना स्वाभाविकच प्रश्न पडलाय की हे फादर या श्रेष्ठ मराठी सारस्वतांच्या मांदियाळीत आणि ज्ञानदेव-तुकोबांच्या वैचारिक-वाङ्मयीन परंपरेत कुठे बसतात?

महाराष्ट्रातील प्रमुख साहित्य संस्थांनी मिळून एकमताने निर्णय घेऊन फादर दिब्रिटोंची निवड केल्याने त्याचा निषेध करणे वा उस्मानाबादच्या संमेलनावर बहिष्काराची भाषा करणे योग्य ठरत नसले, तरी या घटनांमुळे आपल्या एकूण वाङ्मयव्यवहारातील विरोधाभास, विसंगती आणि दांभिकपणा ह्यांचे जे दर्शन होत आहे, त्याचा या सर्व पार्श्वभूमीवर ऊहापोह करणे वाङ्मयीन निरामयतेकरिता आवश्यक ठरते
.

काही खूप महत्त्वाचे प्रश्न या लपूनछपून, अचानक अनपेक्षित झालेल्या निवडीमुळे नक्कीच निर्माण होतात, त्यांचा वेध घेतला गेला पाहिजे.

एखाद्या विशिष्ट धर्माचा वा पंथाचा वा जातीचा अधिकृतपणे प्रचार-प्रसार करणारी व्यक्ती (विशेषतः हिंदू धर्मीय असेल तर) ही साहित्याच्या वा विचारांच्या क्षेत्रात त्याज्य बहिष्कृतच असते, असा एक वैचारिक व्यूह आपल्या साहित्यविश्वात गेली अनेक वर्षे जोपासला गेला असताना... मग त्यात धर्मांतर करणे हाच ज्यांचा मुख्य व्यवसाय आहे (जो ते फार शिताफीने, हुशारीने, चिकाटीने, युक्तीने, शांतपणे करीत आले आहेत!) असे पाद्री फादर फ्रान्सिस त्या निकषात कसे बसतात? असा प्रश्न पडतो. म्हणजे आता आपल्या समाजातील एखाददुसरे वाङ्मयीन पुस्तक लिहिलेले अनेक साधू, संत, शंकराचार्य, कीर्तनकार, महाराज, बाबा, आध्यात्मिक धार्मिक नेते .भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी भविष्यात पात्र ठरू शकतील! तसेही अजून कुणी त्यांच्या निवडीचे समर्थन करणारे फादरांचे साहित्यिक कर्तृत्व अजून नीटपणे सांगू शकलेले नाही. उदा., पूर्वी टेरेसाबाईवर टीका करून तोंडघशी पडलेले थोर पत्रकार कुबेर आपल्या आजच्या अग्रलेखात फादरच्या सामाजिक कार्याचे केविलवाणे समर्थनच फक्त करू शकले. पूर्वी मात्र ते प्रत्येक अध्यक्षाला वाङ्मयीन कर्तृत्व विचारीत असत!

फादरबुवा असे कोण मोठे आगरकर-आंबेडकरांच्या रांगेतले थोर समाजसुधारक म्हणावे, ज्यांना त्यांच्या गौण क्षुल्लक साहित्यकृतींकडे दुर्लक्ष करीत संमेलनाध्यक्षपदी सन्मानाने विराजमान करावेच, असा घाट साहित्यसंस्थांनी घातला? साहित्यसंस्थांचा संबंध साहित्याशी कमी अन् राजकारणाशी जास्त, असा अनुभव दर संमेलनागणिक सामान्य मराठी वाचकांचा वृद्धिंगत होत जावा आणि राजनीतीसाठी उघडपणे सरस्वतीच्या व्यासपीठाचा उपयोग करणार्यांकडून याही वर्षी असेच वर्तन व्हावे, हे मराठी साहित्यसंस्कृतीचे दुर्दैवच म्हटले पाहिजे!

ज्याला वाङ्मय समीक्षेच्या प्रांतात शुद्धप्रचारकीम्हटले जाते, असेच खरे तर त्यांचेधार्मिक वा पंथीयआणिललितदोन्ही प्रकारचे वाङ्मय आहे. त्यांचे ख्रिस्ती धर्मविषयक परिचयपर प्रचारकी लेखन आणि त्यांचे कथित ललितबंधात्म लेखन दोन्ही वैचारिकदृष्ट्या तत्त्वतः सारखेच प्रचारकी आहे, पण बहुतेक मराठी वाचकांना ह्याची माहिती नसावी. एखाद्या लेखकाचे साहित्य वाचताच त्याची जात, धर्म, विचारधारा, राजकीय पक्ष बघून त्यास मोठे ठरवण्याची एक अश्लाघ्य पद्धत महाराष्ट्रातील पुरोगामी साहित्यकंपूत जी रूढ झाली आहे, त्याचेच फादर एक जिवंत उदाहरण ठरावेत.

