धर्माच्या नावाखाली विकृतीचा कळस

विवेक मराठी    06-Jan-2020
Total Views |

 रोमन कॅथलिक चर्चमधील ही अत्याचाराची प्रकरणे केवळ भारतातच नाहीत, तर इतर देशांतही घडत आहेत आणि वेळोवेळी तेथील राजकीय परिस्थितीशी ही संस्था कशी जोडली गेलेली आहे यावर तेथील मिशनऱ्यांवर काय कारवाई होते हे अवलंबून आहे. भारतात केरळमध्ये कित्येक वर्षे कम्युनिस्ट राजवट असल्याने रोमन कॅथलिक मिशनरी तयार करण्याचा कारखानाच उघडलेला आहे. राजकीय आश्रयामुळे केरळमधील नन्सवर आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचार होत असले तरी या मिशनऱ्यांवर कारवाई होत नाही.


kerala nuns issue_1 

गेल्या कित्येक वर्षांपासून केरळमधील मिशनरीज ऑफ जिझस
, मिशनरीज ऑफ चॅरिटी या ख्रिस्ती पंथांच्या चर्चेसमध्ये नन्स आणि अल्पवयीन मुली यांचा लैंगिक छळ होत असल्याच्या बातम्या बाहेर येत आहेत. कन्नूर येथील एका मिशनरी शाळेत शिकणाऱ्या 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तेथेच शिक्षक म्हणून काम करणाऱ्या फादर रॉबिन वडाकुच्चेरी याने 2016मध्ये वारंवार अत्याचार केला. त्या मुलीने फेब्रुवारी 2017मध्ये एका बाळाला जन्म दिला. https://www.thenewsminute.com/article/kerala-priest-fr-robin-found-guilty-raping-and-impregnating-16-yr-old-girl-96819 हे प्रकरण झाकून टाकण्यासाठी त्याच चर्चमधील नन्सना दोषी ठरवलं गेलं. या केसबध्दल खूप उलटसुलट चर्चा झाली. या केसचा दबाव इतका तयार झाला की त्या पीडित मुलीच्या वडिलांनी आपणच आपल्या मुलीवर बलात्कार केला असल्याचे मान्य केले. शेवटी अत्याचारित मुलीच्या बाळाच्या डीएनए टेस्टमध्ये हे सिध्द झाले की त्याचा संबंध फादर रॉबिन याच्याशीच आहे. तरीही चर्च फादर रॉबिन याला दोषी मानून त्याच्यावर कारवाई करण्यास तयार नाही.

 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

2018मध्ये वायनाडमधील चर्चच्या एका ननने जालंधरमधील बिशप फ्रँको मुलक्कल यांनी 2014 ते 2016 या कालावधीत तिच्यावर 12पेक्षा अधिक वेळा बलात्कार केला असल्याचा आरोप केला असल्याची बातमी आली होती. https://www.indiatoday.in/india/story/kerala-nun-rape-case-1432150-2019-01-16 त्या ननने केलेल्या आरोपाच्या समर्थनार्थ तिच्याबरोबर काम करणाऱ्या सहकारी नन्स चर्चच्या बाहेर आंदोलन करत होत्या. शेवटी बिशप मुलक्कल याला कोर्टापुढे हजर राहावे लागले. ट्रायल चालू होती, तोपर्यंत रोममधील व्हॅटिकन येथील वरिष्ठांनी त्याला बिशप या पदावरून तात्पुरते बाजूला केले होते. कोर्टाने त्याला दोषी ठरवल्यावर काही दिवस तो जेलमध्ये होता. पण नंतर केरळ सरकारने त्याला जामीन दिला. जामिनावर सुटलेल्या या बिशपचे जालंधरमध्ये गुलाबाच्या पाकळया उधळून एखाद्या हिरोप्रमाणे स्वागत झाले. https://www.thenewsminute.com/article/rape-accused-bishop-franco-mulakkal-given-grand-welcome-jalandhar-90142 त्याला बिशप या पदावर पुन्हा नियुक्ती देण्यात आली. अजूनही त्याच्या जामिनामध्ये 6 जानेवारी 2020पर्यंत वाढ करणात आली आहे. याउलट ज्या ननवर बलात्कार झाला होता, तिला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. ज्या चार नन्स तिच्या पाठीशी उभ्या राहून तिला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करत होत्या, त्यांना चर्चने बेदखल केले आणि चर्चच्या कार्यक्रमांत सहभागी होण्यास मज्जाव केला. https://www.livemint.com/news/india/kerala-church-dismisses-nun-for-protesting-against-rape-accused-bishop-1565160521549.html केरळमधील त्या चर्चचे 60% सदस्य तक्रारदार ननलाच दोषी मानतात. यात अगदी मोठमोठे शिकलेले लोक आहेत.

