सामाजिक जाणीवेची सप्तपदी डॉ. जयश्री आणि व्ही. मुरलीधरन

स्रोत: विवेक मराठी    दिनांक13-Jan-2020
|

**मेधा किरीट*** 

अविरत काम
, काम आणि काम हे डॉ. जयश्री आणि व्ही. मुरलीधरन या दोघांचेही वैशिष्टय. दोघांनीही राष्ट्रकार्यासाठी वाहून घेतलेले आहे. सामाजिक-राजकीय काम म्हणजे लोखंडाचे चणे चावण्याइतके कठीण असते. अर्थातच यातूनही मार्ग निघतोच. राष्ट्रकार्य हे मूळ ध्येय दोघांचेही समान असल्याने,
क्वचित कधी मतमतांतरे झाली तरी दोघेही एकमेकांच्या मताचा आदर करतात. समोरच्याचे वेगळे मत लक्षात घेऊनही सुसंवाद राखण्याचे मोकळेपण त्यांच्या नात्यात आहे. मनमोकळा संवाद हेच त्यांच्या यशस्वी दांपत्यजीवनाचे गमक आहे.


Biodata of V. Muraleedhar

तत्त्वनिष्ठेचे आजच्या काळातले उदाहरण म्हणून डॉ. जयश्री आणि व्ही. मुरलीधरन या जोडीचे नाव ओठांवर येते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण होऊन मान आपसूक आदराने झुकते. हे दोघेही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि रा.स्व. संघ यांच्या मुशीतून तयार झाले आहेत. 'समाजसेवेचे व्रती' अशी त्यांची ओळख जास्त सयुक्तिक आहे. लग्न करताना दोघांची काही गोष्टीत मते जुळली. उदा. - जात सांगायची नाही, आडनाव लावायचे नाही आदी. तसे तर महाराष्ट्र आणि इतर ठिकाणी जसे लग्नानंतर मुली नाव बदलतात, सासरचे आडनाव लावतात तशी पध्दत जयश्रीताईंच्या प्रदेशात अत्यावश्यक समजली जात नाही. प्रत्येकाने आपापल्या इच्छेनुसार करावे असे असते. त्यामुळे जयश्रीताईंनी माहेरचेच नाव कायम ठेवले. आणखी एका महत्त्वाच्या विषयावर त्या दोघांमध्ये व्यवस्थित चर्चा होऊन एकमत झाले, तो म्हणजे या जगाची वाढती लोकसंख्या ध्यानात घेऊन आपले मूल हवेच असे काही नाही, कालांतराने जर अशी इच्छा झाली किंवा भावनिक आवश्यकता वाटली, तर तेव्हा मुलाचा विचार करता येईल, सध्यातरी आपल्या सहजीवनात सामाजिक कामालाच प्राधान्य असेल, अशा वैशिष्टयपूर्ण विचारांच्या सप्तपदीवरून 1998पासून त्यांचा सहप्रवास चालू आहे.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या संशोधन आणि विकास या विभागांतर्गत अखिल भारतीय पातळीवर एका अभ्यास प्रकल्पात काम करण्याची संधी मिळाली. भारतीय स्त्री शक्तीच्या वतीने मी त्यात सहभागी झाले होते. विषय नाजूक होता. निर्भया कांडाच्या आधीचे आणि नंतरचे सरकारी धोरण, कायदे आणि अंमलबजावणी याचा तुलनात्मक अभ्यास करणे अपेक्षित होते. त्यासाठी चार प्रांत निवडण्यात आले होते. उत्तर प्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र आणि केरळ. केरळमधील अभ्यास गटाच्या प्रमुख होत्या, तत्कालीन भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. जयश्री. या अभ्यासाच्या निमित्ताने माझे केरळ येथे जाणे झाले. जयश्री कोझिकोडे (कालिकत) येथे राहत होत्या. उत्तरेला असलेले वायनाड आणि दक्षिणेचे त्रिवेंद्रम हे दोन जिल्हे अभ्यासासाठी निवडलेले होते. केरळमध्ये दोन ठिकाणांमधली अंतरे खूप आणि दळणवळणाची साधने त्या मानाने अपुरी. महाराष्ट्राच्या आणि दिल्लीच्या संदर्भात मी या अभ्यासाची तुलना करायचे, तेव्हा केरळचा अभ्यास मागे आहे असे वाटायचे, काळजी वाटायची. मात्र जेव्हा मी केरळला गेले आणि जयश्रीताईंना भेटले तेव्हा निश्चिंत झाले. मध्यम उंची, मध्यम बांधा, सावळा रंग, मध्ये भांग पाडून घातलेली लांब एक वेणी. हातात साधी बांगडी. आणि कुंकवाबरोबर दिसेल-न दिसेलसा अंगारा. साधीशीच पण नेटकेपणाने नेसलेली साडी, नाकीडोळी नीटस अशी ही टिपिकल दक्षिण भारतीय महिला. चेहऱ्यावर मात्र बुध्दीचे आणि अंगभूत करारी स्वभावाचे तेज. त्यानेच तिचे वेगळेपण उठून दिसत होते. एकदा हाती घेतलेली गोष्ट पूर्ण केल्याशिवाय या ताईंना समाधान लाभणार नाही, असे स्पष्ट दिसत होते. झालेही तसेच. कठीण परिस्थितीतून केलेला केरळचा अभ्यास इतर तीन राज्यांच्या अभ्यासात वेगळा उठून दिसणारा होता. तसे केरळ हे राज्य अनेक बाबतीत भारताच्या अन्य राज्यांपेक्षा वेगळेपण दाखवते. तेथे असलेली नैसर्गिक संपदा, सुशिक्षित प्रजा, कष्टाळू स्वभाव आणि परदेशातून येणारी संपत्ती याचबरोबर जनतेमध्ये साम्यवादाचा खोलवर रुजलेला पगडा. अशा ठिकाणी रा.स्व. संघ आणि परिवाराचे, तसेच जनसंघ किंवा भाजपाचे काम वाढवणे म्हणजे कातळावर शेती करण्यासारखे आहे. 1967मध्ये कालिकत येथे पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन झाले, तेव्हापासून प्रयत्न करूनही आजपर्यंत केरळ राज्यात सत्ता प्राप्त करता आलेली नाही. आजही केरळमध्ये संघ आणि भा.ज.पा. कार्यकर्त्यांच्या हत्या घडत असतात.


