प्रेम -जिव्हाळ्याचे नाते कांचन आणि नितीन गडकरी

विवेक मराठी    16-Oct-2020   
Total Views |

राष्ट्र प्रथम, मग कुटुंब, शेवटी मीह्या तत्त्वाप्रमाणे नितीनजींच्या 'मी'मध्ये कांचन वहिनी अलगद समावून गेल्या आहेत. नितीनजी अभाविपमधून भारतीय जनता पार्टीचे काम करू लागले. घराची, कुटुंबाची, मित्रपरिवाराची सगळी साखळी कांचन वहिनीनी बांधली, सांभाळली, वाढवली. नितीनजी व्यवसाय सांभाळून पक्षात जोमाने काम करू लागले. दोन्ही पातळ्यांवर यशस्वी झाले. त्यांचे प्रेम-जिव्हाळ्याचे नाते हे अधिक बहरत गेले आहे.

gadkari_1  H x

'घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती

 तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती'केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजींचे हे आवडते गाणे. ते म्हणतात की, "हे माझ्या बाबतीत शक्य झाले ते केवळ माझी पत्नी कांचनमुळेच."
 
 
कांचन नितीन गडकरी हे विदर्भातील लोकांसाठी परिचित, पण अन्य ठिकाणी अपरिचित असलेले नाव आणि व्यक्ती. त्या गडकरीवाडा – घर, कुटुंब, मित्रपरिवार आणि स्वतःचे कार्यक्षेत्र सोडून फारशा कुठे प्रसिद्ध नाहीत, कारण त्या स्वत:च या प्रसिद्धीपासून दूर राहिल्या. नितीनजींच्या कामात त्या जराही ढवळाढवळ करीत नाहीत. मात्र त्यांचे स्वत:चे कार्यक्षेत्र इतके विस्तृत आहे की मनात आणले तरी त्यांना नितीनजींच्या कामात लक्ष घालणे शक्य नाही, आणि तशी त्यांची मनीषाही नाही.
 
 
कांचनवहिनी एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व. पाहताक्षणी आवडणारे आणि भेटताक्षणी आपलेसे करणारे. खास वैदर्भीय मोकळेपणा, गोड आवाज आणि प्रसन्न हास्य ही त्यांची खासियत. माहेरच्या कांचन कमलाकर तोतडे. वडील डॉ. कमलाकर गोविंद तोतडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रामटेकचे संघचालक. रामटेक हे श्री गोळवलकर गुरुजींचे जन्मगाव. त्यांच्या आईंचे - म्हणजे माईंचे वास्तव्य तिथेच असे. त्यामुळे संघ पूर्णकालीन आणि अन्य कार्यकर्त्यांचे सतत येणे-जाणे असे. मा. बाळासाहेब देवरसजी सरसंघचालक झाल्यानंतर त्यांनी काम सुरू केले ते रामटेकमधूनच. त्या वेळी त्यांच्या प्रवासाचा शुभारंभ झाला ते पहिले घर होते डॉ. तोतडे यांचे. घरात हेच संस्कार. डॉ. तोतडे मिसाबंदी म्हणून तुरुंगात एकोणीस महिने काढून आले होते आणि घरातली मंडळी आणीबाणीतून तावून सुलाखून बावनकशी झालेली. आई पुष्पा तेव्हाच्या पदवीधर, पण पतीच्या राष्ट्रकार्यात तना-मनाने सहभागी झाल्या.
 
 
या वातावरणात वाढलेली कांचन शाळेत हुशार विद्यार्थिनी होती. श्रीराम विद्यालयातून दहावी झाल्यावर त्यांनी नागपूरमधील धरमपेठ महाविद्यालयातून होम सायन्सची पदवी घेतली, त्यानंतर नागपूर विश्वविद्यालयातून M.Sc. (Nutrition) प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. महाविद्यालयीन काळात कांचन विवेकानंद केंद्राच्या नागपुरातील सक्रिय कार्यव्रती होत्या. महाविद्यालयातील प्राध्यापक-गुरू विश्वास लपालकर यांच्या मार्गदर्शनाचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला. त्यांचे व्यक्तिमत्त्व फुलले. सामाजिक जाणिवा विस्तारल्या. विचारांना दिशा मिळाली. कामाला सुसूत्र वळण लागले. त्यातून त्यांचा गोड गळा. शास्त्रीय संगीतात विशारद ही पदवी प्राप्त केलेली. त्यामुळे त्या काळात परिवाराच्या कार्यक्रमात संपूर्ण वंदे मातरम म्हणण्याची जबाबदारी कांचन आनंदाने घेत. तो छंद त्यांनी मनापासून जोपासला.
 
