पुत्र व्हावे ऐसे...

स्रोत: विवेक मराठी    दिनांक11-Jan-2020
|

 सगळीच मुले घरच्यांना पाहतच लहानाची मोठी होतात. सहसा त्याच पठडीत जातात, सगळेच पालक आपल्या मुलांच्या भल्यासाठी झटत असतात. आम्ही काही फार वेगळे केले असे अजिबात नाही. फक्त त्यांनी घेतलेल्या निर्णयांच्या मागे खंबीरपणे उभे राहिलो. रुळलेली वाट मोडायची ठरवली तेव्हा आडता घातला नाही. वेगवेगळया गोष्टी करून पाहाव्याशा वाटल्या तेव्हा शक्य झाल्या तेवढया संधी घेऊ दिल्या. जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल बोलणे होई, तेव्हा ती माहिती नसेल, तर त्याबद्दल आम्हीही माहिती काढली.


youth_1  H x W:


18 डिसेंबर 2019ची दुपार. फोन खणखणला. ''आई, कधी नव्हे ते विमानतळावर दोन तास आधी जाऊनही आज माझे इस्रायलचे विमान हुकले.'' पलीकडून सायप्रस विमानतळावरून लेक बोलत होता, आणि कारण काय, तर म्हणे मी इस्रायली सिक्युरिटी करणे टाळले. खरे तर आदल्या रात्री ऑनलाइन चेक इन केले असल्याने आणि तेव्हा कोणतीही सूचना न मिळाल्याने तो थेट गेटवर गेला होता. त्या वेळी त्याला वरील कारण सांगून विमानात बसू तर दिले नाहीच, शिवाय 15-20 मिनिटे पोलिसांच्या कडक चौकशीला सामोरे जावे लागले. एकटा पुरुष प्रवासी हा म्हणे त्यांच्या धोक्याच्या यादीत असतो. त्यात हा दिसायला ब्राउन (भारतीय), पासपोर्ट न्यूझीलंडचा आणि आलाय जर्मनीतून. इस्रायलमध्ये कोणी ओळखीचे नसताना केवळ फिरायला आलाय, हे त्या लोकांच्या दृष्टीने विचित्रच. शेवटी अनेक सोपस्कार होऊन त्याला एस्कॉर्ट केले गेले आणि पुन्हा आत येऊन नवे तिकीट काढून तो सायप्रसवरून इस्रायलला रवाना झाला. हे सगळे होताना मी काळजीत आणि तो नेहमीप्रमाणे शांत होता. नव्याने काढाव्या लागलेल्या तिकिटाच्या 50 युरोच्या बदल्यात मला कितीतरी शिकायला मिळाले हा त्याचा दृष्टीकोन मला पुन्हा एकदा अचंबित करून गेला.
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

 अनिश, माझा मोठा मुलगा. पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनीचा विद्यार्थी. मात्र वयाच्या 19व्या वर्षी, ''मला घोका आणि ओका या परीक्षा पध्दतीत शिकायचे नाही'' असे म्हणून न्यूझीलंडला गेला, हातात इथली कोणतीही डिग्राी नसताना केवळ जिद्दीच्या जोरावर. तिथे मनासारखे शिकताना प्रचंड कष्ट केले आणि कुराण, बायबल, उपनिषदे, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, जागतिक इतिहास, राजकारण अशा वेगवेगळया गोष्टींचा अभ्यास केला. सर्टिफाइड इंजीनिअर झाला. त्यानंतर जागतिक पातळीवरच्या प्रकल्प व्यवस्थापनशास्त्राच्या (प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या) परीक्षा विशेष प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण झाला. 2009मध्ये त्याने जेव्हा तिकडे जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा आमच्यासाठी तो धक्काच होता. इथला अभ्यास झेपत नसताना - म्हणजे परीक्षेत उत्तम गुण मिळवत नसताना तिकडे जाऊन काय करणार, हा माझ्या मनात आलेला पहिला प्रश्न. तो मात्र त्याच्या विचारावर ठाम होता. तसाही तो पहिल्यापासूनच धीट आणि स्वतंत्र विचारांचा होता. youth_1  H x W:

