श्री. वा. नेर्लेकर गुरुजी - ठाण्याचे चालतेबोलते विद्यापीठ

विवेक मराठी    01-Oct-2020
Total Views |

 @नीलेश गायकवाड

विधायक पत्रकारितेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गुरुजी. पत्रकाराला आवश्यक असणारी चौकस वृत्ती, नावीन्याचा सतत शोध, वाचन, समोरच्या व्यक्तीचा वेध घेण्याची क्षमता आणि सहज सोपी भाषाशैली अशा गुणांचा समुच्चय गुरुजीच्या ठायी होता. ठाण्यातील विविध विषयांवर गुरुजी लिखाण करीत असत. ठाण्याचे चालतेबोलते विद्यापीठ म्हणून नेर्लेकर गुरुजी ओळखले जात. ठाणे आणि ठाण्याच्या पत्रकारितेच्या इतिहासात श्री.वा. नेर्लेकर गुरुजीया नावाची लखलखती मोहोर तेजाने तळपत राहील!!

nrlekar _1  H xठाणे.. या ऐतिहासिक शहराला साहित्याचा, संस्कृतीचा, राजकीय, सामाजिक जाणिवांचा गंध आहे. जुने ठाणे ते नवे ठाणे ज्या डोळ्यांनी अनुभवले आणि आपल्या लेखणीने हा इतिहास जिवंत ठेवला, ते ठाणे शहराच्या सहा दशकांचा साक्षीदार असलेले आणि माझ्यावर पुत्रवत प्रेम करणारे गुरुजी अर्थात श्री.वा. नेर्लेकर यांचे अचानक सोडून जाणे हे मानायला अजूनही मन तयार नाही. उत्तम तब्बेत, नियमित चालणे, पथ्य सांभाळणारे गुरुजी कोरोनाच्या आघाताने अनंतात जाणे मनाला चटका लावून गेले.

श्रीकांत वामन नेर्लेकर श्री.वा. अर्थात गुरुजी. साक्षेपी पत्रकार आणि बहुआयामी लेखक. आमच्यासारख्या तरुणांना लाजवेल असे अफाट व्यक्तिमत्त्व. माझ्या आयुष्यात गुरुजींचे स्थान दीपस्तंभाप्रमाणे आहे. अखंड ज्ञानसेवक, अजातशत्रू, स्थितप्रज्ञ, ध्येयवादी, समन्वयवादी, निरलस पत्रकार, ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, चिंतनशील पत्रकार आणि बहुआयामी लेखक अशा बिरुदांनी गौरविले जाणारे गुरुजी साऱ्यांचेच मार्गदर्शक होते. १९५४पासून हाती घेतलेले पत्रकारितेचे व्रत त्यांनी तब्बल ६६ वर्षे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अव्याहतपणे सुरू ठेवले.

विधायक पत्रकारितेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गुरुजी. पत्रकाराला आवश्यक असणारी चौकस वृत्ती, नावीन्याचा सतत शोध, वाचन, समोरच्या व्यक्तीचा वेध घेण्याची क्षमता आणि सहज सोपी भाषाशैली अशा गुणांचा समुच्चय गुरुजीच्या ठायी होता. ज्या घटनेवर लिहायचे आहे, किंवा एखाद्या व्यक्तीवर लिहायचे आहे, त्याची पूर्ण माहिती घेऊन, प्रसंगी प्रत्यक्ष भेटून सत्य वृत्तांकन करणे हा त्यांचा गुण घेण्यासारखा होता. विधायकतेसाठी पाठपुरावा करून, हे आपण केले याचा कोणताही अभिनिवेश बाळगता प्रसारमाध्यमातील प्रसिद्धिपराङ्मुख असे ते पत्रकार होते, याचा मी साक्षीदार आहे.

गुरुजी मूळचे कुर्डूवाडी, जि. सोलापूरचे. मध्य रेल्वेत ३९ वर्षे नोकरी करून मानाने निवृत्त झाले. बालवयापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार. प्रासंगिक लिखाणाची आवड. हे बाळकडू घेऊन १९५४पासून पत्रकारितेला सुरुवात केली. दैनिक भारत या पुण्याच्या दैनिकाचे ठाणे वार्ताहर म्हणून त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर तरुण भारत (पुणे), तरुण भारत (मुंबई) यांचे १९८०पर्यंत बातमीदार म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्र टाइम्सचे वार्ताहर आणि प्रासंगिक लेखक म्हणून गुरुजी घराघरात पोहोचले. केसरी, देशोन्नती, दिव्य मराठी, नवशक्ती या दैनिकांसह साप्ताहिक विवेकमध्ये त्यांनी प्रासंगिक विपुल लेखन केले. विद्यार्थिदशेत रामभाऊ म्हाळगी, काका महाजनी यांच्या सान्निध्यात संस्कारांचे धडे घेतले. ज्येष्ठ संपादक चं.पा. भिशीकर, गोविंद तळवलकर, माधव गडकरी, कुमार केतकर, भारतकुमार राऊत, संजय राऊत, सुकृत खांडेकर, पराग करंदीकर अशा अनेक नव्या-जुन्या संपादकांबरोबर त्यांचे उत्तम ऋणानुबंध होते.

