'आयुर्विमा''जिंदगी के साथ भी... जिंदगी के बाद भी'

स्रोत: विवेक मराठी    दिनांक29-Jan-2020
|

नवे सदर - 'अर्थ'पूर्ण गुंतवणूक


LIC_1  H x W: 0

गुंतवणुकीचा मंत्र सांगणारे नवे सदर आपण सुरु करीत आहोत. यामध्ये आपण सर्व गुंतवणूक प्रकारांची, तसेच यात गुंतवणूक केव्हा करावी आणि किती करावी, तसेच कुठल्या गुंतवणूक प्रकारात कधी करावी, गुंतवणूक करताना कोणती खबरदारी बाळगावी, संभाव्य धोके कोणते आणि ते टाळण्याची उपाययोजना, सरकारची अर्थविषयक धोरणे व त्यांचे आपल्या गुंतवणुकीवर होणारे परिणाम, जोखीम घेण्याची क्षमता असे विविध विषय वाचकांपर्यंत पोहोचवणार आहोत.

 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

भगवान श्रीकृष्णाने रणांगणावर अर्जुनाला श्रमिद्भगवद्गीता सांगितली. त्यातील अकराव्या अध्यायात त्याने अर्जुनास 'विश्वरूपदर्शन' दिले. ते बघून अर्जुन स्तंभित तर झालाच, तसाच भयभीतही झाला. तो ते 'विश्वरूपदर्शन' अधिक वेळ बघू शकला नाही. याचे कारण काय असावे बरे? भविष्यात काय घडणार आहे याचे वर्तमानात जर ज्ञान झाले, तर व्यक्ती भयभीत होणारच. म्हणूनच बहुतेक जण केवळ आजचा/वर्तमानाचा विचार करतात व भविष्याकडे डोळेझाक करतात. मात्र जे भविष्याचा डोळसपणे विचार करतात, ते निश्चयपूर्वक भविष्याची तरतूद करतात. अशी भविष्याची तरतूद करण्याचे द्रष्टेपण भगवंताने फक्त मानवालाच दिले आहे.

माणूस आणि जनावर यात मूलभूत अंतर काय? हे समजायचे असेल, तर गोठयातील गायीपुढे 2-3 दिवस पुरेल एवढा खुराक एकदाच टाकून बघा. तिला लागेल तेवढा खुराक तर ती खातेच, पण बाकीचा पायाखाली तुडवते. तो दुसऱ्या दिवशी खाण्यासाठी योग्य उरत नाही. मनुष्यप्राणी मात्र विवेक वापरून उद्याची बेगमी आजच करून ठेवतो. ती त्याची नैसर्गिक वृत्ती आहे.

या नैसर्गिक वृत्तीला अनुसरून माणूस बचत करतो. पण अनेकदा ही बचत गुंतवणुकीत रूपांतरित करणे त्याला जमत नाही, शक्य होत नाही. महिन्याच्या शेवटी खर्च वजा जाता राहते ती बचत, मात्र महिन्याच्या सुरुवातीसच खर्च करण्यापूर्वी जी रक्कम बाजूला ठेवली जाते, ती गुंतवणूक. बरेचदा आपण बचत व गुंतवणूक यात गल्लत करतो. जी बचत वृध्दिंगत होते ती गुंतवणूक.

गुंतवणूक ही प्रामुख्याने दोन प्रकारांत होते.

1. गैरआर्थिक गुंतवणूक - ही मुख्यत: सोने, चांदी, अन्य मौल्यवान धातूंचे दागिने, मालमत्ता, वाहने यात केलेली असते तर.

2. आर्थिक गुंतवणूक - ही बँकेतील ठेवी, सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (NSC) आयुर्विम्याच्या योजना, राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS), म्युच्युअल फंडांच्या योजना, शेअर बाजार यात केलेली असते.


'अर्थ'पूर्ण गुंतवणूक या विवेक साप्ताहिकात सुरू होणाऱ्या सदरातून आपण या सर्व गुंतवणूक प्रकारांची, तसेच यात गुंतवणूक केव्हा करावी आणि किती करावी, तसेच कुठल्या गुंतवणूक प्रकारात कधी करावी, गुंतवणूक करताना कोणती खबरदारी बाळगावी, संभाव्य धोके कोणते आणि ते टाळण्याची उपाययोजना, सरकारची अर्थविषयक धोरणे व त्यांचे आपल्या गुंतवणुकीवर होणारे परिणाम, जोखीम घेण्याची क्षमता असे विविध विषय वाचकांपर्यंत पोहोचवणार आहोत. या लेखन मालिकेची सुरुवात 'जिंदगी के साथ भी... जिंदगी के बाद भी' असणाऱ्या 'आयुर्विमा' या विषयाने करणार आहोत.

 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

आयुर्विमा म्हणजे काय? विमा घेतलेल्या व्यक्तीच्या मृत्युपश्चात उद्भवणारे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था म्हणजे आयुर्विमा.

 

एकत्र कुटुंबपध्दती अस्तित्वात असताना कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे जरी अकाली निधन झाले, तरी त्याचे कुटुंब उघडयावर येत नसे. इतर भावंडे त्या कुटुंबाच्या नित्य गरजा भागवीत असत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस हळूहळू एकत्र कुटुंब पध्दतीचा ऱ्हास होऊ लागला आणि विभक्त कुटुंबपध्दती मूळ धरू लागली आणि आयुर्विम्याची गरज प्रकर्षाने जाणवू लागली. अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता झाल्यावर पहिली गरज भासते ती म्हणजे आयुर्विम्याची.