Biodata of V. Muraleedhar

माझा या भागात प्रवास झाला, त्याआधी दोनच दिवस त्या भागात एका संघस्वयंसेवकाची हत्या झाली होती. निम्न मध्यमवर्गीय परिस्थितीतील तरुणाची निर्घृण हत्या. मी काम संपवून जयश्रीताईंसमवेत त्यांच्या घरी गेले होते, तेव्हा त्यांचे पती आणि भाजपाचे प्रांत अध्यक्ष (तेव्हा ते खासदार किंवा मंत्री नव्हते.) मुरलीधरनजी नुकतेच मृत कार्यकर्त्याच्या घरून आले होते. कितीही लपवली तरी त्या पतिपत्नीच्या चेहऱ्यावरची विमनस्कता लपत नव्हती, त्याचबरोबरचा निर्धारसुध्दा. काही काळानंतर होणाऱ्या कालिकत येथे भाजपाच्या अधिवेशनाची पूर्वतयारीही एकीकडे चालू होती अाणि एकीकडे अशा घटनांनाही तोंड द्यावे लागत होते.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

अविरत काम, काम आणि काम हे या दोघांचेही वैशिष्टय. दोघांनीही राष्ट्रकार्यासाठी वाहून घेतलेले आहे. जयश्रीताई म्हणजेच डॉ. के.एस. जयश्री या केरळ विश्व विद्यालयात संस्कृतच्या प्राध्यापक आहेत. त्यांचे वडील के.एस. श्रीधरन पिल्ले हे पंडलम या छोटया शहरातील शाळेत शिक्षक होते, तसेच ते रा.स्व. संघाचे स्वयंसेवक होते. आई श्रीमती आनन्द्वल्ली अम्मा ह्या सरकारी शाळेत शिक्षिका होत्या आणि मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या. घरात वातावरण शैक्षणिक आणि राष्ट्रभक्तिनिष्ठ, लोकांची सतत ये-जा. त्यामुळे आपोआपच संस्कार झाले आणि महाविद्यालयात असल्यापासूनच अ.भा.वि.प.च्या माध्यामातून विद्यार्थी चळवळीत त्या सामील झाल्या. पदवीनंतरचे शिक्षण - संस्कृतमध्ये द्विपदवीधर, एम.फिल. आणि पीएच.डी. केरळ विश्वविद्यालयातील वसतिगृहात राहून झाले. दरम्यान त्या थिरुवनन्तपुरम येथे बी.एड. करत होत्या. याच काळात त्यांना मुरलीजींनी लग्नाबद्दल विचारले. तसे जयश्रीताई मुरलीजींना दहा वर्षापासून ओळखत होत्या. ते अ.भा.वि.प.चे पूर्णवेळ कार्यकर्ता होते. सर्वांची सहमती होतीच. सप्टेंबर 1998ला गुरुवायुर मंदिरात अतिशय साधेपणाने दोघे विवाहबध्द झाले.

