आयुर्वेद आणि कोरोनावरील उपचार

विवेक मराठी    13-Oct-2020
Total Views |
@वैद्य ज्योत्स्ना पेठकर


कोरोनाच्या ‘डेडली’ गोंधळात अशा आशयाच्या आवाहनानंतर काही वर्गाकडून publicity stunt म्हणून टीका होणार, याची पुरेपूर कल्पना होती, पण लोकांचा इतका भरभरून प्रतिसाद मिळेल याची पुसटशीही कल्पना नव्हती. आवाहन केल्यापासून आज जवळपास ३५० कोरोना रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करताना एक वैद्य म्हणून आयुर्वेदाची आणि एक नागरिक म्हणून राष्ट्राची जबाबदारी पार पाडतेय, याचे खूप खूप समाधान आहे.


ayurveda and corona_2&nbs

कोरोनाची साथ सुरू झाली आणि सगळीकडे एकच ‘सावळा गोंधळ’ सुरू झाला. महासंक्रमण ‘महामारी’ भासवले गेले. अगदी पहिल्यापासून ‘डेडली’ स्वरूप बिंबवले गेले. यावर काहीच औषध नाही इथपासून ते हमखास औषध सापडले इथपर्यंतच्या विविध माध्यमांतून पसरल्या गेलेल्या बातम्यांनी या गोंधळात अधिकच भर टाकली. जनता कोरोनाग्रस्त होण्याआधी ‘भयग्रस्त’ झाली. सर्व व्यवहार ठप्प होऊन बसले. एक-दोन नव्हे, तब्बल तीन महिने. सामान्य माणसाचेच नव्हे, तर संपूर्ण राष्ट्राचे अर्थकारण गडबडले.
 
यात ‘आयुर्वेदाने’ बोलण्याचा काहीही संबंध नाही, कारण ते पुरातन शास्त्र आहे, त्यात ‘कोरोनाचा उल्लेखच नाही’ अशी सूचक वाक्ये अगदी आधीपासूनच ऐकू येत होती, तर एकीकडे वैद्यांची फळीदेखील वेगवेगळे उपचार अथवा यामागचा विचार पटवून देण्यात गर्क होती. आयुर्वेद शास्त्राच्या वाटेला ही ‘अवहेलना’ हा काही नवीन प्रकार नव्हता, त्यामुळे मी शांतपणे या सर्व प्रकाराकडे बघत होते. आयुर्वेदिक औषधांनी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापुरता त्याचा विचार आधी गृहीत धरला गेला आणि मग आयुर्वेदिक इम्यून औषधांचा ‘घरगुती’ ते ‘branded’ असा प्रकार सुरू झाला. लोकांनादेखील खूप खोलात विचार न करता झटपट सोल्युशन हवे असते आणि काही जणांना झटपट आणि सेफ उत्पन्न, त्यामुळे हा इम्यून औषधांचा फक्त आयुर्वेदिकच नव्हे, तर सगळ्याच चिकित्सा पद्धतींचा गोंधळ सुरू झाला.

एक वैद्य म्हणून माझा या प्रकाराला पूर्ण विरोध होता. ‘रोग: सर्वेपि मंदाग्नौ’ हे सूत्र मी आज २० वर्षे प्रॅक्टिस करून वारंवार अनुभवलेले आहे. ऋतूनुसार आणि भुकेनुसार योग्य अन्न खाणे आणि शोषले जाणे हेच उत्तम प्रतिकारक्षमतेसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्याबद्दल मात्र कुणीही आग्रही दिसत नव्हते. याचा व्हायचा तोच परिणाम झाला आणि वेगवेगळ्या चिकित्सा पद्धतींची इम्युनिटी वाढवणारी औषधे घेऊनसुद्धा लोक बाधित झालेच. ऑक्सिजन बेडच्या अभावी मृत्यूचे प्रमाण वाढू लागले आणि सर्वत्र अस्वस्थतादेखील वाढू लागली. आयुर्वेदाला चिकित्सा देण्याची परवानगी मिळवण्यासाठी अनेकांचे अनेक पद्धतीने प्रयत्न एकीकडे चालूच होते, पण अर्थातच त्याला यश मिळणार नाही हे मला कळून चुकले होते. कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ या वादात न पडता राष्ट्राची परिस्थिती सावरण्याला महत्त्व देण्याची ही वेळ होती. त्या क्षणी आयुर्वेदाच्या अवहेलनेपेक्षा ‘राष्ट्रावर आलेल्या संकटात’ आपण काहीच करत नाही आहोत याची टोचणी जास्त लागली होती. आपण घेतलेली विद्या कधी कामास येणार? या विचारांनी अस्वस्थ होऊन कारवाईची तमा न बाळगता कोरोनाच्या चिकित्सेविषयी ‘जाहीर आवाहन’ केले.
 