 

आयुर्विमा हा करार आहे. करार म्हटले की तो इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, 1872नुसार झाला पाहिजे. यात किमान दोन पक्ष हवेत - एक प्रस्तावकर्ता आणि दुसरा प्रस्तावाचा स्वीकार करणारा. दोन्ही पक्ष करार करायला सक्षम असले पाहिजेत - म्हणजेच व्यक्ती अज्ञान नसावी, म्हणजे किमान 18 वर्षे वयाची असणे आवश्यक आहे. या मूलभूत बाबी पूर्ण असल्या, तरच विम्याचा करार होऊ शकतो. विमेच्छुक व्यक्ती विम्याचा प्रस्ताव विमा कंपनीकडे देते आणि काही अटींवर विमा कंपनी तो प्रस्ताव स्वीकारते, असे ढोबळमानाने विमा कराराचे स्वरूप. विमा घेणारी व्यक्ती ठरावीक रक्कम विशिष्ट मुदतीसाठी दर वर्षी किंवा एकमुदत भरण्याचे कबूल करते आणि विमा कंपनी त्याच्या मोबदल्यात विमाधारकाचा त्या मुदतीत मृत्यू झाल्यास, त्याच्या मृत्युपश्चात नामित व्यक्तीला आणि त्या मुदतीत मृत्यू न झाल्यास, मुदत पूर्ण झाल्यावर विमेदारास ठरावीक रक्कम देण्याचे कबूल करते. ही ठरावीक रक्कम (राशी) म्हणजे बीमाराशी किंवा विमाधन.

 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

ज्याप्रमाणे दागिने हे स्त्री-धन असते, तद्वतच बीमाधन हे तिचे धन असते. अर्थात, आजकाल कुटुंबात स्त्री-पुरुष हे दोघेही अर्थार्जन करीत असल्याने विमा हे स्त्रीधन नसून कुटुंबाला संकटकाळी मिळणारे धन असे म्हणणे जास्त योग्य होईल.

विम्याची सुरुवात

आयुर्विम्याचा उगम होण्याच्या बरीच वर्षे आधी साधारण विमा (General Insurance) अस्तित्वात होता. 1966 साली लंडनला मोठी आग लागली आणि त्यात 13 हजार घरे भस्मसात झाली. एवढे मोठे नुकसान भरून काढणे कुणालाच शक्य नव्हते. त्यानंतर झालेल्या विचारमंथनातून अर्थशास्त्राचा अभ्यासक निकोलस बार्बनने आपल्या अकरा सहकाऱ्यांना घेऊन घरांना विमा देणारे पहिले ऑफिस सुरू केले आणि लंडनमधील 5000 घरांना विमाछत्र प्राप्त झाले.


त्याच दरम्यान जहाजातून ने-आण होणाऱ्या मालाचा विमा करण्याची कल्पना पुढे आली. जहाजांमार्फत तेव्हा मोठया प्रमाणावर व्यापार होत असे. वाटेत कधीकधी ती जहाजे समुद्री चाच्यांच्या टोळया लुटत असत
, तर कधी जहाजे बुडत असत. अशा वेळी ज्या व्यापाऱ्यांचा माल त्या जहाजात असे, ते दिवाळखोर होत. यावर उपाय म्हणून एडवर्ड लॉइड या व्यापाऱ्याने लंडनच्या बंदराजवळील एका कॉफी हाऊसमध्ये अशा व्यापाऱ्यांना विमा देणे सुरू केले. 'एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ' या तत्त्वावर सुरू झालेले ते लॉइड्स ऑफिस विमा आणि पुनर्विमा (reinsurance) करणारे जगातील एक मोठे ऑफिस (विमा कंपनी म्हणू या) भारतासकट जगातील बहुतेक देशांत कार्यरत आहे.

 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

आयुर्विमा कंपन्यांची सुरुवात मात्र त्या मानाने उशिराने झाली. भारतात 1870मध्ये बाँबे म्युच्युअल ऍशुअरन्स सोसायटीने आयुर्विम्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर ओरिएंटल लाइफ इन्शुरन्स कंपनी सुरू झाली. 1897मध्ये युनायटेड, नॅशनल, हिंदुस्थान को-ऑपरेटिव्ह अशा कंपन्या सुरू झाल्या. त्याच दरम्यान सातारा येथे अण्णासाहेब चिरमुले यांनी पूर्णपणे स्वदेशी तत्त्वावर वेस्टर्न इंडिया विमा कंपनी सुरू केली.


आयुर्विमा महामंडळाची
(LICMr) स्थापना

1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा भारतात तब्बल 245 विमा कंपन्या अस्तित्वात होत्या. त्यातील अनेक डबघाईला आल्या होत्या. अनेक कंपन्यांमधील पैसा सुरक्षित नव्हता. अनेक कंपन्यात अनागोंदी कारभार चालत होता. त्या कंपन्यांवर कुणाचेच नियंत्रण नव्हते. हे जाणून अर्थमंत्री चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख यांनी त्या सर्व कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले आणि त्या सर्व कंपन्या एलआयसी ऍक्टनुसार स्थापन झालेल्या आयुर्विमा महामंडळात विलीन केल्या. 1 सप्टेंबर 1956 रोजी LIC of India - आयुर्विमा महामंडळ अस्तित्वात आले आणि 63 वर्षांनंतरही भारतातील एक अग्राणी विमा कंपनी म्हणून आपले स्थान टिकवून आहे.

 

-निलेश साठे (माजी सदस्यइर्डा)

9892526851

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/