 
kerala nuns issue_1 

आपण जर केरळ मधील कॅथलिक चर्चच्या नन्सवरील अत्याचाराच्या बातम्या वाचून त्यांचा मागोवा घेतला, तर थोडयाफार फरकाने हीच कथा समोर येते. रोमन कॅथलिक चर्च ही संस्था किती पॉवरफुल आहे, हे लक्षात येण्यासाठी हे सर्व तपशिलात जाणून घेणे गरजेचे आहे. https://timesofindia.indiatimes.com/city/thiruvananthapuram/Former-Nuns-autobiography-to-expose-Catholic-Churchs-crisis-in-Kerala/articleshow/12476427.cms बलात्काराचा, अत्याचाराचा गुन्हा केलेल्या बिशपला किंवा प्रीस्टला निर्दोष मानून तक्रारदार नन्सनाच दोषी ठरवून चर्चमधून काढून टाकलेले आहे. ज्या लहान मुलींवर किंवा मुलांवर बिशप किंवा प्रीस्टकडून अत्याचार झाले, त्या मुलांच्या पालकांनाच चर्चला बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी चर्चमधून काढून टाकले. काही जणींनी नन्सवरील होणाऱ्या अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी स्वत:ची आत्मचरित्रे लिहून प्रकाशित केलेली आहेत. https://www.ndtv.com/kerala-news/kerala-nun-who-protests-against-bishop-franco-mulakkal-pens-autobiography-on-sex-abuse-by-bishops-2142353 िकाहींनी स्वतंत्रपणे सामाजिक कामाला सुरुवात करून स्वत:ला पुन्हा कामात गुंतवून घेतलेय. पण त्यांना प्रश्न आहे ते त्यांच्या कामासाठी पैसे कसे मिळतील याचा. ह्या सगळया गुंत्यावर भाष्य करण्यासाठी आधी आपल्याला रोमन कॅथलिक चर्च नक्की काय आहे? ख्रिस्ती धर्माची शिकवण काय? या सगळयाचा अशी प्रकरणे झाकण्यामागे काय संबंध आहे याचा मागोवा घेऊ.

 

रोमन कॅथलिक चर्चची रचना

आपण जर ख्रिस्ती धर्माच्या इतिहासात डोकावले, तर लक्षात येते की सगळेच इब्राहिमिक धर्म (यहुदी, ख्रिस्ती, मुसलमान) हे राजकीय धर्म आहेत. म्हणजेच यांची निर्मिती आध्यात्मिक गरजेतून झालेली नसून सत्तालालसा आणि राजकीय प्रभाव वाढविणे यातून झालेली आहे. ख्रिस्ती धर्माची मूळ शिकवणच आहे की सर्व माणसे पापी आहेत आणि या लोकांच्या पापांचे परिमार्जन करण्यासाठी परमेश्वराने स्वत:च्या मुलाचा, म्हणजेच येशू ख्रिस्ताचा बळी दिला. त्यामुळे जे लोक येशू ख्रिस्ताला मानतील ते लोक स्वर्गात जातील आणि बाकीचे नरकात. जे लोक येशू ख्रिस्ताला मानत नाहीत, त्यांना येशू ख्रिस्ताला मानण्यासाठी उद्युक्त करून त्यांचे धर्मांतर करणे हे प्रत्येक धार्मिक ख्रिस्ती व्यक्तीचे आद्य कर्तव्य आहे. म्हणूनच ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी विविध मिशनरी संस्था निघाल्या. ख्रिस्ती धर्मात मुळात दोन मुख्य पंथ आहेत. रोमन कॅथलिक आणि प्रोटेस्टंट. प्रोटेस्टंट पंथाचे आणखी विविध पंथ निघालेले आहेत. या प्रत्येक पंथाने जिथे जिथे ख्रिस्ती सोडून इतर धर्मांचे लोक राहत आहेत तिथे तिथे हॉस्पिटल्स, शाळा, अनाथालये इत्यादी समाजोपयोगी प्रकल्प चालू करून ख्रिस्ती धर्मप्रसाराचे कार्य चालू ठेवले आहे.


