रंग बदलला, अंतरंगही बदलेल

स्रोत: विवेक मराठी    दिनांक24-Jan-2020   
|

 हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष केंद्रात सत्तास्थानी आहे आणि हिंदू समाजाच्या खूप जुन्या मागण्या पूर्ण होत आहेत. अशा वेळी अनेक राजकीय पक्ष हिंदुत्वाचा तिरस्कार करत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका समयोचित आणि समाजमनाची दखल घेणारी आहे. 

 

mns_1  H x W: 0
 
 
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी मुंबईत दोन राजकीय पक्षांचे कार्यक्रम झाले. पहिला कार्यक्रम शिवसेनेचा झाला. त्यात पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की आमचा रंग भगवा आहे, आमचे अंतरंग भगवे आहे. सत्तेसाठी लाचारी पत्करणाऱ्या आणि ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला आपण भगवे आहोत, हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे आहोत असे सांगण्याची वेळ आली, हा काळाचा महिमा म्हणावा लागेल. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी ज्या प्रकारे सत्तेसाठी तडजोडी केल्या, त्या पाहता त्यांनी भगव्याचे स्मरण करणे क्रमप्राप्तच होते. शिवसेनेच्या या बदलत्या स्वरूपाबाबत शरद पवार म्हणाले होते, ''भाजपापेक्षा शिवसेना बरी, असे मुस्लीम समाजाचे मत आहे.'' एका अर्थाने शिवसेना हिंदुत्वाचा त्याग करून सेक्युलॅरिझमच्या बुरख्यात गुरफटून गेली आहे, हेच पवारांनी वेगळया शब्दांत सांगितले.

 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
 

याच दिवशी मोठा गाजावाजा करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या अधिवेशनात नवी दिशा आणि भूमिका स्पष्ट केली. आजवर मराठी भाषा, मराठी स्थानिक भूमिपुत्र, महाराष्ट्र राज्याचा सर्वांगीण विकास अशा प्रादेशिक अस्मिता जपत वाटचाल करणाऱ्या या पक्षाने एकदम राष्ट्रीय भूमिका स्वीकारली आणि आपणही हिंदुत्ववादी आहोत हे सिध्द करण्यासाठी आगामी काळात मोर्चा आयोजित करण्यात येणार असल्याचे घोषित केले. आपल्या पक्षाच्या झेंडयात बदल केला. आता राज ठाकरे यांच्या पक्षाचा झेंडा भगव्या रंगाचा आणि शिवमुद्रायुक्त असणार आहे. राज ठाकरे यांनी स्वीकारलेल्या हिंदुत्वाचा मार्गाबाबत काहींना आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे, कारण आजवर प्रादेशिक पक्ष म्हणून प्रादेशिक अस्मिता जपत वाटचाल करीत असलेला हा पक्ष एकदम राष्ट्रीय विषयाला आपले मानतो आणि राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या विषयावर ठोस भूमिका घेताना दिसतो, यामागील उद्देश काय? असा प्रश्न उपस्थित होतो. या प्रश्नाच्या मुळाशी महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय क्षेत्रातील घडामोडींचा संबंध आहे. शिवसेना लाचार होऊन सत्तेसाठी हिंदुत्वाचा त्याग करते आणि त्यातून हिंदू समाजात एका मोठया राजकीय पोकळीची निर्मिती होते. हिंदू म्हणून जगणारा, जातीपातीच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार करणारा खूप मोठा वर्ग शिवसेनेचा पाठीराखा होता. पण सत्तेसाठी विचारांची, तत्त्वांची हत्या करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पुढाकार घेतला आणि सत्तेच्या कोंदणात स्वतःला मढवले, हे न आवडलेला समाजघटक नव्या पर्यायाच्या शोधात होता. राज ठाकरेंनी प्रादेशिक पक्ष ही आपली ओळख बाजूला ठेवून हिंदुत्वाचा विचार स्वीकारून महाराष्ट्रातील अस्वस्थ घटकांना आपल्या बाजूला वळवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तूर्तास त्यांच्या राजकीय चालीला स्वीकारून समाजातील विविध घटकांनी पाठिंबा दिला आहे, असे चित्र समोर येत आहे. मात्र हिंदुत्वाचा पुरस्कार करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या मूळ स्वभावात आणि कार्यप्रणालीत कसा बदल करणार आहेत, हे पाहणे उत्सुकतापूर्ण असणार आहे. पक्षाच्या झेंडयाच्या रंगाप्रमाणे पक्षाच्या अंतरंगातही बदल घडवून आणण्याची जबाबदारी आता राज ठाकरे यांना पार पाडावी लागणार आहे. परप्रांतीयांबाबतचे त्यांचे खळ्ळ खटयाक धोरण आता 'हिंदू सारे बंधू' या सूत्रात कशा प्रकारे बदलणार आणि शिवसेनेने मोकळे केलेले राजकीय अवकाश मनसे कशा प्रकारे व्यापते, हे लवकरच दिसेल. आज देशपातळीवर सर्व स्तरांतून हिंदुत्वाचा पुरस्कार होताना दिसतो आहे. हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष केंद्रात सत्तास्थानी आहे आणि हिंदू समाजाच्या खूप जुन्या मागण्या पूर्ण होत आहेत. अशा वेळी अनेक राजकीय पक्ष हिंदुत्वाचा तिरस्कार करत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका समयोचित आणि समाजमनाची दखल घेणारी आहे. राज ठाकरे यांच्या या नव्या भूमिकेसाठी त्यांना शुभेच्छा देऊ या.

 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/