कोरोनाच्या ‘डेडली’ गोंधळात अशा आशयाच्या आवाहनानंतर काही वर्गाकडून publicity stunt म्हणून टीका होणार, याची पुरेपूर कल्पना होती, पण लोकांचा इतका भरभरून प्रतिसाद मिळेल याची पुसटशीही कल्पना नव्हती. आवाहन केल्यापासून आज जवळपास ३५० कोरोना रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करताना एक वैद्य म्हणून आयुर्वेदाची आणि एक नागरिक म्हणून राष्ट्राची जबाबदारी पार पाडतेय, याचे खूप खूप समाधान आहे.

Ayurveda_1  H x 
वैद्य ज्योत्स्ना पेठकर

आयुर्वेदाची भूमिका

कोरोनाचे वर्णन तुमच्या ग्रंथात नाही, मग तुम्ही औषध कसे देणार? हा प्रश्न ठरलेलाच असायचा.
‘नास्ति रोगो विना दोषें: यस्मात् तस्मात् विचक्षण:
अनुक्तमपि दोषाणां लिंगे: व्याधिमुपाचारेत्”
ज्या रोगांचे वर्णन नाही, त्यासाठी ‘दोषांच्या लक्षणावरून’ चिकित्सा ठरवावी, असा स्पष्ट निर्देश ग्रंथातून दिलेला आहे. या विचाराला अनुसरूनच रुग्णाच्या लक्षणानुसार चिकित्सा सुरू करून रुग्णाला पुढची गुंतागुंत वाढवून प्राणवायूचा अभाव होऊ द्यायचा नाही, या दिशेने प्रवास सुरू केला.
 
चिकित्सा सूत्र
आयुर्वेदाचा एकूणच विचार हा ‘अग्नी’ संकल्पनेभोवती फिरतो. अग्नी म्हणजेच परिणमन करणारी शक्ती. शिक्षण घेत असताना प्रत्येक आजाराच्या निदानात ‘अहितकर आहार-विहार, भूक नसताना जेवणे’ या गोष्टी फारशा पटायच्या नाहीत. पुढे रुग्ण प्रत्यक्ष हाताळताना मात्र हे पदोपदी पटत गेले. ‘रोगा: सर्वेपि मंदाग्नौ’ या सूत्राला अनुसरून ‘लंघन, दीपन-पाचन आणि अनुलोमन’ या चिकित्सा पद्धतीचा अवलंब चिकित्सेत यश देऊ लागले. कोरोनाच्या प्रकारातदेखील हेच सूत्र महत्त्वाचे ठरले. आजारपणात पेज, कढण, अगदी पातळ मूग-तांदळाची खिचडी असे पचायला सोपे पदार्थ metabolismवरचा भार हलका करतात. अग्नी वाढवणारी आणि वाढलेल्या दोषांचे पचन करणारी औषधे लक्षणे कमी करतात आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ‘पाचन झालेल्या दोषांचे अनुलोमन झाल्यामुळे - म्हणजे शरीरातून ‘मल भाग’ व्यवस्थित बाहेर पडल्याने स्वास्थ्य लवकर लाभते, नंतरचे कुठलेही complications येत नाहीत.
 