माझे आणि गुरुजींचे ऋणानुबंध जवळपास २९ वर्षांचे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता असताना झालेला परिचय, निर्माण झालेली जवळीक दैनिक तरुण भारतच्या निमित्ताने वाढत गेली. व्यास क्रिएशन स्थापनेपासून हा ऋणानुबंध वृद्धिंगत होत गेला. जुलै २००६. व्यास क्रिएशन्सचा शुभारंभ झाला आणि प्रतिभा दिवाळी अंकाचे संपादकत्व गुरुजींनी स्वीकारावे, असा प्रेमळ आग्रह केला. कोणताही विचार करता तो त्यांनी स्वीकारला. गेली १५ वर्षे प्रतिभा दिवाळी अंक गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली समृद्ध झाला. यंदाचा स्वदेशीजागर हा विशेषांक ते नसताना प्रकाशित करावा लागेल असे वाटलेही नाही. अंकाची मांडणी, कोणते विषय असावेत, लेखक याविषयीचे टिपण हातात देऊन ते गेले. हे माझ्यासाठी क्लेशकारक आहे. प्रतिभा दिवाळी अंकासह चैत्रपालवी, पासबुक आनंदाचे, करियर मंत्र या अंकातून गुरुजींची संपादकीय कारकिर्द बहरत राहिली. संपादनशैलीचे यथार्थ दर्शन घडले.

नवीन संकल्पना घेऊन वाचकांना भरभरून वाचनसौख्य देण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. एकाच वेळी पाच दिवाळी अंक, दिवाळीमध्ये गणपती विशेषांक, दिवाळी अंकांच्या १०६ वर्षांच्या परंपरेतील दोन खंड, शंभर विषयांचा अंक प्रकाशित करण्याचा विक्रम केला. वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला. व्यासच्या प्रत्येक वाटचालीत त्यांचे आत्मिक पाठबळ मोलाचे होते. गुरुजींच्या मार्गदर्शनाच्या आणि अनुभवाच्या शिदोरीवर यशाचे शिखर गाठणे सोपे झाले. व्यास क्रिएशन्स हा माझा ध्यास आहे, या ध्यासाला गुरुजींची साथ लाभली.

धगधगते यज्ञकुंड, अनादि अनंत सावरकर, नावात काय दडलंय, मुंबईचा महापुरुष नाना शंकरशेठ, पुण्यभूमी सासवड आणि ठाणे नगरपालिका ते महानगरपालिका ही पुस्तके त्यांच्या संशोधक वृत्तीची साक्ष देतात. ठाण्याचा इतिहास, ठाण्यातील रस्ते, चौक, वसाहती वास्तू यांच्या नावाचा इतिहास, दुर्मीळ आठवणींचा गोफ शब्दबद्ध करण्याचे मोठे काम त्यांनी केले. पुढील कित्येक वर्ष दस्तऐवज ठरेल एवढे महत्त्वपूर्ण योगदान गुरुजींनी दिले आहे. ठाण्यातील सामाजिक संस्थांवरील पुस्तकही प्रकाशनाच्या वाटेवर आहे. अनेक विषय शब्दबद्ध करण्याचा जणू ध्यास गुरुजींनी घेतला आणि त्याच्या पूर्ततेसाठी घेत असलेले कष्ट आणि परिश्रम मी पाहिले आहेत.