 
लग्नायोग्य झाल्यानंतर कांचन यांच्यासाठी सुयोग्य स्थळाचा शोध सुरू झाला. नितीन जयराम गडकरी हे स्थळ आले. मुलगा वकील होता, पण वकिली करणार नव्हता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पदाधिकारी होता. मराठी मध्यमवर्गीय आईवडिलांचे मन स्वाभाविकपणे साशंक झाले. मुलगा नोकरी करत नाही? नितीनजी म्हणाले, "मी नोकरी करणारा नसून नोकरी देणारा माणूस आहे." तेव्हा नागपुरातील जुन्या आणि ज्येष्ठ कार्यकर्त्या सुमतीताई सुकळीकर यांनी या दोघांचे लग्न जुळवण्यासाठी पुढाकार घेतला.

 

नितीनजींची आई भानुताई सुमतीताईंबरोबर सामाजिक आणि राजकीय कामात सक्रिय होत्या. वडील जयराम शांत सज्जन गृहस्थ. हाडाचे शेतकरी. वडिलोपार्जित शेती आहे, ती करायचे. आपले काम बरे आणि आपण बरे या वृत्तीचे. भानुताईच्या कार्याला त्यांचा मन:पूर्वक पाठिंबा होता. परंतु नितीनजींचे लग्न ठरण्याच्या काळात दुर्दैवाने ते हयात नव्हते.
 
बघण्याचा कार्यक्रम झाला, त्या वेळी नितीनजींनी जीन्स, वरती पांढरा कुर्ता - तोही कुठेतरी फाटलेला, असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे कपडे घातलेले. एकदा कांदेपोहे आले. दुसरे वाढप झाले. नितीनजी म्हणाले, “जरा दही वाढता का?” मुलगा आढ्यतेखोर नव्हता. मनाने साफ होता. "आईला आणि वाहिनीला मुलगी आवडली असेल, मी आहे तसा मुलीला मान्य असेल तर माझा होकार आहे" असे त्यांनी सांगितले आणि लग्न ठरले.
याआधी कांचन यांनी नितीनजींना विश्वविद्यालयाच्या कार्यक्रमात पाहिले होते. ते अ.भा.वि.प.चे पदाधिकारी म्हणून प्रमुख पाहुणे होते. व्यासपीठावरून बोलताना ते बंधू आणि भगिनींनो म्हणाले. एका खट्याळ (कांचन नाही) मुलीने विचारले, "तुम्ही सर्वत्र जाता, सर्वांना भगिनी म्हणता, तर मग लग्न कसं होणार?" नितीनजी हजरजबाबी! ते उत्तरले, "तिला मी माझी मामेबहीण मानेन." जेव्हा मैत्रिणींना कळले की कांचनचे लग्न नितीनजींशी ठरले आहे, तेव्हा तिला त्या 'मामेबहीण' म्हणून चिडवू लागल्या.

gadkari_1  H x
नितीनजी पुरोगामी विचारांचे असल्याने लग्नात देणे-घेणे नको, मानपान नको अशा‌ मतांचे होते. आईच्या प्रेमाखातर काही मतांना मुरड घालून त्यांनी फक्त अंगठी आणि पोशाख स्वीकारला. कदाचित तो त्यांनी त्या दिवसापुरता अंगात घातला असावा.
लग्नापूर्वी कांचनला असे वाटायचे की आपण नोकरी करावी, पण नितीनजींनी आधीच सांगितले की "समाजकार्य कर. पण पैसे मिळवण्यासाठी पत्नीने नोकरी करणे मला मान्य नाही. त्याची आवश्यकता भासणार नाही."
लग्नापूर्वी नितीनजी कांचनवाहिनींना घेऊन एकदा अंबाझरीला फिरायला गेले. वाहिनी म्हणतात, “इतके लोक भेटले की आम्हाला एकमेकांशी बोलायला काय, एकमेकांकडे पाहायलासुद्धा वेळ मिळाला नाही! तेव्हापासून ठरवले हे फिरणे वगैरे जमायचे नाही. आम्ही दोघे एकटे असा एकही सिनेमा किंवा नाटक पाहिलेले नाही.” आणि हे सांगताना त्या त्यांच्या स्वभावाप्रमाणे खळखळून हसतात. त्यात कुठे नाराजी किंवा तक्रार नसते, तर निखळ स्वीकार आणि नितीनजींबद्दल अभिमानच असतो.
लग्नानंतर मुलीकडे मांडव परतणी आणि सत्यनारायणाची पूजा घालायचा विधी असतो. ठरल्याप्रमाणे तयारी झाली. सर्व मंडळी आली. नितीनजी आलेच नाही. तेव्हा अशी संपर्काची साधने नव्हती. शोधायचे कसे आणि कुठे? शेवटी कांचनवहिनींच्या भावाने पूजा केली. जेवणे झाली. निमंत्रिताना तीर्थप्रसाद झाला. रात्र झाली. उशिरा नितीनजी आले आणि प्रसादाचे जेवले. कांचनवहिनीने माहेरी सांगितले - हे सण, जेवण सगळे बंद.
राष्ट्र प्रथम, मग कुटुंब, शेवटी मीह्या तत्त्वाप्रमाणे नितीनजींच्या 'मी'मध्ये त्या अलगद समावून गेल्या आहेत.
 