kerala nuns issue_1  

https://i.pinimg.com/originals/70/c9/d9/70c9d96f492dbdcd13d1bc7895d02269.jpg

रोमन कॅथलिक चर्च ही एक खूप मोठी संस्था आहे. वर दिलेल्या छायाचित्रात या चर्चच्या रचनेची उतरण आहे, ती पाहा. https://i.pinimg.com/originals/70/c9/d9/70c9d96f492dbdcd13d1bc7895d02269.jpg. पोप हा रोमन कॅथलिक चर्चचा प्रमुख असतो, जो रोममधील व्हॅटिकन सिटीमध्ये असतो. पोपच्या खालोखाल कार्डिनल्स असतात, जे पोपच्या जास्त जवळ असतात आणि पोपला निवडण्यात यांचा सक्रिय सहभाग असतो. साधारणपणे 115पेक्षा जास्त कार्डिनल्स या प्रक्रियेत सहभागी असतात. कार्डिनल्सच्या खालोखाल आर्चबिशप्स असतात. या आर्चबिशप्सची पदे मोठमोठया शहरांशी जोडलेली असतात. उदाहरणार्थ, आर्च बिशप ऑफ जेरुसलेम याच्या अखत्यारित इस्रायल, पॅलेस्टाईन हा सर्व भाग येतो. या आर्चबिशप्सच्या खालोखाल बिशप्स असतात. या बिशप्सना धार्मिक शिकवण देण्याचा आणि त्याचा प्रसार करण्याचं प्रशिक्षण देण्याचा अधिकार असतो. बिशप्सच्या खालोखाल प्रीस्ट्स किंवा फादर्स असतात. प्रीस्ट/फादर्सच्या खालोखाल डिकन्स असतात. डिकन्समध्ये नन्स आणि ब्रदर्स येतात. त्या खालोखाल सर्वसामान्य जनता असते. सर्वसामान्य जनतेतून महिला आणि पुरुष अनुक्रमे नन्स आणि ब्रदर्स म्हणून रुजू होतात. त्यानंतर त्यांच्या कार्यानुसार, अनुभवानुसार आणि क्षमतेप्रमाणे पदोन्नती मिळत जाते. गंमत म्हणजे नन्सनी कितीही चांगले काम केले, तरी पदोन्नती फक्त पुरुषांनाच मिळते. याचा अर्थ रोमन कॅथलिक चर्चमध्ये लैंगिक भेदभाव जबरदस्त आहे. चर्चशी निगडित संस्थेमध्ये वयस्कर नन असेल आणि त्यांचा अनुभवही मोठा असेल, तर अपवादात्मक स्थितीत त्यांना मदर असे संबोधले जाते. अन्यथा सगळया सिस्टर्सच असतात. हे सर्व थेट व्हॅटिकनच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतात आणि पोप व कार्डिनल्सना उत्तरदायी असतात. प्रत्येक चर्चमधील प्रीस्ट/फादर्स, नन्स, ब्रदर्स, त्या भागाचे बिशप्स, संपूर्ण भागाचे आर्चबिशप या सगळयांचे रेकॉर्ड व्हॅटिकनमध्ये ठेवलेले असते. नन्सना जर आध्यात्मिक अनुभव आलेले असतील किंवा त्यांच्याकडून काही चमत्कार (??) झालेले असतील, तर त्यांना व्हॅटिकनकडून संतपद बहाल केले जाते. उदाहरणार्थ, मदर टेरेसांना संतपद दिलेले होते. पोपला एका राजाप्रमाणे मानले जाते. व्हॅटिकन सिटी हा जगातील सगळयात छोटा देश आहे. आता आपल्या लक्षात येईल की रोमन कॅथलिक चर्च किती योजनाबध्द पध्दतीने काम करते. जगभरातील छोटयातील छोटया चर्चच्या उपक्रमांचे मार्गदर्शन व्हॅटिकनमधूनच होत असते. त्यामुळे यात काम करणाऱ्या लोकांनाही या अत्यंत प्रभावशाली संस्थेचे पाठबळ मिळत असते.

 

मिशनरी अविवाहित का असतात?

