आता सायरन वाजणार नाही...

विवेक मराठी    10-Oct-2020
Total Views |

@श्री.रा. फौजदार

 कार्यप्रवण आमदार मा. सरदार तारासिंगजी

 सेवा आणि संपर्क हा सरदार तारासिंग यांच्या प्रदीर्घ राजकारणातील नाण्याच्या दोन खणखणीत बाजू होत्या. मूलमंत्र होता. अधिष्ठानाचा भरभक्कम आधार होता. त्याला वक्तशीरपणाची किनार होती. बहुतांश कार्यक्रमांना ते दिलेल्या वेळेस किंवा पूर्वीच उपस्थित राहत. माणसांच्या गोतावळ्यातच राहणे त्यांना आवडे. व्यक्तिगत व संस्थात्मक व्यवहार अशी त्यांच्या स्वभावाची वेगळी धाटणी असे.


tarasing_1  H x

कार्यप्रवण आमदार मा. सरदार तारासिंगजी यांचे वयाच्या ८२व्या वर्षी दु:खद निधन झाले. गेली दोन वर्षे त्यांच्या प्रकृतीबाबतच्या तक्रारी होत्याच, परंतु अलीकडचेे तीन महिने त्यात चढउतार होत होते. त्याचा परिणाम अफवांच्या वृत्तात झाला. निवेदनांच्या प्रक्रिया घडल्या. त्यामुळे या वेळीही जनतेचा वृत्तावर विश्वास बसण्यास वेळ लागला. प्रारंभी उपयोगात आणलेल्या कार्यप्रवणविशेषणाने थोडे आश्चर्य वाटले असेल, कारण कार्यसम्राटहे पदनाम राजकीय नेत्यांनी इतके स्वस्त केले आहे की, वर्षातून सत्यनारायणाची एक पूजा आणि दहीहंडीचा दहा हजार रुपये इनामाचा उत्सव करणारा समाजसेवक नेता कार्यसम्राटपदनामाचा मानकरी होतो. बॅनरसम्राट बनतो. त्यामुळे ४० वर्षांहून अधिक प्रदीर्घ काळ लोकप्रतिनिधित्व केलेल्या मान्यवर व्यक्तीस या पदनामापासून दूर ठेवावे असे वाटले.
मा. तारासिंगजी यांच्या राजकीय कारकिर्दीचा ठळक आढावा घ्यावयाचा झाल्यास सन १९८३ ते १९९९ या कालावधीत सलग तीन वेळा भांडुप क्षेत्रात ते नगरसेवक म्हणून निवडून आले. सन १९९७मध्ये त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले. महापौरपदाच्या समितीवरही सदस्य म्हणून त्यांनी यशस्वीपणे काम केले. या कालावधीत उत्कृष्ट नगरसेवक म्हणून त्यांना पुरस्कार प्राप्त झाला होता. सन १९९९ ते २०१४ या कालावधीत सलग चार वेळा मुलुंड विधानसभा क्षेत्रातून सातत्याने वाढत्या मताधिक्याने निवडून आले. २०१४ साली ते नव्वद हजारापेक्षा अधिक विक्रमी मताधिक्याने विजयी झाले होते. विधानसभेतील त्यांची कारकिर्दही उल्लेखनीय ठरली. विविध प्रश्नांवर ते आकर्षक फलकांचा पेहराव करून सभागृहाचे लक्ष वेधून घेत. कौशल्यपूर्ण संवादाने विषय मांडीत.

लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपले काही मानदंड निर्माण केले. निवडणूक प्रचारादरम्यान मतांच्या याचनेसाठी मतदारांच्या दारात येणार्‍या प्रतिनिधींचा निवडणुकीनंतर शोध घ्यावा लागतो. संपर्क कार्यालयात हेलपाटे घालावे लागतात. मा. तारासिंगजी याला अपवाद होते. त्यांनी स्वयंशिस्त लावून घेतली होती. वीस वर्षांच्या आपल्या आमदारकीच्या कालावधीच ते विशिष्ट स्थानी व विशिष्ट वेळी भेटीसाठी सहज उपलब्ध असत. त्यांची दिनचर्या सर्वज्ञात होती, सर्वश्रुत होती. व्यवहार स्वच्छ होता. सकाळी कोळीवाड्याच्या कार्यालयातील कामकाज आटोपून सकाळी ११च्या सुमारास ते मुलुंड पूर्वेच्या मोरयाउद्यानात येत असत. दुपारी २पर्यंत तेथे वास्तव्य असे. त्यानंतर मुलुंडच्या पश्चिमेच्या पक्ष कार्यालयात जात. दुपारी २ ते ५ भांडुपच्या त्यांच्या कार्यालयात व राजभोग हॉटेलात भोजन व विश्रांतीसाठी थांबत. तेथे सायंकाळी ५ ते ६ जनतेच्या भेटीगाठी घेत असत. सायंकाळी ६नंतर साडेसातपर्यंत मुलुंड कॉलनीतील सरदार प्रतापसिंह उद्यानात बसत. सायंकाळी साडेसात ते ९पर्यंत पश्चिमेच्या पक्ष कार्यालयात येत. रात्री १० वाजता परत सायन-कोळीवाड्यात जात. या दिनचर्येत क्वचित बदल घडे. नागरिकांच्या सर्वंकष कामकाजांची या भेटीगाठीत हाताळणी होत असे.

 
सेवा आणि संपर्क या त्यांच्या प्रदीर्घ राजकारणातील नाण्याच्या दोन खणखणीत बाजू होत्या. मूलमंत्र होता. अधिष्ठानाचा भरभक्कम आधार होता. त्याला वक्तशीरपणाची किनार होती. बहुतांश कार्यक्रमांना ते दिलेल्या वेळेस किंवा पूर्वीच उपस्थित राहत. कार्यक्रमाबाबत वैविध्य असे. कौटुंबिक कार्यक्रमापासून ते संस्थात्मक कार्यक्रमांना आणि झोपडपट्टीपासून ते आलिशान गृहसंकुलातील कार्यक्रमांना ते आवर्जून उपस्थित राहत. सफारीच्या खिशातील छोट्या डायरीत दिवसभरातील संपूर्ण कार्यक्रमाची वेळेनुसार नोंद असे. माणसांच्या गोतावळ्यातच राहणे त्यांना आवडे. व्यक्तिगत व संस्थात्मक व्यवहार अशी त्यांच्या स्वभावाची वेगळी धाटणी असे. मतदारक्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्तींची, अधिकारिवर्गाची आणि कार्यकर्त्यांची निवासस्थाने त्यांना सुपरिचित होती. एवढेच नव्हे, तर प्रसंगानुरूप त्यांच्या भेटी घेत. संस्थात्मक जीवनाबाबत बोलावयाचे, तर सर्व शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था, सांस्कृतिक संघटना आणि ज्ञातिसंस्था यांच्याशी त्यांचे स्नेहसंबंध होते. सर्व पदाधिकार्‍यांशी व्यक्तिश: परिचय होता. त्यामुळे त्यांची शासकीय, निमशासकीय किंवा सामाजिक कामे सहजतेने होत. या आत्मीयतेपोटी कुणीच कसल्या प्रकारचे काम नाकारू शकत नसे. अर्थात, त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व हे त्याचे कारण होते. तसे संवादात्मक कौशल्यही होते. आपल्या व्यवहारास अनुकूल होते. कार्यालयातील अधिकारिवर्गास व कर्मचारिवर्गास ते सन्मानाने वागवीत. त्यामुळे तेही त्यांचा आदर राखत. योग्य तो प्रतिसाद देत. विशेष म्हणजे हा सर्व व्यवहार कार्यकर्त्यांनी पाळावा याचा हे आग्रह धरत. शिक्षण देत.
 
