जॉन जॅक रुसो

विवेक मराठी    31-Jan-2020   
Total Views |

***रमा गर्गे***

फ्रेंच राज्यक्रांतीने मानवतावादी विचारांना चालना दिली. गुलामगिरीची अमानुष पध्दत नाहीशी होण्यासाठी आणि तुरुंगातील कैद्यांचे जीवन सुधारण्यासाठी उदारमतवादाचे वारे यानंतर वाहू लागले. मानवी हक्काचे विचार जगभरात गेले. त्यात सुरुवातीला ज्यांचे योगदान आहे, त्यामध्ये जॉन जॅक रुसोचे नाव अग्रागण्य राहील.

 
 The famous philosophar J

मनुष्य जेव्हा निसर्गाच्या सान्निध्यात निसर्गअवस्थेत जगत होता, तेव्हा तो सुखी आणि समाधानी होता. त्याला रानटी अवस्था असे म्हटले असले, तरी खरेच ती रानटी अवस्था होती का? एक दिलदारपणा, एक रांगडेपणा, निसर्गाच्या नियमांवर आधारित जीवन, समतेवर आधारलेले, स्वयंपूर्ण, एका अर्थाने पूर्णपणे स्वावलंबी असे जीवन आणि एक अत्यंत सरळ साधी अशी जीवनव्यवस्था! जगण्यात गुंतागुंत नाही. नैसर्गिक साधेपणा हेच जीवनाचे सूत्र. अशा निसर्गाच्या सानिध्यात चाललेल्या जीवनामध्ये ही समाजरचना आली आणि मग क्रमाक्रमाने साधेपणा, सरळपणा नाहीसा होत गेला आणि समाधानही संपत गेले. इकडे भाषा, कला, संस्कृती, शेती तंत्र यांचा विकास झाला खरा. बांधकामे झाली, वेगवेगळया प्रकारच्या सुविधा निर्माण झाल्या आणि साधेपणा संपला! संपत्तीवरील वैयक्तिक मालकी, माझे-तुझे ही भावना, उच्चनीचता आणि सारे अधिकार स्वतःकडे केंद्रित करून ठेवण्याची वृत्ती यामुळे दुःखदायक अशी समाजनिर्मिती मनुष्यजीवनात अस्वस्थता निर्माण करू लागली. लोकसंख्येच्या वृध्दीमुळे आणि नागरीकरणामुळे निसर्गजीवन संपले. मग मनुष्याने राजसत्ता निर्माण केली. पण ही राजसत्ता ठरावीक श्रेणीच्या लोकांचेच हितसंबंध जपू लागली आणि त्यातूनच सर्व प्रकारची अनागोंदी निर्माण झाली. शास्त्र आणि कला ह्या मनुष्याला विकासाकडे नेणाऱ्या ठरण्याऐवजी रसातळाला घेऊन जातात असे वाटू लागले

 
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
 

फ्रान्समधल्या डीजॉन (Dijon) ऍकॅडमीने आयोजित केलेल्या निबंधस्पर्धेमध्ये शास्त्र आणि कलेवरच्या या निबंधाने खळबळ माजवली. या निबंधाला पहिले बक्षीस मिळाले आणि फ्रेंच राज्यक्रांतीच्या वादळाची चाहूल लागली. काही दिवसांनी याच ऍकॅडमीने 'विषमतेची कारणे' या विषयावर आणखी निबंधस्पर्धा आयोजित केली. याही वेळी सुरुवातीला ज्याला बक्षीस मिळाले त्याच जॉन जॅक रुसोला पुन्हा एकदा पहिले बक्षीस मिळाले आणि त्याचा निबंध फ्रान्सभर गाजला!!

आपण बहुसंख्य आहोत हे सामान्य जनतेला पहिल्यांदा रुसोच्या शब्दांमुळे लक्षात आले. आपल्याला स्वस्थ, समाधानी आणि शांत जीवन हवे आहे हेही जनतेच्या पहिल्यांदा लक्षात आले. नेपोलियन तर स्पष्टपणे म्हणाला होता की ''रुसो झाला नसता, तर फ्रेंच राज्यक्रांती झालीच नसती!!'' इतके त्याच्या लिखाणाचे लोकांच्या मनावर ठसे उमटले.