मुरलीजींचा जन्म मलबार किनाऱ्यावरील कुन्नूर जिल्ह्यातील तेल्लीसेरी या छोटया शहरात झाला. वडील व्ही. गोपालन हे सरकारी नोकरीत होते आणि आई एन.व्ही. देवकी या शाळेत शिक्षिका होत्या. घरातील वातावरण संघाला सहानभूती असलेले असे होते. कुन्नूर जिल्हा म्हणजे साम्यवादी आणि संघवादी यांच्यातील संघर्षाचा गड. तेथूनच मुरलीजींनी इंग्लिश साहित्यात पदवी संपादन केली आणि 1979मध्ये ते अ.भा.वि.प.चे प्रचारक म्हणून काम करू लागले. आणीबाणी नुकतीच संपली होती. जनता पार्टी सत्तेत होती, मात्र दक्षिणेत त्याचा मागमूस नव्हता. तेथील राजकारण स्थानिक नेत्यांच्या प्रभावाखालीच होते. अशा वेळी मुरलीजींच्या वडिलांचे निधन झाले. घराची जबाबदारी त्यांच्यावर आली. ते सरकारी नोकरीत लागले. पण 1980 साली एका साम्यवादी कार्यकर्त्याची हत्या झाली. त्याचा संशय त्यांच्यावर घेण्यात आला आणि त्यांना अटक केली. नोकरीतून सस्पेंड केले गेले. दोन महिन्यांनी सरकारने केस मागे घेऊन त्यांची सुटका केली, कारण मुरली नावाच्या दुसऱ्याच कुणी इसमाने तो खून केला होता. मात्र नामसाधर्म्यामुळे निर्दोष मुरलीजींवर आळ घेण्यात आला होता. ते पुन्हा नोकरीवर रुजू झाले. ह्या अडचणीच्या वेळी त्यांची आई ठामपणे समाजाच्या आणि लोकापवादाच्या विरोधात त्यांच्याबरोबर उभी राहिली. 'माझ्या मुरलीने असे काहीही केलेले नाही, तो यातून निर्दोष सुटेल' असा विश्वास त्यांना होता.

मुरलीजीपेक्षा जयश्रीताई बारा वर्षांनी लहान आहेत. लग्न झाले, तेव्हा त्या पीएच.डी. करीत होत्या. लग्नानंतर जयश्रीताईंनी आपले शिक्षण पूर्ण केले. प्राध्यापिका म्हणून नोकरी करू लागल्या. त्या वेळी मुरलीजी अ.भा.वि.प.चे पूर्ण वेळ काम करीत होते. कालांतराने ते भाजपाचे केरळ राज्यात पदाधिकारी झाले. मी जयश्रीताईंना विचारले, ''इतक्या विषम परिस्थितीत काम करताना भीती, भय वाटत नाही का?'' त्यांनी यावर फार समर्पक उत्तर दिले. म्हणाल्या, ''भय कशाचे? मृत्यूचे? एक ना एक दिवस मरायचेच आहे ना, मग त्याला भ्यायचे कशाला?''

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

1999 साली मा. अटलबिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान झाले, तेव्हा मुरलीजी नेहरू युवा केंद्राचे उपाध्यक्ष म्हणून दिल्ली येथे नियुक्त झाले. ती पाच वर्षे जयश्रीताई इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रात काम करू लागल्या. तरीही त्यांचे सामाजिक काम थांबले नाही. भारतीय स्त्री शक्तीमार्फत केरळात स्त्री चेतना ही समविचारी महिलांसाठी काम करणारी संस्था स्थापन करून, त्या माध्यमातून त्यांनी महिला सक्षमीकरणाचे काम हाती घेतले. 2004 साली मनमोहन सिंग यांचे सरकार आले. त्यानंतर दोघेही कोझिकोडे (कालिकत) येथे परतले. जयश्रीताई केरळ विश्वविद्यालयात शिकवू लागल्या आणि मुरलीजी पूर्णवेळ केरळ भाजपाचे काम करू लागले. त्याचबरोबर त्यांनी समविचारी कार्यकर्त्यांची 'National Yuva Credit Society' ही संस्था स्थापन केली. आज देशभर ह्या संस्थेचे काम पसरले आहे.

 
Biodata of V. Muraleedhar

संघर्षमय वातावरणातही तत्त्वांशी एकनिष्ठ राहून त्यांचा संसार सुरू आहे. आज मुरलीजी महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेले आहेत आणि नव्या मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांचा मुक्काम दिल्लीत असतो. तर जयश्रीताईंनी कोल्लम येथे नवीन काम स्वीकारले आहे.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

सामाजिक-राजकीय काम म्हणजे लोखंडाचे चणे चावण्याइतके कठीण असते. अर्थातच यातूनही मार्ग निघतोच. राष्ट्रकार्य हे मूळ ध्येय दोघांचेही समान असल्याने, क्वचित कधी मतमतांतरे झाली तरी दोघेही एकमेकांच्या मताचा आदर करतात. समोरच्याचे वेगळे मत लक्षात घेऊनही सुसंवाद राखण्याचे मोकळेपण त्यांच्या नात्यात आहे. मनमोकळा संवाद हेच त्यांच्या यशस्वी दांपत्यजीवनाचे गमक आहे. मला तर पतिपत्नीपेक्षा त्यांच्यातील मित्रत्वाचे नाते अधिक जाणवले. विलोभनीय वाटले. दोघांची जीवनधारणा समान आहे. देशासाठी, समाजासाठी खूप काम करायचे आहे. त्यासाठी आवश्यक निर्धार व धैर्य त्या दोघांकडेही आहे. यांच्यापासून प्रेरणा घेत समाजात अशा तरुण जोडया आणखीन तयार होतील, होत आहेत, जे या देशासाठी सुचिन्ह आहे.

 सामाजिक जाणिवेची सप्तपदी चालणाऱ्या या जोडप्याला पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/