पू. सरसंघचालकांची मुलाखत आणि वैचारिक धुरळा

विवेक मराठी    17-Oct-2020   
Total Views |

सा. विवेकच्या 'राममंदिर ते राष्ट्र मंदिर' या ग्रंथात प्रकाशित होणारी पू. सरसंघचालक मोहनजी भागवत यांची मुलाखत ९ ऑक्टोबर रोजी विविध वृत्तवाहिन्यांवरून प्रकाशित झाली. स्वाभाविकच त्यावर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया उमटल्या. सद्य परिस्थितीमध्ये अनेकांनी आपआपल्या पद्धतीने या मुलाखतीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही समाजांतील कट्टरपंथी समूहाने घातलेल्या गदारोळाचा घेतलेला आढावा.


RSS_1  H x W: 0

ऑक्टोबरच्या ९ तारखेला देशभर विविध चित्रवाहिन्यांवरून पू. सरसंघचालक मोहनजी भागवत यांची मुलाखत प्रदर्शित झाली आणि त्या मुलाखतीवरून वैचारिक घुसळण सुरू झाली. सा. विवेकच्या 'राममंदिर ते राष्ट्र मंदिर' या ग्रंथासाठी मा. मोहनजी भागवत यांची मुलाखत करावी असे जेव्हा ठरले, तेव्हाच सद्य:स्थिती, हिंदू समाज मानसिकता आणि भविष्यकाळ यांचे सापेक्षी चिंतन वाचकांना अनुभवावयास मिळणार आहे याची खात्री होती. मा. सरसंघचालकांची मुलाखत घेताना आपण ही मुखालत कशासाठी करत आहोत याविषयी खूप चिंतन केले गेले होते. रमेश पतंगे, दिलीप करंबेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रश्न तयार केले. प्रत्येक प्रश्नमागे सा. विवेकचा हेतू काय आहे, याबाबत आमच्या पातळीवर स्पष्टता आल्यानंतर प्रश्न संघाधिकाऱ्यांना पाठवले आणि शेवटी २० सप्टेंबर रोजी महाल कार्यालयात प्रत्यक्ष मुलखात घेतली गेली. मुलाखत पूर्ण होताच लक्षात आले की ही मुलाखत गाजेल आणि संघविचाराची सुस्पष्ट मांडणी दर्शकासमोर येईल. पू.डॉ. हेडगेवार, श्रीगुरुजी, बाळासाहेब देवरस यांनी जो विचार मांडला आहे, तोच विचार मा. मोहनजी भागवत यांनी संपूर्ण मुलाखतीतून मांडला आहे. आपला समाज, संस्कृती, धर्म, युवा, महिला अशा अनेक विषयांवर पू. सरसंघचालकांनी मूलभूत स्वरूपाचे चिंतन या मुलाखतीतून मांडले आहे.


९ ऑक्टोबर रोजी विविध माध्यमांनी त्या मुलाखतीतील निवडक भाग - विशेषतः मुस्लीम समुदायाविषयी केलेले भाष्य प्रदर्शित केले,आणि देशभर चर्चा सुरू झाली. ती होणे स्वाभाविकच होते. या चर्चेतून विरोधाचे तीन प्रकारचे सूर समोर आले आहेत. त्यापैकी पहिला सूर राजकीय स्वरूपाचा आहे. त्याची गंभीरपणे दखल घेण्याची आवश्यकता नाही. दुसरा सूर कट्टर मुसलमानांच्या विरोधाचा आणि तिसरा सूर कट्टर हिंदुत्ववाद्यांचा आहे. मुसलमान समाज ज्यांना आपली मतपेढी वाटते आणि मुस्लीम समाजाने कायम मध्ययुगातच जगले पाहिजे अशी मानसिकता असणारे तथाकथित मुसलमान नेते आणि मुल्ला-मौलवी यांनी मोहनजींच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. त्यामध्ये ओवेसीसारख्या माणसाने तर मूळ भाष्य समजून न घेताच आपल्या अकलेचे तारे तोडले होते. भडकाऊ स्वरूपाचे भाषण करण्यासाठीच प्रसिद्ध असणाऱ्या काही मंडळींनी ‘मोहन भागवतांना प्रमाणपत्र वाटण्याचा अधिकार काय?’, ‘जगात भारतीय मुस्लीम सर्वात जास्त सुखी आहेत हे त्यांनी कशाच्या आधारे ठरवले?’ असे प्रश्न उपस्थित केले आहेत. ओवेसींनी मत व्यक्त करताना मुस्लीम समाजाने कायम दुय्यम नागरिक म्हणून जगावे अशी संघाची इच्छा आहे, अशा प्रकारची मुक्ताफळे उधळली आहेत.