मुळात ख्रिस्ती धर्माची शिकवण ही मनुष्यप्राणी हा पापी आहे अशापासूनच सुरू होते. त्यामुळे माणसाच्या ज्या काही नैसर्गिक ऊर्मी, गरजा आहेत त्या पापाकडेच घेऊन जातात असा पक्का समज आहे. एखादा पुरुष आणि स्त्री एकत्र येण्यामागे फक्त नवीन जीवनिर्मिती हा आणि हाच हेतू असतो. त्यामुळे बर्थ कंट्रोल वगैरे वापरणे हे पाप समजले जाते. प्रोटेस्टंट पंथाच्या मिशनऱ्यांना विवाह करण्याची मुभा असते. त्यामुळे रोमन कॅथलिक चर्चच्या माध्यमातून ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी पूर्णवेळ देणे म्हणजे कोणतीही कौटुंबिक जबाबदारी न घेता अविवाहित राहणं हे अपरिहार्य झाले. शेवटी नैसर्गिक भावना दाबून टाकून माणूस किती काळ निरोगी मनाने जगू शकतो? याचीच परिणती बिशप्स, फादर्स यांच्या विकृत वर्तनात झालेली आहे.

 

एकूणच चर्चचे उपक्रम आणि त्यांची कार्यपध्दती पाहिली तर लक्षात येते की हे सर्व प्रकार वापरतात. म्हणजेच कुणाला नुसते गोड गोड बोलून भुलवून (साम), तर कुणाला आर्थिक मदत करून (दाम) ख्रिस्ती धर्म स्वीकारायला लावतात. काही ठिकाणी दंड आणि भेदाची उदाहरणेही पाहावयास मिळतात. केरळमध्ये विशेषत: साम आणि दाम हे दोन प्रकार पाहावयास मिळतात. केरळमध्येच सर्वाधिक रोमन कॅथलिक चर्चच्या माध्यमातून मिशनरी कार्य करण्यासाठी नन्स आणि ब्रदर्स रुजू होतात. मिशनरी कार्य करताना भोळया जनतेला भुलविणारे लोक स्वत:च पापात बुडालेले आहेत (म्हणजे नन्सवर अत्याचार करणे, मिशनरी शाळेत शिकणाऱ्या मुलींचे लैंगिक शोषण करणे) असे जर बाहेर पडले, तर किती लोक यांच्यावर विश्वास ठेवून चर्चमध्ये येतील? यासाठी म्हणून या अत्याचारी बिशप्सना आणि फादर्सना अभय दिले जात आहे. त्यांचे गुन्हे माफ केले जाऊन ज्यांच्यावर अत्याचार झालेला आहे/होतो आहे त्यांचेच आवाज बंद करून टाकण्याचा प्रयत्न होतो आहे. यासगळयात रोमन कॅथलिक चर्चमध्ये स्त्रियांना कमी लेखले जाणे आणि त्यांना काहीही अधिकार नसणे याबाबतही नन्सनी भाष्य केलेले आहे. अत्याचारी बिशप किंवा प्रीस्ट हा पुरुष असल्यानेच व्हॅटिकन त्याच्या मागे ठामपणे उभे राहते आणि अत्याचारित पीडिता ही एक स्त्री असल्याने तिचा आवाज दाबून टाकला जातोय असेही मत नन्सने व्यक्त केले आहे. जेव्हा एखाद्या स्त्रीने नन म्हणून स्वत:चे पूर्ण आयुष्य चर्चला वाहिलेले असते, त्या वेळी जर तिच्यावर असा अन्याय होऊन चर्चने तिला काढून टाकले, तर ती जाणार कुठे? यासाठी अनेक नन्स ह्या त्यांच्यावर अत्याचार झाला तरी गप्प बसणेच पसंत करतात. ज्या बोलल्या त्यांना असा अनुभव आहे की चर्चकडून त्यांना कोणताच पाठिंबा मिळत नाही म्हणून त्यांना थेट पोलिसांत जाऊन तक्रार द्यावी लागते आणि अत्याचारी बिशपला कोर्टात खेचावे लागले.

बलात्कारी व्यक्तीला धर्म नसतो...