एकदा न्यूझीलंडला गेल्यावर मग अतिशय खडतर वाटेवरून प्रवास करत त्याने यश मिळवले. हॉटेलमध्ये वेटर, बार-टेंडर, सिक्युरिटी गार्ड अशा नोकऱ्या केल्या. काही वेळा पोटभर जेवायला मिळेल की नाही, अशी परिस्थिती असायची; पण एकदा परदेशी गेल्यानंतर आमच्याकडून एकही पैसा घेणे त्याने नाकारले. तिथे असताना झालेले अपघात, कराव्या लागलेल्या शस्त्रक्रिया सगळयाला एकटयाने तोंड दिले. अगदी बसचे पैसे वाचवण्यासाठी ऑपरेशन झाल्यावरही ऑफिसला चालत जायचा. इकडे आमचा जीव तळमळत असायचा. मात्र हा हट्टी मुलगा कसलीही मदत घेणे नाकारायचा.

 
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना त्याच्या म्हणण्याखातर आम्ही त्याला परदेशी जायची परवानगी दिली, त्याच वेळी धाकटया मुलाने नाशिकला भोसला मिलिटरी स्कूलमध्ये जायचा हट्ट केला, तेव्हा त्याच्याही निर्णयाला पाठिंबा दिला. लोकांच्या मते आम्ही अतिशय मूर्खपणा करत होतो. प्रबोधिनीचा विद्यार्थी असूनही बारावीला नापास झालेला मोठा परदेशी जातो म्हणतो आणि 7वी पर्यंत मराठी माध्यमात शिकणारा धाकटा एकदम आठवीत इंग्लिश माध्यमात, तेही मिलिटरी स्कूलमध्ये जायचे म्हणत होता. मुले ढीग म्हणतील, तुम्हाला कळत नाही का? हा प्रश्न खूप जणांनी विचारला. मात्र आमचा आमच्या मुलांवर विश्वास होता. ते जे काही करतील ते नक्की चांगले करतील याची खात्री होती. यश मिळेल-न मिळेल हा नंतरचा भाग. किमान ते आपले 100% देऊन प्रयत्न करतील याची खात्री होती. मुलांनी हा विश्वास कधीच खोटा ठरवला नाही.

अनिशने त्याला हवे ते मिळवले. आधी काही वर्षे जिथे चालत फिरला, त्याच रस्त्यांवरून बीएमडब्लू झेड 4 ही आलिशान स्पोर्ट्स कार विकत घेऊन हिंडला. वेटरपासून सुरुवात करून वेगवेगळया नोकऱ्या करत, पुढे शिकून वरच्या पदावर जात कंपनीच्या खर्चाने विमानामधून प्रवास करत पंचतारांकित हॉटेल्समध्ये राहिला. हे म्हटले तर यशच होते. मात्र ''चांगलाच धाडसी निघालास तू. मस्त केलेस एकदम सगळे'' असे एकाने म्हटल्यावर, ''यश मिळाले म्हणून धाडस म्हणतायत लोक. नाहीतर नसता मूर्खपणा केलाय असे म्हटले असते'' असे उत्तर त्याने दिले होते.

 

गेल्या वर्षभरात आता सगळे छान चाललेय असे वाटत असताना महिना काही लाखांच्या पगारावर पाणी सोडत आपले जगप्रवासाचे स्वप्न साकार करायला अनिश बाहेर पडला. वर्षभर नोकरी करून महिनाभर सुट्टी घेऊन एखादा देश फिरता आला असता; पण त्याला ते करायचे नाहीये. मला हवे तेव्हा हवे ते करता आले पाहिजे असा आत्ता तरी सूर आहे. मिळवलेल्या सगळया गोष्टी तिथेच सोडून केवळ एक बॅग आणि पाठीवर एक सॅक एवढेच सामान घेऊन अनिश भारतात परतला आणि 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच सलग तीन महिने इथे राहून मग केवळ पाठीवरच्या एका सॅकमध्ये मावेल इतकेच सामान घेऊन जर्मनीला गेला. तिथे काही काळ नोकरी करून सध्या युरोपमध्ये फिरतो आहे. मूळच्या जिप्सी वृत्तीला साजेसेच वागतो आहे. 'सेटल होणे' याबाबतच्या त्याच्या आणि समाजाच्या मान्यतेतच मोठा फरक आहे.