ह्या सर्व प्रवासात वहिनींना त्यांच्या सासूबाई आणि नणंदांची पूर्ण साथ आणि पाठिंबा मिळाला. कांचन म्हणजे भानूताईची तिसरी मुलगीच झाली. सासू-सून हे नाते लोप पावून मायलेकीत पालटले. आता कांचनवाहिनींनी आपल्या दोन्ही सुनांच्या बाबतीतही तोच कित्ता गिरवला आहे, तीच परंपरा पुढे नेली आहे. या बाबतीत नितीनजी अजिबात लक्ष घालत नाहीत. फक्त नव्या ठिकाणी गेले असतील आणि वेळ मिळाला, तर तेथील प्रसिद्ध दुकानात जाऊन दहा मिनिटांत पाच-दहा साड्या खरेदी करतात आणि वहिनींना भेट देतात. त्यांना माहीत आहे, वाहिनींना साड्यांची आवड आहे.
 
नितीनजी अभाविपमधून भारतीय जनता पार्टीचे काम करू लागले. घराची, कुटुंबाची, मित्रपरिवाराची सगळी साखळी वहिनीनी बांधली, सांभाळली, वाढवली. नितीनजी व्यवसाय सांभाळून पक्षात जोमाने काम करू लागले. दोन्ही पातळ्यांवर यशस्वी झाले. तीन मुलांचे वडील झाले.
 
एकहाती मुले वाढवणे कांचन वाहिनींसाठी सोपे नव्हते. मुलांच्या शाळेच्या कार्यक्रमात, आजारपणात, वाढदिवस अशा अनेक प्रसंगी मुलांना वडील जवळ असावे असे वाटायचे. पण त्याच काळात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम सुरू होते. नितीनजी घरी येत, तेव्हा मुले शाळेत असत आणि नागपुरातील कामे उरकून घरी येत, तेव्हा झोपलेली असत. मुलांच्या मनात वडिलांविषयी आणि त्यांच्या कामाविषयी कटुता येऊ नये, यासाठी कांचन वहिनीची धडपड असे. या सर्व प्रसंगात कुटुंब, गडकरीवाड्यातील शेजारी, मित्रपरिवार या सगळ्यांची साथ लाभली. आज तिन्ही मुले आपापल्या कामात आहेत. मुलगे ‘पूर्ती’ या व्यवसायात व्यग्र आहेत. मुलगी केतकी लग्न होऊन अमेरिकेत असते.
 
हे सर्व सांभाळत असताना वहिनीनी स्वत:ची क्षमता आणि कौशल्ये अबाधित ठेवली. त्या आजघडीस रामटेकमधील श्रीराम विद्यालयाच्या अध्यक्ष आहेत. सेवा सदनच्या, मातृ सेवा संघाच्या प्रमुख आहेत. संस्कार भारतीची जबाबदारी सांभाळतात. हे सर्व करून आपली गाण्याची आवड जोपासतात. नागपुरातील सर्वांच्या लाडक्या आहेत.

gadkari_2  H x
गडकरी कुटुंबाला अनेक भल्या-बुऱ्या प्रसंगातून जावे लागले. त्या सगळ्या प्रसंगी वहिनी पहाडासारख्या उभ्या राहिल्या. मुलांना विश्वास दिला की हा सर्व राजकारणाचा अविभाज्य भाग आहे, ह्यातले काय सत्य आणि काय बनावट हे तुमच्या विचारशक्तीने ठरवा. त्याचा तुमच्या जीवनावर आणि कुटुंबाच्या एकसंधतेवर परिणाम होता कामा नये, याची काळजी घ्या.
या आणि अशा काळात वहिनींच्या आध्यात्मिक साधनेने बळ दिले. नितीनजींवरील विश्वास, कुटुंबावरील प्रेम, मित्रपरिवाराची माया कामी आली. ज्यांची सेवा केली त्यांच्या सदिच्छा आणि आशीर्वादामुळे जिवावरच्या संकटातूनसुद्धा बचाव झाला.

