समृध्द बहुभाषक

स्रोत: विवेक मराठी    दिनांक31-Jan-2020
|

प्रवासी पत्र 3

प्रवास करीत असताना अनेक सहप्रवासी भेटतात. प्रवासातील 'वेळ' या सहप्रवाशांमुळे कंटाळवाणी वाटत नाही. कधी नवीन ऋणानुबंध तयार होतात, तर कधी अनुभवाची शिदोरी मिळते. प्रवास करीत असताना येणारे अनेक भावबंध आयुष्यातील वाटेवर नवीन काहीतरी शिकवीत असतात.bhasha_1  H x W 

प्रिय जयराज,

बेंगळुरू ते म्हैसूर हा सकाळचा प्रसन्न प्रवास एका सहप्रवाशामुळे मन विचलित करणारा झाला. पण प्रवास म्हटले की हे आलेच. बसमध्ये शेजारी एक मध्यमवयीन गृहस्थ आपल्या तीन-चार वर्षांच्या मुलीला घेऊन बसले होते. त्या अवखळ मुलीला खिडकीतून बाहेर बघायचे होते. पण खिडकीशी मी बसले होते. स्वारी गोडगोड हसत माझ्या मांडीवर कधी येऊन बसली, मलाही कळले नाही. तिच्या अखंड तामिळ बडबडीला मी आपली अंदाजाने हसून प्रतिसाद देत होते. माझी भाषेची अडचण तिच्या वडिलांच्या लक्षात आली, तसे तेही या गप्पांमध्ये दुभाषा म्हणून सामील झाले. बोलता बोलता छोटी बाजूला पडली आणि मोठयांच्या गप्पा सुरू झाल्या.

ते म्हणाले, ''मी तामिळनाडूतला, पण आता हिंदीचा instructor म्हणून अंदमानात काम करतो.''

मला आश्चर्य वाटले. वडील हिंदी शिकवत असून, मुलीला यातला शब्दही येऊ नये!!

विचारल्यावर म्हणाले, ''तसं तिला माहीत असण्याचं काही कारण नाही. मुळात मीच नोकरीची गरज म्हणून हिंदी शिकलो. आमच्याकडे आधीच हिंदीला कुणी भीक घालत नाही. पण मग शिकता शिकता असं लक्षात आलं की कितीही विरोध केला, तरी ती राष्ट्रभाषा आहे हे सत्य आहे. मग राष्ट्रीयीकृत बँका, रेडिओ, टीव्ही, सिनेमे इत्यादी अनेक ठिकाणी ही भाषा येतेच. मला त्यात रोजगाराची संधी वाटू लागली. राग धरण्यापेक्षा ती शिकून चांगली नोकरी मिळत असेल, तर काय वाईट? त्यात परत saturation नाही. मग मी हिंदीत पी.जी. केलं आणि सुरुवातीला आकाशवाणीत लागलो.''

''मग आता हिंदीबद्दल काय वाटतं?''


''काय वाटणार? भाषा तशा सगळयाच चांगल्या असतात. हिंदीतलं बरंच वाचलं, अजूनही वाचतो. पण...'' चेहरा किंचित आक्रसून म्हणाले, ''पण हीच एक राष्ट्रभाषा म्हणून या उत्तर भारतीय पुढाऱ्यानी जे बाकीच्यांवर थोपलंय, ते पटत नाही. देशातली बरीच लोकसंख्या ती भाषा वापरते, म्हणून तीच एक राष्ट्रभाषा कशी होईल? बरं, आम्हा दक्षिणी किंवा इतर राज्यांना स्वत:ची भाषाच नसती, त्यांना लिपीची, साहित्याची काही परंपराच नसती, सगळे अडाणीच असते, तर पुढाऱ्यांनी घालून दिलेली भाषा आम्ही राजीखुशीने शिकलोच असतो. पण सुदैवाने म्हणा, नाहीतर दुर्दैवाने.. पण तसं नाही. आमच्याही भाषेला हजारो वर्षांची परंपरा आहे, महान साहित्य आमच्यातही आहे. देवनागरीपेक्षा आमची लिपी जास्त ध्वनिसंकेत व्यक्त करते. आमची भाषा 'अभिजात' आहे. रोजच्या जगण्यात आम्हाला आईसारखी आहे.''