 

पध्दतशीर शालेय शिक्षण न घेतलेल्या आईच्या छत्राला, प्रेमाला जन्मतः पारखा झालेला आणि वयाच्या सोळाव्या वर्षीपासून भटकंती करत असलेल्या या 35-40 वर्षांच्या व्यक्तीने साऱ्या फ्रान्सचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतले. 1712मध्ये रुसोचा जन्म झाला. जन्मानंतर आई लगेच गेली आणि मातृछत्राविनाच त्याचे बालपण अत्यंत दुःखित अवस्थेमध्ये गेले. त्याचे प्रोटेस्टंट मध्यमवर्गीय कुटुंब होते. मात्र वडील अतिशय बेजबाबदार आणि नादिष्ट होते. सोळाव्या वर्षी रुसोने घर सोडले आणि त्यानंतर त्याने भरपूर भटकंती केली.

या काळात अनेक प्रकारचे अनुभव त्याने गाठीला बांधले. चांगले-वाईट सर्व प्रकारचे जीवन तो जगला. त्याने कधी नाटयक्षेत्रामध्ये काम केले, तर कधी सरकारी नोकरी करून पाहिली. कधी अतिशय हलकीसलकी कामे केली, तर कधी अमीर-उमरावांच्या घरी वास्तव्यही केले.

जीवनाच्या विद्यापीठामध्ये रुसोचे शिक्षण झाले असेच म्हणावे लागेल. एक गोष्ट त्याच्या लक्षात येत गेली, ती म्हणजे अनियंत्रित राजसत्ता ही सामान्य मनुष्याला सुखी आणि शांत जीवनापासून दूर ठेवत आहे.

 

राजाचे युध्दखोर धोरण, दरबारी आणि राजकुटुंबाची चैन, सर्व श्रेणींचे धर्मगुरू - बिशप, आर्चबिशप, कार्डिनल यांची सामान्य लोकांपेक्षा राजाच्या चरणी असलेली निष्ठा आणि त्यातून त्यांना मिळणारे आर्थिक फायदे. अमीर-उमराव हे राजदरबारातले विशेषाधिकारी! शेती कसणाऱ्या आणि कष्ट करून काम करणाऱ्या लोकांच्या कष्टांवर आणि जिवावर चाललेली त्यांची चैन आणि मग या सर्वांना पोसणारी, या सर्वांचे सारे काही काम करणारी अशी सामान्य जनता ही सगळयात खालच्या श्रेणीत! ही जनता आनंदापासून पारखी झालेली आहे हे त्याच्या लक्षात येत गेले आणि मग त्याने लिहिण्याचा सपाटा लावला!

 

'द सोशल कॉन्ट्रॅक्ट ऑर द प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिकल राइट्स', 'डायलॉग्स', 'कन्फेशन' ही त्याची पुस्तके खूप गाजली.

राज्याचा उदय हा सामाजिक करारामधूनच झालेला आहे असे रुसो मानतो. आधुनिक लोकशाही, प्रजासत्ताक राज्यपध्दती, लोकमताचे स्थान आणि मूलभूत हक्कांचे पावित्र्य या कल्पना पहिल्यांदा रुसोने आपल्या लिखाणात मांडल्या. समाज कसा अस्तित्वात आला असेल, समाजाचे नियम कसे बनत गेले असतील, कसे तयार होत गेले असतील यावर आजवरच्या विचारवंतांनी नेहमीच भरपूर चिंतन केले होते. मात्र रुसोने सांगितलेला करार हा सर्वांपेक्षा थोडासा वेगळा आहे. तो कसा आहे, ते थोडे समजून घेऊ या. रुसोचे निसर्गावरती खूप प्रेम होते. निसर्गाकडे चला हे त्याचे उद्गार नेहमीच सर्व पर्यावरणवादी आणि साधे जीवन जगणाऱ्या लोकांना प्रेरणा देत आलेले आहेत. रुसोचे असे म्हणणे होते की जेव्हा निसर्गअवस्थेतील समाज हा नागरी समाज होऊ लागला, त्याचे समष्टीमन तयार झाले. सामूहिकरीत्या समाज या नात्याने व्यक्ती सार्वभौम झाल्या. एका एका व्यक्तीने आपले व्यक्तित्व, आपले हक्क आणि अधिकार या समूहाच्या इच्छेला अर्पण केले आणि आपण दिलेले हक्क व अधिकार स्वतः सामूहिक इच्छेचा घटक या नात्याने स्वतःच स्वीकारले.