 
नितीनजी ‘युवक प्रतिष्ठान’च्या ‘मोतीबिंदूमुक्त मुंबई’ या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आले होते. त्यांच्या शेजारी बसण्याचे भाग्य मला मिळाले होते. त्यांचा माझ्यावर खूप विश्वास. ते माझ्याकडे स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहातात. एक कार्यकर्ती म्हणून माझ्यातील गुण हेरून त्यांनी माझ्यावर भाजपाच्या 'अन्त्योदय सेल'मधील प्रमुख मा. भजनलाल यांच्या चमूमध्ये अखिल भारतीय पातळीवर सहभागी होण्याची संधी दिली होती, त्यातून मी पूर्ण देशभर प्रवास केला. स्वयंसेवी संस्थामध्ये काम केले. राष्ट्रसेवेसाठी राजकारण. समाजाच्या उन्नतीसाठी राज्यकारभार, पं दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेल्या पंचसूत्रीतील तत्त्वानुसार अन्त्योदयाचे काम पक्ष कार्यकर्ता निष्ठेने कसे करू शकेल? याबाबत चिंतन, विचारमंथन, मार्गदर्शन आणि कार्यप्रणाली आखली. त्यानुसार देशभरातील कार्यकर्ते काम करू लागले. तेव्हा सत्ता नव्हती. या सर्वाचा उपयोग झाला. आता त्यातील अनेक मंडळी सरकारची ध्येयधोरणे घेऊन तळागाळात पोहोचत आहेत. हे सर्व काम मी सहा वर्षे केले. हे काम करायची संधी मला नितीनजींमुळे मिळाली. त्यासाठी मी व्यक्तिश: ऋणी आहेच. पण आजही माझ्या सामाजिक कामाकडे त्यांचे लक्ष असते. जन शिक्षण संस्थेच्या, युवक प्रतिष्ठानच्या कामात ते अनमोल मदत करतात. कौतुकाचा एखादा शब्द, कधी सूचना, कधी इशारा उभारी देतो. तर त्या व्यासपीठावर बसलेले असताना ते म्हणाले, “मेधा, एकाही माणसाचा डोळा खराब होणार नाही याकडे बारकाईने लक्ष दे.” कळत-नकळत केवढा विश्वास आणि जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली होती.
एकदा मी त्यांना म्हणाले होते, "जसे आपण इजिप्तमध्ये नाईल नदीच्या उगमापासून ते समुद्रात मिसळण्यापर्यत बोटीने प्रवास करू शकतो, तसा प्रवास गंगेतून हरिद्वार ते सुंदरबन करू शकू का?" त्यांनी मान डोलावली. मी फेब्रुवारीमध्ये सुंदरवनला गेले होते. नद्यांमधील 'National water-highways'चे काम महामार्गाप्रमाणेच जोरात सुरू आहे. असा प्रवास टप्प्याटप्प्यात करता येतो. जेव्हा पूर्णत्वाने शक्य होईल, तेव्हा त्यांच्याकडून निरोप येईल याची खात्री आहे, कारण जेव्हा मुंबई-मांडवा ‘रो-रो’ सेवा सुरू झाली, तेव्हा त्यांच्या कार्यालयातून मला व्यक्तिश: निमंत्रण आले होते.
आज महाल भागात नितीनजींचे घर दिमाखात उभे आहे. दोन मुलगे, सुना, नातवंडे यांनी भरलेले गोकुळ नांदते आहे. नितीनजींच्या आवडत्या गाण्यासारखेच. नितीनजी दर शनिवार-रविवारी नागपुरात येतात. रविवार संध्याकाळचा वेळ मुला-नातवंडांत रमतात. मुले मोठी होताना पाहण्याचा आनंद हुकला, तो आनंद नातवंडे मोठी होताना अनुभवतात. कांचनवहिनी त्यांच्या आवडीचे पदार्थ घरी करतात. (कांचनवाहिनींनी केलेल्या पुडाच्या वड्या आणि बरेच पदार्थ नितीनजींना खूप आवडतात.) किंवा नातवंडांच्या आग्रहाखातर हॉटेलमध्ये खातात. नातवंडे म्हणतील तसे करतात. दुधापेक्षा दुधावरची साय घट्ट आणि स्निग्ध असते शेवटी.