मुस्लीम कट्टरतावाद्यांबरोबरच हिंदू कट्टरतावादीही या मुलाखतीने अस्वस्थ झाले आहेत. मुस्लीम समाजाला कायम शिव्या देत राहिले की आपले हिंदुत्व सिद्ध होते, अशी मनोधारणा असणारा एक गट हिंदू समाजात अस्तित्वात आहे. अशा हिंदूंना मा. मोहनजींनी मुस्लीम समाजाचे केलेले वर्णन आवडलेले नाही. आपला राग व्यक्त करताना ‘आता बिहार निवडणुकीच्या तोंडावर मुस्लीम समाजाचे लांगूनचालन कशासाठी करता आहात? तुम्हाला मुसलामानांचा पुळका कशासाठी? हिंदुहिताच्या विचार सोडला का? तुम्हाला झेपत नसेल तर राजीनामा द्या, मुसलमानांचे काय करायचे ते आम्ही बघून घेऊ..’ या आणि अशा अनेक प्रकारच्या टिप्पण्या सोशल मीडियावरून व्यक्त करण्यात आल्या. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारी ही मंडळी या मुलाखतीच्या निमित्ताने आपल्या शिवराळ भाषेत व्यक्त झालीच, त्याचबरोबर मुस्लीमद्वेषाचा कंडही त्यांनी भागवून घेतला. अशा प्रकारे व्यक्त होणाऱ्या हिंदूंच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच असेल. ज्यांना हिंदुत्व म्हणजे केवळ मुस्लीमद्वेष वाटतो, त्यांना समाजावून कसे सांगायचे? मुळात मुलाखतीतून मा. मोहनजी भागवत यांनी जो संदेश दिला, तो समजून घेण्याची कुवत या मंडळींकडे नाही, हेच या निमित्ताने समोर आले आहे.

मोहनजी भागवत यांनी एकशे तीस कोटी भारतीय अशी संकल्पना मांडताना जगाच्या परिप्रेक्ष्यात भारतातील मुसलमान अधिक सुखी-समाधानी आहेत, याविषयी सविस्तर मांडणी केली आहे. मोहनजींनी मुस्लीम समाजाबाबत विचार मांडताना हिंदू-मुस्लीम सांस्कृतिक ऐक्याचा विषय अधोरेखित केला आहे. दोन्ही समाज वेगवेगळ्या धर्मांच्या नावाने ओळखले जात असले, तरी त्यांची सांस्कृतिक ओळख एकच आहे. ही ओळख जसजशी ठळक होत जाईल, तसतसा मुस्लीम भारतीय होण्याचा वेग वाढेल, भविष्यात या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत, अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली आहे. धार्मिक ऐक्य नव्हे, तर सांस्कृतिक ऐक्य वाढीस लावणे आणि आपसातील ताणतणाव कमी करणे ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी इस्लाम समजून घेतला पाहिजे. भारताबहेरचा इस्लाम वेगळा आहे आणि भारतातील आणि म्हणून इस्लाम समजून घेण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली पाहिजे, हेच या निमित्ताने मा. मोहनजी भागवत यांना सुचवायचे आहे.

‘राममंदिर ते राष्ट्र मंदिर’ हा ग्रंथ लवकरच वाचकांच्या हाती येईल आणि एकूण हिंदू समाजाला दिशादर्शन करणारे मोहनजींचे विचारपाथेय वाचकांच्या हाती येईल. तोपर्यंत विविध प्रसारमाध्यमांनी आणि वृत्तपत्रांनी केलेला मोहनजींच्या मुलाखतीचा विपर्यास आणि त्यातून उडालेला वैचारिक धुरळा यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करू या.