अर्थ मूलो हि धर्म:

विवेक मराठी    29-Jan-2020
Total Views |

 
raje_1  H x W:

प्राचीन काळापासून भारतातील अगदी नि:संग ॠषिमुनींनीही 'अर्था'चे माहात्म्य फार चांगले जाणले होते. चाणक्याच्या 'अर्थशास्त्रा'प्रमाणेच महाभारतातही अनेकांनी ठायी ठायी असेच विचार मांडले आहेत.

'धन मिळवणे हाच सर्वश्रेष्ठ धर्म होय.'

'धनाच्या योगाने कुळाचा उत्कर्ष होतो.'

'धनात धर्म: प्रवर्तते!'

'निर्धनाला इहलोकही नाही, आणि परलोकही नाही.'

'धनावरच सर्व काही अवलंबून आहे.'

'धनसंपन्न लोकच जगात जिवंत असतात, धनहीन लोक मेल्यातच जमा होत.'

प्राचीन भारतात तत्त्ववेत्ते, धर्मवेत्ते आणि ऋषिमुनीही असे धनाचे महत्त्व सांगत असत. महाराजांनी लहानपणीच महाभारताचे श्रवण केले होते. त्यामुळे धर्मक्रांतीबरोबरच अर्थक्रांतीही केली पाहिजे, अन्यथा धर्मक्रांतीही टिकणार नाही, हे लक्षात घेऊन त्यांनी पहिल्यापासूनच तशी पावले टाकली.

भारतीय अध्यात्मिकतेवरही त्यामुळे 'अर्थपूर्ण' प्रकाश पडतो.

आर्थिक क्रांती

मुसलमान सत्ताधीश हिंदू प्रजेचे प्रचंड शोषण करत, त्यांच्यावर हर तऱ्हेचे अन्याय करत. तशी त्यांची सर्व राज्यव्यवस्था, राज्यकारभार आणि अर्थव्यवस्थाच शोषणावर आधारित होती. सरंजामी पध्दत, मनसबदारी, वतनदारी या नावांनी जी व्यवस्था ओळखली जाते, तीच ही व्यवस्था. सुलतानाने अथवा बादशहाने आपल्या राज्याची अनेक परगण्यांत किंवा सुभ्यांत विभागणी करून ते परगणे विविध सुभेदारांत किंवा सरदारांत विभागून द्यायचे आणि त्या सरदारांनी अथवा सुभेदारांनी त्या त्या परगण्यात स्वतंत्र कारभार करून सुलतानाला/बादशहाला दरसाल ठरावीक रक्कम महसूल म्हणून घ्यायची आणि स्वत:च्या खर्चाने लष्कर नित्य तयार ठेवून युध्दाच्या प्रसंगी सुलतानाबरोबर/त्याच्या प्रतिनिधीबरोबर जातीने जाऊन लढाया करायच्या, असा सरंजामी पध्दतीचा ढोबळ अर्थ. महाराष्ट्रात व भारतात जवळजवळ सगळीकडे हीच व्यवस्था होती. भारताबाहेरच्या जगातही काहीशी अशीच परिस्थिती होती. मुसलमानपूर्वकाळात अशी व्यवस्था नव्हती.

ग्रामसंस्था

शासनव्यवस्था सगळीकडे चांगली राहण्यासाठी भारतातील राजनीतिज्ञांनी काही हजार वर्षांपूर्वी ही ग्राामसंस्था निर्माण केली. ग्राामसंस्था म्हणजे प्रत्येक गावाचे एक लहानसे प्रजासत्ताकच असे. ग्राामपंचायत नावाची संस्था त्याचा कारभार करत असे. मध्ययुगात ही व्यवस्था थोडी बदलली. ग्राामीण भागात देशक सत्ता आली, देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर्णी, चौगुला आणि प्रमुख ग्राामस्थ या सर्वांना मिळून 'देशक' असे म्हणत. गावच्या कारभारासाठी ज्या सभा भरत त्यात बारा बलुतेदार, शेतकरी, जोशी या सर्व जानपदस्थ लोकांचा सहभाग असे. त्यांना 'गोतसभा' असे म्हणत. यातील बहुतेक लोक वतनदार असत. गावचा एकंदर सर्व कारभार सर्वांच्या अनुमतीने होत असे.