दुसरीकडे कायम शांत, अंतर्मुख, आपण बरे आपले काम बरे असा असणारा अमर... माझा धाकटा लेक. तो भोसला मिलिटरी स्कूलचा दोन सलग वर्षे 'बेस्ट रामदंडी' (कॅडेट) ठरला. थेट आठवीत इंग्लिश माध्यम घेऊन जड जाईल, नापास झाला तर तुम्ही शाळेला दोष देणार नाही, हे शाळेत आम्हाला ऐकायला लागल्यावर जिद्दीने अभ्यास करून 92% मिळवून आठवीत शाळेत पहिला आला. धनुर्विद्येत राष्ट्रीय पातळीवर खेळून आला. मिलिटरी ट्रेनिंगमध्ये नैपुण्य मिळवताना बाहेरच्या शालेय विद्यार्थ्यांना ते शिकवण्यासाठीही त्याची निवड झाली. शिवाय नाटयस्पर्धा, वक्तृत्वस्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्याने शाळेला बक्षिसे मिळवून दिली. सैन्यात जायची इच्छा असताना एनडीएमध्ये परीक्षा पास होऊनही केवळ चश्मा असल्याने नेव्ही घेता येणार नाही हे समजल्यावर पूर्ण वेगळया क्षेत्रात गेला. उत्तम गिटारिस्ट, गायक, लेखक, कवी... दिग्दर्शक. बक्षिसे मिळवून त्याने ते सिध्द केलेय. इतर काही नाटकांना संगीत देतानाच त्याने अतुल पेठेंच्या समाजस्वास्थ्य नाटकाचे ध्वनिआरेखन केले. दोन स्पेशल नाटकाचा शो क्यू ऑपरेटर बनला. त्याच्या लेखन-दिग्दर्शनाविषयी त्या क्षेत्रातल्या नामवंतांकडून दाद मिळाली. त्याचेच लेखन, दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका असणाऱ्या नाटकाची काला घोडा आर्ट फेस्टिवलसारख्या प्रतिष्ठित महोत्सवात निवड झाली होती. त्याचे विचारही खूप निराळेच असतात.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

दादाने जसे आपले विश्व शून्यातून उभे केले तसेच आपणही करावे अशी त्याची इच्छा. म्हणूनच तर अनिशने त्याला न्यूझीलंडला बोलावूनदेखील तो शिक्षणासाठी तिकडे गेला नाही. आम्हालाही त्याचा अभिमान आहे. एकदा वाटले होते, सहजी होते आहे, तर त्यानेही जावे तिकडे. जास्त सुखसोयी मिळतील. चांगले शिकता येईल. पण तोही आपल्या निर्णयावर ठाम राहिला.