पत्रकारिता ही विधायकच असली पाहिजे, यावर गुरुजींचा ठाम विश्वास होता आणि या वाटेवरूनच त्यांनी अखंड पत्रकारिता केली. कोणतीही राजकीय प्रणाली असो, गुरुजींचे सगळ्यांशीच सलोख्याचे संबंध होते. प्रशासकीय अधिकारी, लोकसभा, विधानसभा सदस्य ठाण्याच्या विकास कामासाठी आवर्जून गुरुजींचे मार्गदर्शन घेत. सल्ला विचारत. ठाण्यातील विविध रस्ते, चौक यांच्या नामकरणाचा प्रस्ताव, रंगो बापूजी गुप्ते चौकाचे नामकरण, ज्येष्ठांसाठी जेष्ठ भवनाची मागणी, ठाणे-ऐरोली-नवी मुंबई येथील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी लढा, अगदी सामान्यातल्या सामान्य व्यक्तीच्या कौटुंबिक समस्येसाठी पाठपुरावा, अनेक सामाजिक प्रश्नांवर भाष्य, समाजाभिमुख काम करणार्या संस्थांना व्यक्तींना प्रकाशात आणणे, विकासकामांसाठी सरकारदरबारी सातत्याने झटणे अशा अनेक कामांमध्ये गुरुजींचा सिंहाचा वाटा होता. पत्रकारिता हे आयुध नेर्लेकर गुरुजींनी केवळ समाजाच्या हितासाठीच वापरले.

कोणतेही लिखाण करताना त्यांची स्वत:ची अशी शिस्त असायची. वयाच्या ८७व्या वर्षीही ते सुवाच्य हस्ताक्षरात लेख लिहीत. वर्तमानपत्रासाठी आखून दिलेल्या शब्दमर्यादेतच स्वच्छ कागदावर तो असायचा. कविता, कोट्या, सुविचार, इंग्लिश शब्दांचा वापर करता सामान्य वाचक डोळ्यासमोर ठेवून केलेले त्यांचे लिखाण होते. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन बातमी घेणे, त्या संबंधित व्यक्तींना प्रत्यक्ष भेटणे, एखाद्या व्यक्तीने - संस्थेने केलेले कार्य प्रत्यक्ष जाऊन पाहणे आणि मगच त्यावर वृत्तांकन करणे हा त्यांच्या पत्रकारितेचा महत्त्वाचा मापदंड होता. मुलाखत ही त्यांनी कधीही फोनवरून किंवा पूर्वप्रकाशित लेखावरून तयार केली नाही. पत्रकारितेचे हे तत्त्व त्यांनी अखेरपर्यंत पाळले. ठाण्याचे चालतेबोलते विद्यापीठ म्हणून नेर्लेकर गुरुजी ओळखले जात.

स्वप्न कशी पाहावी, त्याचा ध्यास कसा घ्यावा, ती पूर्ण कशी करावीत हे मी त्यांच्याकडून शिकलो. माझ्या निर्णयात त्यांनी नेहमीच साथ दिली, कुठे खटकले तर वडीलकीच्या नात्याने दटावलेही. त्यांचा पाठीवरचा हाच आश्वासक हात मला स्वतःला सिद्ध करण्यासाठी संजीवनी होता. गुरुजी तसे मितभाषी. पण जेव्हा जेव्हा जे जे बोलायचे, त्या बोलण्यात अनुभवाचे मर्म होते. वायफळ बडबड करण्यापेक्षा स्पष्ट मुद्देसूद बोलून ते मोकळे होत. वशिला, लालूच, असत्य, द्वेष, सूड या विकारांना त्यांनी कधी थारा दिला नाही. अनेक दु:खांचा सामना करून केवळ दुसऱ्यांसाठी जगले. पण आज मी आणि समस्त ठाणेकर या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाला पारखे झालो. त्यांच्याबरोबर व्यतीत केलेल्या अनेक सुखद अनुभवांची शिदोरी, आठवणी हृदयाच्या कप्प्यात कायम जिवंत राहतील. गुरुजी.. हे विधात्याने माझ्या आयुष्यात लिहिलेले एक सुंदर पान आहे. ते मी कायम जपेन. त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करणं हे कर्तव्य मानून त्यांनी आखून दिलेल्या वाटेवरून माझी वाटचाल असेल.

जेव्हा जेव्हा गुरुजी भेटायचे, तेव्हा म्हणायचे I Goes. तेव्हा पुन्हा भेटण्याची त्यात आतुरता होती. खात्री होती. आताही गुरुजी असेच म्हणालात का? मनातल्या मनात. हजारो लेखक, पत्रकार, नवोदित साहित्यिक यांच्यासाठी आपण दीपस्तंभाप्रमाणे होता, आहात आणि असणार आहात. ठाणे आणि ठाण्याच्या पत्रकारितेच्या इतिहासात श्री.वा. नेर्लेकर गुरुजीया नावाची लखलखती मोहोर तेजाने तळपत राहील!!


संचालक प्रकाशक
व्यास क्रिएशन्स