राष्ट्र सेविका समितीतर्फे 19 जानेवारीला लोकमान्यांना मानवंदना

स्रोत: विवेक मराठी    दिनांक17-Jan-2020
|

मुंबई : दि. स्वातंत्र्य आंदोलनामध्ये स्वराज्य माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि ते मी बजावणारच अशा प्रकारची घोषणा देऊन स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतवणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या स्मृतीशताब्दीवर्षानिमित्त राष्ट्र सेविका समितीतर्फे त्यांना मानवंदना दिली जाणार आहे. रविवार दि. 19 जानेवारी 2020 रोजी समितीच्या हजारो सेविका ठाणे येथे घोषवादनासहित पथसंचलन काढून लोकमान्य टिळकांना मानवंदना देणार आहेत.


rss_1  H x W: 0

लोकमान्य टिळकांनी स्वराज्याचा हक्क लक्षात आणून देत असतानाच सुराज्याचे स्वप्नदेखील पाहिले होते. म्हणून स्वातंत्र्यानंतर त्यांच्या स्मृतिशताब्दी वर्षात लोकमान्यांच्या विचारांचे जागरण करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन हा विशेष उपक्रम राष्ट्र सेविका समितीने योजला आहे. 19 जानेवारी दुपारी 5 ते 7 या वेळात ठाणे शहराच्या प्रमुख रस्त्यांवरून हे पथसंचलन काढले जाईल. तसेच संचलनानंतर ठाण्याच्या गडकरी रंगायतनसमोरील तलावपाळीजवळच्या शिवसमर्थ विद्यालयाच्या पटांगणावर समितीच्या सेविका काही प्रात्यक्षिकेही सादर करतील. आणि याच कार्यक्रमामध्ये समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलताई मेढे यांचा सत्कार करण्यात येणार असून एसएनडीटी विद्यापीठाने त्यांना डी लिट पदवी दिल्याबद्दल सन्मानित केले जाणार आहे अशी माहिती समितीच्या पश्चिम क्षेत्र कार्यवाहिका सुनंदा देवस्थळी आणि कोकण प्रांत कार्यवाहिका पद्मश्री फाटक यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. याच कार्यक्रमात राष्ट्रवादाचा राष्ट्रीय चेहरा लोकमान्य टिळक या विषयावर चंद्रशेखर टिळक यांचे व्याख्यानही होणार आहे. या मानवंदना कार्यक्रमाला मुंबई, ठाणे, रायगड, वसई, विरार, या भागातील सेविका मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहाणार आहेत.