गत २० वर्षांत मुलुंडचा जो कायापालट झाला आहे आणि बांधकाम व्यावसायिक व नागरिक येथील निवासस्थानाच्या प्रेमात पडत आहेत, त्याचे श्रेय सरदार तारासिंग यांच्या कार्याला आहे. नगररचना आराखडा केवळ कागदावर रेखांकित न ठेवता त्यांनी आपल्या डोळ्यासमोर सतत ठेवून तो प्रत्यक्षात उतरविला. सहज मैलभर कुठेही चालले, तरी त्यांच्या कामांच्या खुणा ठिकठिकाणी दिसतात. रस्त्यावरील बैठकीची आसने, रस्त्याकडील गृहसंकुलातील पेव्हर ब्लॉक,  मंदिरासमोरील सभागृहे, झोपडपट्टीतील फरसबंदी, प्रसाधनगृहे, चौकाचौकातील सार्वजनिक प्रसाधनगृहे, वाचनालयांचे बोर्ड इ. बाबी याची साक्ष देतील. याची गणना परिशिष्टात न करता शतकाचा आणि सहस्रकांचा पाढा म्हणावा लागेल. सार्वजनिक आरोग्याबाबत, सुविधांबाबत त्यांच्या कार्याची वाखणी महापालिका अधिकारी व शासकीय अधिकारी करतात. नगरविकासात विशेष उल्लेख करावा असे काम म्हणजे पूर्वगती महामार्ग ते नीलमनगर अंतर्गत उपमार्गाचा उल्लेख करावा लागेल. प्रतिवर्षी आपल्या आमदार निधीचा संपूर्ण वापर करून प्रसंगी अधिक्याचा निधीही त्यांनी वापरला. विकासाचे प्रारूप प्रत्यक्ष दाखविले.

नगरविकासाच्या अनुषंगाने दोन गोष्टींचा विशेष उल्लेख करावा लागेल, त्या मा. तारासिंग याची सौंदर्यदृष्टी, कल्पकता आणि नावीन्य यांची बोलकी साक्ष आहे. मुलुंड पूर्वेचे मोरया उद्यानआणि पश्चिमेकडील सरदार प्रतापसिंहमनोरंजन उद्यान. मोरया उद्यानातील उत्तम गणेशमूर्ती, विसर्जन व्यवस्था, सर्व धर्मीयांची उपासना स्थाने, शिल्पे आणि विविध रंगीबेरंगी फूलझाडे; तसेच मनोरंजन उद्यानातील संगीत कारंजी, छोट्या बैठक व्यवस्था, स्केटिंग ग्राउंड, विस्तीर्ण मैदानातील वृक्ष व पुष्परचना. ही दोन्ही उद्याने मुलुंड उपनगराची आकर्षण केंद्रे आहेत.
नगरविकासाबरोबरच मा. तारासिंगजींनी नागरी जीवनालाही तितकेच महत्त्व दिले. सामाजिक समरसता त्यांनी व्याख्यानाऐवजी प्रत्यक्ष कृतीने दर्शविली. पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे संस्थात्मक कार्यहा त्यांचा वेगळाच भाव होता. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व ज्ञातिसंस्था विकसित व्हाव्यात, या दृष्टीने त्यांनी मोलाचे कार्य केले. शिक्षण संस्थांना दिलेली शैक्षणिक उपकरणी व शीत जलपान यंत्रे यांचा उल्लेख करता येईल. विद्यार्थ्यांना ते प्रतिवर्षी शैक्षणिक साहित्यांचे वाटप करीत. मुलुंड पूर्वेस आज बृन्हमुंबईत नावलौकिकास आलेल्या मराठा मंडळ, मुलुंडमुंबई संस्थेच्या सांस्कृतिक केंद्राच्या उभारणीस मा. तारासिंग यांनी प्राथमिक अवस्थेत भरीव साहाय्य केले. स्वत:चे वैयक्तिक एक लाखाचे योगदान दिले. संस्थेस शासकीय नियंत्रण दराने सिमेंट उपलब्ध करून दिले. आज संस्थेची भव्य व उत्तम वास्तू उभी आहे. हे सर्व त्यांनी स्वयंस्फूर्तीने आणि सर्व प्रकारची बंधने झुगारून संस्थेच्या दारात जाऊन केले. त्याचप्रमाणे सी.के.पी. समाज, दक्षिणी ब्राह्मण समाज, वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट, भंडारी समाज व वारकरी संप्रदाय या ज्ञाती, धार्मिक संस्थांना आपल्या कार्यालयासाठी व कार्यासाठी विनामूल्य प्रशस्त वास्तू उभारून दिल्या. या सर्व संस्था प्रादेशिक स्तरावर उत्तम कार्य करणार्‍या आहेत. 10 बाय10 ची वास्तू प्राप्तीसाठी आज लाखो रुपये मोजावे लागतात. हे मोठे आणि आगळेवेगळे काम आहे. मा. तारासिंगजींचे हे मूर्त स्वरूपातील स्मारकच म्हणावे लागेल. या ठिकाणी विशेष उल्लेख करणे आवश्यक आहे. संघपरिवाराचे त्यांच्या कारकिर्दीत सहकार्य व योगदान विचारात घेऊन त्यांनी संघपरिवारालाही कार्यालय - अर्थातच विनामूल्य प्राप्त करून दिले. सामाजिक जीवनात ४० वर्षांत प्रथमच ही घटना घडली. स्वत:चीच अत्याधुनिक, वातानुकूलित, सुशोभित, भव्य स्वरूपाची जनसंपर्क कार्यालये निर्माण करणार्‍या लोकप्रतिनिधींपेक्षा मा. तारासिंग यांचे हे योगदान कृतज्ञता दर्शविणारे आहे. सामाजिक समरसतेचा वेगळा धडा आपल्या राजकीय जीवनात मा. तारासिंगजींनी अशा प्रकारे गिरविला.
 