देशकांची कामे व जबाबदाऱ्या

गावच्या जमिनीची सर्व व्यवस्था पाहणे, पडीक जमिनी लागवडीखाली आणणे, जंगलातून नव्या पिकाऊ जमिनी निर्माण करणे, चोरचिलटांपासून गावाचे रक्षण करणे, इ. दुष्काळ, लढाया, परचक्रे यामुळे गावचा मुलुख ओसाड होई, जमीन ओस पडे, वस्ती उठून जाई. ही सर्व वस्ती पुन्हा जागी आणणे हे देशकाचे काम होते. जमिनीवरून, गुराढोरांवरून व इतर अनेक कारणांनी गावात तंटे होत. ते सोडवू

मिरासदारी

मुसलमानी सुलतानांनी/बादशहांनी ही व्यवस्था मुळातून बदलली नाही, परंतु आपल्या शाहीचे अथवा राज्याचे वेगवेगळे भाग करून ते निरनिराळया, मुसलमान व इतर सरदारांना देऊन टाकत. आपल्या मुलखातून ठरावीक रक्कम सुलतानाकडे भरली की आपापल्या परगण्यात ते स्वतंत्र राजेच असत. सुलतान आपली रक्कम मिळाल्यावर त्या सरदारांच्या अंतर्गत कारभारात कधीच लक्ष घालत नसे. अशी अनियंत्रित सत्ता हाती आल्यावर हे सरदार, मिरासदार काय गोंधळ घालत असतील, ह्याची कल्पनाच केलेली बरी. या मिरासदारी पध्दतीमुळे परंपरागत ग्राामसंस्थेचे उच्चाटन जरी झाले नाही, तरी तिचे महत्त्व मात्र जवळपास संपले, कारण प्रजासत्ताक हे तिचे महत्त्वाचे वैशिष्टयच शिल्लक राहिले नाही. त्याऐवजी मक्तेदारीची व्यवस्था आल्यामुळे समाजाच्या व्यापक हिताचा विचारच संपला.

सुलतानाचा खंड दोनशे असला, तर मिरासदार दोन हजार वसूल करणार, पण तो स्वत: कधी वसुलीला जात नसे. त्याचे कामगार म्हणजे देशमुख आणि त्याचे सेवक म्हणजे पाटील, कुलकर्णी आणि चौगुला. तेव्हा वसुली करताना या सर्वांनीच आपल्या तुंबडया भरल्यास नवल ते काय? सुबत्ता असो की दुष्काळ, सुलतानाला खंड हा दिलाच पाहिजे, नाहीतर सुलतान या मिरासदारांना जीव नकोसा करीत असे. त्यामुळे लोकांना पिळून पैसे काढल्याशिवाय मिरासदारांना पर्याय नसे. एकाच माणसाचे (सुलतान/बादशहा) हित आणि त्यासाठी राबणारी ही मतलबी साखळी त्यामुळे ग्राामसंस्था किंवा देशक ह्या व्यवस्था निष्प्रभ झाल्या. ह्यांच्या संभाव्य अत्याचाराला तोंड देण्यापेक्षा प्रजाजन (शेतकरी) परागंदा होणे पसंत करू लागले. गावेच्या गावे ओस पडू लागली. इथले जीवनच कोलमडले.

मिरासदारांच्या/मनसबदारांच्या वैयक्तिक अत्याचाराबरोबरच त्यांच्या आपापसातल्या मारामाऱ्या, लढाया यांनीही रयतेला अतोनात त्रास होत असे. ज्याला वतन मिळावे किंवा वाढावे असे वाटत असे, तो सुलतानाकडे अथवा बादशहाकडे जाऊन तशी सनद घेऊन येई. पण त्याची अंमलबजावणी मात्र सुलतान करीत नसे. ती ज्याची त्याने स्वत:च्या ताकदीवर करायची! ह्यात भर पडायची कुलाभिमान, मानपान, हेवेदावे ह्यांची! ही भांडणे बहुधा वंशपरंपरागत चालायची. अनेकांचे वंश त्यापायी संपले!

ह्या अंदाधुंदीमुळे महाराष्ट्राचे अर्थकारणच ढासळले. काही निर्माण (नवीन) करावे, आहे ते वाढवावे, असा विचारच संपत गेला. संपत्तीची निर्मिती करण्याऐवजी तिचे कसेही वाटप करण्यातच लोकांचा रस राहिला. ह्या मिरासदारांना कोणतेही मूल्य किंवा निष्ठाच राहिली नाही. धर्म नाही, जात नाही, स्त्री नाही, बाल नाही, ते फक्त वतन ओळखत! त्यासाठी वाट्टेल ते करत. अशा परिस्थितीत कुठलीच अर्थव्यवस्था किंवा समाज भरभराटीस येत नाही. त्यासाठी ती व्यवस्थाच बदलावी लागते.

लूटमारीवर आणि शोषणावर आधारित ही व्यवस्था बदलून प्रजाजनांच्या भाकरीची खात्री देणारी अर्थव्यवस्था आणणे आवश्यक होते. 'धर्मात अर्थश्च कामश्च' असे व्यासांनी म्हटले आहे. महाराजांनी शेतकऱ्यांना, सैनिकांना, साळी-माळी-कोळी अशा सर्व बहुजनांना जाणवून दिले की, त्यांनी सध्दर्मसाधना केली, तर धर्माबरोबरच अर्थ आणि काम हे दोन पुरुषार्थही त्यांना साध्य करता येतील. त्याचा प्रत्यय येताच सर्व समाज त्यांच्या मागे एकवटू लागला.

ह्या नव्या अर्थव्यवस्थेबद्दल पुढच्या लेखात.

 
लेख क्रमांक - 16 
 
अजित आपटे