आपल्या भारताच्या संविधानातदेखील 'आम्ही हे संविधान स्वतःप्रति अर्पण करीत आहोत' असे वाक्य आहे, त्याचेही मूळ कोठेतरी रुसोच्या या समष्टीमनाच्या कल्पनेमध्ये आहे.

रुसोच्या लिखाणाचा फ्रेंच समाजावर जबरदस्त पगडा होता. संसद नसलेल्या देशात साहित्यिकच राजनीतिज्ञ झाले होते असे हेजन याने म्हणून ठेवले आहे, तर कॅटलबी असे लिहितो की या काळातील साहित्य म्हणजे अनियंत्रित राजसत्तेला नष्ट करणारा दारूगोळा होता.

 

सरकार हे आपल्या सोयीसाठी आणि सुखासाठी निर्माण केले आहे. जर सरकार ही सोय न वाटता अडथळा वाटली, तर ते काढून टाकणे ही चूक नाही. राज्यकारभार जनतेच्या हितासाठी जनतेच्या इच्छेने चालवायचा असेल, तर लोकमताला पूर्ण वाव मिळाला पाहिजे. अशा अत्यंत क्रांतिकारक विचारांची पायाभरणी रुसोने केली.

ज्या काळामध्ये विचारशून्य, घमेंडखोर, उधळे, स्तोम माजवणारे असे राज्यकर्ते होते, त्या काळामध्ये रुसोचे लेखन फ्रेंच राज्यक्रांतीची पहिली ठिणगी ठरले. हे लेखन लोकांनी डोक्यावर घेतले.

रुसोचे व्यक्तिस्वातंत्र्यविषयक विचार हे समूहमनाला आणि व्यक्तीला एकाच वेळी योग्य तो न्याय देणारे आहेत. समष्टीचे मत हे नेहमीच सर्व व्यक्तींना घेऊन चालणारे असते, असे त्याचे म्हणणे होते. लोकांना ते सारे आपल्या हिताचे वाटले. राज्यसंस्था ही दैवी नसून लोकांनी निर्माण केलेली आहे, असे म्हणून रुसोने आधुनिक लोकशाहीचा पाया घातला.

जनतेच्या इच्छेनुसार कायदे व घटना तयार झाल्या पाहिजेत, या विचारांना पहिल्यांदा रुसोमुळे अधिष्ठान मिळाले. 1778मध्ये रुसोचा मृत्यू झाला आणि 1789मध्ये फ्रान्सची राज्यक्रांती घटित होऊन तेथे प्रजासत्ताक निर्माण झाले.

एकाच वेळी समाजमन-समष्टी यांचे महत्त्व प्रतिपादन करून त्याचबरोबर व्यक्तिस्वातंत्र्याचाही पुरस्कार करून आणि प्रस्थापित राजसत्तेला लोकांना विरोध करण्याचे अधिकार आहेत हे स्पष्टपणे मांडून वेगळया विचारांचा पायंडा घालणारा हा आधुनिक चिंतक स्वतः मात्र अत्यंत हालअपेष्टेत जगला आणि तसाच बेदखल अवस्थेमध्ये मरण पावला.

 

फ्रेंच राज्यक्रांतीने मानवतावादी विचारांना चालना दिली. गुलामगिरीची अमानुष पध्दत नाहीशी होण्यासाठी आणि तुरुंगातील कैद्यांचे जीवन सुधारण्यासाठी उदारमतवादाचे वारे यानंतर वाहू लागले. मानवी हक्काचे विचार जगभरात गेले. त्यात सुरुवातीला ज्यांचे योगदान आहे, त्यामध्ये जॉन जॅक रुसोचे नाव अग्रागण्य राहील.