 
मुलुंड विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी निश्चित झाल्यावर मा. तारासिंगजींनी क्षेत्राची, कार्यकर्त्यांची, ज्येष्ठ पदाधिकार्‍यांची व पूर्वाश्रमीच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची माहिती जाणून घेतली. विशेषत: मा. बाळासाहेब धारप व वामनराव परब यांच्या योगदानाबद्दल ते कृतज्ञता व्यक्त करीत. वामनराव परबांमुळे ते जनसंघाकडे ओढले गेले, तर बाळासाहेबांना ते आपले आदर्श मानीत. मुलुंड पूर्व-पश्चिमेस जोडणार्‍या नीलमनगर येथील उड्डाणपुलास बाळ धारप उड्डाणपूलया नामकरणाने त्यांनी याबद्दलची कृतज्ञतापूर्ती केली. वामनराव धारप यांच्या जनताजनार्दन ट्रस्टच्या रौप्यमहोत्सवी समारंभात व त्यांच्या जीवनकार्यावरील पुस्तक प्रकाशन समारंभास त्यांचे योगदान लाभले. विशेष म्हणजे वरील ऐतिहासिक कार्यक्रमास जुन्या, ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना त्यांनी विशेषत्वाने आमंत्रित केले होते. त्यांच्यालेखी त्यांना आदराचे स्थान होते.
 
 
पोलीस वाहने आणि रुग्णवाहिका यांच्या कर्कश व धावत्या सायरनच्या आवाजाव्यतिरिक्त मुलुंडकरांना सौम्य व केवळ अर्ध्या मिनिटाच्या सायरनच्या आवाजाची प्रतिदिन सवय होती. आवाजाचा कानोसा घेत असताना मंदगतीने येणारी इनोव्हा ८२२६दृष्टीस पडे, माणसांच्या घोळक्यातून ती जात असे. मा. सरदार तारासिंगजींना हात करणारे नागरिक, प्रेमळ नजरेने भावना व्यक्त करणाने नागरिक यांच्यासाठी त्या वाहनाची गती मंदावत असे. कार्यक्रमस्थळी दूरवरून येणारा सायरनचा आवाज त्यांच्या आगमनाची सूचना देई, तर कधी भांडुप गतिरोधक ते नीलमनगर पूल आणि केळकर महाविद्यालय ते स्वामी समर्थ उद्यान या मार्गावरून जाताना नागरिकांना सायरनचा आवाज ऐकण्यास मिळे. मा. तारासिंगजींच्या उपस्थितीची ती खूण असे. आता ती लाल रंगाची इनोव्हा दिसणार नाही आणि सायरनचा आवाज ऐकू येणार नाही. कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना साद घालणारा सत नाम वाहे गुरुहा आवाज ऐकू येणार नाही.

 


9833027277