हा लेख लिहायचा म्हटल्यावर नेमके काय लिहावे असा प्रश्न आधी पडला होता. आपण पालक म्हणून वेगळे काय केले असेच वाटले. अखेर विचार करत काही वर्षे मागे गेले. अनिश सातवीत असताना त्याला नवी गिअरची सायकल घ्यायची होती. त्याची त्याला दुकाने फिरून सगळी माहिती काढायला सांगितली. ती काढताना त्याच्याच लक्षात काही गोष्टी आल्या आणि मग चर्चेअंती साधी सायकल घेण्याचा निर्णय झाला. तशीच गोष्ट घडली अमरच्या मिलिटरी स्कूलमध्ये प्रवेश घेण्याच्या वेळी. उन्हाळी सुट्टीत तिथे शिबिराला जाऊन आल्यावर भारावलेल्या मन:स्थितीत तो हा हट्ट करतो आहे, असे आम्हाला वाटत होते. शेवटी त्याच शाळेत का जायचे आहे याची किमान 10 कारणे लिहून दे, असे त्याला सांगितल्यावर त्याने त्यापेक्षा जास्त कारणे लिहून दिली. आम्ही त्याला त्या शाळेत घातले असतेच, पण आपण जी गोष्ट करू पाहतो आहोत ती का करायची आहे याची स्पष्टता त्यांच्या मनात असायला हवी, यासाठी यांसारख्या गोष्टी आम्ही केल्या. हीच गोष्ट माझ्याही बाबतीत घडली. गेल्या वर्षी आपल्या कमाईतून मला नवी गाडी घेताना अमरने मलाही आधी अभ्यास करायला लावला, दहा ठिकाणी फोन करायला लावले, सुट्टीच्या दिवशी माझ्याबरोबर येऊन गाडी चालवून बघायला लावली आणि मगच नवी गाडी घेतली. केवळ अमुक एक गाडी आवडते एवढे कारण खरेदीसाठी पुरेसे नाही, असे मलाही बजावले गेले होते. भूमिकेतला हा बदल माझ्यातल्या आईला सुखावून गेला.

 

कोणतेही निर्णय घेताना त्याचा आपल्याला शक्य तेवढया बाजूंनी विचार करायचा, त्याचे बरे-वाईट परिणाम काय होऊ शकतात याचा अंदाज घ्यायचा, चर्चा करायची आणि मग मनाला योग्य वाटेल तो निर्णय घ्यायचा अशी सवय हळूहळू त्यांना लागली, आणि एकदा का निर्णय घेतला की त्याच्या परिणामांची जबाबदारी आपणच स्वीकारायची असते, हा धडा कळत-नकळत आमच्या वागण्यातून मुलांच्या मनावर बिंबला गेला असावा. घेतलेले निर्णय चुकूही शकतात. आपण कायमच यशस्वी ठरतो, असे नाही. अपयशदेखील पचवता आले पाहिजे, हे बाबांनी समजावले. आधी मी काहीशी चाकोरीचा आग्राह धरणारी होते. परीक्षेतले मार्क, स्पर्धांमधले यश हे मला महत्त्वाचे वाटे. खूप काही करायची क्षमता असताना केवळ आळसापोटी काहीही न करणे म्हणजे मुलांनी अंगच्या गुणांचा अपमान करणे आहे असे वाटे. हे मत बदलण्यासाठी मला स्वत:त बदल करावे लागले. ते मुलांच्या बाबांमुळे शक्य झाले.

 

मुले लहान असताना साहजिकच मोठेपणी कोण होणार या प्रश्नाला वेगवेगळी उत्तरे येत. आजूबाजूच्या मित्रमंडळींची, नातेवाइकांची समवयस्क मुले जेव्हा इंजिनिअरींग, मेडिकल अशा रुळलेल्या वाटांवरून जात होती, तेव्हा आमची मुले मात्र काहीतरी वेगळेच करू पाहत होती. उत्तम बुध्दिमत्ता असूनही या शाखा न निवडण्यामागे त्यांचे म्हणून काही विचार होते. आर्थिक, सामाजिक स्थैर्य देणारे हे व्यवसाय असूनही आम्ही त्यांच्या निर्णयाचा आदर ठेवला. त्यांचे बाबा लहानपणापासून 'एक चांगला माणूस बना' असेच त्यांना सांगत. चांगला माणूस म्हणजे काय हे थेट, स्पष्ट शब्दांत कधीच त्यांना सांगितले नाही. रात्री झोपताना मी त्यांना पौराणिक, ऐतिहासिक गोष्टी सांगत असे, तर बाबा प्राणी-पक्षी यांच्या दैनंदिन दिनचर्येच्या गोष्टी रचून सांगत. त्या गोष्टींमधून नकळत चांगले वागणे काय असते हे त्यांच्यापर्यंत पोहोचले असावे, असे वाटते.