दिब्रिटोंपुढे साहित्यिक हे विशेषण लावण्यास कारणीभूत जी दोनचार पुस्तके आहेत, त्यांचा थोडक्यात परामर्श घेणे इष्ट ठरेल. त्यांचे हे लेखन मराठीतील आत्मकथनपर अशाललित निबंधया वाङ्मयप्रकारात मोडणारे आहे. मराठी साहित्यात ह्या प्रकाराचे खूप समृद्ध असे दालन आहे. फडके-खांडेकरांपासून, कुसुमावती, इरावती, दुर्गाबाई, गो.वि. करंदीकर, पु.., पु.भा. भावे, विनोबा भावे, राम शेवाळकर, श्रीनिवास कुलकर्णी, आनंद यादव, जयवंत दळवी, ग्रेस, चितमपल्ली, यशवंत पाठक, माधव आचवल, मीना प्रभू, .मो. मराठे, चपळगावकर, शिरीष कणेकर, मुकुंद टाकसाळे, शांता शेळके, एलकुंचवार, प्रकाश संत, डॉ. अरुणा ढेरे इत्यादी लेखकांची खूप समृद्ध परंपरा या वाङ्मयप्रकाराला लाभली आहे. आनंद यादवांच्या मांडणीनुसार त्यातील मीत्वाच्या अंगाने होणार्या आठवणी-अनुभव, लघुनिबंध, प्रवासलेख, व्यक्तिचित्र आणि ललित लेख ह्या पाचही उपप्रकारात विपुल आणि दर्जेदार लेखन मराठीत झालेले दिसते. ह्या परंपरेच्या पार्श्वभूमीवर दिब्रिटोंच्या ललित लेखांतील वाङ्मयीन महानतेचा विचार करावा लागतो.

परिवर्तनासाठी धर्म, ख्रिस्तभूमीची संघर्षयात्रा, मुलांचे बायबल, पोप जॉन पॉल द्वितीय इत्यादी पुस्तके तर उघडच माहितीपर धार्मिक-प्रचारकी आहेत. नाही मी एकला हे त्यांचे आत्मकथन त्यांच्या वसई भागातील वटार गावच्या बालपणापासून ते वसईतील बिल्डरविरोधी संघर्षापर्यंतचा प्रवास रेखाटणारे आहे. 15 प्रकरणांतून 250 पानांतून ते साकारते. जन्मानंतर लागलीच बाप्तिस्मा झालेले सांतान लोर्या या ख्रिस्ती दांपत्याचे हे अपत्य. ‘जगभर पसरलेल्या विशाल कॅथलिक संप्रदायाचा मी सन्मान्य सभासद झालो. मी ख्रिस्ती झालो.’ असे त्या घटनेचे वर्णन फादर करतात. मी प्रथम भारतीय नंतर ख्रिस्ती आहे याचे भान मी नेहमीच ठेवतो हेही ते आवर्जून सांगतात. त्यावर मखलाशी म्हणून पुन्हा जे. कृष्णमूर्ती म्हणतात तसे - आपण माणूस म्हणून जन्माला येतो ही आपली ओळख पुरेशी आहे, असेही विधान ते करतात, जे विधान खरे तर त्यांच्या कडव्या ख्रिस्ती व्यक्तिमत्त्वाशी त्यांच्या एकूण जीवनक्रमाशी विसंगत ठरणारे आहे!

 

त्यांचा अगदी अलीकडे प्रसिद्ध झालेला लेखसंग्रहगोतावळामार्च 2019मधला. यात 73 लघुलेख आहेत. भेटलेल्या व्यक्ती, आलेले अनुभव, वाचलेल्या गोष्टी हे त्यांचे स्वरूप लेखक प्रस्तावनेत स्पष्ट करतो. यातली रामूची आई ही गोष्ट लेखकाला त्यांच्या एका धर्मगुरू मित्राने सांगितली आहे! एका लेखात ते आदिमानवाची म्हणून काल्पनिक ख्रिस्ती धर्मकल्पनांतील ॅडम-ईव्हची गोष्ट मोठ्या श्रद्धाभावाने, चवीने विस्ताराने कथन करतात. गोतावळा या संग्रहावर नावापासून प्रस्तावनेपर्यंत मराठीतील पूर्वप्रसिद्ध लेखकांची सावली दिसते. गोतावळाची प्रस्तावना लिहिताना पुलंच्या गणगोतची प्रस्तावना त्यांनी डोळ्यासमोर ठेवली असावी. यात कुठेतरी मोठ्या प्रमाणातकथाया वाङ्मयप्रकाराची सरमिसळ झालेली दिसते.