मारायचे कुणाला आणि बरे कोणाला करायचे?
काही शास्त्रांच्या मते आजार infectionsने होतात, पण infections कशाने होतात? या प्रश्नांच्या उत्तरातील तफावत कळली, म्हणजे चिकित्सा कोरोनावर करायची की आणखी कशावर, ते कळते. कुठल्याही ‘जिवाची’ अस्तित्वाची लढाई चालूच असते. अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी वाढीस अनुकूल असे वातावरण आवश्यक असते. हे ‘अनुकूल’ वातावरण नष्ट करणे हेच या प्रकारात म्हत्त्वाचे ठरते. कोरोनाच्या वाढीसाठी शरीरात असलेली अनुकूलता नष्ट केली की त्याची वाढ थांबून त्याचे बळ कमी होते आणि लक्षणे बरी होतात. बिघडलेली पचनसंस्था, साचलेला मल ही अनुकूलता ज्यांच्या शरीरात जास्त होती, त्यांना लक्षणेदेखील जास्त होती आणि बरे होण्यासदेखील काळ लागला. काही व्यक्तींना एकही लक्षण नाही, तर काहींना सौम्य लक्षणे आणि काहींना तर तीव्र लक्षणे, व्यक्तिपरत्वे हा भेददेखील जाणून घेतला तर ‘अनुकूलतेचा’ उलगडा होतो.
 
चाचण्यांची गरज
रुग्ण जेव्हा ‘त्याला काय काय होतेय’ हे सांगत असतो, त्या वेळी तो अप्रत्यक्षपणे निदानच सांगत असतो. आयुर्वेदात रुग्णाची परीक्षा (तपासणी) करताना ‘दर्शन स्पर्शन प्रश्ने’ असा विचार मांडलेला आहे. त्याचे रक्ताचे रिपोर्ट्स काय सांगत आहे यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे ‘भूक लागतेय का?, तोंडाला चव आहे का?, पोट साफ होतेय का?’ प्रत्यक्ष तपासताना त्याच्या ‘छातीच्या परीक्षणाइतकेच’ त्याचे ‘उदर परीक्षण’देखील त्यात महत्त्वाचे आहे. तिथून रुग्णाच्या यकृत, आंत्र याच्या एकूण परिस्थितीचा अंदाज येतो आणि औषधांची योजना करणे सोपे जाते. त्यामुळे रक्ताची तपासणी, फुप्फुसांची तपासणी हा भाग आमच्या चिकित्सा पद्धतीत दुय्यम ठरला. बरेचदा आधीच भरपूर तपासण्या केलेला रुग्ण आला, तरी आधी त्याचे उदर, ऊर, भुकेसंदर्भी, मलासंदर्भी प्रश्न महत्त्वाचे असायचे.


ayurveda and corona_1&nbs

सौम्य लक्षणे की तीव्र लक्षणे?
वैद्य आणि सरकार यांच्या लढ्यात अखेर वैद्यांनी ‘प्रतिकारक्षमतेवरची औषधे आणि अति सौम्य लक्षणावर’ चिकित्सा करण्याची परवानगी मिळाली, तेही मुख्य modern medicinesना साहाय्य म्हणून. हे असे काठाकाठाने पोहणे मला जमणार नव्हते. कारण एका विचाराने आपण चिकित्सा सुरू करत असतो, त्याच विचाराने ती पुढे जायला हवी. म्हणजे बघा, आम्ही वैद्य सांगणार - ‘भूक लागल्याशिवाय खाऊ नका’, तर इतर सांगणार - ‘भूक असो नसो, गोळ्या घेण्यासाठी आधी खावेच लागेल.' अशा परस्परविरोधी गोष्टीतून रुग्णाला फायदा होण्याऐवजी त्याचे नुकसान होण्याचा संभाव अधिक. अगदी घसा खवखवणे, जराशी कणकण अशी सौम्य लक्षणे असोत अथवा १०४ ताप, प्रचंड अंगदुखी, जुलाब, कमालीचा थकवा, श्वास अशा सर्व लक्षणांमध्ये ‘लंघन, दीपन-पाचन आणि अनुलोमन’ या त्रिसूत्रीमुळे उत्तम रिझल्ट मिळत गेले.
 
खोकला ते न्युमोनिया प्रवास
एरवीदेखील ऋतू बदलला की सरदी, ताप आणि त्यानंतर खोकला हा क्रम आपल्या परिचयाचा आहे. या प्रकारात तो जरा जास्त त्रासदायक ठरतो, एवढाच काय तो फरक. नुसताच चिकट बुळबुळीत कफ सहजतेने बाहेर पडतो, पण जेव्हा त्याबरोबरच वाताचा कोरडेपणा येतो, तेव्हा ‘स्त्यान’ कफ तयार होतो, जो चिकटून बसतो. छोट्या छोट्या alveoliमध्ये असा चिकटून बसलेला कफ बाहेर टाकण्यासाठी खोकला हे लक्षण उत्पन्न होते. खोकल्याच्या कितीही प्रेशरखाली हा चिकट कफ बाहेर फेकला जात नाही आणि गोष्टी पुढे गंभीर रूप धारण करतात.