घरात आमच्या चौघांच्याही आवडी-निवडी बऱ्याच सारख्या. संगीत ऐकणे, चित्रपट पाहणे, वाचन या सगळयाची प्रचंड आवड. चांगले काही पाहिले, ऐकले, वाचले की त्यावर चर्चा, हिरिरीने मतप्रदर्शन होई, अजूनही होते. आता त्यात जगभरचे संगीत, चित्रपट आणि साहित्य असते. मुलांबरोबर आमचाही परीघ विस्तारतो आहे. मराठी माध्यमात शिकत असतानाही दररोज इंग्लिश 'टाइम्स ऑफ इंडिया' वाचला पाहिजे, असा बाबांचा दंडक होता. विचार करताना भाषांतर करण्याऐवजी तो थेट इंग्लिशमधून करता आला पाहिजे, असा आग्राह होता. त्यामुळे दोन्ही मुलांची दोन्ही भाषांवर उत्तम पकड आहे. याचा परिणाम म्हणजे परदेशी जाताना द्याव्या लागणाऱ्या परीक्षेत इंग्लिश मातृभाषा असणाऱ्या मुलांपेक्षा अनिशचा स्कोअर जास्त होता. धाकटा अमर इंग्लिशमधून मराठीत अनुवादही करतो. दोन पुस्तके करून झाली आहेत. सध्या तिसऱ्याचे काम चालू आहे. जोडीला मानसशास्त्राचा अभ्यास, एका स्वयंसेवी संस्थेबरोबर तरुणाईच्या महत्त्वाच्या विषयांवरील प्रकल्प, शॉर्ट फिल्म्स, गिटारचे क्लास घेणे, एकांकिका लेखन-दिग्दर्शन असे सगळे जमेल तसे चालूच आहे. एक ठरावीक नोकरी, ठरावीक कमाई याचा अजून तरी दोघांना कंटाळा आहे. जोवर चालवता येईल तोवर चालवू, मग काय तो विचार करू असे म्हणतायत. ठीक आहे, म्हणून आम्हीही गप्प आहोत.

जसे आम्हाला पाहत लहानाची मोठी होताना मुले काही शिकली, तसेच आम्हीही बरेच काही शिकलो. पालक म्हणून आमचे वयही मुलांच्या वयाइतके आहे. त्यामुळे समवयस्क होऊन वागलो. आमच्याकडे असणारे मोकळे वातावरण पाहून त्यांच्या सगळया मित्रांना आश्चर्य वाटे. आमच्या घरी सारे मित्रमंडळ खूश असे. कॉलेजला बंक करून पाहिलेले चित्रपट, केलेल्या सहली, लावलेल्या पैजा, इतकेच काय, कधी कुठे आवडलेली मुलगी, असे सगळे आमच्याशी मोकळेपणाने बोलताना मुलांना कधीच अवघड वाटले नाही. मुलांमुळे आम्ही वेगळे विचार करायला शिकलो, चाकोरी मोडून जाण्यात वेगळीच मजा आहे हे शिकलो. माझ्या लेखनाचे पहिले वाचक माझे यजमान असले, तरी पहिली टीकाकार माझी मुलेच आहेत. मी तर म्हणते, 'निंदकाचे घर असावे शेजारी म्हणतात, पण आपल्या घरातच आहेत.' पण तेवढाच या गोष्टीचा आम्हा सर्वांनाच फायदाही होतो.