 

सृजनाचा मळाहा त्यांचा 23 आठवणीवजा ललित लेखांचा संग्रह. यातील बकुळफुले या लेखाची सुरुवात बघा - ‘आकाशातील पाखरांकडे निरखून बघा.. रानातील फुले बघा.. असे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितले.’ किंवा फुलला सृजनाचा मळा या लेखाची सुरुवात पाहा - ‘प्रारंभी सर्वत्र अंधार भरून उरला होता आणि देव बोलला, प्रकाश होवो! बायबलच्या पहिल्या पानावरील देवाच्या मुखातील पहिलेवहिले वाक्य... प्रकाश देवाचे पहिलेवहिले अपत्य!’ फादरबाबांचे बहुतांशी लिखाण अशाच धर्मभोळ्या, भाबड्या, अंधश्रद्ध विचारांनी भरलेले आहे. मराठी साहित्याच्या कुठल्याही प्रगल्भ वाचकाला हे लिखाण
बाळबोध जुनाट वाटण्याचाच संभव अधिक आहे. हळव्या कविहृदयाच्या धर्मोपदेशकाने रचलेली भावकविता म्हणजे सृजनाचा मळा असे जे वर्णन पाठपृष्ठावर करण्यात आले आहे, त्याऐवजी सखाराम गटणे पद्धतीची बाळबोध भावपूर्णताच सर्वत्र प्रत्ययाला येते.

 

ओअॅसिसच्या शोधात हा त्यांचा प्रवासवर्णनपर लेखसंग्रह असून त्यात 31 प्रवासलेख आहेत. हे प्रवासलेख तुलनेने अधिक विचारगर्भ, माहितीपूर्ण संदर्भसंपन्न आहेत. सोन्याचा पिंजरा या लेखात सौदी अरेबिया आणि इतर इस्लामी देशांतील कट्टर वातावरणाचे तिथल्या गैरइस्लामी नागरिकांना होणार्या त्रासाचे वर्णन करतात.

सृजनाचा मोहोर या संग्रहात काही ठिकाणी सृजनाचा मळातील वाक्यांचीच पुनरावृत्ती झालेली दिसते. स्पर्श शाश्वताचा या लेखात किंवा सृजनाचा मोहोर या लेखात ती दिसते. उदा., बायबलच्या पहिल्या पानावरील वाक्य वगैरे. फादरची बरीच वाक्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या निषेधाच्या कक्षेत येणारी आहेत खरे तर! असो.


 

जसे रेगे यांच्या मते - फा. दिब्रिटो यांच्या टिपणात एखाद्याला छुपी कार्यक्रम पत्रिका दिसू शकेल (पृ. 206, मर्मभेद.) तसे वाचकाला त्यांचे ललित लेखन वाचताना त्यात त्यांचा धर्मप्रचाराचा छुपा अजेंडा लपलेला स्पष्ट दिसतो. साखरेच्या अवगुंठणातली ही ख्रिस्ती धर्मअफूगोळी वाचकांना स्पष्ट दिसते, भलेही ती धर्माला अफू मानणार्या मार्क्सवादी नशाखोरांना मात्र दिसत नसावी. आणि इतरांना सहिष्णुतेचा उपदेश करणारे फादर स्वतः मात्र आयुष्यभर धर्माचे राजकारण करीत असलेले दिसतात. म्हणूनच बखेडे होतात ते धर्माचे राजकारण करण्यामुळे. आपण असे करीत तर नाही ना, असा विचार दिब्रिटो यांनी करावा...(पृ.209, मर्मभेद.) अशी सौम्य शब्दात मेपु त्यांना समज देतानाही दिसतात. फादरच्या एकूणच विचारांमधून, त्यांच्या टिपणातून कालकूट पाझरते आहे, हे त्यांना दिसत नाही (रेगे त्यांच्या लेखाबद्दल म्हणतात, पृ.208, मर्मभेद.) इथल्या देशी धर्मसंस्कृतीविषयी जे द्वेषपूर्ण पूर्वग्रह सातत्याने व्यक्त होतात, ते कुठलाही विवेकी अन् विचारी माणसाला निषेधार्हच वाटेल यात संशय नाही! फादरचा ख्रिस्ती बनाव उद्ध्वस्त करताना मे.पु. रेगे त्यांना ऐतिहासिक वास्तवाची आठवण करून देताना सांगतात - जेथे हिंदू बहुसंख्य आहेत, तो भारत सेक्युलर राज्य घटना स्वीकारतो. भारतीय संस्कृतीचे महावस्त्र जेथे हिंदू बहुसंख्य आहेत तेथे शाबूत राहते; पण जेथे ते बहुसंख्य नाहीत तेथे त्याच्या चिंध्या होतात. ह्याचा काही संबंध हिंदू मानसिकतेशी आहे का? (मर्मभेद. 192, मर्मभेद.)