 
आयुर्वेदात कफाच्या गुणानुसार काम करणाऱ्या वेगवेगळ्या वनस्पती आहेत आणि वेळोवेळी त्यांचे कार्य दिसून आले आहे. चिकित्सा करताना अग्नी सांभाळण्यास प्राधान्य दिल्यामुळे अशा पद्धतीचा कफ रुग्णांमध्ये जास्त प्रमाणात तयार झालाच नाही आणि योग्य वेळी वाताची रूक्षता कमी करून कफाला मोकळी करणारी औषधे वापरल्यामुळे एकाही रुग्णाला न्युमोनिया झाला नाही.
Co morbid रुग्ण?
अगदी सुरुवातीपासूनच मधुमेह आणि उच्च रक्तदाब वगैरेसाठी वर्षानुवर्षे घेतलेल्या औषधांनी खंगलेल्या जिवांसाठी कोरोनामुळे ‘प्राणभय’ सांगितलेच गेले होते. तरीही संधी मिळाली आणि मधुमेह, उच्च रक्तदाब असलेल्या ६०च्या पुढच्या एका काका-काकूंवर चिकित्सा करण्याची संधी मिळाली. अंगदुखीच्या पहिल्या लक्षणापासून पूर्णत: आयुर्वेद चिकित्सा देऊन रुग्ण २ आठवड्यांत उत्तम बरे झाले आणि आत्मविश्वास दुणावला आणि पुढे अशा लेबल्ड Co morbid अनेक रुग्णांवर यशस्वीरित्या चिकित्सा केली. लंघनापासून अनुलोमनापर्यंत व्यवस्थित केलेला विचार आणि औषधांच्या उपाययोजनेमुळे कुठेही कुठलेही complication निर्माण झाले नाही.

पोस्ट कोविड अध्याय
Co morbid रुग्णदेखील जेव्हा बरे होऊ लागले, तेव्हा इतर सहकाऱ्यांनी फुप्फुसांच्या भवितव्याबद्दल सूचक वक्तव्ये सुरू केली. बरे झालेल्या रुग्णांचा पुढे महिनाभर फॉलो अप ठेवला आणि कुणातही फुप्फुसांच्या क्षमतेत काहीही बिघाड झाल्याचे लक्षात आले नाही. शिवाय रुग्णाचा दृष्टीकोन यादरम्यान पूर्णपणे बदलल्यामुळे भूक ओळखून ऋतूनुसार खाणे रुग्ण स्वत:होऊनच करू लागले आणि नंतरही स्वस्थच आहेत.
पोस्ट कोविड रुग्ण सध्या भरपूर येत आहेत, कारण infection बरे झाले आहे, पण अनेक लक्षणे मात्र शिल्लक असतात.
 
रुग्णानुभव
प्रत्येक रुग्ण एक स्वतंत्र अध्याय असतो. खूप काही शिकवून जातो. त्याच्या बऱ्या होण्याचा प्रवास एकट्याचा नसतो, आपणही त्यात अधिकाधिक समृद्ध होत जातो. रुग्णाला प्रत्यक्ष हात लावून तपासण्यासारखी साधीशी कृतीदेखील त्याचे मनोबल किती वाढवू शकते, हा अनुभव खरेच वेगळा होता. प्रत्येक वेळी मनोबल वाढवण्यासाठी केलेले अथक परिश्रम अत्यंत आवश्यक होते.
एक अत्यंत गरीब रुग्ण ताप येतोय म्हणून कुठल्यातरी जनरल प्रॅक्टीशनरकडून ३ दिवस औषध घेत होता. बरे वाटेना, म्हणून माझ्याकडे आला. तपासले, तर छातीत चांगलाच कफ भरला होता. प्राणवायू फक्त ८०.. आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची, अशा वेळी कुठले हॉस्पिटल परवडेल ते कळेना. त्याला आणि नातेवाइकांना कल्पना दिली आणि पुढच्या २४ तासांत प्राणवायू वाढला नाही, तर मात्र हॉस्पिटलमध्ये admit करावे लागेल, ते शोधून ठेवा असे सांगितले. दर दोन तासांनी औषधे चालू होती. घरच्यांनी १२ तासांनी कळवले, तेव्हा ताप पूर्णपणे उतरला होता आणि प्राणवायू ९०ला पोहोचला होता. धन्वंतरीबरोबरच रुग्णाचेही आभार मानले, कारण त्याच्यामुळे माझे पुढचे शिक्षण होऊन आत्मविश्वास दुणावला.