खूप जणांना वाटते, 'मुले अशी वेगळया वाटा चोखाळत आहेत. तुम्ही याला परवानगी कशी दिली? हे खूप मोठे धाडस आहे.' काही लोकांच्या मते, हे 'नसते धंदे' कसे करू देता? ऐकत नाहीत म्हणजे काय, द्यायचे सरळ लग्न लावून, गप लायनीवर येतील... इ.इ. मीही एक आई आहे. माझ्या मुलाने वेळेत लग्न करावे, आयुष्याला एक स्थैर्य प्राप्त व्हावे असे मलाही वाटत होतेच; पण त्याची इच्छा वेगळी आहे हे समजल्यावर त्याला पाठिंबा देणे जास्त योग्य वाटले. मुळात एकतर सगळयांनी आधी शिकणे, मग काम करणे, पैसे मिळवणे, मग लग्न, मुले-बाळे या चाकोरीतून जायलाच हवे असे काही नाही, यावर विश्वास ठेवला. शिवाय मी नाही म्हटले असते, तरी त्यांनी त्यांना हवे ते केलेच असते. ते करायचे, निर्णय घेण्याचे शिक्षण आणि स्वातंत्र्य आम्हीच त्यांना दिले होते. मग त्यात मोडता घालणे हा दुटप्पीपणा ठरला असता, आणि आई नाही म्हणाली होती ही एक बारीकशी बोच कायमस्वरूपी त्यांच्या मनात राहील असेही वाटले, कारण बाबा तर कायमच त्यांच्या बाजूने. त्यामुळे चर्चा करून झाल्यावर सहज निर्णय स्वीकारले गेले, याचे त्यांनाही समाधान आणि आम्हालाही. केल्याने देशाटन, पंडित मैत्री... ही केवळ म्हण न राहता हे त्यांनी अनुभवावे हा हेतूदेखील आहेच. त्यांच्यामुळे आम्हालाही कित्येक नव्या गोष्टी समजतातच की.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

सगळीच मुले घरच्यांना पाहतच लहानाची मोठी होतात. सहसा त्याच पठडीत जातात, सगळेच पालक आपल्या मुलांच्या भल्यासाठी झटत असतात. आम्ही काही फार वेगळे केले असे अजिबात नाही. फक्त त्यांनी घेतलेल्या निर्णयांच्या मागे खंबीरपणे उभे राहिलो. रुळलेली वाट मोडायची ठरवली तेव्हा आडता घातला नाही. वेगवेगळया गोष्टी करून पाहाव्याशा वाटल्या तेव्हा शक्य झाल्या तेवढया संधी घेऊ दिल्या. जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल बोलणे होई, तेव्हा ती माहिती नसेल, तर त्याबद्दल आम्हीही माहिती काढली.

हा पालकत्वाचा प्रवास सरळसाधा मुळीच नव्हता. खूप खाचखळगे आले, चढउतार आले, सगळया पिढयांमध्ये होतात तसे संघर्षाचे प्रसंगही आले, टिपिकल 'तू तू मैं मैं'सुध्दा झाले. मात्र काही झाले तरी आपण एकमेकांचे, एकमेकांसाठी आहोत हे भान कधीच सुटले नाही. आम्ही जसे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी जोडून आहोत, तशीच मुलेही नातेसंबंध जपून आहेत. माणसे ही खरी संपत्ती हे त्यांना पटलेले आहे. काही वेळा माणसे जपण्यासाठी त्यांनी स्वतःच्या मनाला मुरड घातलेली आम्ही अनुभवली आहे. दुसऱ्याच्या आनंदासाठी कित्येकदा मनाविरुध्द काही गोष्टी केल्या आहेत. काही काही बाबतीत मात्र कसलीच तडजोड नाही, हादेखील अनुभव घेतलाय.

 

अजून तरी मुलांनी त्यांना आयुष्यभर काय करायचे आहे हे ठरवलेले नाही. जेव्हा केव्हा ते ठरेल तेव्हाही त्या निर्णयात आम्ही सहभागी असू. बदलत्या काळाबरोबर माणसेही बदलतात. कदाचित आम्हीही बदलू, पण आमच्यातले हे बंध बदलणार नाहीत. मुले कुठेही जावोत, काहीही करोत, सर्वात आधी त्यांना ते आमच्याशी शेअर करावेसे वाटते. आपल्या या वेगळया वाटेवरच्या प्रवासात आपण धडपडलो, तरी सावरून घेणारे हात आणि मायेचे छप्पर कायम आपल्यासाठी असणार आहे ही आमच्याबद्दल त्यांना खात्री असणे, हे पालक म्हणून आमचे यश आहे असे वाटते. पुढेही हे नाते असेच टिकून राहो ही देवाकडे प्रार्थना!

 

आरती देवगावकर

8380015450

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/