सेवा हा ख्रिस्ती श्रद्धांचा अविभाज्य भाग आहे, असे दिब्रिटो म्हणतात. सेवा हा हिंदू धर्माचाही अविभाज्य भाग आहे. परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम् - ज्या तुकारामाचा चर्चला अलीकडे शोध लागला आहे, तो म्हणतो - जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले.

 

एस.डी. इनामदार यांनी संपादित केलेल्या प्रतिमा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्यामर्मभेद’ (मे 2007) या ग्रंथातलेखक फादरआणितत्त्वज्ञ रेगेयांची मते एकत्रितपणे संकलित झाली आहेत. फादरच्या एकूण हिंदू धर्मविषयक (केवळ हिंदुत्ववाद्यांविषयीच्या नव्हे!) पक्षपाती दांभिक मतांची वस्तुनिष्ठ कठोर चिकित्सा (खरे तर चिरफाड) मे.पु. रेगे यांनी केली आहे, ती जिज्ञासूंनी मूळातून वाचली पाहिजे, म्हणजे फादरला विरोध म्हणजे त्यांच्या संकुचित अज्ञानजन्य विचारांना विरोध ही भूमिका घेता येईल.

 

कुणी लेखक किती गोड गोड शब्दांत संयत लिहितो किंवा उत्तम भाषाभिव्यक्ती करतो, ह्यापेक्षा त्याची विचारसरणी इथल्या संस्कृतीविषयी दुटप्पी राजकीय कशी आहे हे बघणे अधिक महत्त्वपूर्ण आहे, असे मला वाटते. त्या दृष्टीने फादरच्या दयाळूपणाची, कथित संतत्वाची आणि मोठेपणाची आणि त्यांच्या विचारसरणीतील दांभिकपणाची चिकित्सा रेग्यांनी केली आहे, ती आजही ह्या फादरबाबाच्या संदर्भात प्रासंगिक लक्षणीय ठरते. कुणी भगवा चोला घातला म्हणजे तो ढोंगी कुणी पांढरा चोगा घातला म्हणून महान सेक्युलर, हा वैचारिक क्षेत्रातील सगळ्यात मोठा ढोंगीपणा आहे. ह्यांचा तर उघडपणे मुख्य व्यवसायच धर्मांतर करणे हा आहे! एका धर्माचा प्रचार करणारा इतर धर्मांवर मानभावीपणाचे सोंग घेऊन टीका करणारा एक फादरधर्मनिरपेक्षकसा ठरू शकतो? हे समजण्यापलीकडचे आहे. म्हणूनच रेग्यांनी त्यांच्या वैचारिक ढोंगाची चिरफाड करताना त्यांना प्रश्न विचारला होता, की हिंदू धर्माच्या अभिमान्यांनामनूवादीम्हणणारे फ्रान्सिस स्वतःस मगिइन्क्विझिशनवादीम्हणतील का?

फादरच्या लेखनाचे नीट, मुद्देसूद असे वाङ्मयीन वैचारिक ह्या दोन्ही अंगांनी मूल्यांकन करायला हवे. ह्या संमेलनाच्या निमित्ताने आपल्याला तशी संधी प्राप्त झालेली आहे. प्रस्तुत लेखात तसाच एक छोटासा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यांची बहुतांशी पुस्तके ख्रिस्ती धर्मप्रसाराच्याशुद्ध वाङ्मयीन’, ‘उदार’, ‘दयाळू’, धर्मनिरपेक्षहेतूने लिहिलेली आहेत. त्या प्रचारकी साहित्याचा मराठी साहित्यात समावेश करण्याची गरज नाही. ह्यातून मग उरतात त्यांची पाच आत्मकथनात्मक ललितबंधात्म पुस्तके. ‘नाही मी एकलाहे आत्मकथन, ‘ओएसिसच्या शोधातहा प्रवासवर्णनपर लेखसंग्रह, सृजनाचा मळा, सृजनाचा मोहोर आणि गोतावळा हे तीन ललित लेखसंग्रह. यात ते मराठी वाचकांना चिरपरिचित असणार्या गूढ, आध्यात्मिक आणि निसर्गमय भाषाशैलीचा आधार घेतात. परंतु याही लेखनात प्रामुख्याने त्यांच्यातला ख्रिस्ती धर्मप्रचारक सर्वत्र छुपेपणाने वावरताना दिसतो. त्यामुळे मराठी साहित्यात अगदीचचार ओळींचेयोगदान असणार्या फादरांच्या निवडीमागे पुरोगामी मंडळींचे राष्ट्रीय पातळीवरील नियोजनबद्ध कटकारस्थान तेवढे दिसते. अर्थात त्यामुळे महामंडळाने नियमानुसार निवडलेल्या व्यक्तीची निवड चुकली, एवढेच आपण म्हणू शकतो. आणि ह्या कृतीतून कथित पुरोगामींचेच ढोंग उघडे पडते.