ayurveda and corona_1&nbs

हे खरेच इतके सोपे आहे का?
होय, व्यवस्थित विचारपूर्वक प्राथमिक लक्षणातच ‘लंघन’ करून ‘दीपन-पाचन’ औषधे घेऊन दोषांचे ‘अनुलोमन’ केले, तर हे खरोखर सहज साध्य आहे.

Evidence कुठे आहे?
सर्वात मोठा evidence म्हणजे बरा झालेला ‘रुग्ण’ हाच आहे, प्रत्यक्ष प्रमाण आहे. ज्या चिकित्सा पद्धतीचा पाया ‘औषधांच्या भौतिक गुणां'वर आहे, त्या औषधांची तपासणी chemical पद्धतीने करवून काय साध्य होणार? रक्ताच्या तपासण्या असोत, x ray असोत अथवा CT स्कॅनचे report, या parametersनुसार अनेक वैद्यांनी evidences वेळोवेळी जगापुढे मांडले आहेत. आयुर्वेदासारख्या ‘शाश्वत शास्त्राला’ आपल्याच भूमीत अशी परीक्षा द्यावी लागणे, त्यासाठी स्वतंत्र parameters नसणे यासारखे दुर्दैव नाही.

सरकारदरबारी उपेक्षा का?
याची अनेक उत्तरे असू शकतात. त्यापैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे ‘मानसिकता’. आयुर्वेद चिकित्सा ही जुनाट आजारांवर उपयुक्त आहे, बरे होण्यास खूप वेळ लागतो, ह्या गोष्टी इतक्या बिंबवल्या गेल्या आहेत की acute आजारांमध्ये आपण आयुर्वेदाला कधी प्राधान्य देतच नाही.
 
शिवाय पूर्णपणे शुद्ध आयुर्वेद शिकवणारी महाविद्यालये आणि चिकित्सा करणारी संलग्न रुग्णालये बोटावर मोजण्याइतकी आहेत. आज अशी रुग्णालये आणि शुद्ध आयुर्वेद शिकलेली वैद्यमंडळी प्रत्येक जागी असती, तर सरकारला सहज आव्हान देऊ शकलो असतो. औषधांच्या ट्रायल्समध्ये अनेक जीव गमावले गेले, पण आयुर्वेदाला मात्र हाच न्याय लागू होत नाही. त्यांनी ट्रायल करायचीच नाही, कारण त्याचा काही उपयोगच नाही, हे गृहीतच धरलेले आहे.

फलश्रुती
‘एक काठी सहज तोडली जाऊ शकते, पण अनेक काठ्यांची बांधलेली मोट तोडणे अवघड असते’. आपण हे तत्त्वज्ञान ऐकलेले असते, फक्त आचरणात येत नाही. आजच्या परिस्थितीत सगळ्यात महत्त्वाची भूमिका ‘चिकित्सकाची’ आहे. चिकित्सा पद्धती अगणित असू शकतात. राष्ट्रावर, मानवजातीवर आलेल्या संकटात सगळ्यांनी एकत्रितपणे मोट बांधली असती, तर जीवन व्यवहार कधीच सुरळीत चालू झाले असते. आज हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असली, तरी अनेक जण आत्मविश्वास गमावून बसले आहेत, मुले आज चार भिंतीत अडकून बसली आहेत. हा सगळा गोंधळ आयुर्वेदाच्या मदतीने नक्कीच कमी करता आला असता.
राजाश्रय नसला, तरी ‘लोकाश्रय’ मिळतोय. अनेक रुग्ण खूप कमी खर्चात, घरीच राहून, कुठलेही complications न येता छान बरे होत आहेत.

कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ हे ठरवत बसण्याची ही वेळ नव्हे... प्रत्येकाचा आपला दृष्टीकोन आहे, विचार आहे. ज्याला जे शक्य आहे त्याने ते करून आपली जबाबदारी उचलावी.
९७६४९९५५१७