बलात्कार करणे ही एक विकृती आहे आणि ती कोणत्याही धर्माशी निगडित नाही हे खरे आहे. हिंदू धर्मातही (आसाराम बापू), शीख धर्मातही (बाबा राम रहीम) असे बलात्कारी बाबा आहेत आणि त्यांना शिक्षा झालेली आहे. त्यांच्या समर्थकांनीदेखील त्यांच्या अटकेविरोधात आणि त्यांच्या समर्थनार्थ निदर्शने केलेली होती. मग फक्त रोमन कॅथलिक चर्चमधील मिशनऱ्यांनाच आपण वेगळे का काढतोय? त्याला कारण आहे. हिंदू धर्मात किंवा शीख धर्मातील हे स्वयंघोषित गुरू आहेत. त्यांना कोणत्या एका संस्थेने नियुक्त केलेले नाहीये. तिथे कोणतीही एक मोठी संस्था कार्यरत नाहीये, जी या सगळयांना पोसते, त्यांच्या उपक्रमांना पैसा पुरवते. यांनी स्वत:च्या कामासाठी लागणारा पैसा आपला आपण उभा केला आहे... त्यांच्या भक्तांच्या जोरावर. अशी कोणतीही संस्था या गुरूंच्या पाठीशी नाहीये, जी देशातील राजकीय पक्षांच्या बाजूने किंवा विरोधात जनमत तयार करू शकेल. त्यामुळेच इतर धर्मातील बलात्कारी बाबांना व्यवस्थित न्यायप्रक्रिया चालवून तुरुंगात टाकलेले आहे. पण रोमन कॅथलिक चर्चमधील प्रकरणे दाबून टाकली जात आहेत, जी बाहेर पडली त्यातदेखील बलात्कारी मिशनऱ्यांना अभय मिळत आहे, त्यांच्यावर चर्चकडून कोणतीच कारवाई होत नाहीये आणि कोर्टाने दोषी ठरवलेच तरी त्यांना राजकीय लागेबांध्यांमुळे जामिनावर सुटका मिळत आहे.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/ 
 

ख्रिस्ती मिशनरी संस्था आणि राजकीय लागेबांधे

ही सर्व यंत्रणा देशभर आणि जगभर पसरलेली आहे. यांना जो पैसा पुरविला जातो, तो युरोप, अमेरिका, इंग्लंड यांसारख्या देशांतून येतो. या पैशांतून धर्मांतरणाचे कार्य अखंड चालू आहे. गंमत म्हणजे पाश्चात्त्य देशांत अनेक ठिकाणी शिकलेले लोक ख्रिस्ती धर्माची शिकवण विज्ञानाधिष्ठित नाही म्हणून ख्रिस्ती धर्म सोडून देत आहेत. पण आफ्रिका, भारत यांसारख्या विकसनशील देशांत (जिथे अजूनही शिक्षणाचे प्रमाण कमी आहे, गरिबी आहे) या मिशनरी लोकांना पाय रोवण्यास संधी मिळते आहे आणि ख्रिस्ती धर्माचा प्रसार केला जात आहे. रोमन कॅथलिक चर्च त्या त्या देशांतील राजकीय पक्षांच्या मागे वेळोवेळी आपला प्रभाव उभे करते. उदाहरणार्थ, 2018मध्ये रोमन कॅथलिक चर्चच्या भारतातील आर्चबिशपने सर्व ख्रिस्ती बांधवांना आवाहन केले होते की तुम्ही भाजपाच्या विरोधात मतदान करा आणि नरेंद्र मोदींना सत्तेपासून दूर ठेवा. त्यासाठी त्यांनी देशभरातील चर्चेसना तसे निर्देश दिलेले होते. दर रविवारच्या मासमधून (ख्रिस्ती प्रार्थना) हे सर्व ख्रिस्ती जनतेच्या मनात ठसविण्याचा आणि त्यातून जनमत विशिष्ट पक्षाच्या विरोधात तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

निष्कर्ष

अशा बलात्काराच्या केसेस मुसलमान धर्मांतही भरपूर आहेत पण त्या फारशा बाहेर आलेल्या नाहीत. म्हणजे बाहेर येण्याआधीच त्या व्यक्तींना गायब केले जाते. यावर कोणीही भाष्य करण्यास तयार नाही कारण केवळ आणि केवळ राजकीय फायदे. रोमन कॅथलिक चर्चमधील ही अत्याचाराची प्रकरणे केवळ भारतातच नाहीत, तर इतर देशांतही घडत आहेत आणि वेळोवेळी तेथील राजकीय परिस्थितीशी ही संस्था कशी जोडली गेलेली आहे यावर तेथील मिशनऱ्यांवर काय कारवाई होते हे अवलंबून आहे. भारतात केरळमध्ये कित्येक वर्षे कम्युनिस्ट राजवट असल्याने रोमन कॅथलिक मिशनरी तयार करण्याचा कारखानाच उघडलेला आहे. राजकीय आश्रयामुळे केरळमधील नन्सवर आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचार होत असले तरी या मिशनऱ्यांवर कारवाई होत नाही. याचाच परिणाम म्हणजे दिवसेंदिवस या केसेसची संख्या वाढते आहे.

aparnalalingkar@gmail.com

9742045785