''पण हिंदी देशाला एकत्र बांधून ठेवणारी आहे!' मी आपले घोडे पुढे दामटत होते.

ते जरा जोरात हसले, म्हणाले, ''मूठभर पुढाऱ्यांनी वेगवेगळी 'धोरणं' आखून एकच भाषा इतरांवर लादली, तर त्याने देश एकसंध राहतो, हाच मुळात भ्रम आहे. आमच्या अभ्यासक्रमात हिंदी सक्तीचं. कशासाठी? आमचे कोणतेही व्यवहार त्या हिंदीवाचून अडत नाहीत. हिंदी आलं नाही तर त्यांचं अडतं, आमचं नाही, हे लक्षात घ्या. आमचा विरोध आडमुठा नाही. पण सक्तीचा करून उर्वरित देशावर राजकीय कुरघोडी करण्याचा प्रकार आहे. बरं, हिंदी शिकून तरी काय? माझ्यासारखा एखादा त्यावर नोकरी वगैरे करतो. पण बाकीचे? कुठलंही आधुनिक शिक्षण घ्यायचं म्हटलं की परत इंग्लिश शिकणं चुकत नाहीच.''


''पण मग राष्ट्रभाषेचं काय?''

'करा ना मग बंगालीला करा - रवींद्रनाथांना साहित्यातलं नोबेल मिळालंय - करा, बंगालीला करा राष्ट्रभाषा! मल्याळमला करा. हजारो वर्षांची परंपरा आणि जगभरात पसरलेले लोक आहेत. गेला बाजार गुजराथीला करा! राष्ट्रपिता त्याच भाषेतून आले. आमच्या तामिळला करा, तुमची मराठीही उत्तम आहे, तिला करा. सगळया हिंदी भाषकांनी यातली एक तरी भाषा, एक तरी लिपी शिकावी राष्ट्रभाषा म्हणून! कुठे बिघडलं? मुद्दा हिंदी शिकण्या-वापरण्याचा नाहीच! हे सगळे राजकीय डावपेच आहेत!''

बोलता बोलता आपला आवाज चढला आहे, हे त्यांच्याही लक्षात आले. मग पुन्हा मृदू स्वरात म्हणाले, ''...आणि मुलांनी तरी किती शिकायचं? मातृभाषा म्हणून आम्ही हिला तामिळ शिकवतोच. शाळेत इंग्लिश भाषा आणि रोमन लिपी आहेच. त्यात परत, या सगळयांहून निराळी देवनागरी लिपी आणि हिंदी भाषा शिकायची म्हणजे मलाच जड वाटायला लागतं.''


दुर्बिणीतून बाहेरचे जग बघण्यात मग्न झालेल्या त्या छोटया मुलीकडे मी पाहिले. किती भाषा आणि किती लिप्या शिकायचे? खरेच होतं ते! इतक्या लहान वयात, किंवा मोठे झाल्यानंतरही कुणी लादली म्हणून भाषा शिकणे वाईटच. तसे, काहीही लादणे म्हणजे वाईटच. पण पर्यायांचा वारा खेळता ठेवला की माणसे इतकी कडवट होत नाही, एवढे मला कळते.

तर, म्हैसूरच्या कन्नड वाटेवर अंदमानात काम करणाऱ्या तामिळ बांधवाची हिंदी भाषेची तक्रार मला तुला मराठीत लिहून कळवावीशी वाटली. भाषेची ठणकती नस माणूस होऊन समोर घडाघडा बोलू लागते, तेव्हा लादलेले कितीतरी आदर्श गळून पडतात. ठणका कुणालाच सहन होत नाही.

तू तुझ्या मुलाला कुठल्या माध्यमाच्या शाळेत घालू असे विचारलेस. उत्तर वाटते तितके सोपे नाही. पण आपण अनेक अर्थांनी असे 'समृध्द बहुभाषक' आहोत, हे लक्षात घेऊन काय तो निर्णय घे.

भाषेच्या या आजपर्यंत अनुत्तरित राहिलेल्या राजकीय अस्मितेच्या प्रश्नावर हे पत्र थांबवत आहे.

भेटल्यावर बोलू.

तुझी,

शिवकन्या